आता प्रत्येक बँकरच्या तोंडी एक वाक्य कायम असतं म्यॅन्यूअल बँकिंगची मजाच वेगळी होती, कुणावर अवलंबून रहावे लागत नव्हते, कनेक्टिव्हिटी, रेंज, सॉफ्टवेअर अपडेशन, लॉग इन, असे कुठलेच प्रॉब्लेम नव्हते. पूर्वीचे टेलर तर घरापासूनच काम सुरू करायचे, येता येता त्यांना कुणीतरी खात्यात पैसे भरायला द्यायचं, कुणी विड्रॉल द्यायचं, त्याला लगेच पैसे मिळायचे, बँकेत जाता जाता लोक सरकारी चलन भरायला द्यायचे, अशी कितीतरी कामं सुरळीत पार पडायची. तेव्हा बँकेत कॅश ऑफिसर आणि टेलर ह्या दोन्ही व्यक्ती खूप महत्त्वाच्या असायच्या. किल्ली गळ्यात पडणे, किल्ल्या टाकणे असे अनेक वाक्प्रचार प्रचलित होते. कॅश डिपार्टमेंटला तर, सेंट्रल डेप्युटीची किल्ली गळ्यात पडू नये म्हणून, आज जातानाच उद्या कोण कोण रजेवर आहे? आपला नंबर लागतोय का? ह्या सगळ्या गोष्टींची तपासणी व्हायची.
बऱ्याच लोकांना हे माहीत नसेल बँकेतल्या कॅश काउंटर वर काम करणाऱ्यांना टेलर म्हणतात (मागे एकदा अशाच टेलर काउंटर वरून शंभर ची तीन पाकिटे, गर्दीचा फायदा घेऊन एका चोराने पळवली, रीतसर पोलीस तक्रार झाली, पोलीस चौकशीला आले, नेहमीप्रमाणे मॉबमध्ये चोरी झाल्यावर, पहिला संशयित ज्याच्या ताब्यातली कॅश गेलीय तोच असतो. त्याप्रमाणे चौकशी झाली. नेमका चौकशीला आलेला हवालदार माझा वर्गमित्र निघाला, संध्याकाळी भेटल्यावर सहज बोलताना तो म्हणाला, ‘अशा केसेसमध्ये हे भुरटे चोर सापडत नसतात, म्हणून आम्ही कर्मचाऱ्यालाच दम देत असतो, पण नेमका तुमचा बँकेतला माणूस टेलर निघाला, बिचाऱ्याला बँकेतले कपडे शिवून असे किती पैसे मिळणार ? म्हणून आम्ही जास्त त्रास दिला नाही.’ अर्थात मी पण गप्प बसलो. त्याला टेलर म्हणजे बँकेतला कॅशियर असतो, हे कळू दिले नाही. नंतर बँकेत बँक मास्टर हे सॉफ्टवेअर घुसलं आणि लोक थोडे घाबरले, कारण बेरजा वजाबाक्या ही किरकोळ कामं कमी झाली, पण त्याच्यावर अवलंबून राहावं लागलं आणि थोड्याच दिवसात सीबीएस सिस्टीम सुरू झाली आणि लोकांनी, प्राचीन युगात जशी पतीचं निधन झाल्यावर बायका जोहार जायच्या, तसे गठ्ठ्यानी लोकांनी व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेतल्या. त्यानंतर बँकेतला एकमेकाच्या बद्दल असलेला ओलावा संपलाच. जो तो आपल्या खिडकीत तोंड घालून बसायला लागला, कुणी कुणाशी बोलेना, एक तर इन्फ्रास्ट्रक्चर तितकं चांगलं नव्हतं आणि कॉम्प्युटर सगळ्यांनाच कोरोनासारखा नवीन होता. त्यामुळे एका मुठीत जीव आणि एका मुठीत नोकरी, कारण चूक झाली की लगेच तुमचा आयडी सापडायचा.
