माझ्या वडिलांचे क्लबमधील मित्र चंद्रशेखर टिळक हे माझ्या गाण्याचे चाहते होते. त्यांनी ‘रसधारा’ हा गाजलेल्या मराठी गाण्यांचा कार्यक्रम सुरू केला. या कार्यक्रमात गाण्यासाठी त्यांनी मला बोलावले. चंद्रशेखरजींशी अनेक वर्षे आमचे घरगुती संबंध होते. मी लगेचच होकार दिला. ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये पहिला कार्यक्रम झाला आणि त्याचबरोबर अनेक कार्यक्रम आम्ही केले. अनघा पेंडसे, प्रल्हाद अडफळकर, संध्या खांबेटे आणि माझी विद्यार्थिनी श्वेता पुराणिक हे गायक कलाकार आमच्याबरोबर होते.
कै. पं. राम मराठे हे ठाणे शहराचे भूषण. लोकप्रिय खासदार माननीय प्रकाश परांजपे हेसुद्धा संगीतप्रेमी. त्यांच्याच प्रयत्नांमुळे ठाणे महानगरपालिकेतर्फे पं. राम मराठे स्मृती समारोहाचे आयोजन काही वर्षांपूर्वी सुरू झाले. माफक तिकीट दरात सतत तीन दिवस होणारा हा समारोह लवकरच लोकप्रिय झाला. बदलापूरमध्ये एका सुगम संगीत स्पर्धे चे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून मला आमंत्रित करण्यात आले. माझ्याबरोबर दुसरे परीक्षक होते पं. राम मराठे यांचे मोठे चिरंजीव पं. संजय मराठे. स्पर्धेनंतर लगेचच बक्षीस समारंभ झाला. समारंभाचे अध्यक्ष होते खासदार प्रकाशजी परांजपे, प्रकाशजींनी आम्हा दोन्ही परीक्षकांना गाण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही दोघांनीही गाणी सादर केली. प्रकाशजी एकदम खूष झाले. त्यांच्याच गाडीतून परतताना आमच्या गप्पा सुरू झाल्या.
“अनिरुद्ध, तुझा गझलचा कार्यक्रम पं. राम मराठे संगीत समारोहात झाला पाहिजे,” प्रकाशजी म्हणाले.
“माझ्यासाठी ती अत्यंत आनंदाची बाब असेल. पण ते शक्य होईल असे वाटत नाही,” मी उतरलो.
“असे तुला का वाटते?” प्रकाशजींनी विचारले.
‘कारण या समारोहात फक्त शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम आयोजित केले जातात.”
यावर प्रकाशजी उसळून म्हणाले, “आम्हाला संगीतातले हे बारकावे समजत नाहीत आणि रामभाऊ तर संगीत नाटकात काम करायचे. मराठी चित्रपटातदेखील त्यांची गाणी आहेत. माझा तर तुम्हाला आग्रह राहील की या समारोहात एक तरी सुगम संगीताचा कार्यक्रम असायला हवा.
मी माझे म्हणणे मांडले. त्यावर प्रकाशजी उत्तरले, “तर मग या संगीत समारोहातील सुगम संगीताच्या कार्यक्रमाची सुरुवात तुझ्या गझलच्या कार्यक्रमानेच करू या. मी तसे या कार्यक्रमाचे आयोजक श्रीकृष्ण दळवी यांना सांगतो. तू त्यांना भेट.” संगीततज्ज्ञ श्रीकृष्ण दळवी यांची भेट मी घेतली. त्यांनीही कार्यक्रम आयोजित करण्यास होकार दिला. १९ नोव्हेंबर २००२ रोजी गडकरी रंगायतनमध्ये पं. राम मराठे संगीत समारोहात मी हिंदी-ऊर्दू गझलचा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाला रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. या वर्षीपासून या समारोहात सुगम संगीताच्या कार्यक्रमांचे आयोजन सुरू झाले.
शेवटी रागदारी संगीत काय, सुगम संगीत काय किंवा पाश्चात्त्य संगीत काय! रसिकांचे मन जिंकेल तेच खरे संगीत. रसिकांच्या मनात प्रवेश करण्यासाठी गायकांनी निवडलेल्या ह्या वेगवेगळ्या वाटा आहेत इतकेच. ठाणे शहरापुरता हा विचार मी पोहोचवला. लवकरच हा विचार व्यापक स्वरूपात पोहोचवण्याची संधी मला मिळाली. महाराष्ट्र टाईम्समध्ये ‘माझा धर्म’ या लेख मालिकेत मी लेख लिहिला. माणसांची वर्गवारी करताना त्यांचा धर्म पाहण्यापेक्षा त्यांचा गुणधर्म पहावा असा विचार मी या लेखात मांडला. विस्ताराने सांगायचे तर संगीतावर प्रेम करणारे संगीतप्रेमी, तसेच विज्ञानप्रेमी, नाटकप्रेमी, सिनेमाप्रेमी, क्रिकेटप्रेमी ही माणसांची वर्गवारी गुणधर्माप्रमाणे झाली. संगीताच्याच बाबतीत बोलायचे झाले तर या क्षेत्रात वेगवेगळ्या धर्माचे लोक वर्षानुवर्षे आनंदाने एकत्र काम करतांना आपण पाहतो आहोत. गुणधर्माप्रमाणे माणसांची वर्गवारी केल्यास आपण संपूर्ण जग फार लवकर एकत्र आणू शकू असा मला विश्वास वाटतो. सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे, गायिका पद्मजा फेणाणी, शहनाईवादक शैलेश भागवत यांच्यासह अनेक वाचकांनी हा लेख आवडल्याचे मला प्रत्यक्ष भेटून, फोन करून आणि पत्र लिहून कळवले.
– अनिरुद्ध जोशी
Leave a Reply