यंदाच्या ऑगस्ट महिन्यात १५ तारखेला “शोले” या चित्रपटाने ५० वर्षे पूर्ण करुन ५१ व्या वर्षात पदार्पण केले.
सिनेरसिकांची पिढी दर १० वर्षांनी बदलते म्हणतात. या हिशेबाने सिनेरसिकांच्या जवळपास ५ पिढया “शोले “च्या अंगाखांद्यावर खेळल्या. आम्ही आमच्या पहिल्या पॉकेटमनीमध्ये आणि नवसाच्या पहिल्या वहिल्या फुलपॅण्टमधे शोले पाहिला. माहीमच्या “बादल” मध्ये तेव्हा ४ रुपये ४० पैसे स्टॉलचे तिकीट होते. आणि ५ रुपये ५० पैसे बाल्कनी.तेव्हढे पैसे तर मला वाटते आजकाल भिकारीदेखिल घेत नाहीत. मरण सोडून बाकी सगळ्याच गोष्टी मधल्या काळात कमालीच्या महागल्या.
रामायण आणि महाभारत सोडले तर या जगात ओरिजिनल काहीच नाही असे “शोले”कार सलिम- जावेद त्यांच्या उमेदीच्या काळात छातीठोकपणे त्यांच्या प्रत्येक मुलाखतीत सांगायचे. सांगोत बापडे. जेव्हा लेखक स्वतःच येथुन तेथून हात मारल्याचे सांगतो तेव्हा त्याच्यावर अविश्वास दाखवायचे कारणच नाही.
पण आमच्यासाठी जसे……
अनारकली म्हणजे…..केवळ मधुबाला.
आघाडीचा फलंदाज म्हणजे फक्त आणि फक्त सुनिल गावस्कर.
तसे……. रुपेरी पडद्यावरचा आजवरचा सर्वात प्रेक्षकप्रिय सिनेमा म्हणजे…….” शोले एके शोले.”
तुम्हाला सांगतो, अगदी आजही, सिनेमातल्या शेवटच्या प्रसंगात, ” विरु, बस एक बात रह गयी, तेरे बच्चोंको कहानी नही सुना सका ,लेकिन तुम उन्हे अपनी दोस्तीकी कहानी जरुर सुनाना ” असे अमिताभने म्हंटल्यावर डोळे पुसणारे रसिक मला ठाऊक आहेत .आणि जयाकडे बघत त्याने ” यह एक कहानी भी अधुरी रह गयी ” म्हंटल्यावर डोळ्याला पदर लावणाऱ्या स्त्रिया सुद्धा मी पाहिल्या आहेत. आजचा आघाडीचा विनोदवीर जॉनी लिव्हरदेखिल “कुछ कुछ होता है ” मधे सहज बोलून जातो ” मेरा बाप अंग्रेजके जमानेका टेलर था ” …आणि थिएटरमध्ये हास्याचा सात मजली स्फोट होतो.४० वर्षांपूर्वी असरानीच्या ” हम अंग्रेजके जमानेके जेलर है ” ला व्हायचा तसाच. तेव्हा आजोबा हसलेले असतात ….आता नातू हसतो… उद्या पणतूही हसेल.
शोलेच्या प्रचंड लोकप्रियतेमागे त्यातल्या ” छप्परतोड ” संवादांचा मोठा हात आहे असा एक सर्वसाधारण समज आहे. असो बापडा ….तसेही असेल. पण तुम्ही ,एकदा मी सांगतो म्हणून, वेळ काढून ,के. आसिफच्या” मुघल-ए-आझम” चे ,बी. आर. चोप्रांच्या” नया दौर” चे, चेतन आनंदच्या “हीर रांझा” चे व हृषीकेश मुखर्जींच्या “अनाडी” चे संवाद मन लावून ऐका… आणि मग खरे काय ते सांगा.
” ये वो लोग है जिन्हे रास्तेमे बटवे मिले ,पर जीन्होने लौटाये नही ” ( मोतीलाल-अनाडी ), “तो एक राजपूत की वचन पर कट जानेवाले सर भी लाखों है शहजादे ….राजपूत जान हारते है, जबान नही “(अजित- मुघल- ए-आझम )आणि ” अरे थूक देना उस मुहपे जो बात पे पलट जाय ” ( दिलीपकुमार- नया दौर ) या संवादांपेक्षा तुम्हाला “अरे ओ सांभा “,” कितने आदमी थे ?” आणि ” इतना सन्नाटा क्यो है भाई ?” हे संवाद जास्त भावत असतील तर मग कादरखानच तुमचे रक्षण करो.
हेलनने ” मेहबुबा मेहबुबा ” या गाण्यावर केलेले दिलखेचक नृत्य पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरवर परत परत चाल करुन गेले असे मला पैजेवर सांगणारे नृत्यरसिक आहेत, त्याचप्रमाणे राज सिप्पीच्या ” इन्कार ” मधे “मुंगळा मुंगळा ” या गाण्यावर हेलनने केलेला नाच जास्त “मारु आणि कडक ” होता असे ‘चांदनी बार ‘ फेम मधुर भांडारकरची शपथ घेऊन सांगणारे जाणकारही काही कमी नाहीत. पण म्हणून इन्कार काही शोलेप्रमाणे मैलाचा दगड बनू शकला नाही.
