नवीन लेखन...

संधिप्रकाशातील सावल्या – २ : येऱ्हवी जग हे कर्माधिन…

” – मी सांगितलेलं ऐकलं नाहीत तर हात छाटून टाकीन .”

राजानं सभोवार पहात गर्जना केली आणि दरबारातील सगळे भीतीनं थरथर कापू लागले .

” घाबरायला काय झालं ? मी काय , मुंडकं मारून टाकीन , असं नाही म्हणालो अजून . मला घाबरता कशाला ? मी काय राक्षस आहे की हैवान ? मी प्रेमानं सांगतोय , काय , समजतंय ना ? चेहरा कसा हसरा पाहिजे . चला माझ्यासमोर हसतमुखाने उभे रहा .”
राजानं दरडावलं .

दरबारातील सगळे अभ्यागत चेहऱ्यावर हसू आणू लागले .

आता तर ते भयंकर केविलवाणे दिसत होते . भीतीनं शरीर लटलटा कापत होतं . घाम आल्यामुळं कपडे भिजले होते . उसनं अवसान संपून आता त्याची जागा , भविष्यातल्या चिंतेनं घेतली होती आणि प्रत्येकजण डोळ्याच्या कोपऱ्यातून सुटकेचा मार्ग शोधत होता . पण सर्वत्र कडेकोट बंदोबस्त होता . क्रूर शिपाई जागोजाग उभे होते .

” ही तर हुकूमशाही झाली .”
– अभ्यागतांच्या घोळक्यातील एका कोपऱ्यातून क्षीण आवाज आला .

” कोण बोललं हे ? त्याला पुढं आणा आणि त्याच्या उजव्या हाताची सगळी बोटं छाटून टाका .”

पुढच्या क्षणी आसमंत भेदून जाईल अशी किंकाळी ऐकू आली आणि पांढऱ्याशुभ्र रुजाम्यावर रक्ताची चिळकांडी उडाली . पाच बेवारस बोटं तडफडत खाली पडली .
तो क्षीण आवाज बेशुद्ध होऊन खाली पडला .

क्षण दोन क्षण तसेच गेले आणि अभ्यागतांच्या घोळक्यातील मागच्या भागात उभ्या असणाऱ्या एकाने टाळ्या वाजवायला सुरुवात केली . त्याला शिपायांनी पकडले आणि राजासमोर आणले .
” टाळ्या का वाजवतोयस ? ” राजाने विचारलं .
” तुमच्या शिपायाचं आणि पर्यायानं , तुमचं कौतुक करायला .”
अजूनही तो टाळ्या वाजवत होता .
राजा त्याच्याकडे बघत राहिला .
” तुला भीती नाही वाटली ? आणि आमचं कौतुक करणारा तू कोण ? ”
” भीती ? आणि तुमची ? मुळीच नाही वाटली भीती . तुम्ही आमचे पोशिंदे . या पृथ्वीवर सूर्यानंतर चमकणारे , प्रेरणादायक , गुणग्राहक आणि ज्यांचं साम्राज्य , पृथ्वीच्या अस्तापर्यंत टिकून राहणार आहे, असे महान राजे आपण आहात . आणि कौतुक कशाकरता वाटलं की ज्या राजाचा शिपाई बोटं छाटताना इतक्या कलात्मक रीतीनं छाटतो , पांढऱ्याशुभ्र रुजाम्यावर तुटलेल्या बोटांची आणि सांडलेल्या रक्ताची अप्रतिम , अजरामर , विलक्षण देखणी कलाकृती तयार होते . तो राजा यासगळ्यात किती आणि कसा निपुण असेल , या विचारानं कौतुक वाटलं . क्षमस्व राजन , मी खूपच बोललो .”
” काही हरकत नाही . आणि तसंही योग्य तेच बोललात . त्यामुळं आम्ही आपला सन्मान करू इच्छितो . कोण आहे रे तिकडे ? एका तबकातून लेखणी घेऊन या आणि सहस्त्र सुवर्णमुद्रा पण घेऊन या .”
पुढच्याक्षणी राजाच्या शुभहस्ते त्या अभ्यागताचा सत्कारसोहळा संपन्न झाला .
” यापुढं नुसतं बोलू नका , लिहीत राहा , तुमचा यथोचित गौरव होत राहील . प्रधानजी सर्व अभ्यागताना सन्मानाने परत पाठवा आणि बोटं तुटलेल्या त्या अभ्यागताला , राज्याच्या सीमेबाहेर फेकून द्या .”

