नवीन लेखन...

संधीचं सोन! – Part 3

‘अग, पण हे चांगलं आहे का? मतदानासाठी लाच? छे, छे, मला नाही पटत.’

‘अहो, आपण काही फुकट नाही घ्यायचं, पैसे देऊ त्यांना. आपल्याकडे मनुष्यबळ नव्हते म्हणून तर आपण घरच्याघरी करणार होतो ना? मग त्यांना संधी द्यायची तशी आपणही थोडी संधी साधली तर का बिघडलं?’

‘चल, तूम्हणतेस तर घेऊ संधी. पण काही ओळख ना पाळख, काही घोटाळा ना होवो म्हणजे झालं. माझंतर बी.पी. आत्ताच वाढायला लागलंय असं वाटतंय.’

‘हे पहा, आता कसला विचार करु नका. आता डबे येतील. गरम गरम खाऊन घ्या. औषध घ्या आणि पडा.’

‘डबे? म्हणजे स्वैपाक नाही? आणि कोण आणणार डबे?’

‘अहो, तो बाळाभाऊच पाठवणार आहे. म्हणाला आज घरी काही करु नका. एकदम आरामात होऊ द्या.

‘बरं पण ही तायडी आणि बबडी कुठेय? तिचा साखरपुडा आणि दोघीही गायब?’

‘अहो, असं काय करताय? दोघी सकाळीच नाही का गेल्या फेशियलसाठी ब्यूटिपार्लरमधे? आपण खूप साधेपणाने करायचं ठरवलं पण पोरींना वाटतं थोडी हौसमौज करावी.’ तेवढ्यात एक माणूस दोन मोठे डबे, पेपर डिशेस, ग्लास, अर्धा डझन बिसलेरीच्या बाटल्या घेऊन येतो. म्हणतो, ‘बाळाभाऊंनी पाठवलंय. जेवण करून घ्या. मी उद्या सकाळी येऊन डबे घेऊन जाईन.’ एवढे म्हणून तो गेला सुद्धा. डबे आल्याचे पहाताच राधाक्कांची खात्री पटली. मग त्यांनी भजनी मंडळाच्या बायांना फोन करून निरोप दिले. शेजारच्यांनाही निरोप गेले, तेवढ्यात तायडी आणि बबडी आल्याच. आल्या आल्या बबडी म्हणाली,

‘हे हो काय आई-अप्पा? आम्हाला म्हणालात घरच्याघरी करू साखरपुडा. मी चांगली म्हणत होते की तुम्हाला दगदग नाही सहन व्हायची तर मी करते सगळं मॅनेज, तर म्हणे, अगं तुझी पोरीची जात. असं पुढं पुढं करणं शोभत नाही. आणि आता आम्हाला काहीच न सांगता…… हे काय चालवलंय तुम्ही?

‘अग, आल्या आल्या काय तोंडाचा पट्टा फिरवतेस? काय झालं काय एवढं चिडायला?’

‘झालं काय? अग येताना आम्ही त्या ताई हॉलवरून आलो तर तिथं मोठी पाटी! भोळे-बेणे साखरपुडा. वेळ संध्याकाळी सात ते दहा. गेट फुलांच्या माळांनी सजवलेले! गेटपासून हॉलच्या पायऱ्यापर्यंत लाल गालिचा. आत हॉलच्या सजावटीचे काम चालू हा, हा काय प्रकार आहे?’

‘अग हो, हो हो. जरा शांत हो. सगळे सांगते. चला, आधी हातपाय धुवून या. हे डबे आलेत, जेवण करु आणि जेवता जेवता मी सांगते सगळं रामायण.’

जेवता जेवता राधाकांनी सकाळी आलेल्या घाशीराम कोतवाल छाप टोळीची गोष्ट सांगितली. त्यांनी संधीचं सोनं करायची गोष्ट काढली, मग मीही विचार केला, चला आपणही साधावी ही संधी.”

‘वा! तायडे, चांगला मुहूर्त शोधलास हा साखपुड्यासाठी!”बबडी.

‘हो, हो आता लग्नासाठी तुझ्या साखरपुड्याचाच मुहूर्त पहाते हो!’ सगळे हसतात.

