( कॉलेजच्या कट्टयावर तीन तरुण बसल आहेत. त्यांच्यात थट्टा मस्करी सुरु आहे. समोरून एक छोटा स्कर्ट, ( तोकडे कपडे ) घातलेली तरुणी सावकाश जाते. )
पहिला तरुण – ( तिच्याकडे पाहत ): हिला कापड कमी पडलं वाटत कपडे शिवायला ?
दुसरा तरुण – नाही रे ! मला वाटत छोटे कपडे स्वस्त भेटत असतील !
तिसरा तरुण – काही ही काय ? अरे ! तिला गरम होत असेल !
आणि ते तिघे एकमेकांना टाळ्या देऊन हसतात
त्यांचे बोलणे एकूण ती तरुणी रागात पण तोर्यात माघारी येते आणि आणि त्यातील एकाकडे रागाने पाहात : ए ! तुझं नाव काय ?
पहिला तरुण ( घाबरत ) : राहुल !
त्यावर ती तरुणी : राहुल ! नाईस नेम ! ( त्याच्या गालाला हात लावत ) तुझ्या माहितीसाठी सांगते माझ्या बाबांची कपड्यांची चार दुकाने आहेत. तुझ्या घरात कोणाला कापड कमी पडत असेल तर सांग मी आणून देईन !
आणि तू रे ! दुसऱ्या तरुणाकडे पाहात
दुसरा तरुण : ( स्वतःहून सांगतो ) मी विवेक !
ती तरुणी : विवेक ! तू काय म्हणालास ? छोटे कपडे स्वस्त असतात . असे कपडे तुझ्या बहिणीला घेऊन दे ! मग कळेल तुला किती स्वस्त असतात ते.
तिसऱ्या तरुणाकडे पाहात : आणि तू ! तू राजू ! मी ओळखते तुला ! तू काय म्हणालास मला गरम होत असेल आता सोडतेय पुन्हा मलाच काय कोणालाही अस काही बोलताना एकल ना ! तर तुझी गरमी उतरवून टाकेन समजलं ! तिघेही मान खाली घालून मानेनेच होकार देतात !
ती तोऱ्यात निघून गेल्यावर राजू विवेक आणि राहुलला विचारतो ही वाघीण कोण होती ?
विवेक : आम्हाला काय विचारतोस ? ती तुला ओळखते ना ? मग तू तिला कसा नाही ओळखत ?
राजू : मूर्खां ! मी तिला ओळखत असतो तर तिच्याशी पंगा घ्यायला मला काय पागल कुत्रा चावला होता ?
राहुल : या वाघिणीची माहिती काढावी लागेल!
इतक्यात राजुची बहीण रागिणी तेथे येते
रागिणी : काय कोणाची माहिती काढताय ? त्या यामिनीची ! तुमचा पराक्रम पाहिला मी लांबून ! राजू तू माझा भाऊ आहे हे तिला माहीत आहे म्हणून तुम्ही वाचलात नाहीतर आज तुमची हाडे नक्कीच मोडली असती . तिच्या कपड्यांवर आणि मेकपवर जाऊ नका ! वेळ आली तर त्या मेनकेचीे जगदंबा होते कराटे ब्लॅक बेल्ट आहे ती ! त्यावर राहुल मध्येच म्हणाला मग तीच नाव यामिनी नाही दामिनी असायला हवं होत !
रागिणी – तशी यामिनी दमीनीसारखीच आहे पण खूप चांगली आणि तितकीच प्रेमळही आहे नाहीतर तिच्याजागी दुसरी कोणी असती तर आज तुमचे गाल लाल झाले असते, ती सगळ्यांना खूप मदत करते ! फक्त कॉलेजातच नाही तर कॉलेजच्या बाहेरही ! तिच्या तोकडया कपड्यांवर जाऊ नका ! ती रोज न चुकता गणपतीच्या देवळात जाते, सगळ्या आरत्या श्लोक तिचे तोंडपाठ आहेत. घरातील सारी कामे तिला करता येतात, स्वयंपाक ! तो ही ती उत्तम करते मला तिच्या हातचा उपमा खूप आवडतो.
राहुल : रागिणी ! तू बोलते आहेस त्यावर आमचा विश्वास नाही बसत पण तू म्हणतेयस म्हणजे खरं असेल आणि ते जर खरं असेल तर खरंच आम्हाला तिला सॉरी म्हणावं लागेल !
