जगण्याची साधी सोपी सूत्रे – एकशे चौपन्न
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – भाग तेरा
सांगेन गोष्टी हिताच्याच चार – भाग बारा
जगण्याचे साधे सोपे नियम सांगताना ग्रंथकार पुढे म्हणतात,
बुडण्याचा भय असेल, अशा छिद्र असलेल्या किंवा फुटक्या नावेत बसू नये, किंवा जे झाड पडणारे असते, त्यावर चढू नये.
यात आपलेच नुकसान होणार हे नक्की असते.
आजच्या काळानुसार जी बॅक बुडणारी आहे, त्यात पैसे ठेवू नयेत, किंवा कमी काळात दाम दुप्पट वगैरे फसव्या योजनेत पैसे गुंतवू नयेत. मल्टीलिंक मार्केटिंग हा परदेशी फंडा आहे. आपली गुंतवणुक सोडवून घेण्यासाठी दुसऱ्याला आत गुंतवायचे असा सरळ सरळ अर्थ म्हणजे एम एल एम.
कमी पाणी असलेल्या एका विहिरीत पडलेल्या बोकडाला वर येण्यासाठी, एक बोकड धडपडत असतो. पण वर येता येत नाही. “व्वा, पाणी किती गोड आहे, पिऊन तर बघा !” असे आमिष इतरांना दाखवल्यावर, काठावरून जाणाऱ्या दुसऱ्या बोकडाला, पाणी चाखून बघावेसे वाटते. म्हणून दुसरा बोकड इतर कोणताही विचार न करता, आत उडी मारतो. त्याच्या डोक्यावर पाय ठेवून पहिला बोकड केव्हा विहिरीबाहेर पडतो, ते दुसऱ्याला कधी कळतच नाही, मग तीच युक्ती दुसरा बोकड, तिसऱ्या बोकडासाठी वापरतो याला म्हणतात, मल्टी लिंक !
यात प्राॅडक्ट म्हणून काहीही साधन वापरले जाऊ शकते. मग ती बदकाच्या पिसाची गादी असेल, नाहीतर भादरलेल्या बोकडाची दाढी असेल, नाहीतर एखादे लाॅकेट असेल वा लोहचुंबक असेल, खेळण्यातली गोल्डन डाॅल असेल वा एखादे दंतमंजन असेल. झटपट पैसे मिळवण्यासाठी काहीही फंडे वापरले जातात, पश्चात ताप होऊ नये, यासाठी सावध तो सुखी, हे सूत्र लक्षात ठेवावे.
मातीचे ढेकूळ, दगड वा फळ मारून, (आपल्या किंवा इतरांच्या ) झाडावरचे फळ तोडू नये.
हा मारलेला दगड परत आपल्याच डोक्यावर पडण्याचा संभव असतो, वा कुणाचे तरी नुकसान करणारा असतो. कुणा व्यक्तीचे नाही झाले तरी झाडाचे नक्कीच होते. गरज नसताना दुसरे कच्चे फळ पडणे, झाडावरील घरट्यातील पक्ष्यांच्या पिल्लांना धोका पोचणे, किंवा पलीकडील घराची कौले फुटणे यापैकी काहीही होऊ शकते. अगदीच काही नाही झाले तर असा शेजारी किंवा झाड मालक जेव्हा पाठ धरून बोंबलत येतो तेव्हा सैराट होऊन धावताना आपल्याला इजा होऊ शकते.
परवानगी घेऊन अथवा न घेता कोणाच्याही घरात, दाराचा वापर न करता अन्य मार्गाने घुसू नये.
दुसऱ्याच्या घरात आपण एकट्यानेच कोणाला सांगितल्या शिवाय, किंवा कोणी सांगितल्याशिवाय खुर्चीवर वा उच्च आसनावर बसू नये.
नंतर खुर्ची सोडावी लागली तर ते दुसरे दुःख कोणते नसते. विशेषतः व्यासपीठावर बसणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे.
झोपी गेलेल्यास उठवू नये, हे पण ग्रंथकार लिहितात. पण ही सूचना शाळा काॅलेजमधे वर्गात झोपा काढणाऱ्यांसाठी सांगितलेली नसून, अति श्रमाने जो दमलेला आहे, किंवा ज्याला खरोखरच विश्रांतीची गरज आहे, अशा मंडळींकरीता आहे हे सूज्ञांनी लक्षात घ्यावे.
रात्रभर वाॅटसप चालवून दमल्याभागल्यांसाठी हा नियम लागू होत नाही. अशा मंडळीना उठवताना नाकी नऊ येतात. यांना उठवण्यासाठी हळुच यांच्या कानात म्हणावे, “मोबाईलला लाॅक टाकायला विसरला आहेस, की स्वारी टुणकन उठून बसेल बघा !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
१२.०९.२०१७
Leave a Reply