अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये प्रा. डॉ. सयाजी निंबाजी पगार यांनी लिहिलेला हा लेख
महाराष्ट्रात श्री विठ्ठल भक्तीच्या स्नेहाने चंद्रभागेत सुस्नात होऊन जीवन कृतार्थ करण्याचा राजमार्ग दाखविणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या मंदिराचा कळस म्हणून गौरविलेले संतश्रेष्ठ म्हणजे तुकाराम महाराज होत. वारकरी संप्रदायाच्या इमारतीचा वैचारिक पाया ज्ञानेशांनी घातला. अनुभवामृत, ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथांनी उत्तुंग असे चिविलासाचे व प्रेमबोधाचे तत्त्वचिंतन पुरविले. नामदेवांनी आपल्या स्कंधावर भगवी पताका घेऊन पंढरपूर ते पंजाबपर्यंत ‘नाचू किर्तनाचे रंगी | ज्ञानदिप लावू जगी ।।’ म्हणत अध्यात्माचा रंग उधळला. एकनाथ महाराजांनी बहुजन समाजास समजेल अशा सुबोध वाणीत भागवत, रामायण कथा बरोबरच भारुडे, गवळणी इत्यादी कवने रचून लोकरंजन करीत करीत भक्तिप्रेमाचे गोड घास चारले. त्यानंतर संत तुकाराम अवतरले. त्यांनी वारकरी संप्रदायाची देवता ‘श्री विठ्ठल’ यांचा सगुण व निर्गुण दोन्ही रूपांचा साक्षात्कार केवळ एका नामस्मरण, भजन, किर्तन या मार्गानेच जाऊन घेतला. त्यांच्या मुखातून स्त्रवलेल्या अमृतरुपी अभंगवाणीने लोकमानसाच्या हृदयात भक्ती प्रेमाचा अनमोल ठेवा निर्माण केला.
संत तुकाराम महाराजांच्या प्रापंचिक जीवनाच्या अनेक कथा-व्यथा होत्या. जीवाभावाच्या माणसांचं निधन, दुष्काळाचे थैमान, अठरा विश्व दारिद्र्य, दुसऱ्या पत्नीने सतत केलेली अवहेलना, आयुष्यात उभी राहिलेली आव्हाने, पणाला लावलेली जिद्द, कर्तव्यबुद्धी, मनाचे मालिन्य काढून टाकण्यासाठी आत्मशोधावर केंद्रीत झालेले लक्ष्य. त्यातून दिसणारे हाती लागणारे सत्य, परमेश्वराकडे परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी सुरू झालेली अलौकिक वाटचाल हे सगळे भाव त्यांच्या अभंगातून व्यक्त होत राहतात. संसाराचा गाडा ओढताना ऐहिकाकडून सुरू झालेली वाटचाल अगदी सहज अलौकिकाकडे जाऊन पोहोचते.
देहू येथील मोऱ्यांच्या कुळात, सधन व धर्मनिष्ठ आंबिले घराण्यात तुकारामांचा जन्म झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर अंगावर पडलेला दुकानदारीचा व्यवसाय आणि दोन बायकांचा संसार ही गृहस्थाश्रमाची जबाबदारी चांगल्या रीतीने पार पाडण्यामध्ये तुकारामांच्या वयाची सतरा वर्षे सुरवात व समाधानात गेली, पण त्यांना तर दुष्काळामध्ये झालेले प्रियजनाचे मृत्यू, व्यापारात झालेला तोटा, संसारात सततची आपत्ती यामुळे प्रपंचाला वैतागलेल्या संत तुकाराम महाराजांनी भक्तीमार्गाची कास धरली. दुष्काळाने हैदोस घातला. घरात अन्नाचा दाणा नाही. संत तुकाराम महाराजांची पहिली बायको गेली, आई गेली, मुलगा गेला, सावजीची बायको गेली, सावजीगृहत्याग करून निघून गेला. जिजाबाई भरपूर वैतागली. ती संत तुकारामांना अपमानीत करू लागली, बोलू लागली. पण संत तुकारामांच्या मनी मानसी विठ्ठलाचा छंद लागल्यामुळे ते देवाला म्हणाले – देवा नको हा प्रपंच. मी आता फक्त तुझाच होईन. वैतागून त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले. ते म्हणाले,
‘पोर मेली बरे झाले । देवे मायाविरहित केले ।
माता मेली मज देखता । तुका म्हणे हरी चिंता ।।
‘संत तुकारामांच्या सडेताड आत्मनिवेदनाने मन थक्क होते.
ज्ञानदेवांनी भागवत (वारकरी संप्रदायातून सुरू केलेली ‘विठ्ठल भक्ती’ व ‘पंढरीची वारी’, संत तुकारामांनी घातलेल्या सकस खत-पाण्याने आणखी तेजस्वी व दृढ झाली. ज्ञानदेवांप्रमाणेच संत तुकारामांचीही विठ्ठल भक्तीची वडीलार्जित मिरास होती. आठ पिढ्यांची विठ्ठल भक्ती, एकादशीचा उपवास व पारणे यांचा ‘दारवंटा’ म्हणजे नियम होता आणि पंढरीची वारी हे फार मोठे पूर्व संचित होते.
‘पंढरीची वारी आहे माझे घरी ।
आणिक न करी तीर्थव्रत ।।१।।
व्रत एकादशी करीन उपवासी ।
गाईन अहर्निशी मुखी नाम ||२||
नाम विठोबाचे घेईन मी वाचे ।
बीज कल्पांतीचे तुका म्हणे ||३||
संत तुकारामांसाठी “विठ्ठल’ हे गुरु तर ‘पंढरी’ हे माहेर होते. संवेदनशील अंतःकरणाच्या संत तुकाराम महाराजांना व्यक्तिगत जीवनात, जीवघेण्या परिस्थितीला तोंड द्यावे लागले. त्यातून त्यांना जाणवले की, जीवन हे नश्वर आहे. ‘जन हे दिल्या घेतल्याचे ।’ हे सत्य वास्तवात अनुभवल्यामुळे ते प्रपंचातून एकांतात गेले. त्यातून पंढरी-चंद्रभागा-पुंडलिक व विठ्ठलाचे वडिलोपार्जित नाते आणखी घट्ट झाले.
‘माझ्या वडिलांची गा मिरासी गा देवा ।
तुझी चरणसेवा पांडुरंगा ||१||
उपवास पारणी राखिला दरवंटा ।
केला भोगवटा आम्हालागी ।।
संत तुकारामांनी ईश्वर भक्तीचा मार्ग अंगिकारला. आपण स्विकारलेला आत्मानुभवाचा मार्ग म्हणजे सतीचे वाण आहे याची जाणीव त्यांना होतीच. रात्रंदिवस स्वतःच्या मनाशी व बाह्य जगाशी खऱ्या ध्येय निष्ठेने ते झगडले. एक क्षणभरही गाफील न राहता मन काबूत आणण्याची त्यांनी पराकाष्ठा केली. परमार्थ साधनेत गुरुपदेश आवश्यक असतो. तो संत तुकाराम महाराजांना स्वप्नातच लाभला. ज्ञानदेवांवर निवृत्तीनाथांचे कृपाछत्र होते. एकनाथांवरही जनार्दन स्वामींच्या मायेची पाखर होती. पण संत तुकाराम महाराजांना कोणाही थोर पुरुषाचे प्रत्यक्ष मार्गदर्शन न मिळाल्यामुळे अखेरपर्यंत स्वतःवरच त्यांना विसंबून राहावे लागले. वेळोवेळी निराशेचे प्रसंग येत. ‘प्रपंच आणि परमार्थ’ हे दोन्ही गमावून शेवटी जगात आपले हसे तर होणार नाही ना, अशी कधी धास्ती वाटे. पण या साऱ्या दिव्यातून ते सही सलामत पार पडले आणि केवळ निश्चयाच्या बळावर ‘कासया उदास असो देहावरी । अमृतसागरी बुडोनिया ।।’ अशा जीवनमुक्त दशेला पोहोचले.
तुकोबांच्या पारमार्थिक जीवनात त्यांनी पूर्णपणे देवाची शरणागती पत्करल्यावर भामगिरीवर जाऊन देवांच्या नामस्मरणाचीच तपश्चर्या केली. ज्ञानेशादि पूर्व सूरींवर त्यांची अनन्य भक्ती होती आणि त्या संतांनी सांगितलेल्या हरिनाम स्मरणाच्या मार्गानेच ते चालू लागले. नामाने सर्व साध्य होते ही त्यांची निष्ठा होती. ‘न भेटे ते भेटो येईल ते उगले । नामे या विठ्ठले एकाचिया । न कळे ते कळो येईल उगले । नाम या विठ्ठल एका चिया ।।’ अशी त्यांची संतवचनावर आत्यंतिक दृढ श्रद्धा होती. त्यामुळे भामगिरीवर नामानेच त्यांना विठ्ठलाचा निर्गुण साक्षात्कार झाला व तो अंतःकरणी पचवून सगुण भक्तीत रंगले. संत वचनावर विश्वास ठेवून इतर साधनांच्या कडे गेले नाहीत. इतर साधने म्हणजे ते छांदिष्टपणाचेच होते. ‘तुका म्हणे छंद आम्हा वासा निंद्य ।’ असे म्हणाले. निर्गुण साक्षात्कारानंतर सद्गुरु स्वप्नी भेटले त्यांनी आवडता मंत्र- वारकरी संप्रदायाचा ‘रामकृण हरी’ हाच सांगितला. यानंतर संत नामदेव, श्री. पांडुरंग यांची स्वप्नी भेट झाली. ‘नामदेव केले स्वप्नामाजी जागे । सवे पांडुरंगे येवोनिया ।।’ सांगितलेले काम करावे कवित्व । वाऊगे निमित्य बोलो नको ।।’ ही देवाची भेट झाल्यानंतर त्यांची सर्व अभंग रचना निर्माण झाली आहे.
मायेचे भाषिक अस्तित्व मान्य करूनही संत तुकाराम महाराजांनी ‘ब्रह्मवादा’चा अद्वैत सिद्धान्त अनुभवांती उचलून धरला होता. ‘सरते माझे तुझे। तरी हे उतरते ओझे ।। न लगे सांडावे मांडावे । आहे शुद्धाचे स्वभावे ।।’ द्वैत भावामुळे मायेचे ओझे जीवाला सांभाळावे लागते. काल्पनिक मायाजाल दूर झाले की, ‘ब्रह्मतत्त्व’ सत स्वरूपात शुद्ध रूपात जीव स्वतःमध्येच अनुभवू शकतो. त्याकरिता ‘सांडावे-मांडावे’ असे काही करावे लागत नाही. ‘तुका म्हणे चेता । होणे ते तूंच आइता ।।’ जीव माया मोहाच्या निद्रेतून जागा झाला की, चैतन्य रूपात आयता स्वतः सिद्धपणे विलसू लागतो. हीच तुकोबांना जाणवलेली ‘अद्वैत दृष्टी’ होय. ज्ञानेश्वरी परंपरेने तुकारामांपर्यंत आलेला ‘ब्रह्मवाद’ तो हाच. पारिभाषिक शब्दांचे अवडंबर न माजविता संत तुकाराम महाराज स्वतःला जाणवलेले सत्य बोल भाव भाषेत सोपे करून सांगतात, त्याचे हे एक उदाहरण आहे. ‘आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने । शब्दांचीच शस्त्रे यत्न करू । शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन । शब्दे वाटू धन जनलोका । तुका म्हणे पाहा शब्दचि हा देव । शब्दे चि गौरव पूजा करू ।।’ शब्द हेच मौल्यवान धन, शब्द हेच शस्त्र, शब्द हे जीवन सर्वस्व, शब्द हाच देव, शब्द हेच पूजा द्रव्य, अशी ही तुकारामांची निखळ शब्द निष्ठा आहे. पण तुकारामही महाराजांची अक्षरसाधना देवासाठी आहे. केली आटा आटी अक्षरांची देवा साठी विश्वंभवराची पूजा हे या शब्दाचे ध्येय आहे. ‘शब्दाचि रत्ने करुनि अलंकार । तेणे विश्वंभर पूजियेला ।’ या पूजनाबरोबरच ‘आम्हा हे कौतुक जगा द्यावी नीत । धर्म रक्षावयासाठी करणे आटी आम्हासी ।’ ‘उजळावया आलो वाटा । खरा खोटा निवाडा ।’, ‘बुडते हे जन न देखवे डोळा । येतो कळवळा म्हणवुनि ।’ या प्रकारच्या धर्मरक्षणासाठी आणि लोकरक्षणासाठीही या संत कवीने आपले शब्द भांडार उधळले आहे.
संत तुकाराम महाराजांच्या अभंगातून विठ्ठलभक्तीचे विविध आविष्कार व्यक्त होतात. सगुण निर्गुणातील सीमारेषेपलीकडील वारकऱ्यांची अद्वैतानुभवाची भक्ती, संत तुकाराम महाराजांच्या अभंगातून व्यक्त होते. वारकऱ्याची संकल्पना संत तुकाराम महाराज निश्चित करतात. जे सदैव पंढरी पाहतात, पदोपदी वाचेने ‘विठ्ठल’ म्हणतात, सर्वसंसार सोडून प्रेमभराने वाळवंटी नाचतात, कपाळी गोपीचंदन लावतात, गळ्यात तुळशीच्या माळा घालतात, ते ‘पंढरीचे वारकरी होत. असे वारकरी विठ्ठलभक्ती करणे पसंत करतात. कारण या भक्तीपुढे धनसंपदा, मुक्ती देखील गौण आहे. म्हणून भारतीय संस्कृतीत असणारी मुक्तीची संकल्पना त्याज्य मानून, ‘तुका म्हणे गर्भवासी । सुखे घालावे आम्हासी ।।’ अशी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करतात. कारण विठ्ठलाची भक्ती ही सर्वश्रेष्ठ व जन्माचे सार्थक करणारी आहे, याची संत तुकाराम महाराजांना खात्री झाली होती.
संत तुकाराम महाराज हे शूद्र असल्यामुळे त्यांना हे वेदाध्ययनाचा अधिकार नव्हता. तेव्हा त्यांनी संत वचनाच्या श्रवणाने, वाचनाने व मननानेच विचारधन जोडले आणि अनुभवाच्या आगीतून तावून सुलाखून घेतले. या दृष्टीने त्यांचे मोठेपण हे स्वयंनिर्मित आहे आणि म्हणूनच त्यांच्या ठिकाणी ‘धन्य म्हणवीन येह लोकी लोका । भाग्य आम्ही तुका देखियेला ।’ असा जबर आत्मविश्वास निर्माण होऊ शकला. संत तुकाराम महाराज म्हणजे सात्विकतेची मूर्ती, दया क्षमा शांतीचा पुतळा. व्यवहार पराङ्गमुखतेची परिसीमा अशी सार्वत्रिक समजूत आहे. त्यांच बाह्य वेषावरून त्यांच्यावर भोळसटपणाचाही छाप कायमचा बसला आहे. परंतु तुकारामांचा जीवनक्रम पाहिला, वाङ्मय तपासले तर त्यात भाबडेपणाचा किंवा एककल्ली पणाचा लेशही नाही याबद्दल ताबडतोब खात्री पटते. ‘वेष धरावा बावळा । अंतरी नाना कळा हे समर्थ वचन संत तुकोबांना तरी तंतोतंत लागू पडते.
समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराजांची दिव्य अलौकिक भेटी. विठ्ठलाच्या भेटीसाठी आर्त झालेले मन, इंद्रायणीतून कोरडी निघालेली गाथा, समाजाची कथा आणि तुकोबांची व्यथा, साडेचार हजार अमृताचे रूप लाभलेली अभंग संपदा, तुका सदेहची वैकुंठासी जाणे. ‘आम्ही जातो आमुच्या गावा आमुचा राम राम घ्यावा ।’ इतक्या धिरोदात्तपणे जगाचा निरोप घेणे हे अलौकिक कार्य संत तुकाराम महाराजांनी या भूलोकी करून दाखविले. म्हणूनच जनता जनार्दनाच्या मुखातून नामोचार झाला ‘तुका केवढा केवढा तुका आकाशा एवढा.
-प्रा. डॉ. सयाजी निंबाजी पगार
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मधून)
Leave a Reply