प्रत्येक कलाकृती स्वतःचे भाग्य घेऊन जन्माला येते असं म्हटलं जातं. राधामानस या संगीत नाटकामुळे मला हा अनुभव घेता आला .
खल्वायन या रत्नागिरीतल्या आमच्या संस्थेने माझी अनेक संगीत नाटके रंगभूमीवर आणली . अपवाद वगळता बहुतेक नाटकांना स्पर्धेत चांगलं यश मिळालं . अनेक नाटकांचे देशभर प्रयोग झाले , अनेक कलावंत स्पर्धेमुळे नावारूपाला आले , अनेक कलावंतांना परितोषिकांच्या रूपाने प्रेरणा मिळाली आणि करिअरची दिशा सापडली .
युद्धामुळे कोणतेही प्रश्न सुटत नसले तरीही सस्यश्यामल पृथ्वीसाठी आणि मानवजातीच्या हितासाठी काहीवेळेला युद्धही क्षम्य ठरते .
हा विचार मांडण्यासाठी मी महाभारतातील युद्धापूर्वीच्या कथानकाचा , वर्तमानकालीन संदर्भाच्या पार्श्वभूमीवर आधार घेतला होता.
नाट्यपंढरी समजल्या जाणाऱ्या सांगलीतील कै. विष्णुदास भावे नाट्यगृहात २२मार्च २००५ रोजी या नाटकाचा पहिला प्रयोग झाला होता .
राज्य नाट्य स्पर्धेत द्वितीय आणि दिल्लीतील स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळवलेल्या या नाटकाने रसिकाश्रय संपादन केला .
हे सगळं आज आठवत आहे . कारण इचलकरंजी मध्ये, जानेवारी २०२० मध्ये होणाऱ्या ४६ व्या राज्यनाट्यस्पर्धेत संगीत राधामानस हे नाटक पुन्हा सादर होणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे एक नव्हे तर दोन संस्था ( एक वसईची आणि दुसरी अकोल्याची ) हे नाटक सादर करणार आहेत.
कलाकृतीचे भाग्य हेच म्हणायला हवे की एकाच लेखकाचे एक नाटक एकाच स्पर्धेत दोन वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या तारखांना सादर करणार आहेत . प्रत्येक संस्थेचे नेपथ्य वेगळे , संगीत वेगळे , दिग्दर्शन वेगळे असणार आहे .
तीच ती पारंपरिक संगीत नाटके , तेच ते कथानक , तेच ते संगीत या पेक्षा वेगळी वाट शोधणाऱ्यांसाठी हा एक दिशादर्शक प्रवास आहे .
आपण रसिक प्रेम करीत आहात म्हणून संगीत नाटक काळाच्या ओघात टिकून राहिले आहे , त्याचा वैभवशाली भविष्यकाळ आपल्यासारख्या रसिकांच्या हाती आहे, असे मला वाटते . आपली प्रेरणा , आपले प्रोत्साहन आणि आपली दिलखुलास मिळणारी दाद , कलावंतांना नक्की दिलासादायक आहे .
संगीत राधामानस च्या निमित्ताने इतकेच …
डॉ. श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी.
९४२३८७५८०६
Leave a Reply