संजीवकुमार, अमिताभ व धर्मेंद्र ( आणि अमजदखान ) यांची जुगलबंदी पाहण्यासाठी प्रेक्षकांनी पंढरपूरप्रमाणे शोलेच्या वाऱ्या केल्या असेही काहीजण म्हणतात. सोडा राव. कोणाला शिकवताय ?
” शक्ती ” मध्ये दिलीपकुमार, अमिताभ ( व राखी ), ” त्रिशूल ” मध्ये संजीवकुमार ,अमिताभ ( व शशी कपूर ) , ” मशाल ” मध्ये दिलीपकुमार, नवखा अनिल कपूर ( व वहिदा रेहमान ) आणि ” परिंदा ” मधे नाना पाटेकर ,जॅकी श्रॉफ व अनिल कपूर यांची जुगलबंदी जास्त प्रभावी आणि परिणामकारक होती असे नाही वाटत तुम्हाला ? मला विचाराल तर, अतिशय बंदिस्त व बांधेसूद कथा व पटकथा , सहजगत्या तोंडी घोळणारे चटपटीत संवाद ( मुझे बेफुजुल बाते करनेकी आदत तो है नही ), ठसठशीत प्रमुख व्यक्तिरेखा, कसदार अभिनय ,( सहसा दुर्लक्षित रहाणारी ) काळजीपूर्वक फुलवलेली दुय्यम सशक्त पात्रे ( असरानी ,जगदीप , ए.के.हंगल ,लीला मिश्रा , मँकमोहन इ.),पारंपारिक खलनायकाची प्रतिमा तोडून मोडून अमजदखानने सादर केलेला काहीसा वेडसर, ओंगळ व पुढेमागे सुधारण्याची शक्यता नसलेला पूर्णतः क्रूर खलनायक , अतिशय प्रवाही आणि गतिमान दिग्दर्शन, देखणं कला निर्देशन आणि सुरेख छायाचित्रण हे ( कदाचित ) शोलेला अजरामर करणारे घटक असू शकतात.
आणि शेवटी नशीब हा घटक तर ( सर्वात ) महत्वाचा आहेच. नाहीतर…….” सच कहा मौसी ,बडा बोझ है आप पर ..” पासून सुरु झालेल्या आणि ” मै नीचे उतरुंगा मौसी…. मौसीजी ” ला संपणाऱ्या ,अमिताभ ,लीला मिश्रा आणि धर्मेंद्रने ( पाण्याच्या टाकीइतक्या ) उंचीवर नेलेल्या १४ मिनिटांच्या प्रसंगाला ,सिनेमा लांबतोय, रेंगाळतोय असे वाटून , कात्री लावण्याची दिग्दर्शक रमेश सिप्पीला झालेली दुर्बुद्धी ,ऐनवेळेस त्या दृश्याला हातही न लावण्याच्या सुबुद्धी मध्ये कशामुळे परावर्तित झाली असावी ? रमेश सिप्पींच्या आणि मुख्य म्हणजे शोलेच्या नशिबामुळेच नाही का ?…दुसरे काय ?
पटले की नाही ? बहुआयामी दिग्दर्शक राजकुमार संतोषीचे तर सोडाच ( चायना गेट ) पण खुद्द रमेश सिप्पीला देखिल शोलेच्या जवळपास जाणारा दुसरा शोले ( शान ) बनविता आला नाही तर इतरांची काय कथा ? आम्ही सुनिल आणि सचिनची आख्खी कारकीर्द पाहिली.आम्ही ‘जनता’लाट, इंदिरालाट आणि मोदीलाट पाहिली.आम्ही विस्फारलेल्या डोळ्यांनी मोबाईल क्रांती पाहिली आणि आम्ही मनाला मरगळ आल्यावर रिचार्ज होण्यासाठी शोले परतपरत, परतपरत पाहिला.
घामेजलेल्या मुठीत तिकीट घट्ट पकडून मी ” P -14 ” नंबरच्या खुर्चीवर बसतो. प्रेक्षागृहात संपूर्ण काळोख होतो. पोलीस अधिकाऱ्याला घेऊन आलेली गाडी स्टेशनात शिरते. त्याच्या स्वागताला रामलाल ( सत्येन कप्पू ) पुढे येतो. पडद्यावर झळकणाऱ्या नामावलीसह दोघे घोड्यावरुन रामगढला निघतात. रुपेरी पडद्यावरच्या सर्वात रोमांचकारी सूडनाटयाला सुरुवात होते.साडेतीन तासांनंतर त्याच स्टेशनातून विरु आणि बसंतीला घेऊन आणि प्लॅटफॉर्मवर ठाकूर बलदेवसिंगला एकटे सोडून गाडी निघून जाते. फक्त शरीराने थिएटरबाहेरच्या जगाच्या प्रखर वास्तव उजेडात गेलेला मी , मनाने ” P-14 ” या हातमोडक्या खुर्चीवर, पुढच्या गाडीची वाट बघत बसून रहातो.
या एकतर्फी प्रेमाच्या अनादी प्रवासाला पुढील महिन्यात ५० वर्ष पूर्ण झाली !
संदीप सामंत
Leave a Reply