रागिणी : तुम्ही तिला सॉरी म्हणाच ! मग तुम्हाला कळेल ती किती मोठ्या मनाची आहे ते ! ( इतक्यात यामिनी त्यांना समोरून येताना दिसते ती रागिणीला पाहुन थांबते )
यामिनी : हाय ! रागिणी चल मी तुला सोडते स्कुटीने तुझ्या घरापर्यत !
रागिणी : ते ठीक आहे पण या तिघांना तुझ्याशी काहीतरी बोलायचंय !
यामिनी : त्या तिघांकडे पाहात गोड हसत…काय ?
( ते तिघे मिळून हात जोडून सॉरी यामिनी ! म्हणतात )
यामिनी : हसत ओके ! ओके ! नाऊ वुई आर फ्रेंड्स ! आता मी निघते उद्या कॅन्टीन मध्ये भेटून बोलू बाय ! चल रागिणी !
( यामिनी रागिणी सोबत निघून गेल्यावर ते तिघे तिथेच बसतात )
राहुल : विवेक ! राजू ! आपल्याला आता कपड्यांवरून मुलींना जज करण सोडायला हवं !
राजू : यार राहुल ! तुझं बरोबर आहे आज यामिनीने जसे कपडे घातले आहेत तसेच रागिनीने घातले असते तर आपण आता यामिनिकडे या नजरेने पाहिले त्याच नजरेने तिच्याकडे पाहिले असते का ?
विवेक – नक्कीच नसते पाहिले ! छोटे कपडे घातलेल्या तरुणीकडेही आपण ती आपली बहीण मैत्रीण समजून पाहिले तर आपली त्यांच्याकडे पाहण्याची दृष्टी बदलेल.
( इतक्यात समोरून तोकडे कपडे घातलेली आणखी एक तरुणी येताना दिसते तिच्याकडे पाहून तिघेही मान खाली घालतात ती तरुणी त्यांच्या जवळ येते आणि म्हणते हाय ! मी कामिनी ! फ्रेंड्स मी तुम्हालाच शोधत होते मी आपल्या कॉलेजसाठी एक नाटक बसवतेय मला तुमची मदत हवी आहे ! करणार ना मदत ? तिघेही मान वर करून मानेनेच होकार देतात ! चला मग उद्या भेटू ! ( आणि ती बाय करून निघून जाते )
विवेक : राहुल ! राजू ! तुम्हाला एक गोष्ट आली का लक्षात ती कामिनी दूर होती तोपर्यत आपल्याला ती वेगळी वाटत होती पण ती आपल्यातील झाल्यावर तिचे तोकडे कपडे काहीच मॅटर करत नव्हते…
राहुल : म्हणजे जो काही झोल आहे तो आपल्या पाहण्यात आहे आपल्या नजरेत आहे आपल्या विचारात आपल्यावर झालेल्या संस्कारात आहे.
राजू : आता पर्यत वर्तमानपत्रातील बलात्काराच्या बातम्या वाचून आपण म्हणायचो बलात्काराला कारण मुलीचे तोकडे कपडे आहेत पण ते चुकीचं होत आपण आपल्या लहानपाणापासून संस्कारांची टोपी फक्त स्त्रियांनाच घालून वावरताना पाहत आलो आपल्या आजूबाजूच्या पुरुषांना ती घालून वावरताना आपण कधीच पाहिले नाही आपण स्वतः ती कधीच घालून पाहिली नाही आपणही किती वेडेवाकडे वागत असतो तेव्हा आपल्या त्या वागण्यावर आक्षेप घेताना कोणी स्त्री कधीच दिसत नाही…
विवेक : पण आपण मात्र स्त्रियांच्या कपड्यांपासून त्याच्या मेकँपर्यतच नव्हे तर त्यांच्या वागण्या , चालण्या बोलण्यावरही आक्षेप घेत असतो
राहुल : हो हे खरं आहे ! समाज नेहमीच संस्कारांची टोपी फक्त स्रीयांच्याच डोक्यावर ठेवत आला आणि पुरुषांना मोकाट सोडत आला आता ती टोपी पुरुषांच्याही डोक्यावर ठेवायला हवी ! तरच समाजातील बलात्कार आणि स्त्रियांवरील अत्याचार कमी होतील आपणही संस्काराची टोपी आपल्या डोक्यावर स्वत: ठेवून घेऊया !
( ते तिघे आपल्या डोक्यावर टोपी ठेवतात त्यावर लिहलेले असते संस्कार ! )
— निलेश बामणे
Leave a Reply