जगण्याची साधी सोपी सूत्रे – एकशे छापन्न
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – भाग तेरा
सांगेन गोष्टी हिताच्याच चार – भाग चौदा
पंधरा दिवसातून तीन वेळा म्हणजे दर पाच दिवसांनी डोक्याचे केस, दाढी, नखे, आदि कापावेत. त्यानंतर स्नान अवश्य करावे. मात्र स्वतःच्या हातानी विशेषतः केस कापू नयेत. ते नाभिकाकडून कापून घ्यावेत. दातानी नखे खाऊ नयेत.
स्वतःचे स्वतः केस कापले तर नाभिकाचा रोजगार बुडेल हा व्यवहार सोडला तरी, स्वतःचे केस नीट कापता येत नाहीत. लहानपणी हळुच केस कापून पहाण्याचा अनुभव प्रत्येकालाच असेल.
डोके, दाढी या ठिकाणी जे केस वाढतात, त्यांच्यावर बसलेली धुळ, जीवजंतु साफ होण्यासाठी ते दर पाच दिवसांनी कापावेत, असे ग्रंथकार म्हणतात. आजच्या युगानुसार, दाढी दर दिवशी किंवा एक दिवसाआड केली तरी चालेल, आणि केस दर महिन्याला तरी कापावेत.
कोणत्याही प्रकारची धार्मिक कार्ये करायची असल्यास किंवा एखाद्याच्या मृत्युपश्चात धर्मशास्त्रानुसार मुंडन करायला सांगितले आहे. यामधेही शुद्धी क्रिया अपेक्षित आहे.
पण डोळ्यांच्या पापण्या, भुवया, मिशी आणि छाती या ठिकाणी असलेल्या केसांना अजिबात कापू नये. त्याने नुकसान होते.
छातीवरील केसांमुळे ह्रदय आणि फुफ्फुसे यांना संरक्षण मिळत असते. केसांमधून काही प्रमाणात मलद्रव्ये देखील बाहेर पडत असतात आणि घाम निर्माण व्हायला पण मदत होते. ज्यामुळे रक्ताची शुद्धी होते.
डोळ्यावरील भुवयांचे केस हे डोक्यावरून येणारा घाम डोळ्यात जाऊ नये यासाठी संरक्षक म्हणून काम करत असतात. त्या उगाचच कोरत राहू नये.
जशा भुवया तशा मिशा. नाकातील स्राव वा उच्छवास तोंडात जाऊ नये, यासाठी मिशांचे केस संरक्षण देतात. पिळदार मिशा व्यक्तीमत्व आणखी खुलवतात, हा भाग वेगळा !
डोळ्यांच्या पापण्यांचे केस तर अतिशय नाजुक असतात. डोळ्यांच्या आतील सर्व स्तरांचे संरक्षण होण्यासाठी या पापण्या तत्पर असतात. आपल्या इच्छेविरुद्ध शरीराच्या फायद्यासाठी काही अवयव काम करत असतात. त्यात जसे ह्रदय, यकृत, किडनी, मेंदू हे आतील अवयव आहेत, तसे डोळ्यांच्या पापणीवर आपला ताबा बहुतेक वेळा नसतो. आपल्या नकळत काही धुळ, धूर, सूक्ष्म किटक जर डोळ्यांत जात असतील तर त्यांना अडवण्यासाठी एक सक्षम यंत्रणा असते, त्यात या पापण्यांचा समावेश असतो.
जननेंद्रिये आणि कक्षा प्रदेशी असलेले रोम नियमितपणे काढावेतच. इथे जंतुसंसर्ग होण्याची शक्यता जास्त असते.
सर्व अंगावर असलेले केस हे जणुकाही शरीरावर असलेली पिसे आहेत. त्वचेचे संरक्षण करणे, घाम येणारी छिद्रे बाहेरील धुळीने बुजुन जाऊ नयेत यासाठी या बारीक लवीचा उपयोग होत असतो. सूक्ष्म स्पर्श संवेदना होण्यासाठी, समजण्यासाठी या छोट्या केसांचा उपयोग होत असतो. त्वचेची कांती चमकदार रहावी, यासाठी देखील हे रोम काम करीत असतात.
डोक्यावरचे केस खूप कमी ठेवावेत आणि शेंडी राखल्यास उत्तम. शेंडी ठेवणे म्हणजे ब्रह्मरंध्राचे संरक्षण करणे. आणि विश्वातील सकारात्मक उर्जा थेट शरीरात. अर्थात ज्यांचा विश्वास असेल त्यांना पटेल. हा अनुभव घेऊन पाहण्याचा विषय आहे. शेंडी ही “डिश अँटीना” प्रमाणे काम करते, असा माझा अनुभव आहे. आणि फक्त ब्राह्मण जातीत जन्माला आलेल्यानीच ठेवावी असं काही नाही. अन्य जातीमधे देखील शिखा ठेवतात. असो. ज्याची त्याची शेंडी, ज्याची त्याची मर्जी !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
१४.०९.२०१७
Leave a Reply