माजघर सोडलं तर हरचिरीच्या आमच्या मोठ्या घरात त्यादिवशी अस्वस्थ , निःशब्द गडबड सुरू होती . लहानग्या वयातल्या मला आणि माझ्या लहान बहिणीला शैलजाला काही कळत नव्हतं . एक भयाण मौन सर्वत्र पळत होतं. आणि सर्वांना पळवत होतं.
ओटीवरच्या लाकडी माच्यावर , ऊर्ध्व लागलेल्या स्थितीत असलेल्या अण्णाना ठेवलं होतं .अण्णा म्हणजे माझे वडील . त्यांच्या जवळ लांज्याचे डॉ . लिमये बसले होते . त्यांचा चेहरा बरंच काही सांगत होता . उशालगत आई बसली होती . अण्णांच्या कपाळावर मिठाच्या पाण्याच्या घड्या सारख्या बदलत असणाऱ्या आईच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं . काकुची धावपळ पाहवत नव्हती .स्वयंपाक घरात जाऊन रडणाऱ्या काकुला सावरावं तरी कसं हा अनेकांना प्रश्न पडला होता . मी अण्णांचा गरम हात हातात घेऊन भिरभिरत्या नजरेनं रडवेला होऊन सगळीकडे पाहत होतो .
आणि पौरोहित्य करणारे , अण्णांचे सगळे मित्र माजघरात महामृत्युंजय मंत्राचा जप करीत होते . धीर गंभीर तरीही मोठ्या आवाजातला त्र्यंबकम यजामहे चा घोष संपूर्ण घरभर पसरत होता . अनुष्ठान चालू होतं .
अण्णांना विषमज्वर झाला होता . डॉक्टरांच्या मते काही तासच हाताशी होते . नाडी हाताला लागत नव्हती आणि श्वास अनियमित झाला होता .
कुठल्यातरी एका क्षणी डॉक्टरांनी अण्णांचा हात सोडून दिला . आणि आईने हंबरडा फोडला . मी आणि शैला रडू लागलो . आणि तो आवाज ऐकून माजघरात महामृत्युंजय मंत्र म्हणणाऱ्या सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला . शंकरावर रुद्राभिषेक चालू होता . त्यातील तीर्थ घेऊन अण्णांचा जिवलग असणारा हरिभाऊ मोठ्यांदा मंत्र म्हणत बाहेर आला आणि अण्णांच्या मुखात ते तीर्थ घातले . महामृत्युंजय मंत्र चालूच होता .
डॉ .लिमयांच्या औषधांचा परिणाम म्हणा किंवा महामृत्युंजय मंत्राचा परिणाम म्हणा पण काहीतरी अतर्क्य घडत होतं .
– आणि काय झालं कुणास ठाऊक , मला अचानक जाणवलं . अण्णा क्षीण बोटांनी माझा हात घट्ट धरत आहेत . मी ते आईला दाखवलं . तिनं डॉक्टरांकडे पाहिलं आणि डॉक्टरांनी तपासायला सुरुवात केली . त्यांचा चेहरा उजळला .
आणि पुढच्याच क्षणी सगळे ओटीवर आले . प्रत्येकाच्या डोळ्यात आनंदाश्रू होते .
अण्णांचा ताप उतरला होता .
-अण्णांचा जणू पुनर्जन्मच झाला होता …
आज इतक्या वर्षांनी सगळं लख्ख आठवतंय .
आज अण्णांचा स्मृतिदिन .
२००२ मध्ये अर्धांगवायू आणि तो आघात झाल्याच्या पंधराव्या दिवशी हृदयविकाराच्या धक्यानं ते गेले .
आम्हा कुटुंबियांना सेवा करण्याची कसलीही संधी न देता .
चेहऱ्यावर वेदनेची कोणतीही पुसटशी खूण न ठेवता .
अण्णांचं व्यक्तिमत्व विलक्षण होतं .
