सतराव्या शतकात गुजरातमधील अहमदाबादजवळील बावला या गावी एका मुलाचा जन्म झाला. त्याचे नाव ठेवले गेले प्रीतम. तो मुलगा जन्मतःच अंध (सूरक्षस) होता. त्यातच त्याच्या लहानपणी आई-वडिलांचे छत्र हरपले त्यामुळे तो पोरका झाला आधीच अंध, त्यातून निराधार यामुळे प्रीतमचे लहानपणी खूप हाल झाले. भिक्षा मागून तो कसेबसे आपली उपजीविका करीत होता. एका कोणाबरोबर तरी प्रीतम भागवत पारायणाला गेला. भागवतकथा ऐकून तो इतका प्रभावित झाला की, ईश्वराबद्दल त्याच्या मनात खूपच आकर्षण निर्माण झाले. त्यातूनच त्याला काव्य स्फूरत गेले. त्याचे हे काव्य लोकांनाही आवडू लागले. आपले काव्य प्रीतम पुढे भजनाच्या रूपात सादर करू लागला. एकदा प्रीतम श्री डाकोरजींच्या दर्शनाला गेला.
त्याला पाहताच पुजार्याला त्याची थट्टा करण्याची लहर आली. तो त्याला म्हणाला, तू तर नेत्रहीन आहेस मग कोणाचे दर्शन घ्यायला आला आहेस? त्यावर प्रीतमने भगवान डाकोरजींच्या प्रतिमेचे व्यात्मक वर्णन केले. डाकोरजींना कोणत्या रंगाचे वस्त्र नेसवले आहे, तसेच त्याला कोणत्या रंगाची फुले घातली आहेत, त्याचा मुकुट कसा आहे, बासरी कशी ठेवली आहे हेही प्रीतमने काव्याद्वारे सांगितले. त्याचे काव्य ऐकून पुजारी आश्चर्यचकित झाला व त्याने त्याच्या चरणी लोटांगण घातले. कारण ज्याच्या मनात ईश्वराची अपार भक्ती आहे ते डोळ्याशिवाय भगवंताचे दर्शन करू शकतात, याची प्रचिती त्याला आली होती. हाच प्रीतम पुढे संत प्रीतमदास बनला. एकदा रोमारोला या परदेशी संस्थेचे लोक भारतात आले होते. संत प्रीतमदास यांना भेटल्यानंतर त्यांच्या असे लक्षात आले की, प्रीतमदास नेत्रहीन आहेत. मात्र त्यांच्या भक्तिरचना इतक्या ‘डोळस’ आहेत की, कोणताही डोळस तसेच प्रज्ञावान मनुष्य अशा रचना करू शकणार नाही. संत प्रीतमदासच्या निवडक भक्तिरचना ते परदेशी घेऊन गेले.
Leave a Reply