जेवण आरामात करून मंडळी चार वाजता मतदानाला रवाना झाली. मतदान करून भोळे कुटुंब घरी आले. बाकी सगळे गेले साई दर्शनाला. सोसायटीच्या गेट बाहेर फुलांनी सजवलेली एक दहा बारा आसनांची व्हॅन उभी होती. बाळाभाऊही तिथेच तयार होते. पाहुणे येताच त्यांना घेऊन व-हाड हॉलवर पोहोचलं. खाली उतरताच जावईबापूंवर फुले उधळली गेली. नवी विटी, नवा दांडू, म्हणजे नवीन दांडू पक्षाची महिला ब्रिगेड स्वागताला सज्ज होती. आल्या आल्या बबडी पण त्यांच्यात सामील झाली. इतकेच नाही तर पुढे सर्व कार्यक्रमाचा ताबाच बबडीने घेतला, दणक्यात समारंभ झाला. मस्त बुफे पार्टी आणि त्यानंतर भजनी मंडळाचा छोटासा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचा शेवट बबडीनेच एका गोड भजनाने केला. स्वतः कुमारसाहेब शेवटी शेवटी आले होते. व्याही मंडळींना स्पेशल टॅक्सीने त्यांच्या घरी पाठवून मंडळी घरी परतली.

दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी दारावरची घंटा वाजली. राधाक्कांनीच दार उघडले. दारात केदार – राहुल आणि दोघांच्या बायका!

‘अरे तुम्ही? तुम्ही थेट लग्नालाच येणार होता ना? आणि आलात ते आलात मग कालच नाही का यायचं? कालच झाला साखपुडा!’

‘अगं, त्यांना आत तर येऊ दे. प्रवासाने थकले असतील ते! या रे या, आत या.’ राधाक्का दरवाजा लावू लागल्यात.

राहूल म्हणतो, ‘आई, दरवाजा जरावेळ उघडाच राहू दे. त्या वॉचमनला सांगितलंय सामान वर आणायला. अगं, आम्ही काल सकाळीच येणार होतो. तुम्हाला आश्चर्यचकित करणार होतो पण आमचं विमानच उशिरा आलं. पण साखरपुडा खूप दणक्यात झाला म्हणे!’

‘तुम्हाला कुणी सांगितलं?’

‘अगं, खालीच देशपांडे आजोबा भेटले, त्यांनी.’

‘अरे, त्याची एक गंमतच झाली. आमच्या पन्नास मतांची किमया होती ती!’ ‘अरे हो ना. काल एका नव्या पक्षाचे लोक आले होते मत मागायला. म्हणाले, आम्हाला एक संधी द्या. मी म्हणाले, देऊ हो, पण आम्हाला कधी संधी मिळणार?’

‘म्हणजे? कसली संधी?’

‘अरे, आपण मतदान करून त्यांना निवडून यायची संधी देणार मग आपल्या मतांच्या किंमतीचे सोने करायची संधी आपण का सोडायची?’

‘म्हणजे आई, आपल्या मतांच्या बदल्यात साखरपुडा? ही लाच मागणेच झाले !’ ‘अरे कसली लाच? आपण सगळा खर्च देणारच आहोत. आपल्याकडे मनुष्यबळ नव्हतं, तेवढी त्यांची मदत घेतली.’

‘आई, तुझी पण कमालच झाली हं.’ केदार.

इतक्यात दरवाजात स्वतः कुमारसाहेब आणि त्यांची टोळी प्रगट होते.

‘अरे या या या. कुमारसाहेब आपण तर कमालच केलीत कालचा समारंभ तुमच्या या मंडळींनी फार दणक्यात केला. तुमचे फार उपकार झाले.’

‘अहो उपकार कसले? शिवाय सगळा खर्च म्हणे तुम्ही देणार आहात, मग झाले तर! झाली फिट्टंफाट!

‘फिट्टंफाट? ती कशी?’

‘अहो, मी निवडून आलो आणि तेही फक्त किती मतांनी माहीत आहे?’

‘किती?’

‘फक्त पन्नास मतांनी! म्हणूनच तर आलोय राधाक्कांचे आशीर्वाद घ्यायला आणि एक विनंती किंवा मागणी म्हणा, मागायला!’

‘आता आणखी कुठली संधी मागायला आलात?’

‘राधाक्का, आशीर्वाद द्या आणि तुमच्या बबडीचा हात आमच्या हातात घ्यायची संधी द्या.’

‘काय सांगताय? अहो, पण बबडीला विचारायला हवे ना? काय बबडे? तुझं काय म्हणणं आहे?’ बबडीने खाली नजर करत अंगठ्याने गालिचा उकरायला सुरवात केली. ‘अग पुरे पुरे. त्या गालिच्याला भोक पडेल अशानं! म्हणजे तुझीही संधीचं सोनं करायची इच्छा आहे तर?’ गोविंदराव.

सगळे हसायला लागतात.

–विनायक अत्रे

विनायक रा अत्रे
About विनायक रा अत्रे 91 Articles
श्री विनायक अत्रे हे महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त मुख्य वास्तुविशारद (Retd Chief Architect) आहेत. हास्यनाटिका, कथासंग्रह, काव्यसंग्रह तसेच विविध मासिके, नियतकालिके आणि दिवाळी अंकांतून त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांनी बालगोपालांसाठी अनेक पुस्तके, एकांकिका वगैरे लिहिल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..