नवीन लेखन...

संसार

“मलयगिरीचा चंदन गंधीत,
धूप तुला दाविला….
स्वीकारावी पुजा आता,
उठी उठी गोपाळा…!”

कुमार गंधर्वांच्या आवाजातली ही अमर भूपाळी शंकर मथार्‍याच्या टेपरिकॉर्डरवर लागली तसं सारजाची झोप मोडली.शंकर मथार्‍याच्या टेपरिकॉर्डरचा भोंगा वाजनं आण गल्लीतल्या बायामाणसांचं पहाटचं उठनं हे मागील काही वर्षांपासून गल्लीतल्या बायकांसाठी नेहमीचच होतं.गावात फक्त शंकर म्हाताऱ्याच्या घरीच टेपरिकॉर्डर होता. शंकर मथरा पहाट सुखाची चांदणी निघाली की मोठ्ठया आवाजात आपला टेपरेकॉर्डर सुरू करायचा. सारजा जरा गडबडीनच उठली. कामाचा लय रोंभा पडला व्हता,त्यात पेरणीचे दिवस व्हते. पहाटचे सगळे कामं आटपुन शेतात जायचं व्हतं.तिनं उठून तोंडावर पाण्याचा सपकारा मारला,केसं नीट करून बुचडा बांधला अन चुली जवळ जाऊन चुलीतला एक भला मोठा ढेपसा हातावर घेऊन दात घासत घासत तिच्या नवऱ्याल,दौलतल आवाज दिला.पेरणी पाण्याचे दिवस असल्यानं दिवसभरच्या कष्टानं थकून दौलत आरमोडून झोपला व्हता. त्यालं तसं झोपलेलं पाहून सारजाच्या डोळ्यालं समाधान वाटत होतं. खरं म्हंजे कामाचा लय रोंभा पडला होता पण तरी बी त्याची झोप न मोडु देता तशीच ती उठली . पारोश्या अंगानं सयपाक पाणी करू नाही मंतात…! सारजीलं लहानपणापासूनच थंड पाण्यानं आंघुळ करायची सवय होती,म्हणून मग आधी तिनं आंघुळ करून घेतली. तव्हरोक दौलत बी उठला होता. त्याच्याकडं रेडीओ होतख.रेडिओवर गाणे ऐकण्याचा त्यालं लय नाद होता. झोपतून उठून त्यांनं रेडिओवर विवीध भारती लावलं.तेव्हड्यातं नहानीतून आंघुळ करून बाहिर येणारी सारजा त्यालं दिसली. सारजालं पाहून त्याचे डोळे उघडे ते उघडेच राहिले.तिचा तो लांब लांब केसांचा वलबट केशसंभार पाहून तो खुळ्यागत तिच्याकडं पाहू लागला. तेवढ्यात रेडिओवर गाणं लागलं होतं…

‘सजनी ग भुललो मी काय जादू झाली
बघून तुला जीव माझा होई वर खाली’

दौलतलं आपल्याकडं तसं बघतांनी पाहून सारजीलं लय लाज वाटली. ती तसंच पळत जाऊन आरश्या पुढं गेली. देवळीतून मेणाची डबी काढून टिचकोर मेन बोटावर घेऊन तिनं कपाळावर लावलं आन् त्याच्यावर कुखाची चंद्रकोर कोरली. चापुन चोपून नेसलेल्या नऊवारी लुगड्यावर तिच्या केसांचा अंबाडा तिच्या खानदानी सौंदर्यात आजुकच भर घालत व्हता. तिच्याकडं पाहून दौलत तिच्या भोवतालच पिंगा घालू लागला. तेवढ्यात दौलतचं मथारं परसाकुन आलं. दौलतलं सारजी भवताल पिंगा घालायलेलं पाहून म्हताऱ्याचा रागाचा पारा चढला. तसं बी म्हताऱ्याचा स्वभाव जरा तामशिळच होता. “आता इथचं सोंग करत बसणार आसशील तं जनावरायचं चारा पाणी आन् शेण काय तुव्हा बाप काढणार हे का रं सुक्काळीच्या…!” म्हाताऱ्यानं पहाट रामपहार्‍यातच दौलतलं शिवी हासडली होती. तसं दौलतनं रेडिओ आपल्या बगलत लटकवला,बैलांच्या खुराकाच टोपलं उचललं अन खाली मान घालून मुकाटपणे जनावरांच्या गोठ्याकडे पळाला. सारजीबी आपला पदर सावरत आतल्या घरात पळाली. करड्या शिस्तीचा स्वभाव आन् तामशिळपणामुळं मथार्‍यापुढं घरातलेच नाही तं भावकीतले बी सगळेच जरा दबूनच राहायचे.

