नवीन लेखन...

संस्कृती रक्षण

संस्कृती ही माणसाच्या वर्तनात असते. सदाचरणात असते. माणूस अतिलोभी, मत्सरी असेल तर तो सदाचारी असू शकत नाही. त्याच्यातले हे दोष घालवण्याचं काम धार्मिक स्तोत्रं मग ती कोणत्याही धर्माची असू देत करत असतात. म्हणून लहानपणापासून संस्कारक्षम, पापभीरु वयापासून त्यांची शिकवण द्यायची. पण हे पाठांतर कधी कधी नुसतंच पोपटपंचीसारखं होतं, त्यातला अर्थ मनाच्या गाभ्यापर्यंत पोहोचतच नाही आणि मग कडक धार्मिक आचरणाचा माणूसही व्यवहारात दुराचारी होऊ शकतो.

थोडं सभोवती पाहिलं तर ही परिस्थिती सगळीकडे दिसते आहे. एकीकडे देवळातली गर्दी वाढते आहे. एखाद्या मंदिराच्या अस्तित्वाचा प्रश्न जीवन-मरणासारखा महत्त्वाचा मानला जातो आहे आणि त्याचवेळी भ्रष्टाचार, लाचलुचपत हे आमचं नित्याचं जीवन होऊ पाहतं आहे.
एकदा कुठेसं वाचलं, भ्रष्टाचारामुळे देशाचं दहा हजार कोटीचं नुकसान सध्या होतं आहे. बातमीमागे आश्चर्यकारक काही नव्हतं. वाईट वाटलं ते याचंच की एक सामान्य बातमी असं मानून मनानं ती सोडूनही दिली. भ्रष्टाचाराच्या बाबतीत ‘असं चालायचंच’ अशी आपली मनोवृत्ती होत चालली आहे. कमीजास्त प्रमाणात आपल्या सर्वांचंच ते रोजचं जीवन झालंय.

कोणत्या तोंडानं आम्ही आमच्या संस्कृतीचे गोडवे गायचे? रामायण, महाभारत असे ग्रंथ आम्ही आमच्या संस्कृतीचा ठेवा मानतो. त्या रामायणात भरताच्या राज्याचं सुरेख वर्णन आहे. ‘रामराज्य’ ही कल्पना आता वापरून वापरून गुळगुळीत झाली आहे. पण भरताच्या राज्याचा उल्लेख आपल्यामध्ये फार क्वचित होतो. असं म्हणतात, की भरतानं चौदा वर्षांनंतर रामाला त्याचं राज्य सुपूर्द केलं तेव्हा राज्याचा खजिना दुप्पट झाला होता. प्रत्येक व्यक्तीचं वैयक्तिक उत्पन्न उंचावलं होतं आणि स्वतः भरत मात्र राज्याचा स्वामी नव्हे तर विश्वस्त या नात्यानं अलिप्तपणे साधं आयुष्य जगत होता.

हे सगळं पुराणकाळाबरोबर गाडलं गेलं असं समजू ! पण जेमतेम चाळीस वर्षांपूर्वीसुद्धा बरेच आदर्श या देशात होते. पहिले राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांच्या घरी ते राष्ट्रपती असताना काही कार्यकर्ते गेले होते. पाहुण्यांच्या आदर सत्कारासाठी राष्ट्रपतींनी त्यांच्यासमोर फळं ठेवली आणि ते म्हणाले, ‘माफ करा. माझ्या कार्डावरची साखर सध्या संपली आहे. मी आपल्याला चहा देऊ शकत नाही.’ आज ही
आपल्याला दंतकथाच वाटेल. पण साधं ऑफिसचं पेनसुद्धा ऑफिसच्या कामासाठी आणि घरचं एखादं कार्ड लिहायलाही स्वतःच्या घरचं पेन वापरणारी माणसं आत्ता आत्तापर्यंत हयात होती.

सगळा कदाचित फार टोकाचा आदर्श असेल. पण सध्या जे आपण याचं दुसरंच टोक गाठतो आहे; ते आपल्याला कुठे नेणार आहे? कशाकशासाठी आपण टेबलाखालून ‘मिठाईचे बॉक्स’ देणार आहोत? एक काळ असा होता, की शिक्षण, डॉक्टरी पेशा हे व्यवसाय आपण फार स्वच्छ मानत होतो. ज्यांना पैसा कमवायचा होता, ते लोक शिक्षकीपेशाला नाकं मुरडत होते. आता याही व्यवसायात ‘विकण्यासारखं’ खूप काही असतं. कोणत्याही व्यावसायिकाला आता ‘गरीब बिचारा’ राहायचं कारण उरलं नाही. जग खरंच किती वेगानं बदलतंय ! आमच्या पिढीसाठी तर ‘त्याग’ हा भूतकाळातला शब्द आहे. आम्हाला समजतंय तसं ‘जे मिळतंय तिथून आणि जसं मिळतंय तसं ते घेत राहा’ हेच जीवनाचं तत्त्व आहे.

याचाही पाया कुठेतरी हरवत चाललेल्या संस्कारांमध्ये नसेल? स्वतःच्या मनगटाच्या जोरावर भरपूर कमवावं हे तर पूर्वीही शिकवलं जायचं पण त्यानंतर मात्र जे मिळतंय त्यात समाधानी राहायलाही शिकवलं जायचं. इतरांनी आपला मत्सर करावा म्हणून संपत्तीचं मुद्दाम प्रदर्शन केलं जात नव्हतं आणि जे शेजारी आहे ते मलाही हवंच ही वृत्ती असली तरी तिला प्रतिष्ठा नव्हती.

खूप हवं आता मात्र मला आणखी हवं मला एकट्यालाच हवं ही प्रवृत्ती वाढते आहे. ‘हौस’ या गोंडस नावाखाली लपलेल्या हव्यासानं मनाची शांती, समाधान घालवलं आहे. या अखंड अतृप्तीवर मिळवत राहाणं हाच एक उपाय केला जातो आणि म्हणूनच शक्य असेल त्या मार्गानं मिळवणं ही या काळाचीच नीती बनते आहे. ‘स्वतःचं कर्तव्य सचोटीनं करणं’ हीच ईश्वरपूजा म्हणून वाट्याला आलेलं काम आनंदानं आणि निरपेक्षबुद्धीनं करायला कर्म-योगानं सांगितलं. पण धर्म म्हणजे – टिळा – माळा घालणाऱ्यांचा प्रांत अशा समजुतीनं त्याचा अभ्यास बंद झाला. त्यातली रोजच्या व्यवहारातली नीतीतत्त्वं विसरली गेली आणि जे काम केल्याबद्दल आपल्याला नियमानुसार पैसे मिळतातच, तेच काम उपकार केल्यासारखं करून त्याबद्दल पैशाची मागणी करणं यात गैर वाटेनासं झालं.

पूर्वी धर्म माणसाला पापाचरणातून परावृत्त करायचा, आजकाल मात्र धर्माचं प्रस्थ कधीकधी नको इतकं वाढलं असलं, तरी नीतीमत्ता खालावते आहे. रोज तासभर पूजा केली, सत्यनारायण करून भरपूर लोकांना खाऊ पिऊ घातलं की उरलेला वेळ कसंही वागायला मोकळा ! हे सारं आमच्या संस्कृतीला अभिप्रेत होतं का? नसेल तर संस्कृतीच्या दालनात शिरलेला हा कचरा कुठून आला?
कुठूनही आला असला तरी तो काढून टाकणं हे आता जास्त गरजेचं आहे, नाही का?

1 Comment on संस्कृती रक्षण

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..