अर्थात जे सोडून गेले ते काम करणारे होते, ज्यांना काम करायचंच नव्हतं, ते काही लोक शेवटपर्यंत झुंजले (त्यांच्याकडून काम करवून घेणारे झुंजले असं म्हणलं तर जास्त समर्पक होईल, अर्थात नर्मदमध्ये काही नुसतं पाणी नसतं, दगड गोटे असायचेच)
थोड्या वयाने जास्त (केवळ वयाने जास्त म्हणून त्यांना सिनियर म्हणावं लागायचं, नाहीतर अगदी शेवटच्या दिवशी सुद्धा एका कॅशियरला शंभर रुपयांचा फरक लागला आणि तो हजार, पाचशेची पाकिटे दोनदोनदा मोजत होता ) असलेल्या सिनियर लोकांना थोडा त्रास झाला, एकतर कॉम्प्युटरची भीती खूप होती, त्यात कनेक्टिव्हिटी हा मोठा प्रॉब्लेम होता. एकदा एक सिनियर बाई खूप घाबरली, माऊस हलवला तरी समोर स्क्रीनवर कर्सर हलत नाहीये, तिला चांगलाच घाम फुटला होता. मी बघायला गेलो , तर समोरचा छोटा स्टॅम्प पॅड घट्ट धरून हलवत होती . मी त्यांना म्हणलं, ‘मॅडम ते स्टँप पॅड हलवलं तर कर्सर कसा हलेल?’ तेव्हा तिने खाली बघितलं आणि अतिशय खजील झाली बिचारी .
अशा इतक्या गमती जमती व्हायच्या. आमच्याकडे एक ऑफिसर होते, कॉम्प्युटरमध्ये किंवा सॉफ्टवेअरमध्ये काही बिघाड झाला किंवा एखादी एन्ट्री रिव्हर्स करायची असेल तर, झोनल ऑफिसला सपोर्टला फोन करावा लागायचा. सपोर्टवाले लोक थोडे ‘वासरात लंगडी गाय शहाणी’ असे असायचे , तर त्या ऑफिसर ने झोनल ऑफिस ला फोन लावला (पूर्वी काही बिचारे असे ऑफिसर होते, एजीएमचा फोन म्हणलं को खुर्चीत उठून उभे राहून, ‘हॅलो सर’ असं म्हणायचे).
त्या सपोर्टमधल्या बाईने सूचना द्यायला सुरुवात केली, ‘ते एमच्या खालचं बटन दाबा, आता कंट्रोल अल्ट डिलीट अशी तिन्ही बटणं दाबा, ठीक आहे आता. बाहेर पडा, असं ती म्हणली ( त्या विंडोतून बाहेर पडा असं ती म्हणाली) साहेब लगेच बँकेच्या दारातून बाहेर पडले, जाता जाता त्यांना कुणीतरी विचारलं, ‘कुठं चाललात?’
ते काय आत्ता त्या सपोर्टवाल्या बाईंनी सांगितलंय, ‘बाहेर पडा म्हणून.’
संगणकाची दोस्ती जुन्या लोकांना खूप अवघड गेली, असेच एक ऑफिसर ज्यांच्याकडे EOD करायचं काम होतं, पूर्वी हे काम करायला दोन तीन तास लागायचे, पिंपरी शाखेत असताना एक मेसेंजर होता, तो ते सगळं बघून बघून शिकला होता, एकदा अशी वेळ आली होती, EOD करणारे ऑफिसर आजारी पडले आणि त्या मेसेंजरच्या घरी, सत्यनाराणाची पूजा होती म्हणून तो पण आला नव्हता, EOD करणारे ऑफिसर मुंबईहून अप-डाऊन करायचे, बाकी कुठल्याच ऑफिसरला ते काम येत नव्हतं , शेवटी त्या मेसेंजरला बँकेची गाडी पाठवून, सोवळं नेसलेल्या अवस्थेत बँकेत आणून SOD करावा लागला होता. छोट्या ब्रांचेसमध्ये खूप प्रॉब्लेम या सिस्टीममुळे यायचे. नंतर सुरळीत झालं. पण कधी काय होईल याची कुणालाही गॅरेंटी नसायची. कनेक्टिव्हिटीबद्दल तर सगळा कारभार बे भरोसा होता. अर्थात बॅलंसिंग वगैरे कामात या संगणकाचा भरपूर उपयोग पण झाला. पण माणसं दुरावली, भ्रमिष्ट झाली आणि सगळा राग गिर्हाईकांवर निघायला लागला.
हळूहळू स्टेट बँकेबद्दल आपलेपणा असलेली पिढी पण संपली आणि त्यांची बँकेबद्दलची आस्था देखील संपली.
-सतीश वैद्य
(व्यास क्रिएशन्स च्या पासबुक आनंदाचे दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)
Leave a Reply