पं. विष्णू दिगंबर पलुसकरांनी ५ मे १९०१ रोजी लाहोर शहरात गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली.
एक काळ असा होता की एकूणच शिक्षणाच्या बाबतीत आजच्या इतक्या सोयी, सुविधा-सवलती मुळीच म्हणजे मुळीच नव्हत्या. संगीताच्या बाबतीत तर यापेक्षाही फार वाईट परिस्थिती होती. त्या काळात कलाकार मोठे; पण समजा एखाद्याला विचारलं की, ‘आपके गानेमें वो सरगम क्या होता है?’ तर साधी माहिती मिळणेही मुश्कील होतं. उलट ‘बहोत मुश्कील है, सिर्फ एक जनम में नहीं आती, और हमारे शागीर्द बनने बगैर कुछ नहीं मिलेगा, कुछ नहीं समझेगा’ असलीच काहीतरी उर्मट उत्तरं मिळण्याचा तो काळ.
अशा त्या काळात दक्षिण महाराष्ट्रातल्या मिरज या संस्थानी गावातला एक तरुण तिथून निघतो काय आणि पुढे थेट भारताच्या अखंड पंजाबातल्या लाहोर नावाच्या शहरात ‘गांधर्व महाविद्यालय’ या नावाची एक संस्था उभारतो काय! आज सगळंच अजब वाटतं! आणि वय तरी किती.. केवळ एकोणतीस! ज्या काळात कॉलेज किंवा युनिव्हर्सिटी या शब्दांची भाषांतरे झाली नव्हती त्या काळात पं. पलुसकरांनी संस्थेच्या नावातच ‘महाविद्यालय’ हा शब्द स्वतंत्रपणे योजला आहे.
संपूर्ण पारतंत्र्याच्या काळात पं. विष्णू दिगंबर पलुसकरांनी लाहोर शहरात गांधर्व महाविद्यालयाची केलेली स्थापना ही एक संपूर्ण स्वतंत्र घटना होती आणि पुढे त्यांच्या शिष्य-प्र-शिष्यांच्या रूपानं आणि देशात ठिकठिकाणी गांधर्व महाविद्यालयाच्या शाखांच्या रूपानं हेही दिसून आलं की, या कार्याचा व्याप एखाद्या विद्यापीठासारखाच आहे.
संकलन. संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply