शांत होती रात्र सारी, आणि निद्रे मध्ये सारे
खिडकी मधूनी वाहे, मंद मंद ते वारे….१
तोच अचानक तेथे, चिमणी एक ती आली
मध्य रात्रीचे समयी ओरड करू लागली….२
जाग येता निद्रेतूनी, बत्ती दिवा पेटविला
काय घडले भोवती, कानोसा तो घेतला….३
माळावरती बसूनी, चिव् चिव् चालू होती
बघू लागलो दूरूनी धडधडणारी छाती….४
मध्येच उडूनी जाई, दारावरती बसे
तगमग देखूनी तीची, कांहीं न कळत असे….५
भाषा न कळली जरी, धडकन सांगत होती
‘संकटात आहे हो मी, ह्या भयाण मध्यरात्री’….६
केवीलवाणी बघूनी, भूतदया ही आली
काय हवे तिजला, या अवचित वेळी….७
जेंव्हां बसे माळावरी, ओरड वाढत होती
हालचालीतील बैचेनी, काही सूचवित होती….८
आधार घेवूनी कसला, माळावरती चढलो
विखूरलेल्या सामानी, निरखूनी बघू लागलो…९
धस्स झाले मन बघूनी, एक लांब त्या सर्पाला
छोट्या घरट्या पुढती, विळका घालूनी बसला..१०
जीभल्या चाटीत होता, समोर बघूनी भक्ष्य
चिव चिवणारी पिल्ले, होती तयाची लक्ष्य….११
चाहूल माझी लागता, सावध परि झाला
छलांग मारीत वेगे, झरोक्यामधूनी गेला…१२
काळसर्प तो बघूनी, उडाली होती चिमणी
घुटमळला जीव परि, पिल्लामध्ये अडकूनी….१३
आघाद होता हृदयी, कळवळूनी ती गेली
मातृत्वातील ओढीने, गहीवरूनी ती आली…१४
भयाण असूनी संकट, चिमणीची बघता शक्ती
यश मिळविले तिने, योजूनी केवळ युक्ती….१५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply