सांताक्रुझ मुंबई येथील द योग इंन्स्टिट्युट ही एक फार जुनी योग संस्था आहे. तिच्यामागे सत्त्याण्णव वर्षांची परंपरा आहे. सांताक्रुझ रेल्वे स्थानकाजवळच गर्द झाडीने वेढलेल्या परिसरात या संस्थेची वास्तू उभी आहे. तिची स्थापना १९१८ साली मणी हरिभाई देसाई उर्फ योगेंद्रजी यांनी केली. सुरूवातीच्या काळात ही संस्था वर्सोवा येथील दादाभाई नौरोजी यांच्या द सॅण्डस् या बंगल्यात सुरू झाली. १९४७ साली ती सांताक्रुझ येथील सध्याच्या जागेत स्थलांतरित झाली.
संस्थापक योगेंद्रजी यांचा मूळातच योगमार्गाकडे ओढा होता. त्यांची योगायोगाने परमहंस माधवदासजी यांच्याशी गाठ पडली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी योगमार्गाचे संपूर्ण शिक्षण घेतले. माधवदासजींच्या आशीर्वादाने योगेंद्रजी यांनी योगाचा जनसामान्यांपर्यंत प्रचार करण्याच्या कामाला वाहून घेतले. पूर्वी योगाभ्यासाला एक गूढतेचे वलय होते. योगविषयक ज्ञान गुरूगृही राहून आणि संन्यास स्वीकारूनच घेतले पाहिजे अशी समजूत होती. योगेंद्रजींनी हे चित्र बदलायचे ठरवले. हिमालयात आणि गिरीकंदरात बंदिस्त असलेले योगविषयक ज्ञान सामान्य संसारी माणसांना आणि सर्वांनाच सोप्या मार्गाने उपलब्ध झाले पाहिजे अशी त्यांची भूमिका होती. स्त्री-पुरूष, गरीब-श्रीमंत, निरोगी रूग्ण या सर्वांना योग शिकवण्याचे त्यांनी व्रत घेतले. त्याची सुरूवात त्यांनी आपल्या पत्नी सीतादेवी यांना योग शिकवण्यापासून केली. १९२१ साली मणीभाई उर्फ योगेंद्रजी अमेरिकेत गेले. तिथेही त्यांनी योग इन्स्टिट्युटची स्थापना केली. १९२४ नंतर ते भारतात परत आले. त्यानंतरचे सगळे आयुष्य त्यांनी योगविषयक संशोधन आणि प्रशिक्षण यांना वाहून घेतले. योगाभ्यासापासून मिळणाऱ्या लाभाच्या बाबतीत तडजोड न करता संसारी माणसाला सोपेपणाने योग कसा अंगिकारता येईल यावर त्यांनी मुख्यतः संशोधन केले. योगाभ्यासाद्वारे संसारी माणसाला सुखी जीवनाची गुरूकिल्ली सापडावी अशी त्यांची तळमळ होती. त्यांनी योगावर अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांनी योग ॲण्ड टोटल हेल्थ हे मासिक चालू केले. ते आजही इन्स्टिट्यूटतर्फे प्रकाशित होते. योगेंद्रजी यांना कवितांची आवड होती. रवींद्रनाथांच्या गीतांजलीचे त्यांनी गुजरातीत भाषांतर केले.
त्यांची दोन मुले जयदेव आणि विजयदेव आणि दोन्ही सुना यांनीही योगप्रचारालाच वाहून घेतले. त्यांचे ज्येष्ठ पुत्र डॉ. जयदेव हे आता या संस्थेचे अध्यक्ष आहेत तर स्नुषा हंसाजी जयदेव या संचालक आहेत. जयदेव हे अतिशय विद्वान आहेत. विल्सन कॉलेजातून संस्कृतमध्ये ऑनर्स ही पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी भारती विद्याभवनतर्फे त्यांनी सांख्ययोगावर डॉक्टरेट मिळवली आहे. त्यांनी योगविषयक संशोधनालाच वाहून घेतले. त्यांनी योगविषयक अनेक पुस्तके लिहिली आहेत. डॉ. जयदेव आणि हंसाजी हे आता या संस्थेचा कारभार पाहतात.
