ठाणे रंगयात्रामधील प्रा. कीर्ती आगाशे यांचा लेख.
ठाणे शहराच्या नाट्य आणि संगीत जगतातील अतिशय भूषणावह आणि आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणजे संगीत भूषण पं. राम मराठे. आग्रा, ग्वाल्हेर आणि जयपूर घराण्यांच्या तालमीतून आपल्या एका स्वतंत्र गायनशैलीचा ठसा उमटवणारे पं. राम मराठे. या एकाच व्यक्तिमत्त्वाचं बाल नट (चित्रपट), घरंदाज शास्त्रीय गवय्या, मराठी संगीत रंगभूमीवरील गायक नट, बंदिश रचनाकार, उत्कृष्ट तबलावादक, चित्रपट पार्श्वसंगीत गायक, अनवट आणि जोड रागांचे बादशहा आणि आदर्श संगीत गुरू, असे अष्टपैलू गुण पाहिले की मन थक्क होतं. आपल्या 65 वर्षांच्या संगीत कारकीर्दीत 5000 पेक्षा जास्त नाट्यप्रयोग आणि 3000 पेक्षा जास्त मैफिली करणारे रामभाऊ म्हणजे एक सांगीतिक झंझावात होता.
रामभाऊंच्या आक्रमक आणि तडफदार गायकीला ‘झंझावात’ हाच शब्द योग्य ठरेल. आयुष्याच्या अखेरपर्यंत पांढरी चार आणि प्रसंगी काळी तीन पट्टीमध्ये रात्री 9 ते पहाटे 4 पर्यंत, विलक्षण ताकदीने आणि दमसासाने गायची अद्भुत क्षमता रामभाऊंकडे होती. या सादरीकरणात कधी बालगंधर्व आणि मास्टर कृष्णरावांची लडिवाळ गायकी, कधी नोम तोम युक्त आलापी आणि लयदार तिहाया घेणारी आग्रा गायकी, कधी लयदार आणि बुद्धिनिष्ठ रंजक ग्वाल्हेर गायकी अशी चतुरस्र गायकी रामभाऊ श्रोत्यांपुढे अत्यंत सहज ठेवून थक्क करायचे. संगीतविश्वात अशी भारदस्त हुकूमत आणि दरारा निर्माण करणाऱ्या पं. राम मराठे यांची जन्मभूमी पुणे, तर कर्मभूमी ठाणे. रामभाऊंना लोक विचारायचे ‘तुम्ही पुण्याचे का ठाण्याचे?’ यावर रामभाऊ गमतीने म्हणायचे ‘आम्ही फक्त गाण्याचे!’ 23 ऑक्टोबर 1924 साली जन्म झालेल्या रामभाऊंनी वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी सागर फिल्म कंपनीत काम सुरु केले. 1933 सालानंतर ‘मनमोहन’, ‘जागिरदार’ ‘वतन’ आणि त्यांच्या यशस्वी कारकीर्दीची सुरुवात करणाऱ्या ‘गोपालकृष्ण’ चित्रपटातून ते रुपेरी पडद्यावर झळकले.
