जगण्याची साधी सोपी सूत्रे – एकशे पंचेचाळीस
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – भाग तेरा
सांगेन गोष्टी हिताच्याच चार – भाग तीन
आपले कार्य उत्तम व्हावे असे वाटत असेल तर कल्याणकारी रत्न, गुरु, माता पिता, आदि पूज्य व्यक्ती, यांना वंदन करून, तसेच तूप खाऊन बाहेर पडावे.
आशीर्वाद ही अशी गोष्ट आहे की दिसत नाही पण सूक्ष्मातून काम करत असते. जे दिसत नाही, ते नाही, असे नाही ! हे आपण आधीच मान्य केले आहे. ज्यांना हे सूक्ष्म प्रकरण किंवा आशीर्वाद वगैरे मान्य नसेल, त्यांनी मोठ्यांना निदान सांगून तरी घराबाहेर पडावे. म्हणजे घरात कळेल, कोण कुठे चालला आहे तो !
रत्न हे शुभसूचक असते. म्हणूनच सकाळी घरातून बाहेर पडताना चांगली रत्ने पहावीत, त्यांना स्पर्श करावा, म्हणजे सकारात्मक उर्जा तयार होते. मनातील नकारात्मकता जाते. प्रत्येक रत्नांचे गुरुत्व आणि गुणधर्म वेगवेगळे असते. केवळ रासायनिक संघटन पहायचे असते तर कोळसा आणि हिरा एकच आहेत. पण त्याहीपेक्षा कितीतरी पटीने या दोघांमधे फरक आहे. याचा अतिशय सूक्ष्म अभ्यास आयुर्वेदात केलेला दिसतो.
आयुर्वेदात अनेक रत्ने, उपरत्ने, वर्णन केलेली आहेत. ही रत्ने फक्त अंगावरच धारण करायची असतात असे नाही. त्यांचे औषधी गुणधर्म, त्यांची उपयुक्तता, त्यापासून पोटात घ्यायची औषधे तयार करणे, त्यांचे गुणदोष इ. सर्वांचा अभ्यास आयुर्वेदात केलेला आहे. गेली कित्येक वर्षे या रत्नांवर संशोधन सुरू आहे. या अंधश्रद्धा नाहीत, एवढे लक्षात ठेवले तरी पुरे !
ज्यांचे दर्शन घेऊन घरातून बाहेर पडावे अशा गुरुला आम्ही आता मानत नाही. जरा कुठे गुरुच्या नावात राम दिसला आणि त्यांना प्रसंगवशात शिक्षा झाली की, किती उकळ्या फुटतात, काही जणांना! रामाला दूषणे देण्यात ज्यांचे आयुष्य गेले त्यांच्याकडून आणखी काय अपेक्षा ठेवणार म्हणा ! राम जसा समजून घ्यायला हवा तसा समजूनच घेतला नाही, की राम या शब्दाची अॅलर्जी निर्माण होते. असो !
तूप खाऊन बाहेर पडावे, किंवा तूप पाहून किंवा तूपाला हाताने स्पर्श करावा. आणि घरातून बाहेर पडावे. असं करण्यामधे देखील सकारात्मकता निर्माण व्हावी हाच हेतू दिसतो. तुपाचे दर्शन घेणे, तुपाला स्पर्श करणे आणि तुप खाणे हे चढत्या क्रमाने उत्तम गुणांचे आहे.
मुद्दाम हा विषय इथे सांगण्याचे कारण आज तुपाला एवढी नावं ठेवली जातात, इथपर्यंत मजल पोचली आहे, की तुप म्हणजे जणु काही विषच म्हणे ! घोर कलियुग म्हणतात, ते हेच.
तुपासारख्या अमृतालाच आम्ही घराबाहेरच काढायला लागलो आहोत. आणि शतायुष्याची अपेक्षा करतोय. तुपाशिवाय कसं शक्य आहे ? नुसत्या कॅल्शियम च्या गोळ्या खाऊन आणि पालकाचा ज्युस पिऊन आरोग्य मिळत नसतं. ( उलट बिघडतंच ! )
दैव किती अविचारी, जीवन गती ही न्यारी. मूर्ख भोगितो राजवैभवा….सारखं म्हणावं वाटतं….
तुपाची वाटी, अमृत असून बिचारी
वनी वनी फिरती अविचारी.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
Leave a Reply