सांताक्रुझची योग इन्स्टिट्युट ही केंद्र सरकारतर्फे मान्यताप्राप्त योग संशोधन संस्था आहे. तिच्या तीन महिन्यांच्या योगशिक्षक कोर्सला केंद्र सरकारची अधिकृत मान्यता आहे. सरकारतर्फे योगविषयक अनेक सर्वेक्षणांसाठी या संस्थेची मदत घेतली जाते. मुंबई परिसरातील अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना योगविषयक प्रशिक्षण देण्यासाठी या संस्थेची मदत घेतात.
योगमार्गाचा प्रसार करण्यासाठी या संस्थेतर्फे विविध उपक्रम राबवण्यात येतात. संस्थेतर्फे सर्वसामान्य नागरिकांसाठी नेहमी एक दिवसीय शिबिरे आयोजित करण्यात येतात. त्यात स्ट्रेस मॅनेजमेंट, हायपरटेंशन, मधुमेह, रेस्पिरेटरी अस्थमा, ब्रॉन्कॉयटीस, जुनाट डोकेदुखी, पाठीची व सांध्यांची दुखणी, वजन कमी करणे वगैरे विकारांसंबंधी योगासने शिकवली जातात व मार्गदर्शन केले जाते. तसेच संस्थेतर्फे योगविषयक एक दिवसीय कोर्स किंवा शिबिर नेहमी आयोजित केले जाते. त्यात योगाची तोंडओळख करून देण्यात येते. या कोर्सेसचे उजळणी वर्ग नेहमी होत असतात व कोर्स केलेल्यांना त्या वर्गांना विनामूल्य उपस्थित राहता येते. त्याला फॉलोअप कॅम्पस् असे म्हणतात.
या शिवाय संस्थेतर्फे २१ दिवसांचा एक बेटर लिव्हींग कोर्स घेतला जातो. तो सकाळ ते संध्याकाळ असा पूर्णवेळाचा असतो. तसेच एक महिन्याचा पूर्ण वेळेचा कोर्सही उपलब्ध आहे. ज्यांना योगशिक्षण घेण्याची आवड आहे परंतु आठवडाभर वेळ देता येत नाही त्यांच्यासाठी आठवड्याच्या शेवटी दीड तासांचा व एक वर्ष कालावधीचा कोर्सही चालवला जातो.
या संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे या संस्थेतर्फे तीन महिन्यांचा योग शिक्षकाचा एक कोर्स चालवला जातो. त्याला भारत सरकारची मान्यता आहे. या संस्थेतर्फे योगशिक्षकाचा कोर्स केलेली व्यक्ती कोठेही योगशिक्षकाची नोकरी मिळवण्यास प्राप्त समजली जाते. या तीन महिन्यांच्या कोर्समध्ये आसने, प्राणायाम, क्रिया, भाव, अटिट्युड ट्रेनिंग, कौन्सेलिंग, पब्लिक स्पिकींग, शिक्षण पद्धती, शिकवायचा सराव, शरीरशास्त्र, योगसूत्रे आणि सांख्य तत्त्वज्ञानाची ओळख यांचा समावेश आहे. परदेशी विद्यार्थ्यांमध्ये हा तीन महिन्यांचा कोर्स फार लोकप्रिय आहे.
योगशिक्षक बनण्यासाठी असलेले सात महिन्यांचा, एक वर्षाचा व दोन वर्षाचा पूर्ण योगशिक्षक असे पुढील प्रगत कोर्सेसही या संस्थेमार्फत घेतले जातात.
विशिष्ट समाजघटकांसाठी संस्थेतर्फे काही विशेष कोर्सेस आयाजित केले जातात.