प्रभात कंपनीच्या ‘माणूस’ या चित्रपटात त्यांनी साकारलेला रामू चहावाला अजरामर झाला. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पण ‘माणूस’ चित्रपट दाखविला गेला. पण रूपेरी पडद्याच्या या चकचकीत मायाजालाचा मोह सोडून त्यांनी आपल्या आईला ‘मी घरंदाज गवय्या’ होईन असं वचन दिलं आणि आपल्या संगीत साधनेला आरंभ केला. या साधनेचा मार्ग खडतर असतो, पण रामभाऊंना लाभलेला ‘गुरु-योग’ केवळ अद्वितीय! पं. मनोहर बर्वे, पं. मिराशीबुवा, पं. बाळकृष्णबुवा बखले यांचे पट्टशिष्य मा. कृष्णराव फुलंब्रीकर; जयपूर घराण्याचे पं. वामनराव सडोलीकर आणि पंडिता मोगुबाई कुर्डीकर; आग्रा घराण्याचे खाँसाहेब विलायत हुसेनखाँ आणि ‘गुणिदास’ ऊर्फ पं. जगन्नाथबुवा पुरोहित, तबला वादनासाठी पं. बाळूभय्या रुकडीकर, पं. जगन्नाथबुवा पुरोहित आणि उस्ताद अहमदजान तिरखवाँ यांची तालीम मिळाल्यामुळे रामभाऊंची सूर-ताल आणि लय यावर जबरदस्त हुकूमत होती. पण ही विद्या हस्तगत करण्यासाठी त्यांनी अपार कष्ट, गुरुगृही राहून सेवा आणि अखंड रियाज ही त्रिसूत्री आयुष्यभर जपली. 1940 साली ऐन उमेदीच्या काळात पं. वामनराव सडोलीकर यांच्याकडे पहाटे 4 पासून पाच तास फक्त मंद्रसाधना आणि खजीचा रियाज रामभाऊ करत. यामुळे आवाजाला अपेक्षित गोलाई आणि घुमारा आला. या स्वरसाधनेबरोबरच तबल्याचा रियाझ सुरू असायचाच. तबलावादनात पारंगत झालेल्या रामभाऊंना बंदिशकार आणि संगीतकार म्हणून घडवलं ते पं. जगन्नाथबुवा पुरोहित यांनी! शब्दांचे अर्थ, भाव आणि त्यांची बंदिशीमधील नेमकी मांडणी याची अनोखी दृष्टी या गुरूने आपल्या पट्टशिष्याला दिली. यातूनच पुढे अनवट राग आणि जोड राग यांची अनोखी खासियत रामभाऊंनी निर्माण केली. म्हणूनच पं. कुमार गंधर्व यांना ‘जोड रंगाचे बादशाह’ म्हणायचे. मा. दीनानाथ मंगेशकरांची आक्रमक गायकी समर्थपणे रंगभूमीवर मांडणाऱ्या रामभाऊंवर, मंगेशकर कुटुंबीयांचा विशेष लोभ होता. तर उस्ताद झाकीर हुसेन रामभाऊंच्या अप्रतिम लयकारीचा नेहमीच गौरव करायचे.
प्रथितयश गवय्या म्हणून संपूर्ण भारतभर संगीत दौरे, आकाशवाणी वरील कार्यक्रम, रेकॉर्डिंग अशी त्यांची घोडदौड सुरू असतानाच, 1950 साली नटवर्य गणपतराव बोडस यांच्या आग्रहास्तव रामभाऊंनी ‘संगीत सौभद्र’ मधील कृष्णाच्या भूमिकेतून संगीत रंगभूमीवर पदार्पण केले आणि संगीत रंगभूमीला जणू झळाळी आली. 1960 ते 1975 हा संगीत रंगभूमीचा साठोत्तर सुवर्णकाळ! ‘सौभद्र’, ‘स्वयंवर’, ‘मानापमान’, ‘मृच्छकटिक’, ‘संशयकल्लोळ’, ‘एकच प्याला’, ‘गोकुळचा चोर’, ‘सुवर्णतुला’, ‘जय जय गौरीशंकर’, ‘मंदारमाला’, ‘मेघमल्हार’, ‘रंगात रंगला श्रीरंग’, ‘बैजू’, ‘तानसेन’ अशा जुन्या नव्या 22 नाटकांमध्ये भूमिका करत रामभाऊंनी संगीत रंगभूमीला नवचैतन्य बहाल केलं. 1963 सालच्या ‘मंदारमाला’सह सहा संगीत नाटकांचे दिग्दर्शन करताना त्यांनी अहिर भैरव, बैरागी, जोग कंस, कानडा रागाचे प्रकार, बागेश्री कंस, बसंत-बहार अशा विविध रागांमधील नाट्यपदे रचून नाट्यसंगीत वैविध्यपूर्ण आणि बहारदार केलं. पण हे सर्व करताना आपल्या वृत्तीला त्यांनी कधी गर्वाचा स्पर्श होऊ दिला नाही किंवा आपला विनम्र, शांत स्वभाव सोडला नाही. कठोर परिश्रम, रियाझ आणि अभ्यासातून मिळविलेल्या विद्येचं दान आपल्या आयुष्याच्या अखेरीपर्यंत त्यांनी निष्ठेने पार पाडलं. त्यांच्या योगदानामुळेच संगीत क्षेत्रात पं. उल्हास कशाळकर, विश्वनाथ बागूल, प्रदीप नाटेकर, राम प्रथम, विश्वनाथ कान्हेरे, सुधीर दातार, मधुवंती दांडेकर, सुरेश डेगवेकर, मधुसूदन आपटे, डॉ. राम नेने, शरद जोशी, अनघा गोखले, शशिकांत ओक, योगिनी जोगळेकर, राजेंद्र मणेरीकर असा गुणवान शिष्यवर्ग त्यांनी तयार केला. त्यांचे सुपुत्र संजय मराठे आणि बालगंधर्व सुवर्णपदकाचे मानकरी मुकुंद मराठे या दोघांनी या ‘नादब्रह्मा’चे संवर्धन आपल्या विद्यादानाच्या कार्यातून अखंड चालू ठेवले आहे. नातवंडे स्वरांगी, प्राजक्ता आणि भाग्येश संगीत, नाट्यक्षेत्रात नावारूपाला येत आहेत आणि संगीत रंगभूमीचं नातं असं पिढ्यान् पिढ्या जोपासलं जातं आहे.
