सामाजिक बदलांचा आणि आर्थिक विकासाचा वेग जसजसा वाढत चालला, तसतसं माणसाचं राहणीमान झपाट्यानं उंचावत चाललं. विज्ञानानं असंख्य सुखसुविधा निर्माण केल्या. शिक्षणाचा प्रसार वाढला. ज्या समाजात ‘व्ह. फा. ‘पर्यंत शिकणाऱ्या मुला-मुलींकडे लोक आदरानं बघत होते, त्याच समाजात घरोघरी पदवीधर दिसू लागले. जास्तीतजास्त उच्च शिक्षण घेतलेला, नोकऱ्यांमध्ये मानाच्या जागा मिळवणारा आणि आर्थिक दृष्ट्या संपन्न असा एक नवा वर्ग, उच्च मध्यमवर्ग निर्माण होऊ लागला. हा समाज स्वत:ला बुद्धिजीवी समजतो. इतिहास आणि वर्तमानातल्या असंख्य सामाजिक घडामोडींची याला माहिती आहे. अडीअडचणीसाठी आर्थिक पाठबळ आहे. या पुंजीवरती त्याच्या जीवनाचा पाया स्थिर असायला हरकत नाही. पण प्रत्यक्षात तसं दिसत नाही.
साध्याशा संकटाच्या चाहुलीनं माणसं मोडून पडताना दिसतात. जिद्दीनं आयुष्याला सामोरे जाण्याऐवजी प्रवाहपतित होतात. दोन सुशिक्षित व्यक्ती परस्परांना भेटल्या तर त्यांना बोलताना विषयांची वाण पाडू नये. पण तसं होत नाही. बऱ्याच वेळा मोठी डिग्री घेतलेल्या, लेटेस्ट फॅशनची उंची वस्त्रं नेसलेल्या व्यक्तीशी बोलताना जाणवतं, ‘अरे याचं अनुभवाचं विश्व मर्यादित आहे. विचारांची झेप मोठी नाही. अतिशय वरवरचं उथळ व्यक्तिमत्त्व आहे आणि मग हाय-हॅलो’ झालं की गप्पांचे विषय संपतात. या वर्गाला आजूबाजूच्या समाजाचं चतुरस्र ज्ञान असतं. ज्याला आपण जनरल नॉलेज म्हणतो, ते चांगलं असतं. आलेली संधी झटकन पकडून स्वतःची उन्नती करून घेण्याची कला साधलेली असते. पण विचारांची खोली पुरेशी नसते. संवेदनाक्षम तरल मन नसतं. यामुळं सगळं व्यक्तिमत्त्वच कसं उथळ आणि पोकळ वाटायला लागतं. हे असं का व्हावं? याचाही संबंध पुन्हा हरवत जाणाऱ्या संस्कृतीशीच आहे का? पूर्वी घरात आई-वडिलांकडून सहज संस्कार व्हायचे. त्या संस्कारातही बळ असायचं. ‘पाय मळू नयेत म्हणून इतका जपतोस तसं श्याम; मन मळू नये म्हणूनही जप हो,’ असं सांगणारी एकटी श्यामची आई नव्हती. घरोघरी आई, वडील, आजी, आजोबा हेच संस्कार करायचे. संध्याकाळी सक्तीनं पाट
करून घेतलेल्या मनाच्या श्लोकातून ‘मना वासना दुष्ट कामा नये रे’ याची शिकवण मिळायची तसा ‘जगी सर्व सुखी असा कोण आहे?’ असा विचार मिळायचा. दुःखाच्या प्रसंगी हीच ओळ मनाला शांत करायची. तू एकटाच जगात दुःखी नाहीस ही जाणीव करून द्यायची. ज्ञानेश्वरी, दासबोध हे ग्रंथ घरोघरी असायचे. वाचले जायचे. जीवनाकडे बघण्याची एक दृष्टी त्यातून तयार व्हायची.
