नवीन लेखन...

संस्कारांच्या भिंती

कथा म्हटलं की त्यात ‘नायक’ आला आणि ‘नायक’ नेहमी शुर,पराक्रमी वगैरे असायचाच. मग तो परंपरागत महाकाव्यांचा नायक असू दे किंवा आजच्या चित्रपटांचा ! मात्र या दोन्ही नायकांमध्ये बराच फरक असतो. आपल्या प्राचीन महाकाव्यांचे नायक हे अन्यायाविरुद्ध लढणारे असायचे. त्या त्या काळातल्या आसुरी शक्तींविरुद्ध त्यांनी हातात शस्त्रही घेतलं. पण लढणं आणि मारणं एवढाच त्यांच्या शौर्याचा निकष नाही. जीवनातल्या अनेक प्रसंगांना धीरोदात्तपणे आणि संयमाने त्यांनी तोंड दिलं. उदाहरणासाठी सर्वात प्रसिद्ध रामायण-महाभारत अशा महाकाव्यांचाच विचार करू. वनवासातून परत येऊन राज्य स्वीकारल्यानंतर नुक्ता कुठे राम-सीतेच्या संसाराचा डाव रंगू लागला. वनवासाच्या काळात दोघांनीही भरपूर मनस्ताप सहन केला आहे आणि आता पुन्हा लोकापवादासाठी सीतेचा त्याग करण्याची पाळी रामावर आली. सीतेवर प्राणाहून जास्त प्रेम करणाऱ्या रामाच्या मनावर केवढा हा आघात ! पण रामानं तो शांतपणे सोसला. आजचा नायक असता, तर दुःख पचवण्याच्या नावाखाली पेल्यावर पेले रिकामे करताना दिसला असता. पण हा ‘राम’ आहे. अयोध्येच्या सिंहासनावर पूर्वी आरूढ झालेल्या प्रत्येक पूर्वजाची जीवनकथा आठवीत तो स्वतःचं सांत्वन करतो आणि केवळ कर्तव्य शांतपणे राज्य चालवितो.

म्हणून महाभारतात कृष्णाच्या आयुष्यात तर सतत सुखदुःखांचे, मानापमानाचे हेलकावेच येत गेले. आयुष्याच्या शेवटी आपल्या संपूर्ण कुलाचा नाश झालेला त्याला पाहावा लागला. पांडव कधीच निजधामाला गेले होते. आता सभोवार रक्ताच्या नात्यांच्या माणसांचा मृत्यू होता. मुलगे, नातवडं, चुलतभाऊ, त्यांचा वंश आप्तेष्ट सारे पडले होते. अगदी एकटा उरलेला कृष्ण स्थितप्रज्ञ वृत्तीनं वृक्षतळी बसला आणि महाभारताच्या या महान नायकाचा अंत एका व्याधाच्या बाणानं उघड्या आकाशाखाली झाला. आयुष्यात दुःख पचवणं, जे अटळ आहे ते शांतपणानं स्वीकारणं हे शूराचंच काम नाही का?

शौर्याची व्याख्या इथेच संपत नाही. आपल्याला पूर्णपणे पटलेला विचार समाजाचा विरोध असतानाही अमलात आणणं हे शौर्यच आहे. वाळवंटामध्ये पाय भाजणाऱ्या अस्पृश्य मुलीला एकनाथांची उचलून घेतलं. सगळे उच्चवर्णीय आपली छी: थू करतील हे त्यांना माहीत नव्हतं का? धार्मिक कर्म हा त्याकाळच्या गृहस्थधर्माचा पाया ! पण आता आपल्या घरात धर्मकार्य करायला एकही ब्राह्मण येणार नाही हे त्यांना कळलं नाही का? बाकीच्या समाजाचं जाऊ दे. पण प्रत्यक्ष पोटचा मुलगासुद्धा त्यांच्या या वागण्याच्या विरोधात होता. तरीही एकनाथ आपल्या विचारांशी ठाम श्रद्धा ठेवून राहिले. स्वत:ला पटलेल्या विचारासाठी साय समाजाचा विरोध सहन करणं यासाठी केवढं मानसिक बळ लागत असेल? या अर्थानं पाहिलं तर सारे संत आणि सारे समाजसुधारक हे शूरच होते असं म्हणावं लागेल.