सारजीनं आंगनातली चूल पेटवून चुलीवर पाणी तपायलं ठेवलं आणि ती आतल्या घरात जात्यावर दळण दळायलं गेली.जात्याच्या पाळुवर खुट्टा ठोकून सुपातली मूठभर जवारी जात्याच्या तोंडात टाकत सारजा आपल्या गोड आवाजात ओव्या गाऊ लागली.

“राम म्हणू राम, राम गळ्याचं ताईत
घातिलं गळ्यामंदी, नाही जनाला माहित|

राम म्हणू राम, राम संगतीला चांगला
माझ्या हुरद्यात, यानं बंगला बांधिला|

राम म्हणू राम, राम सुपारीचं खांड
याचं नावू घेता, देही झाली गार थंड|

रामाला आला घाम, सीता पुसी पदरानं
कोणाची झाली दृष्ट, रथ गेला बाजारानं|

रामाला आला घाम, सीता पुसिती लहुलाया
कोणाची झाली तुला दृष्ट, माझ्या रामराया…|”

तिच्या आवाजालं एक आलगच गोडी होती. जात्यावर ओव्या म्हणत म्हणत ती तिच्या संसाराची गोष्ट सांगत होती.तिचा सासरा वसरीत बसून तिच्या ओव्या ऐकायचा. सारजाच्या सासर्‍यालं सारजीचं लई कौतुक वाटायचं. त्याच्या आडमुठ्या पोराचा संसार सारजी खूप नेटानं चालवतेय हे पाहुन त्यालं लय बरं वाटायचं. सारजा सासर आन् माहेर आसं दोन्हीकडील पाव्हणे-राव्हणे,नातेवाईक,सोयरे-धायरे असं सगळ गणगोत मानमरातब ठेवुन संभाळायची.त्यामुळं तिच्या सासर्‍यालं तिचा लय आभिमान वाटायचा. तेवढ्यात तिच्या सासर्‍यालं खोकल्याची उबळ आली आणि तो जोर जोरात खोकलु लागला.हे ऐकुन जात्यावरचं काम तसच आर्धवट सोडून सारजी पळतच बाहिर वसरीत आली.तिनं बाजखालचं टोपलं उचललं,त्यात जराक्स राखुडं टाकलं आणि ते सासऱ्याच्यापुढं आणुन ठेवलं. लग्न होऊन सासरी आलेल्या सारजाची सासू,सारजा सासरी आल्यानंतर एक-दोन महिण्यातच मेली आन् अकस्मातच सगळ्या घराची जबाबदारी सारजावर येवुन पडली होती.तिनं बी मोठ्या हिमतीनं एक एक करत सगळ्या जबाबदाऱ्या हातात घेत घर संभाळायलं शिकली होती. लग्नानंतर इतक्या वर्षांनी सुध्दा तीनं ना कव्हा सासर्‍यालं काही कमी पडू दिल ना कव्हा तिच्या नवरा आणि लेकरा बाळायलं काही कमी पडू दिल.दम्याची शिकायत असल्यानं पहाटं पहाटं तिच्या सासर्‍यालं खोकल्याचा तरास व्हयाचा.खोकल्याची हुबळ आली की मग ते मथारं तिथच बसून टोपल्यात बेंडके टाकायचं. अस असुनही सारजीनं कव्हाच तक्रार केली नाही की किळस वाटून घेतली नाही.ती घरातले सगळे काम इमाने इतबारे करून आपला संसार नेटानं चालवायची.

सारजाच दळून झालं होतं. आभाळात तांबडाई फुटत असल्याने बाहेर पाखरायचा किलबिलाट सुरू झालता.तिनं जात्या भवतालचं पीठ सुपात घेतलं अन् लगबगीनं ती चुलीकडे निघाली.तेवढ्यात,

“दार उघडा नां नाव सांगा नां,
देवाचा जी देव पहारा..
रामाचा जी राम पहारा…!”

डमरू वाजवत बैलावर बसुन भिक्षा मागणारा कुर्मुड्या तिच्या दारात डमरू वाजवत गाणं म्हणु लागला.तिनं कनग्यातून पसाभर जवारीचे दाणे घेतले आन् त्या कुर्मुड्याच्या झोळीत टाकले.डमरू वाजवत वाजवत गाणं गातं तो कुर्मुड्या निघून गेला.

पहाटं सुखाची चांदणी निघाल्यापसून ती उठली होती.तिची कामाची लगबग चालू होती दौलतच्या रेडिओवर गाणं लागलं होतं…..

“जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा…..!”

गाईच्या शेणाचा एक पव्हटा आणुन त्यात जराशी बुरुजाची ढवळी मातुडी मिसळून तीनं चूल सारवली.मग तिनं सडा सारवन आटपुन अंगणात रांगुळी काढली. तेवढ्यात दौलत जनावरायचं चारा-पाणी आटपुन,शेन काढून घरी आला होता. आल्या आल्या त्यांनं दुधाची चरवी सारजाकडं सोपवली.

सारजान रातच्यालच चुलीत ईखोरावर राखुड्याचे ढेपसे ठुलते.आताबी ईखोर चेतीच व्हता.दोन-तीन गौर्‍यायचे खांडं आन् झिपल्या एकाखाली एक रचुन फुकणीनं ती आतल्या ईखोरालं शिलगवु लागली.आदल्या दिवसाच्या पावसामुळे सगळं इंधन सादळलं होतं त्यामुळं सगळ्या घरात धुपटच धुपट झालतं.धुपटानं खोकल्यासंगच तिच्या डोळ्यातुन पाणी बी येऊ लागलं. हे पाहून दौलतलं वाईट वाटलं. तो सारजाजवळ गेला आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून तिलं म्हणु लागला,“सारजा यंदा सुगी जर चांगली पिकली नं तं म्या तुलं पाच तोळ्याचं सोन्याच गंठण तं करीनच पण संगटच तुलं घरातं धुपट व्हवु नाही म्हणुन एक धुरांड बी करून देतो बघ….! मग तं आमच्या राणीसायबांच्या डोळ्यातं पाणी येणारं नाय नं….!”

“आले मोठ्ठे गंठण घेणारे…..त्यापक्शा जनावरायचा गोठा बांधा आंधी…. अन् लयच धुपटाची काळजी वाटत असलं नं तं बाहिर दोरणीच्या वरतुन टांगलेल्या जराक्शा सनकाड्या आणा चुल पेटवायलं…! एकदा का ईखोर पेटला की मंग धुपट आपोआप पळून जाते….!”

तसं दौलतनं वसरीतून दोरनीच्या वर्‍ही टांगलेल्या मूठभर सणकाड्या आणुन चुलीत घातल्या अन फुकणीनं फुकू लागला तसं त्या सनकाड्यायनं पेट घेतला.आग शिलगताच चुलीतल्या गौर्‍या अन झिपल्या पेटल्यानं घरातलं धुपट गायब झाल. दौलतच्या रेडीओवर गाणं लागलं….

“दिस जातील,दिस येतीलं
भोग सरंल, सुख येईल.”

सारजीनं चुलीवर दूध तपवायलं ठेवलं. बाहिर झुंजुरका उजेड पडत होता. सारजान वसरीतले शेरडं सोडुन बाहिर अंगणात नेऊन बांधले. डारल्याखालच्या कोंबड्याही चेती व्हवुन पहाटची बांग देऊ लागल्या तसं तिनं त्यांनाही मोकळ करून अंगणात सोडलं. सारजाची पहाटं उठल्यापसून सारखी लगबग सुरू होती. तेवढ्यात उगवत्या टायमालं टाळ आन चिपळ्या कुटतं वासुदेव आला होता. आंगावर झब्बा आन् पायघोळ पयजामा,कमरलं खवलेली बासरी,आणि डोक्यावर मोर पिसाचा टोप घातलेला वासुदेव आपल्या हातातला टाळ आण चिपळ्या वाजवत गवळण मनत होता.सारजानं पुन्हा एकदा कनगुल्यातून पसाभर दाणे काढुन वासुदेवालं वाढले. सगळ्या देवायच नाव घेत तेह्यलं दान भेटलं असं म्हणत वासुदेव चालता झाला.

