उत्कृष्ट व लोकाभिमुख काम केल्यास सन्मान आणि कौतुकाची थाप मिळतेच. आणि ती मिळायलाच पाहिजे, यात काहीच दुमत नाही. मात्र, काहीच ध्यानी-मनी नसताना व कशाचीही अपेक्षा न बाळगता केवळ दुसऱ्याच्या जीवनात आनंदाचे चांदणे फुलविण्यासाठी सतत खटाटोप करणाऱ्या व्यक्तिमत्वाला सन्मानित केल्यास मन प्रफुल्लित होणारच. हीच बाब उस्मानाबादचे तहसीलदार (महसूल)प्रवीण पांडे यांच्याबाबत घडून आली. महसूल दिनाचे (1 ऑगस्ट)औचित्य साधून अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांना सन्मानित केले. उत्कृष्ट काम केल्याची पावती म्हणून प्रवीण पांडे यांनाही सन्मानित करण्यात आले. सन्मान झाला छान वाटलं. पण,
प्रवीण पांडे म्हणजे महसूल विभागातील आगळंवेगळं व्यक्तीमत्त्व. महसूल विभागात आदराने घेतलं जाणारं नाव. आदरयुक्त दरारा ते प्रेमळतेचा अथांग सागरच.महसूल विभाग म्हटलं की, केवळ काम आणि कामच. कधीही विरंगुळा नाही. सतत कोणत्या ना कोणत्या कामाचा मारा सुरुच असतो.त्यात कामातूनच विरंगुळा मिळवून लोकांची कामे झटपट कशी मार्गी लागतील, यावर त्यांचे लक्ष असते.हीच बाब हेरून लोकांची कामे लवकर आणि वेळेत करण्यावर प्रवीण पांडे यांचा भर असतो. नागरिकांना ठोस आश्वासन नका देऊ, तर ती कामे उरकवूनच मोकळा श्वास घ्या, असा त्यांचा मानस असतो. महसूल म्हटलं की, रुक्ष क्षेत्र. त्यातील बरेच अधिकारी असे आहेत की, जमिनीशी नातं कामापुरतं. प्रवीण पांडे याला अपवाद. ते महसूली कामात अग्रेसर आहेतच, यात काही दुमतच नाही. परंतु, संवेदनशीलतेतही ते ‘प्रवीण’च ठरतात!’विकायला आज,निघालो मी व्यथा…जुनी माझी कथा,कोण घेई?’ असे कविवर्य ग्रेस यांनी लिहिले. पण, प्रवीण पांडे अनेकांच्या डोळ्यातील व्यथा जुनी असो वा नवीन त्याला वाचून त्यावर फुंकर घालण्याचे काम करतात. हल्लीच्या स्वार्थी युगात माणुसकी लोप होत आहे, असं आपण बहुतांशी बोलत व बघत असतो. असं असतानाही मनाला आल्हाददायक अनुभव येतात. त्यापैकी अर्थातच माणुसकीचा ओलावा अजूनही झिरपत ठेवणारे नाव प्रवीण पांडे आहे, हे नक्कीच!
सोयगावला दिले ‘वैभव’
औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुका तसा दुर्लक्षित आणि अतिदुर्गम. एकीकडे जळगाव तर दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्याच्या सीमा आहेत. एखादा शेतकऱ्याला तहसीलला काम असल्यास 80 ते 90 किलोमीटर अंतर कापून सोयगाव गाठावे लागते. सोयगावला पोहचण्यासाठी शेतकऱ्यांची होणारी ससेहोलपट, खर्च होणारा वेळ आणि पैसा, या सर्व बाबी तहसीलदार प्रवीण पांडे यांना प्रचंड वेदना देत असायच्या. त्यावर मात म्हणजे ‘माझा तलाठी हा सजेवर असावा आणि तेथूनच शेतकऱ्यांची कामे व्हावी’असा आग्रह प्रवीण पांडे सोयगावला तहसीलदार असताना त्यांचा होता. यात ते बऱ्यापैकी यशस्वी झाले. चाळीसगाव, कन्नड जवळील मोहळाई असो किंवा बुलढाणा जवळील सावळदबारा असो, तेथील शेतकरी प्रत्येक कामासाठी तहसीलला दिसायला नको, याकडे त्यांचे विशेष लक्ष असायचे. ‘इतक्या दुरून येणाऱ्या नागरिकांचा त्रास फारच क्लेशदायक आणि हृदयाला पिळवटून टाकतोय’, अशा शब्दात प्रवीण पांडे आपले मत व्यक्त करायचे.सोयगाव तालुका अतिदुर्गम असूनही झटपट होणारी कामे, त्यांना तहसीलदार, तलाठी मंडळीकडून मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन नागरिकही आनंदी व्हायचे. कोरोना काळात तर प्रवीण पांडे यांनी उल्लेखनीय काम करून तालुक्यातील नागरिकांची विशेष खबरदारी घेतली होती. प्रवीण पांडे यांची होणारी तळमळ एकप्रकारे सोयगाव तालुक्याला वैभव मिळवून देणारी ठरली होती.
काटेरी अन गोडही
पाहायला गेलो तर वरून फणसासारखे काटेरी पण, फणसात जसे गोड गरे असतात तसा हा माणूस आतून गोड आहे. हे काम नाही झालं, ते का रेंगाळलं, याकडे त्यांचे लक्ष असते. तहसीलदार म्हटलं की, कामाचा ताण न विचारलेलाच बरा. एक काम आटोपलं की दुसरं माथ्यावर आहेच. तरीही, नियोजन असेल तर काहीच अवघड नाही, हे त्यांनी दाखवून दिले आहे. कित्येकांना त्यांनी विविध योजनेचा लाभ मिळवून दिलाय. दिन-दुबळ्यांसाठी तर कणाच.शेवटच्या घटकापर्यंत आपली यंत्रणा कशी पोचेल, तेथील नागरिकांना त्रास व्हायला नको, यासाठी सतत कर्मचाऱ्यांसोबत समन्वय ठेवणे.प्रत्येक कर्मचाऱ्यांसोबत वैयक्तिक चर्चा. ते कित्येकदा रागावले आणि कितीही कडक शब्दांत बोलले तरी नंतर ते प्रेमही तितकेच करायचे. अर्थात त्यांना आपल्या सहकाऱ्यावर चिडल्याचे दुःख प्रचंड व्हायचे. ‘ते तसेच बोलणार’ हे काहींनी आधीच गृहीत धरलेले असायचे. ते रागावून बोलले तरी दुसऱ्या क्षणाला राग विसरून कामात रमायचे. मग जणू काही असे घडलेच नाही, अशा आविर्भावात समोरची व्यक्ती त्यांच्यासोबत गप्पा मारायची. प्रवीण पांडे हे व्यक्तिमत्त्व तसे कुणालाच सर्वार्थाने उमगणारे नाही.त्यांच्यातील पडद्यामागे राहून काम करणारा सामाजिक कार्यकर्ता हा अनेकांना अनुभवता आला. कोणतेही काम असो, कुणाला मदत असो किंवा अन्य कोणतीही समस्या असो, तेथे धीरमय शब्दच नव्हे तर एक वडिलधाऱ्याप्रमाणे आधारवड म्हणून भक्कमपणे ते आजही उभे असतात. त्यांच्या गतिशील कार्यातून अशीच निरंतर व अविरतपणे जनतेची सेवा व्हावी, हीच अपेक्षा.
कास सामाजिकतेची
सतत खटाटोप करून अमुक विधायक कार्य करायचं तर, तमुक ठिकाणी जाऊन गरिबांना न्याय देण्यासाठी जीवाचं रान करण्याची जिद्द त्यांच्यात दिसते.डोळ्यासमोर केवळ आणि केवळ कामच ठेवून कूच करायची, असा निर्धार करून अनेकांचे मार्गदर्शक असणारे तहसीलदार प्रवीण पांडे. यापूर्वीही त्यांचा सन्मान झालेला आहे. पर्यावरण आणि सामाजिक कार्याची त्यांना विशेष आवड. स्वतः हुन पुढाकार घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासणे.चुकीच्या कामासाठी कोणी कितीही दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तरीही आपली तत्व डगमगू नये, अशी खुणगाठ त्यांनी बांधली आहे. मात्र, एखादा कामातून कोणाचं जीवन सुजलाम-सुफलाम होत असल्यास त्याच्यासाठी दहाही दिशा पिंजून सुकर मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशीलही तितकेच, अशा सामाजिक व दूरदृष्टी व्यक्तिमत्वाला मानाचा मुजरा.
नितळतेचा झरा
पारदर्शक कारभारासाठी प्रवीण पांडे यांचा अतोनात प्रयत्न असतो. केवळ शासकीय कामातच ते ‘प्रवीण’ नाहीत.तर, सामाजिक कामालाही ते तितकेच प्राधान्य देतात. लोकांच्या कल्यानासाठी सदैव धडपड त्यांच्यात दिसते.ही आणि अन्य बाबी अर्थात त्यांच्या जमेच्या बाजू आहेत.कोणत्याही चुकीच्या गोष्टीला वाव द्यायचा नाही. एखादी चूक झाली तर संबंधिताला सांभाळून त्यातून सुखरूप बाहेर काढण्यासाठीही त्यांचा पुढाकार असतो. काम वेळेवर न झाल्यास कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर कधी रागवायचे, कधी चिडायचे, तर कधी प्रचंड संताप व्यक्त करायचे. पण, त्यातून कुणाचेही नुकसान होणार नाही, याकडेही कटाक्षाने लक्ष द्यायचे. अधिकाऱ्यांजवळ मागे-पुढे करणारे खूप असतात. पण,संबंधित व्यक्तीच्या कामाला प्राधान्य द्यावे,फावला वेळ माझ्या मागे व्यर्थ घालवू नये, असेही ते सहकाऱ्यांना सांगत असतात.सामान्यांचे कोणतेही काम आपल्यामुळे थांबू नये, या उद्देशाने निरंतर प्रयत्न त्यांच्याकडून पाहायला मिळालेत. असे त्यांचे कितीतरी किस्से सांगता येतील, ज्यातून अनेक शेतकऱ्यांची चुटकीसरशी रीतसर कामे त्यांनी केली. त्यांची यात धावपळ, संताप, चिडचिड व्हायची आणि ते होणारच. पण, सामान्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून ते तृप्त व्हायचे. कोणताही शासकीय कर्मचारी-अधिकारी प्रत्येकाला समाधानी करू शकत नाही. मात्र, आपल्या परीने प्रयत्न करून त्याला मार्गदर्शन करता येते, हे ते नेहमीच सांगतात. पारदर्शी कारभारासह प्रयोगशील व तितक्याच नितळ मनाचा आणि मूल्यनिष्ठ जपणारा अधिकारी आहे. प्रशासकीय कौशल्य, जनतेशी जुळलेली नाळ, कामाची हातोटी, अंगी असलेली तत्परता अशा व्यक्तिमतत्वाला आगामी काळासाठी खूप-खूप शुभेच्छा.
— मंगेश दाढे, नागपूर
Very good & balanced writing ????