प्रसिद्ध इतिहासकार अर्नार्ड टॉयन्बी एकदा परदेशात व्याख्यान देण्यासाठी गेले होते. आपला दौरा संपवून ते मायभूमीला जाण्यासाठी परत निघाले. बोटीचा प्रवास होता त्यामुळे वेळ लागणार होता. त्याच बोटीतून एक धर्मोपदेशकही प्रवास करीत होते. त्यांना समजले की टॉयम्बीदेखील याच बोटीत आहेत. त्यामुळे त्यांनी स्वतःहून टॉयन्बीची ओळख करून घेतली. आणि मग उभयतांमध्ये विविध प्रश्रांवर चांगलीच साधकबाधक चर्चा झाली.
बोटीचा प्रवास चालूच होता. एके दिवशी अचानक समुद्र खवळला. समुद्राच्या उंचच उंच लाटांनी बोट हेलकावे खाऊ लागली. एवढ्या मोठ्या बोटीवर नियंत्रण ठेवणे कप्तानाला अवघड जाऊ लागले. त्याने सर्व प्रवाशांना एकत्रित करून आलेल्या संकटाची कल्पना दिली व समुद्रात आलेल्या वादळामुळे काहीही होऊ शकते असा इशारा दिला.
कप्तानाच्या इशाऱ्यामुळे सर्वच प्रवासी भयभीत झाले. आपल्याला आता जलसमाधी मिळणार या कल्पनेने धर्मोपदेशकदेखील खूप घाबरले. त्यांनी परमेश्वराचा धावा सुरू केला. प्रार्थना संपल्यानंतर त्यांना टॉयन्बीची आठवण झाली. परंतु टॉयन्बी प्रवाशांमध्ये कोठेच दिसत नव्हते. त्यामुळे धर्मोपदेशक घाईघाईने त्यांच्या केबिनमध्ये गेले. तेथे टॉयन्बी अतिशय शांतचित्ताने खुर्चीवर बसून एक पुस्तक वाचत बसल्याचे त्यांना आढळून आले.
वास्तविक इतर प्रवाशांप्रमाणे टॉयन्बीनीदेखील कप्तानाचा इशारा ऐकला होता. मात्र त्यांच्या मनात कसलीही भीती उत्पन्न झाली नव्हती. त्यांना शांतपणे वाचत असल्याचे पाहून धर्मोपदेशक म्हणाले की, हे काय? या भयंकर वादळात बोटीचे काहीही होऊ शकते हे माहीत असताना तुमचे वागणे एवढे धीरोदात्त कसे.
त्या वेळी टॉयन्बी त्यांना म्हणाले, मलाही माहीत आहे की, आपल्या मरणाची घंटा वाजू लागली आहे. त्यामुळे जो काही थोडा वेळ उरला आहे त्याचा मी जास्तीत जास्त उपयोग करून घेत आहे. त्यांच्या या उत्तराने धर्मोपदेशकाला त्यांच्या धीरोदात्तपणाचे कौतुक वाटले.
Leave a Reply