पहाटंपासून सारजाची लगबग चालली होती.जनावरायचा चारा पाणी उरकून आलेला दौलत चुलीत जळतन टाकत टाकत सारजासंग गप्पा करू लागला. नवरा बायकोच्या त्या पहाटच्या गप्पा पहाटलं पडणाऱ्या साखर झोपंपेक्षा बी गोड होत्या. पहाटं पहाटं अंगणात कलरव करणाऱ्या चिमण्या,बांग देत अरवणाऱ्या कोंबड्या, अन गाई गुरांच्या हंबरण्यान वातावरणात चैतन्य निर्माण झालं होतं. पहाटच्या त्या रामपहार्‍यातल्या गारेगार,,मनमोसट अश्या त्या अल्हाददायक गारव्याचा गोडवा मनालं मोहरून टाकत होता.सारजाच्या सासऱ्याची चहाची वेळ झालती. रात्रीच्या टायमालच सारजी दोन-तीन भाकरी जास्तीच्या करून ठेवायची.दोघबी बाप-लेकं भुकचे लय कवळे व्हते.दिवस उजेडते न उजेडते की बाप लेकायलं नेहारीसाठी एक दीड भाकर आण परात भरून चहा लागायचा. भुरक्या चटणीवर तेलाचे दोन थेंब आणि एका खाराच्या फोडीनं नेहारीच ताट सजवून सारजीनं बापलेकायल न्याहारी वाढली अन लसूण निसत निसत चहाच भगुनं चुलीवर ठुलं.

नवरा आणि सासऱ्याचं चहापाणी झालं की सारजा देव पूजायलं बसली.सूर्यदेव वर येत होता. सारजाचा नवरा सुताराकडं आवतं भरून घ्यायसाठी गेला तं सासर्‍यानं झिपर्‍या वाढलेल्या लेकरायलं वारकाकडं डोसक्या करायलं नेलं. सारंजानं झटपट पूजापाथी आटपून तुळशीलं पाणी घातलं अन् प्रदक्षिणा मारत सूर्यनारायणालं नमस्कार केला.कामाच्या घटमटीत तिचा पहाटचा चहा बी प्यायचा राहिला व्हता. तेवढ्यात येटाळीतल्या दोन शेजारणीयचे भांडण डिकले होते. अंगणात कचरा टाकण्यावरून दोन शेजारणींची चांगलीच जुपली होती. बाकीचे शेजारीपाजारी गलका करून त्या भांडणाची मजा घेत होते. सरजीनं त्याकडं दुर्लक्ष केलं आणि ती आपल्या कामालं लागली.

पोरांची शाळेची वेळ झालती.डोस्की करून एवढ्यात ते येतीलच या हिसाबान तिनं अंगणातल्या चुलीवर पाणी तपाय ठेवलं आणि स्वयंपाक करायला लागली. धपाधप भाकरी थापत तिनं कोरड्यासालं फोडणी देली अन पोरांचे शाळेचे दप्तरं आवरू लागली. तेवढ्यात तिचा नवरा भरलेलं आवुतं जुपून शेताकडं जायच्या हिसाबानं दारी आला.तेवढ्यात शेजाऱ्याची फटफटी पुढून आल्यानं औतालं जुपलेले बैल बुजाडुन पळाल्यानं बेसावध दौलत धप्पकन अंगणातल्या चिखलात पडला. हे पाहून शेजारीपाजारी ख्खी ख्खी हसू लागले. सन्नकन दौलतच्या डोक्यात राग शिरला,अन् रागातच त्यांना सारजीलं आवाज देला,“सारजे,भाकरी बांधल्या का?… उशीर व्हयाला दे लवकर..!”

“देते …देते वाईच जराक्स थांबा…! कोरडयासालं तेवढं आंधन येऊ द्या.” असं म्हणत ती धुडक्यात भाकरी बांधायलं लागली. आंधन आलेलं गरम कोरड्यास कॅटलीत भरून ती गडबडीनं बाहेर आली तं तिचा नवरा दारी नव्हता.तिलं जरासा येळ लागल्यानं तिचा नवरा भाकरी न घेताच रागानं फणफणत शेती गेलता.हे पाहुन ती कावरीबावरी झाली.पहाटपसून चहाचा घोट की अन्नाचा कण तिच्या पोटात गेला नव्हता. सुखाची चांदणी निघाल्यापासून ती सारखी राबत होती.नवरा उपाशीपोटीच शेतात गेल्यानं सारजीच्या डोळ्यात टच्चकन पाणी आलतं.