आपल्या 65 वर्षांच्या आयुष्यात संगीत भूषण, संगीत चूडामणी, बालगंधर्व सुवर्णपदक, विष्णुदास भावे गौरव पदक, संगीत नाटक अकादमीचा राष्ट्रपती पुरस्कार असे 100पेक्षा अधिक पुरस्कार आणि मान-सन्मान रामभाऊंना मिळाले. पण त्यांना ‘सरकारमान्य’ पेक्षा ‘लोकमान्य’ आणि ‘रसिकमान्य’ होण्याची उत्कट ओढ होती.
आपल्या शिष्यगणांबरोबर दर्जेदार रसिक श्रोतावर्ग तयार करण्याची दूरदृष्टी रामभाऊंच्या कार्यात दिसते. अनेक संगीत सभा, संस्था, सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन रामभाऊंच्या सल्ल्याने ठाणे शहरात घडत होतं. बालगंधर्व जन्मशताब्दी आयोजन, मराठी नाट्य परिषद आणि ठाणे महानगरपालिकेतर्फे भरविले जाणारे संगीत महोत्सव यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे आणि नामवंत कलाकार ठाण्यात येऊ लागले. अशा संमेलनातून त्यांनी रसिकवर्गाला अभिजात संगीत ऐकवून प्रगल्भ केलं. ठाणे शहरावर त्यांनी आणि ठाणेकरांनी त्यांच्यावर भरभरून प्रेम केलं. त्यांची साधी राहणी, विनम्रता आणि आपल्या गुरुंबद्दलची अपरंपार निष्ठा निव्वळ अजोड म्हणावी लागेल.
‘तपत जपत गुरु नाम, रटत रटत साचे काम’ अशी अर्थपूर्ण बंदिश रचणाऱ्या पं. राम मराठे यांचे देहावसान झाले तो दिवस होता 4 ऑक्टोबर 1989’. म्हणजे त्यांचे गुरू मास्तर कृष्णराव आणि ज्या आक्रमक गायकीचा आदर्श रामभाऊंनी आयुष्यभर बाळगला त्या संगीतसूर्य केशवराव भोसले यांचा अनंतात विलीन होण्याचा तो दिवस! हा योगायोग म्हणावा की अनन्यसाधारण गुरुभक्तीचा प्रसाद म्हणावा?
ललित पंचमीच्या दिवशी 4 ऑक्टोबर 1989 रोजी, हिंदुस्थानी शास्त्रीय आणि नाट्य संगीतातील हा ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळ असलेला पंचम स्वर ‘निराकार ओंकार’ म्हणत पंचतत्त्वात विलीन झाला. ज्या पिढीने रामभाऊंचा ‘सप्तसूर झंकार’ प्रत्यक्ष अनुभवला त्या पिढीला भाग्यवान म्हणायला हवे हे नक्कीच!
— प्रा. कीर्ती आगाशे – 9766628515.
(साभार – ठाणे रंगयात्रा २०१६)
Leave a Reply