जगण्याची साधी सोपी सूत्रे – एकशे चौव्वेचाळीस
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – भाग तेरा
सांगेन गोष्टी हिताच्याच चार – भाग दोन
मुक्तवेगश्च गमन स्वप्नाहार सभा स्त्रियः ।
जेव्हा आपल्याला चारचौघात जायचे असते, तेव्हा झोपायला जाण्यापूर्वी, जेवणानंतर आणि जेवणापूर्वी, शाळा, काॅलेज, देऊळ, मार्केट, इ ठिकाणी तसेच एकांतामधे असताना देखील मलमूत्र आदि वेगांचे उदीरण करून नंतरच बाहेर पडावे अथवा अन्य कर्मे करावीत.
मल, मूत्र, ढेकर, शिंका, अश्रु, तहान, भूक इ. तेरा वेग सांगितलेले आहेत. यांना कधीही अडवू नये. जेव्हा हे वेग आतून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करतील, तेव्हा जबरदस्तीने यांना अडवून धरू नये. लगेचच त्यांना मोकळे करावे. यासाठी ग्रंथकारानी एक अध्यायच लिहिला आहे. आणि यापूर्वी या विषयावर अनेक आरोग्यटीपा पण येऊन गेल्या आहेत. एवढे सांगून देखील ग्रंथकार पुनः इथे त्याची आठवण करून देत आहेत.
जसं घरातून बाहेर पडताना स्वतःचा , मोबाईल, रूमाल, चष्मा, पाकीट, कवळी, पेन, लायसेन्स, आयडेंटीटीकार्ड, एटीएम, चावी/ key हे सर्व सोबत घेतलं हाये की नाय्ये, ( मोरूचा पाकपेला आए की ) याची खात्री करतो, तसं मल मूत्र विसर्जन करून झाले आहे की नाही, याचीही खात्री करावी.
म्हणजे आए, मोरूचा पाकपेला शिशु की असंही लक्षात ठेवायला बरं !
नाहीतर बाहेर गेल्यावर लाजेस्तव, किंवा स्वच्छतागृह नसल्यास, वेगांचा अवरोध करावा लागतो. असं वारंवार झाले तर अनेक रोग होतात. हे फक्त आयुर्वेद सांगतो.
अनेक वेळा सकाळी बाहेर पडल्यापासून सायंकाळी घरी येईपर्यंत मल मूत्र वेग अडवून ठेवले जातात. असे होऊ नये.
घरातून बाहेर पडताना विशेषतः लहान मुलांना ही सवय लावावी. नाटक, सिनेमा, पार्टी, भिषी, माॅल मार्केट इ. ठिकाणी गेल्यावर स्वच्छता गृहे शोधण्यासाठीच जास्त वेळ खर्च होतो. असे होऊ नये, याकरीता ही हिताची गोष्ट ग्रंथकार सांगत आहेत.
गंमत म्हणजे हे वेग ज्याला त्याला सांगितले जातात. दुसऱ्या कोणालाही कळत नाही, किंवा कोणत्याही यंत्राला देखील हे समजत नाही.
आपणाला या वेगांची जाणीव कशी होते ? ही जाणीव करून देणारा, आपल्यापेक्षा आणखी कोणीतरी आपल्यापेक्षा वेगळा, पण आपल्या गरजांची जाणीव असणारा, आतमधे ह्रदय सिंहासनावर बसलेला आहे……
तोच तो, अंतस्थ परमेश्वर !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
Leave a Reply