उगमापाशी ओहोळ रूपातील टीचभर नदी पहिल्यांदा पाहिली अमरकंटकला ! नर्मदा कुंडातील बालरूपातील नर्मदा एखाद्या पाळण्यात पहुडलेल्या शांत बालकासारखी भासली. नंतर तिचे रूप, परिक्रमा वगैरे “ऑ ” प्रकारातील !
कोठलीही नदी उगमापाशी थांबत नाही. वाटेत तिच्यावर किती धरणे बांधली जातील हे तिला माहीत नसते. किती जमीन ओलिताखाली येईल याची तिला कल्पना नसते. तिला पूर येऊन ती केव्हा आणि किती हाहाकार माजवेल, याचे आकलन उगमाला नसते. तिचा मार्ग, वाट-वळणे ती ठरवत नसते. कधीतरी सुर्यबाप्पा कोपला तर ती आटतेही ! प्रवाहातील गाळ आणि काय-काय पोटात कोंबत ती सहज “मैली ” होते.
किती अंतरावरील कोणत्या समुद्रात केव्हा विलीन व्हायचे हेही तिच्या हातात नसते. मध्येच संगमाच्या ओढीने एखादा प्रवाह (तो नद ही असू शकतो) येऊन मिळाला तर ती त्याच्याशी जुळवून घेत, पण ” खळखळ ” (असा आवाज) म्हणत मार्गक्रमणा करू लागते.
माझ्या मनातील शब्द भावनांना लगडत मेंदूच्या आज्ञेने उगम पावतात माझ्या संगणकाच्या पडद्यावर ! तेथून त्यांचा प्रवास DTP कार्यालयातील बोटांच्या माध्यमातून PDF रूप धारण करतो. वाटेत दोन वेळा प्रूफ रिडींग च्या वाटेने दुरुस्त होत शब्द निघतात छपाईला ! मध्येच मित्राचे सुंदर मुखपृष्ठ त्यांना प्रेमाचे /संरक्षक आवरण घालते. प्रकाशात आलेले शब्द मग कोठकोठल्या वाचकांच्या हातात, कधीतरी मनात जाऊन बसतात. कोणीतरी त्यांच्याबद्दल दोन शब्द चांगले बोलतोही.
ते शब्द कोठल्या कोठल्या घरात, ग्रंथालयात कपाटांमध्ये /रॅक्समध्ये इतरांबरोबर समझोता करीत सुखेनैव नांदतात. त्यांचा ठावठिकाणा मला कळतही नाही, त्यांच्या व्यथा ते मला सांगत नाहीत, आणि उगमाकडे परततही नाहीत.
नदीतल्या पाण्याप्रमाणे ( कधीकाळी माझे असलेले) शब्द कोणत्यातरी समुद्रात सामावून जातात.
पाण्याच्या आणि शब्दांच्या या समान ” मकर ” संक्रमणाच्या शुभेच्छा !
माझं नवं ( आणि दहावं ) पुस्तक ” पांढरा पडदा ” येतंय या महिना अखेरीपर्यंत !
हे पुस्तक मी माझ्या पत्नीला अर्पण केलंय. फार पूर्वी तिने “वाटेवरच्या कविता ” हा तिचा काव्यसंग्रह मला अर्पण केला होता. ही उशिराची रिटर्न गिफ्ट ! संक्रांतीच्या पर्वाच्या पार्श्वभूमीवर !!
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply