नवीन लेखन...

संधिप्रकाशातील सावल्या – ३ : तुम्ही फक्त लढ म्हणा !

संधिप्रकाशातील सावल्या – ३ : पाठीवर हात ठेवून, तुम्ही फक्त लढ म्हणा !

” आज मी नाही तुला गोष्ट सांगणार .”
‘ तो ‘ सावलीत आल्याक्षणी अश्वत्थानं सांगून टाकलं .
” आज बकुळीचं झाड , तुझी वाट बघतंय .”
‘ तो ‘ न बोलता बकुळीच्या तळी जाऊन बसला .
आपल्याला गोष्ट सांगायला मिळणार , या आनंदात झाड रोमांचित झालं .
बकुळीच्या प्रसन्न फुलांची पखरण त्याच्यावर झाली . त्यानं वर पाहिलं . एक वेगळा सुगंध त्याच्या अवतीभवती पसरल्याचा भास त्याला झाला .
बकुळीचं झाड बोलू लागलं होतं …

“– तिचं नाव काय होतं ते माहीत नाही पण सगळे तिला गजरेवाली बकुळी म्हणायचे . आठदहा वर्षाची असेल नसेल पण कमालीची गोड आणि लहान वयात समज आल्यासारखी वागणारी होती बकुळी .

साधे स्वच्छ अंगभर कपडे , केस नीटनेटके बांधलेले आणि हातात फुलांसाठी मोठ्ठी परडी . वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला बांधलेल्या पांढऱ्या शुभ्र सुताची नीट सोडवणूक करून , गुंता होणार नाही अशी केलेली गुंडाळी . आणि परडीत चांद्याच्या मोठ्या पानांची चवड .

भल्या सकाळी ती रोज यायची . न दमता , न कंटाळता जमिनीवर पडलेली बकुळीची फुलं वेचायची . तिच्याजवळच्या त्या मोठ्या परडीत फुलांचा हा मोठा ढीग व्हायचा .

मग इथेच ती झाडाला टेकून फतकल मारून बसायची . आणि गाणं गुणगुणत गजरे गुंफत बसायची .

किती गजरे ?
बरेच . अंदाजानं शंभर सव्वाशे तरी नक्कीच .
असे गजरे झाले , की ती परडीतली पानं सगळीकडे पसरून त्यावर ती गजरे मांडून ठेवायची . मग स्वतःच्या नादात मान हलवत दुडक्या चालीने चालत

चालत ती घरी निघून जायची . जाण्यापूर्वी डोळे भरून त्या गजऱ्यांकडे पहायची .”

” कुणासाठी गजरे करायची ती ? विकण्यासाठी की…?”
“ती गजरे कधीच विकत नव्हती . या रस्त्यावरून येणारी जाणारी माणसे , एकेक गजरा घेऊन जायची . त्यातल्या कुठल्याही व्यक्तीने कधी असे विचारले नाही , की या गजऱ्याचे पैसे किती द्यायचे ? कुणाला द्यायचे ? किंबहुना हे गजरे इथे कोण ठेवतो याची साधी विचारपूस कुणी करीत नव्हतं . पण त्या बकुळीला त्याचं काही वाटत नव्हतं . रोज सकाळी ती आली की भिरभिरत्या नजरेनं सगळीकडे पहायची आणि सगळे गजरे संपलेले दिसले की आनंदानं , दुप्पट उत्साहानं नवीन गजऱ्यांसाठी बकुळीची फुलं वेचायला लागायची . मी एकदा विचारलं तिला ,
“बकुळे , अगं रोजच्या रोज इतका वेळ खर्च करून कुणासाठी गजरे तयार करतेस ? तुला दुसरा कामधंदा नाही का ? शाळेत जातेस की नाही ? आईवडील काय म्हणत असतील तुला ? काय हा तुझा वेड्यासारखा छंद …”
ती गोडसं हसली . म्हणाली ,

” आहेच मुळी माझा जगावेगळा छंद . माझा बाबा सकाळी उठून रस्त्यावरच्या कामाला जातो , आणि आई आजारी म्हणून घरात असते . एकदा काय झालं , मी आईवर चिडले , तिच्यावर रागावले , म्हटलं तिला , मी घरात बसून कंटाळले आहे , शाळेचा अभ्यास झाला , की शाळेची वेळ होईपर्यंत कंटाळा येतो . तू कायम आजारी , बाबा कायम बाहेर . मग मी काय करू ? इतकी रागावल्यावर मला वाटलं आई चिडेल , मारील मला . पण तसं काहीच झालं नाही . ती हसली आणि म्हणाली , तू एक काम कर , रोज सकाळी मोठ्या रस्त्याच्या कडेला बकुळीचं झाड आहे , त्याच्या खाली रोज भरपूर फुलं पडतात . तू ती फुलं वेच आणि त्याचे गजरे तयार कर . आणि चांद्याच्या पानांवर नीट मांडून ठेव . त्यामुळं काय होईल , ज्यांना हौस आहे, त्यांना ते गजरे मिळाले की त्यांना खूप आनंद होईल . शिवाय बकुळीची फुलं सुकली तरी त्याचा सुगंध येतंच राहतो . तो सुगंध सगळीकडे पसरेल . कुणीही दिले तरी त्या गजऱ्यांचे पैसे घेऊ नकोस . किंवा त्यांना मिळालेल्या आनंदाचं श्रेय सुद्धा तू घेऊ नकोस . आपल्यामुळं सर्वांना आनंद मिळतो हेच केवढं तरी सुख असतं . अनपेक्षित मिळालेल्या सुगंधाचा आनंद सर्वांना घेऊ दे . हे व्रत समज . त्या आनंदामुळं तुझं आयुष्यसुद्धा सुगंधित होईल आणि तू खूप मोठी होशील . आयुष्याचं भलं होण्याचा मार्ग तुला आपोआप सापडेल . असं आईनं मला सांगितलं .”

बकुळीचं झाड बोलताना थांबलं .

” त्या मुलीचं पुढं काय झालं ? ”

” पुढं ती मुलगी इथं यायची बंद झाली . आणि खूप वर्षांनी एके दिवशी याच रस्त्यानं एक गाडी आली . इथं थांबली . आणि एक साधी , सात्विक बाई त्यातून उतरली . मला म्हणजे बकुळीच्या झाडाला नमस्कार केला . म्हणाली , तुझ्यामुळं आणि आईच्या शिकवणुकीमुळं मी आज कलेक्टर झाले . म्हणून नतमस्तक होण्यासाठी इथं आले आहे . आई बाबा देवाघरी गेले . त्यामुळं आता तूच मला आई आणि बाबा . इतकं बोलून ती खूप रडली . बराच वेळ .आवेग शांत झाल्यावर , रडणं आवरून म्हणाली , आईनं दिलेला आनंद वाटण्याचा वसा मी अजूनही सांभाळला आहे माझ्या कामाच्या रूपानं . आणि इथे येणाऱ्या प्रत्येक पांथस्थाला माझा वसा तू दे . इतकं बोलून ती निघून गेली .”

थोडा वेळ शांततेत गेला .

बकुळीचं झाड त्याच्याकडेच पहात होतं . तेच नव्हे तर सगळी झाडं त्याच्याकडे पहात होती .
” आम्हाला सगळ्यांना माहित्येय तू इथं का आला आहेस , का अस्वस्थ आहेस . गुणवत्ता असूनही सरकारी नोकरी न मिळाल्यानं तुझ्या मित्रानं आत्महत्या केली , म्हणून तू दुःखी आहेस . पण एक सांग त्या आत्महत्या करणाऱ्या तुझ्या मित्राला त्यातून काय मिळालं ? तुम्हा सर्व मित्रांना काय मिळालं ? त्याच्या आईवडिलांना , भावाबहिणींना काय मिळालं ? केवळ आणि केवळ दुःख . समाजाकडून सहानुभूती . कायद्याच्या दृष्टीनं गुन्हा आणि सगळ्यात भयंकर म्हणजे , एखादी गोष्ट मिळाली नाही की कुणाचाही विचार न करता आयुष्य संपवायचं , हा पर्याय इतरांसाठी तो ठेवून गेला .बरोबर ना ? का रे बाबांनो , इतकं सुंदर आयुष्य वाया का घालवता ? जीवन जगण्याचे अन्य पर्याय का शोधत नाही तुम्ही ? असंख्य पर्याय आहेत . जवळ दृष्टी मात्र तशी हवी . तुमच्या भाषेत सांगायचं तर पॉझिटिव्ह विचारसरणी अंगी का बाणवत नाही ? एकमेकांशी संवाद का होत नाही . सहकाराचे पूल का बांधत नाही ? निर्मळ मनानं आणि स्वच्छ नजरेनं वर्तमानाकडे आणि येणाऱ्या भविष्याकडे का बघत नाही ? व्यक्तिमत्व समृद्ध करण्यासाठी नव्या जुन्या नात्यांचे अनुबंध का तपासून बघत नाही ? आपल्या अस्तित्वानं आणि कर्तृत्वानं सगळ्यांच्या आयुष्यात सुगंध पसरवता येतो , हा आत्मविश्वास तुम्हाला का कमावता येत नाही ? आपण कुठे कमी पडलो हे शोधण्याबरोबर आपण कुठल्या बाबतीत जास्त गुणवान आहोत याची नम्र जाणीव का ठेवत नाही ? संयम आणि सहनशीलता का नसते तुमच्याजवळ ? आणि या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपण जन्माला आल्यावर , आपल्यावर केवळ आपला अधिकार नसतो , तर कुटुंब , नातेवाईक , समाज, राज्य , राष्ट्र यासर्वांचे आपण देणं लागत असतो , हे कसं विसरता तुम्ही ? त्यामुळं आत्महत्या करायला जाणार्यांनी प्रथम या प्रश्नांची उत्तरं शोधायला हवीत . म्हणजेच सगळ्यांचं आयुष्य सुगंधित करायला हवं . त्या गजरेवाल्या बकुळीनं वसा सांगितलाय तो मी आज तुझ्याकडे सुपूर्द करणार आहे . त्याशिवाय तुझं आयुष्य सुगंधित होणार नाही .”

त्याला बोलायला संधी न देता बकुळीच्या झाडानं त्याच्या ओंजळीत फुलं दिली .
तो उठला आणि त्या फुलांचा सुगंध , छातीत भरभरून घेतला . आणि न बोलता चालू लागला .

आज , आत्ता त्याच्या चालण्यात एक वेगळाच निर्धार दिसत होता .
आणि वसा स्वीकारल्याची जाणीवसुद्धा …!

– डॉ. श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी
९४२३८७५८०६
———-
संधिप्रकाशातील सावल्या , ही कथामाला आहे .
आपल्याला आवडल्यास नावासह सर्वांना जरूर पाठवा .
सध्याच्या परिस्थितीत सकारात्मकतेची गरज आहे , आपण ती पूर्ण करू या .
आणि हो , अभिप्राय पाठवा , वाट पाहतोय .

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 122 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..