अश्वत्थानं गोष्ट संपवली आणि सावलीत बसलेल्या त्या तरुणाकडे पाहिलं .
त्याच्या डोळ्यातून पाणी वहात होतं .

नेहमीप्रमाणं संधिप्रकाशातील सावल्या घनदाट होऊ लागल्या होत्या . सगळी झाडं , क्षितिजाकडे नजर रोखून सूर्य अस्ताला जाण्याची वाट पहात होती .

” या संधिप्रकाशाला थांबवता आलं असतं तर बरं झालं असतं .”
खूप वेळानं तो तरुण बोलला .
” कशासाठी ? ”
” राजाची गोष्ट पूर्ण ऐकायला मिळाली असती .”
” ती पूर्ण होणारी गोष्ट नाही . ती वर्षानुवर्षं , पिढ्यांपिढया चालू राहणारी चिरंतन गोष्ट आहे . डोळे उघडे ठेवून पाहिलंस तर तुला ती गोष्ट किती धारावाही आहे हे जाणवत राहील . त्यासाठी संधिप्रकाश थांबवण्याची गरज नाही . संधिप्रकाश गेल्यानंतरसुद्धा उभी असणारी झाडं , तुला मदत करू शकतात .”
” हे थोडं अवघड आहे समजायला .”
” हो , मान्य . पण विचारांती पटेल मी काय बोलतो आहे ते. पण गोष्ट ऐकताना तुझ्या डोळ्यात पाणी का आलं ? ते नाही समजलं. ”
” मला वाटलं ती गोष्ट माझ्या रक्ताशी जुळते आहे . माझ्याकडे लेखणी आहे , कागद आहेत , वेळ आहे आणि थोडीफार प्रतिभाशक्ती सुद्धा आहे . पण काही लिहायला लागलो की शब्दच संपून जातात . शब्द सापडले तर ते अर्थहीन होतात . अर्थासह शब्द सापडले तर अनुभव थिटे पडतात . आणि मग नैराश्य येतं . म्हणून डोळ्यात पाणी आलं . ”

वरून दोनचार पानं , काही फुलं त्याच्यावर ओघळली .
त्याला वाटलं , कुणीतरी सांत्वन करतंय आपलं .

” तुम्हा तरुणांचं काय चुकतं महित्येय ? ”
अश्वत्थ सळसळला .
” तुम्हा सर्वांना, तीनशे पासष्ट पानांचं , तीन खंडात पसरलेल्या बारा प्रकरणांचं पुस्तक माहीत नाही . त्यामुळं तुमचे अनुभव थिटे पडतात . मग काहीतरी लिहायचं म्हणून लेखन करता .”
” हे कसलं पुस्तक ? माझ्या पाहण्यात नाही आलं अजून . ”
” पुन्हा चुकतोयस . तू नित्य पाहतोयस , पण मी म्हणतो ते हेच पुस्तक , हे तुला माहीत नाही . तीन खंडांच्या पुस्तकातील तीन खंड म्हणजे तीन ऋतू , बारा प्रकरणे म्हणजे बारा महिने आणि तीनशे पासष्ट पाने म्हणजे वर्षाचे सगळे दिवस . या सगळ्या पुस्तकातला निसर्ग कधी वाचलास तू ? कधी अनुभवलास तू ? डोळे उघडे ठेवून त्याचे विभ्रम , त्याचं सौंदर्य , त्यातलं नावीन्य , त्यातली अपूर्वाई , त्यातले रंग गंध …आणि त्यात मिळून मिसळून गेलेला माणूस , त्याची वर्तनप्रेरणा, त्याचं विश्व , हे अनुभवलंस तू ? तर त्याचं उत्तर नाही असंच आहे . बरोबर ना . मग तुझ्या लेखनात अनुभवाधिष्ठित ताजेपणा , सकसता कुठून येणार ? आणि तुझं नैराश्य जाणार तरी कसं ? ”
” खरं आहे तुझं बोलणं . मी त्यात कमी पडतो हेही खरं आहे . पण जे लिहितो किंवा लिहिण्याचा संकल्प करतो ते समाजाला रुचत नाही . त्याची दखल कुणी घेत नाही . मानधन , मानसन्मान नकोच मला . उलट हेटाळणीच जास्त वाट्याला येते . मग माझ्याच प्रतिभाशक्तीवरचा माझा विश्वास उडतो . आपली लेखनाची , तत्वज्ञानाची , संस्कृतीची विशाल परंपरा पेलवत नाही . मग भीती वाटते . भीती वाटते सर्व संपून जाण्याची . भीती वाटते अस्तित्व नष्ट होण्याची . फार फार भीती वाटते …”

तो आतून पूर्ण कोरडा झाला .

