अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये भालचंद्र केशव गन्द्रे यांनी लिहिलेला हा लेख
श्रीकृष्ण परमात्म्यांनी द्रौपदी वस्त्रहरणांत सातत्याने तिला वस्त्रे पुरवून तिची अब्रू वाचविली. संत तुकाराम महाराजांच्या जीवनातही अशाच एका परीक्षेच्या वेळी, तत्सम प्रसंग घडला नि श्रद्धेमुळे ईश्वरी-लीला कशी घडते हे साऱ्यांनाच जाणवले. तुकाराम महाराजांचे गुरुबंधू श्री. गोचर स्वामी! तुकाराम महाराजांवर गुरुकृपेचा वरदहस्त होता. त्यामुळे ते विदेही स्थितीचे सुख अनुभवीत असत. रात्र झाली की ते, क्षुद्राचे घरी जात व तेथेच झोपत. त्यांचा तो जणू नियमच झाला होता. सकाळी घरी जाताना मात्र या क्षुद्राच्या घरचे जे वस्त्र हाती लागेल ते घेऊन ते घरी परतत असत.
एके रात्री ते एका भंगी समाजाच्या माणसाकडे झोपावयास गेले व सकाळी घरी परत येताना त्याच्या घरची जी घोंगडी हाती लागली ती घेऊन ते गोचर स्वामींकडे गेले. गोचरस्वामी व इतर भक्त जेव्हा जेवायच्या तयारीत होते त्यावेळी स्वामींनी तुकाराम महाराजांस भिक्षा करण्यास सांगितले. ते ऐकून जेवावयास बसलेले ब्राह्मण म्हणाले, “तुकाराम काल रात्री एका भंगी कुटुंबाकडे राहिले होते. त्यांनी त्याच्याकडची ही घोंगडीही बरोबर आणली आहे. त्यामुळे अशा भ्रष्ट माणसास आमच्या बरोबर जेवावयास बसवाल तर आम्ही जेवणार नाही.” ते ऐकून दुःखानेच गोचर स्वामी म्हणाले, “तुकाराम महाराज, हे सर्व ब्राह्मण तुम्हाला भ्रष्ट म्हणत आहेत. याकरिता तुम्ही ती घोंगडी टाकून द्या बरे.”
गोचर स्वामींच्या आज्ञेप्रमाणे तुकाराम महाराजांनी त्यांच्या अंगावरची घोंगडी टाकून दिली पण काय आश्चर्य लगेच दुसरी घोंगडी त्यांच्या अंगावर आली. असे करता करता घोंगड्यांचा ढीग झाला. पण घोंगडी टाकली की नवी घोंगडी येणे बंद होईना. ते पाहून गोचरस्वामी ब्राह्मणांना म्हणाले, “काय हो, तुकाराम भ्रष्ट झाले आहेत का ते आता सांगा.” पण हा अद्भुत प्रकार पाहून तेथे जमलेले सर्व ब्राह्मण लज्जित झाले व तुकाराम महाराजांचा अधिकार किती महान आहे, हे जाणून त्यांनी त्यांना नमस्कार केला व ते सारे क्षमायाचना करू लागले.
मग गोचर स्वामी सर्वांना उद्देशून म्हणाले, “तुकाराम महाराजांची योग्यता किती महान आहे हे मी जाणतो. म्हणूनच दररोज आम्ही त्यांची भिक्षेकरिता वाट पहात असतो. साधु पुरुषाचे सद्गुण पाहून ते अंगिकारण्याचा प्रयत्न करावा. त्यांच्या कार्याला दोष देऊन त्यांना कलंकित करू नये. त्यांचा देहाभिमान नष्ट झाल्याने, त्यांच्या दृष्टीने देह हा कस्पटासमान आहे. त्यामुळे त्यांच्या देहाने केलेले कोणतेही कर्म दुषित वा कलंकित असू शकत नाही हे यापुढे नीट लक्षात ठेवा. देहाचा अभिमान असलेले जीव खरंच अज्ञानी आहेत. सर्व जीव-प्राणीमात्रांवर दया करणारी माणसे थोर अंतःकरणाची व अतुलनीय आदर्शयुक्त आहेत. मात्र त्यांचा अधिकार कळण्यास सामान्यजनांना खूप वेळ लागतो नि तोपर्यंत अशा असामान्यांचा जनतेकडून वृथा छळ होतो. यासाठी सद्गुरु कृपेच्या छायेत रहा. म्हणजे खरा हिरा कोणता हे तुमच्या आपोआप ध्यानी येईल.”
गोचर स्वामींचे हे अमृतबोल ऐकून मग सर्वांनी तुमाराम महाराजांचा जयजयकार केला व कृष्णाच्या द्वापार युगाप्रमाणे कलियुगातही चमत्कार घडतात हे साऱ्यांच्या ध्यानी आले.
– भालचंद्र केशव गन्द्रे, ठाणे
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मधून)
Leave a Reply