जीवन हे शतरंगी आहे. काही विचारांची योग्यता स्थलकालातीत असते.

त्यांच्याशी सदैव एकनिष्ठ राहणं आणि त्यासाठी हवी ती किंमत मोजणं हे शौर्य असतं. कधी कधी मात्र स्वतःच्याच विचारांचं महत्त्व स्थल, काल, परिस्थितीनुसार बदललेलं पाहावं लागतं. स्वत:च्याच मानसिक विकासानुसार पूर्वीचे आपले विचार चुकीचे आहेत असं वाटू लागतं. अशा वेळी ‘आता माझ्या विचारात बदल केले, तर लोक काय म्हणतील? मी वारा येईल तशी पाठ फिरवणारा आहे

असं मानतील काय? ‘ याची भीती वाटून आपण आपल्या जुन्या चुकीच्याच मतांशी ठाम राहतो. खरं तर हा हेकटपणा असतो. अशावेळी आपली पूर्वीची चूक कबूल करून नव्या विचाराचा स्वीकार ही धैर्याची गोष्ट असते.

आयुष्यात केवळ शारीरिक बळावर माणसं श्रेष्ठ, शूर ठरत नाहीत तर त्यासाठी मानसिक बळही महत्त्वाचं असतं.

आज चित्रपटातून दिसणारा प्रचंड हिंसाचार, मुलांमध्ये प्रिय ठरणारे रेसलिंगसारखे प्रोग्रॅम्स पाहताना हा विचार सतत मनात येतो. सूड, कुणाला तरी ठार मारणं हा आयुष्याचा अंतिम आणि उदात्त हेतू असल्यासारखा नायक तीन तास मुलांसमोर वावरतो, तेव्हा आपणच नकळत हिंसेची बीजं त्यांच्या मनात पेरीत नसतो का? डोळ्यांसमोर सतत आणि सहज होणारा हिंसाचार पाहून त्याविषयी मुलांची मनं संवेदनाहीन होतात. प्रत्यक्ष आयुष्यातही या हिंसेचा गंभीरपणा त्यांच्या लक्षात येत नाही असा अनुभव आहे. एकीकडे संस्कार देणारं वाङ्मय, संस्था आणि कुटुंबातील व्यक्तींची संख्या कमी होत असताना दुसरीकडे असे कुसंस्कार करणारी माध्यमं मात्र वाढत आहेत. ती इतक्या आकर्षक पद्धतीनं समोर येताहेत की त्यांच्या मोहापासून मुलांना दूर ठेवणं जड जात आहे.

जोराच्या वादळात भिंती कोसळतात. पण म्हणूनच त्या जास्त बळकट करायला हव्यात. नाही का?

सभोवतीच्या वातावरणात घरातल्या संस्काराच्या भिंती पाडण्याचं सामर्थ्य आहे. त्या अधिक बळकट करण्याची गरज आताच आहे.

मुलांनी काय खावं, काय प्यावं याचा विचार आपण पालक खूप करतो.

जास्तीत जास्त शुद्ध वस्तू, पाणी त्यांना देण्याचा प्रयत्न करतो. पण त्यांनी काय पाहावं, काय वाचावं, काय ऐकावं याचा आणि त्याहीपेक्षा जे भोवती आहे, ते घरात येणारच असलं, तरी मनानं काय स्वीकारावं याचा विचार आपण करतो का?

‘डोळे उघडे ठेवणं’ हा शिक्षणाचा मार्ग आहे. पण आज मात्र डोळे उघडे ठेवल्यावर जे जे दिसतं, त्यातली प्रत्येक गोष्ट मेंदूपर्यंत जाऊ द्यायची नाही, हेही मुलांना शिकवायला हवं.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..