मुलांच्या हातात पडणाऱ्या गोष्टींच्या पुस्तकात त्यांच्यावर चांगले संस्कार होतील याचा विचार केलेला असायचा. या साऱ्यांनी जीवनाची वैचारिक बैठक पक्की व्हायची. दिवसेंदिवस ‘वाचन’ हा प्रकार मुलांच्या आयुष्यातून कमी होत चाललाय. तशी कॉमिक्स, मुलांना जनरल नॉलेज देणारी पुस्तकं आहेत. पण विचार देणाऱ्या पुस्तकाचं वाचन आता फारसं होत नाही. मुलांचं बाल्य फुलू द्यावं त्यांच्यावर सक्ती करू नये या नावाखाली घरातून होणारे संस्कार क्षीण झाले. वाढत्या स्वातंत्र्याच्या कल्पनेने मुलाच्या आयुष्यातली आई-वडिलांची भूमिकाच कमी महत्त्वाची होत चालली. त्याचवेळी समाजात आकर्षणं वाढली. शाळा कॉलेजमधलं शिक्षण फक्त भाकरी मिळवून देण्यापुरतं उरलं नाही.
यामुळं उच्च शिक्षित, भरपूर पैसा मिळवणारी, वरवर कर्तृत्ववान वाटणारी माणसंसुद्धा आतून उथळ, वैचारिक पाया नसणारी बनू लागली.
हसा, खेळा, मजा करा’ इतकंच जीवनाचं ध्येय बनलं. या मौजमजेची साधनं मिळणं एवढ्यापुरता आनंद आणि ती न मिळणं एवढ्यापुरतं दुःख मर्यादित झालं. आभाळाएवढा आनंद आणि आभाळाएवढं दुःख पचवण्याची शक्ती तर राहूदेच, पण त्या सुखदुःखांशी तोंडओळखही राहिली नाही.
विवेक’ हा तसा मूळचा आध्यात्मिक शब्द. हे सारं जग नाशवंत, क्षणभंगुर आहे. खरं आहे, ते फक्त निर्गुण निराकार ब्रह्म असं मानणं हा विवेक. त्या अर्थानं आपण हा शब्द इथे वापरत नाही. पण पैसा, भौतिक सुखसाधनं हे मानवी जीवनाचं अंतिम साध्य नाही. जीवन सुखी करण्याचं ते साधन आहे.
या साधनाला त्याच्या मर्यादेपर्यंतच मान द्यायला हवा. हा विचार म्हणजेही ‘ विवेकच.’ आज हा ‘विवेक’ माणसाच्या जीवनात उरला नाही. परस्परांमधले संबंध, चार रिकामे विसाव्याचे क्षण, मन:शांती या साऱ्याच्याच बदल्यात माणूस आज भौतिक साधनं मिळवू पाहतोय. खरं सुख मनामध्ये असतं. मन शांत, समाधानी असेल तर उन्हातही चांदणं पडल्यासारखं वाटतं. मन अस्वस्थ असेल तर वातानुकूलित खोलीचंही रखरखीत वाळवंट होतं हे त्याला कळत नाही.
संस्कार, विचार आणि विवेक यांच्या अभावामुळं माणूस स्वतःला हरवत चाललाय. फक्त खाणं, पिणं, उत्तम कपडे घालणं आणि पिकनिक पाठ्यांमध्ये आयुष्य उधळून टाकणं यापलिकडेही माणसाचं ‘माणूसपण’ उरतं हे विसरलं जातंय. बदलती संस्कृती उत्तम डॉक्टर्स, उत्तम इंजिनिअर्स, चार्टर्ड अकौंटंटस् निर्माण करू शकेल. उत्तम तंत्रज्ञान विकसित करू शकेल. पृथ्वीवर स्वर्गसुख आणू शकेल. पण उत्तम आणि स्थिर माणूस निर्माण करू शकेल का?
Leave a Reply