सहा फुटापेक्षा जास्त उंची . मजबूत शरीरयष्टी . स्वच्छ धोतर .लांब हातांचा सदरा.अंगावर उपरणे.डोक्यावर काळी टोपी . खांद्याला पिशवी आणि हातात जाड काठी .
गरिबी पाचवीला पुजलेली . दोन भावांचा मृत्यू झाल्यावर लहान वयात अंगावर येऊन पडलेल्या कुटुंबाच्या जबाबदारीने खचून न जाता भिक्षुकी करून प्रपंच सावरताना त्यांनी दाखवलेलं धैर्य विलक्षण होतं.
सखाराम कृष्ण जोशी हे नाव व्यवहारापुरतं , प्रत्यक्षात बापुकाका जोशी हीच सर्वत्र ओळख . भिक्षुकी करताना आजच्या हिशोबात सांगायचं तर दहा पंधरा मैल चालायचं , घाटया, डोंगर चढायचे आणि मिळेल त्या रुपया दोन रुपये दक्षिणेवर समाधान मानून घरी परतायचं . यात आयुष्य सरलं. पण चेहऱ्यावरचा आनंद , स्वभावातला सरळपणा आणि वृत्तीतला प्रामाणिकपणा हरवला नाही शेवटपर्यंत .
अनेकांनी व्यवहारात फसवलं तरीही कुणाबद्दल आकस , सूड , द्वेष या भावना शिवल्याच नाहीत त्यांना . असहकार्य , अपमान , अनादर , अकिंचनावस्था यामुळे खचून न जाता परमेश्वर आणि पावसच्या स्वामी स्वरूपानंदांवरची श्रद्धा यामुळं परिस्थितीनं वाटेवर पेरलेल्या काट्यांना त्यांनी फुलं मानली .
त्यांचं एक आवडतं वाक्य होतं .
झोपाळ्यावरच्या आडव्या बारावर माझ्याकडून त्यांनी ते खडूनं लिहून घेतलं होतं .
दिधले दुःख पराने , उसने फेडू नयेची ,सोसावे ।
तसं ते सोसत राहायचे .
आई म्हणायची ,
” संत एकनाथ पैठणात गेले आणि वृत्तीनं जोशांच्या घराण्यात आले “
यावर अण्णा नेहमीप्रमाणे मान हलवून हसायचे आणि पडवीतला झोपाळा संथ लयीत झुलायचा .
पंचक्रोशीत होणाऱ्या सगळ्या उत्सवांना ते जायचे . पायपीट करून जायचे , रात्रीच परत यायचे आणि सकाळी उठून पुन्हा भिक्षुकीला जायचे .
थकवा माहीत नसायचा त्यांना .
हरचिरीच्या महाशिवरात्रीच्या उत्सवात अण्णांचा उत्साह दांडगा असायचा .
सकाळपासून रुद्राची आवर्तने , रात्री आरत्या , भोवत्या, कीर्तन यात ते अखंड रंगून जायचे . त्यांचा आवाज घरीदारी मृदू असायचा , पण रात्री आरती म्हणताना , भोवत्यांचे अभंग सांगताना , रिंगण करून नाचताना , त्यांचा आवाज पहाडी व्हायचा .
उत्सवातल्या समाराधनेच्या दिवशी आग्रह करकरून वाढताना तोच उत्साह असायचा . ते स्वतः कमी जेवायचे पण त्यांचा आग्रह म्हणजे अगदी शेंडी तुटेपर्यंत असायचा .