त्याला काय म्हणायचं आहे हे अश्वत्थाला कळलं . आत्ता याला सावरलं नाही तर हा उद्ध्वस्त होईल याची त्याला जाणीव झाली . पुन्हा पानं सळसळली . एक शीतल झुळूक तरुणाच्या सर्वांगावरून फिरली . त्याला बरं वाटलं .

” हे बघ , तुला मी मघाशी गोष्ट सांगितली , ती तुझ्याशी नातं सांगणारी असं तुला वाटलं . पण मला नाही पटलं . गोष्ट सांगण्याचा हेतू वेगळा होता माझा . फार प्राचीन काळापासून आजपर्यंत समाजात असेच लेखक जिवंत राहिले आहेत , जे बलदंडाना शरण जातात . त्यांना हवं तसंच लिहितात . त्यातून मिळणाऱ्या मानसन्मानाच्या तुकड्यावर समाधानी राहतात . त्याचा उपयोग करून समाजात पत कमावतात . स्वतःचं घर भरतात . स्वतःची आवडनिवड बाजूला ठेवून शब्दांशी , प्रतिभाशक्तीशी व्यभिचार करतात . लांगूलचालन करतात . आपल्या लेखननिष्ठा विकतात , केवळ चार पैशांच्या बदल्यात . आणि मिळवतात आंतरराष्ट्रीय मानसन्मान .मिरवतात परदेशातील कौतुक सोहळे . आपल्या देशाच्या संस्कृतीचे , तत्वज्ञानाचे , प्राचीन परंपरांचे , गरीबीतील स्वाभिमानाचे , औदार्याचे आणि मानचिन्हांचे धिंडवडे काढतात , आपल्या लेखणीच्या जोरावर . उथळपणे लिहून लक्तरे टांगतात परदेशातील प्रसिद्धीमाध्यमातून. आणि इथे आपल्या देशात त्याची अवास्तव भाषांतरे मिरवतात पांढऱ्यावर काळे करून .”

अश्वत्थाची सळसळ खूप वाढली होती . कदाचित त्याचं वादळात रूपांतर झालं असतं , इतका संताप त्याच्या सर्व शाखात भरून राहिला होता .

” याला उपाय …? ”
न राहवून तरुणाने विचारले .

” तुमच्या लेखणीला आत्मबळ द्या . त्या लेखणीशी प्रामाणिक राहा . जे घडतंय तेवढंच न मांडता त्याचा अभ्यास करून त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करा . नैतिकतेला उराशी जपा . उसनं अवसान आणून दुसऱ्याच्या अनुभवांना आपलं म्हणण्याऐवजी , अनुभवांना थेट भिडण्याचा प्रयत्न करा . समोर कोण आहे याचा विचार न करता त्याच्या डोळ्यात डोळे घालून , त्याला भिडा . कुठल्याही प्रकारच्या मानसन्मानाऐवजी आत्म्यानं दिलेला प्रतिसाद , हाच सत्कार समजा. आणि लिहीत राहा . अखंड लिहीत राहा . मनाच्या निर्भेळ आनंदासाठी लिहीत राहणं गरजेचं आहे . कुणीही बोटं छाटली तरी सत्याची साद महत्वाची असते आणि ती चिरंतन असते हे लक्षात ठेवा. ”

अश्वत्थ बोलायचा थांबला .
त्यानं खाली पाहिलं .
तो तरुण नमस्कार करण्यासाठी हात जोडून उभा होता .

आणि इतकावेळ लक्षात न आलेली गोष्ट , आत्ता त्याच्या ध्यानात आली .

केव्हा कुणास ठाऊक , पण त्या तरुणाच्या उजव्या हाताची बोटं कुणीतरी कापली होती आणि भळभळणाऱ्या रक्तानं त्याचा उजवा हात माखला होता . पण तरीही प्रचंड आत्मविश्वासानं तो उभा होता . अश्वत्थाकडे आदरानं पहात होता .

– डॉ. श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी
९४२३८७५८०६
———-
संधिप्रकाशातील सावल्या , ही कथामाला आहे . आपल्याला आवडल्यास नावासह सर्वांना जरूर पाठवा .
सध्याच्या परिस्थितीत सकारात्मतेची गरज आहे , आपण ती पूर्ण करू या .
आणि हो आपल्या अभिप्रायाची वाट पहात आहे .

आजची कथा , कविकुलगुरु कालिदास यांच्या स्मृतीला समर्पित आहे .

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 122 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..