तेवढ्यात सासरा आणि लेकरं डोस्की करून आले. सारजीनं लेकरायलं आंघुळी घालुन शाळलं धाडलं.सासर्‍यालं आंघुळीलं पाणी टाकलं.घाईघाईत तिनं घरातला रोंभा आवरला,गडबडीतच कपडे धुतले आन सासर्‍यालं जेवन वाढुन टोपल्यात भाकरी भरून ती शेताकडं निंघाली. तिचा नवरा भाकरी न नेताच शेती गेल्यानं सगळ्या रस्त्यानं ती स्वतःच्याच मनालं खात होती.

शेतात येताच तिनं दौलतलं आवाज देला तसा आउत सोडून दौलत खाली मान घालून तिच्याकडं आला.पहाटं फणफणत रागानं शेतात आल्याचं त्याला वाईट वाटत होतं. बैलं बुजाडल्यानं तो पडला होता आणि शेजारीपाजारी फिदी फिदी हसत असल्यानं त्यालं सनक भरूली होती .तो आलेला राग त्यानं उगाच सारजीवर काढला व्हता.यात सारजीचा काहीबी दोष नव्हता. पहाटं चार वाजल्यापासून ती घरात राबत व्हती हे त्यालबी कळत होतं.क्षणभराच्या रागानं शेतात निघून आल्याचं त्यालं वाईट वाटत होतं. सारजीलं आलेलं पाहून त्यालं बरं वाटलं…ती कव्हा एकदा शेतात येते याचीच तो वाट पाहत होता.सारजीनं झाडाखाली टोपलं टेकवलं तसा तो मान खाली घालूनच आला.

“काय व,एवढा काय तनका आलता तुम्हालं की, भाकरी न घेताच निंघून आले…!”

“म्हंजे आपण चिखलात पडलो व्हतो हे हिलं कळलं नाही तर…!” दौलत मनातल्या मनात म्हणाला.आपली फजिती बायकोलं कळाली नाही हे वाटुन तो मनातल्या मनात खुश झाला.त्यालं बरं वाटलं.

तीन कॅटलीतलं कोरड्यास एका वाटीत घेऊन त्यालं वाढलं. त्यानं टोपल्यातल्या धुडक्यातली भाकर हातावर घेऊन त्याच्यावर खाराची फोड घेतली आणि घास मोडला. अचानक काहीतरी आठवल्यासारखं होऊन तो थांबला आणि तिलं म्हणला,“काय व सारजे, तू जेवली का नाही..?”

तसं तिनं माननच नकार देत,“तुम्ही उपाशी असतानी मलं अन्न गोड लागते व्हयं…!” असं म्हणलं आन् दौलतलं गहिवरून आलं. पहाटं आपण सारजीलं उगाचच रागात बोललो असं त्यालं वाटू लागलं. त्यांनं हातावरच्या भाकरीचा कुटका तोडून कालवणात भिजवला आणि तिच्या तोंडापुढं हात केला. दौलतच्या मायेमुळे तिच्या डोळ्यात टचकन आनंदाश्रु आले. रागाच्या भरात कधी कधी दौलत तिच्याशी हेकटपणे वागायचा पण तो तिच्यावर खूप माया बी करायचा. ती पुढ्यात आली की त्याच्या मनातला राग बर्फासारखा ईतळायचा. तीनं डोळे पुसले. भाकरीचा एक घास मोडला आणि कालवणात भिजवून त्याच्याकडे केला. त्याच्या तोंडात तो घास भरवतांना ती खट्याळपणान त्याच्याकडं पाहात हळूच म्हणली,“काय हो पहाटं बैलं बुजाडल्यावर तुम्ही चिखलात पडले आन् तसेच भरक्या कपड्याने शेतात आले का?…कपडे तं बदलायचे नं…!”

तिच्या या बोलण्यानं क्षणभर दौलत स्तब्ध होऊन तिच्याकडं पाहतच राहिला….आणि अचानक दोघेही हसायला लागले.

दौलतच्या रेडिओवर गाणं लागलं होतं…,

“देखा संसार संसार,
दोन्ही जिवांचा सुधार

कदी नगद उधार,
सुख दुखःचा बेपार….।”

©गोडाती बबनराव काळे,लातुर
9405807079

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..