माझी काही संगीत नाटकं , खल्वायन संस्थेनं हरचिरीच्या उत्सवात सादर करावी असा त्यांचा आग्रह होता , तो संस्थेनं पूर्ण केला , त्यावेळी अण्णांचा उत्साह अवर्णनीय होता . सगळ्यांना चहा करून देणं , जेवण वाढणं आणि प्रत्येक रंगकर्मीची आपुलकीनं चौकशी करून प्रोत्साहित करणं यात ते रंगून , रमून जायचे . नाटकातल्या विनोदाला खळखळून दाद देणं , गाण्यात गुंग होणं आणि करुण प्रसंगाच्या वेळी, खांद्यावरच्या उपरण्यात , भरून आलेले डोळे मोकळे करणं हे त्यांचं रूप मी अनेकदा पाहिलंय .
माझं लेखन प्रसिद्ध झालं की वाचण्यासाठी आई आणि अण्णा यांच्यातली वादावादी ऐकण्यासारखी असे . ते दिवसा वाचायचे आणि रात्री मला , अण्णांना जाग येऊ नये म्हणून आई लाईट घालवून कंदिलाच्या प्रकाशात वाचत असायची . रोज पहाटे तीन वाजता मला ते जागं करायचे , चहा करून द्यायचे आणि मग सकाळपर्यंत पाणचुली जवळ बसून गप्पा मारत बसायचे . कधी वेगवेगळी स्तोत्रं , तर कधी अनुभव सांगत बसायचे .
स्वभावतली उदारता , हळवेपण , शहाळ्याच्या पाण्यासारखी वृत्ती , हिंदू संस्कृतीतील सगळे सण उत्सव साजरे करण्याची हौस , माणसं जोडण्याची जन्मजात आवड , जोडलेली नाती टिकवण्यासाठी जीवाचा आटापिटा , निर्व्याज हास्य , जीवन संघर्षाला संधी म्हणून पाहण्याची सवय आणि तरीही भावनेच्या ओलाव्याने आकंठ भरलेलं मन….
किती सांगावं अण्णांबद्दल ?
शब्दच कमी पडतील .
नातवंडांत रमणारे , त्यांच्यात मूल होऊन खेळणारे , मैत्री जपणारे , स्वतःचं दुःख लपवून सगळ्यांच्या जीवनात आनंद फुलवण्यासाठी धडपडणारे अण्णा आज नाहीत .
आज त्यांचा स्मृतिदिन .
त्यांच्याबद्दल नंतर खूप लिहिणार आहे ,कारण इतकं वेगळं जीवन ते जगले होते , जे इतर कुणाला माहीत नाही .
ते गेले तेव्हा ८५ वर्षांचे होते .
पण इतक्या वर्षानी आजही पोरकेपणाच्या भावनेनं मन उदास होतं . आणि डोळे भरून येतात .
त्यांना आदरांजली वाहताना , अण्णांनी, स्वामी स्वरूपानंदांच्या अभंगातून केलेला संस्कार सांगतो आणि अल्पविराम घेतो!?
भुकेल्यासी अन्न । सत्पात्री ते दान ।
भावे दिल्याविण । राहू नये ।।
— डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी .
९४२३८७५८०६
नमस्कार सर!
आपण आपल्या वडिलांबद्द्ल जे लिहिलंत त्यातून आपले त्यांच्याबद्दल असलेले प्रेम आणि आदर व्यक्त होतोच आहे आणि त्यातही महत्वाचे म्हणजे त्यांनी जगलेल्या जीवनातून त्यांनी गिरवलेले धडे तुम्हालाही खूपच उपयोगी पडले याबद्दल तुमच्या मनात असलेली कृतज्ञतेची भावना ही सुद्धा दिसून येते.
हा लेख आज वाचला पण २ दिवसापूर्वी रत्नागिरीमध्ये तुमच्या तोंडून यातील किस्से ऐकले. धन्य ते अण्णा आणि भाग्यवान आणि पुण्यवान तुम्ही !!!!
अश्या आदर्श पुरुषांची / माणसांची जीवनचरित्र आमच्यासारख्या पिढयांना वाचायला / ऐकायला मिळणे हे काही आमचे भाग्य कमी नव्हे!!!
धन्यवाद!!!
श्रीहरी अळवणी