१) हरीप्रसाद बंडी ( सोलापूर)
दै तरुण भारत मध्ये २०२० पासून सुरु झालेल्या माझ्या सदराचे हे “एकलव्य ” वाचक ! आपणहून त्यांनी माझ्याशी संपर्क साधला आणि वाढविला. कोरोना काळात वृत्तपत्र प्रसिद्धीवर काहीशी बंधने असल्याचे मी त्यांना सहजच कळविले होते. तेव्हापासून आजतागायत माझ्यासाठी दर रविवारी त. भा. घेऊन, त्यातील कात्रण काढून माझ्या प्रत्येक सोलापूर भेटीत ते मला कात्रणांचा गठ्ठा सुपूर्द करीत आले आहेत. खूपदा ते आणि त्यांचे नातेवाईक माझे लेखन वाचून काही शंकाही विचारतात आणि मी यथामती त्यांचे निरसन करीत असतो. मागील आठवड्यात “सकारात्मकतेचे तत्वज्ञान ” खंड १ आणि २ प्रकाशित प्रती माझ्याकडे आल्यावर स्वाभाविकपणे मी त्यांना स्पीड पोस्ट ने त्या पाठविल्या. या खंडांच्या प्रस्तावनेत मी त्यांच्या नांवाचा आणि सहकार्याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केलेला आहे.
काल प्रती मिळाल्यावर त्यांनी त्या देव्हाऱ्यात ठेवून ( मध्यभागी माऊलींची “ज्ञानेश्वरी”), प्रतींची विधिवत पूजा करून मला सोबतचा फोटो पाठविला आणि खालील मजकूरही !
“आदरणीय डॉ नितीनजी देशपांडे- सर, आपली पुस्तके आज घरपोच मिळाली. आताच त्यांचे पूजन केले आहे. श्रीचरणी विनम्र प्रार्थना आहे की या पुस्तकांचा लाभ माझ्यासारख्या असंख्य वाचकांना व्हावा आणि आपले लेखनकार्य सार्थकी ठरावे.”
यावरून सहज खालील दोन प्रसंग आठवले-
२) श्री किशोर कोंढाळकर (मास फ्लॅन्ज इंडिया प्रा. ली. मरकळ- हे आळंदीजवळ आहे) हे एच आर हेड आहेत. २०१६ साली मला संत साहित्यावरची पी एच डी मिळाल्यावर श्री कोंढाळकरांनी व त्यांच्या संस्थेतील वरिष्ठांनी शाल/श्रीफळ आणि माऊलींची प्रतिमा देऊन माझा कंपनीत सत्कार केला होता. माझ्या प्रबंधातील संशोधनात मास फ्लॅन्ज चा उल्लेख आहे.
३) श्री उस्मान शेख (सेवानिवृत्त- MSEB Exe. Er)- हा आमचा वालचंदी मित्र- कार्यकाळाच्या शेवटच्या टप्प्यात इस्लामपूरला होता. त्याआधी आमची शेवटची भेट १९८२ साली फलटणला झाली होती. त्यावेळी मी,सुधीर देशपांडे,रमेश शिवगुंडे त्याच्याकडे दोन दिवस राहून आलो होतो.
२०१७ साली मी कराड अभियांत्रिकी महाविद्यालयात असताना, उस्मान इस्लामपूरला असल्याची खबर मिळाली. मी एका दुपारी त्याच्याकडे पोहोचलो. गप्पांमध्ये माझ्या नुकत्याच हाती लागलेल्या PhD पदवीचा उल्लेख निघाला. उस्मानचा मराठी साहित्याचा आणि त्यांतल्या त्यांत संतसाहित्याचा अभ्यास आहे. ” तुझ्या प्रबंधात समर्थांच्या दासबोधावरील कामाचा समावेश आहे, चल दर्शन आणि आशीर्वाद घेऊ यात ”
असे म्हणत त्याने गाडी काढली आणि रात्री ९ वाजता आम्ही सज्जनगडावर पोहोचलो.अर्धा तास समर्थांच्या रामरायाचे स्थिर दर्शन घेतले आणि रात्री बाराच्या सुमारास त्याने मला कराडला सोडले.
संत एकदा आपल्या वाट्याला आले की ते “जेथे जाऊ तेथे” सतत सोबत करत असतात- हरीप्रसाद /किशोर/उस्मान च्या रूपात ! मग वेगळ्या दर्शनाची, वारीची गरज पडत नाही. ते असतातच!
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे.
Leave a Reply