गरोदर महिलांसाठी दोन दिवसांचा एक खास कोर्स असतो. त्यात प्रसुतीपूर्वी व प्रसुतीनंतर आरोग्याची काळजी कशी घ्यावी हे शिकवले जाते. विवाहित जोडप्यांसाठी दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी दोन तासांचा एक खास कोर्स चालवला जातो.
आपली मुले नीट अभ्यास करत नाहीत किंवा अभ्यासाकडे लक्ष देत नाहीत अशी साधारणत: सर्वच पालकांची तक्रार असते. काही मुले बराच वेळ अभ्यास करतात पण त्यांच्या फारसे लक्षात रहात नाही. योग हे शास्त्रच शरीर व मन यांचा संयोग करणारे आहे. योगाद्वारे मनाची एकाग्रता साधली जाते. मुलांनी नियमित व थोडा वेळ केलेला अभ्यास त्यांच्या पूर्णपणे लक्षात रहावा म्हणून या संस्थेतर्फे मुलांसाठी योगासनांचा एक कोर्स चालवला जातो. तो आठवड्यातील ठराविक दिवशी किंवा शनिवार-रविवार असाही असतो. त्यात मुलांची ऊर्जा एकप्रवाही करण्याच्या पद्धती शिकवल्या जातात. हे सर्व कोर्सेस हिंदी व इंग्लिश या दोन माध्यमांतून उपलब्ध आहेत. ते सर्व सशुल्क आहेत.
त्यांच्याशिवाय संस्थेतर्फे काही निशुल्क उपक्रम राबवले जातात. दर रविवारी संस्थेतर्फे विनामूल्य सत्संग आयोजित केला जातो. त्यात सर्वांना मुक्त प्रवेश असतो. तसेच रोज आरोग्यविषयक प्रश्नांची चर्चा करणारा परिसंवाद नावाचा कार्यक्रम असतो. त्यात कोणीही आपल्या आरोग्यविषयक समस्या विचारू शकतात व डॉ. जयदेव व हंसाजी हे जिज्ञासूंना मोफत मार्गदर्शन करतात.
काही लोकांच्या आरोग्यविषयक काही जुनाट समस्या असतात. त्या जीवनशैलीशी निगडित असतात. त्यांच्यासाठी दर शनिवारी समत्वम नावाचे एक जीवनशैली व्यवस्थापनाचे सत्र संपन्न होते. हे सत्र तीन तास चालते. त्यात रुग्णांनी आपली उपचारविषयक कागदपत्रे आणायची असतात. त्यात मेडीकल हिस्टरीचा अभ्यास करून योगमार्गातील उपाय सुचवले जातात.
या पलीकडे ज्येष्ठ नागरिक, महिलांसाठी व मोठ्या कंपन्यांत काम करणाऱ्या नोकरदारांसाठी त्यांनी समूह केल्यास विशेष कोर्सेस आयोजित केले जातात. ज्यांना इस्टिट्युटमध्ये येणे जमत नाही त्यांच्यासाठी घरगुती योगशिक्षणाची सोयही करण्यात येते. जास्त मुदतीच्या कोर्सेससाठी निवासाची सोय आहे.
संसेथेतर्फे योग ॲण्ड टोटल हेल्थ हे मासिक प्रसिद्ध केले जाते. तसेच संस्थेची एक प्रकाशन संस्था आहे. तिच्यातर्फे योग, विविध रोगांवर योगाद्वारे उपचार, ध्यानधारणा, रोजच्या जीवनातील योगाचा उपयोग या विषयांवर अनेक पुस्तके, सीडीज प्रकाशित केल्या आहेत.
अशा तऱ्हेने जनसामान्यांमध्ये योग प्रचार करण्यासाठी ही संस्था फार मोठे काम करत आहे. सामान्य माणसाला तासनतास योगाभ्यास करायला वेळ नाही. त्याच्यावर अर्थाजनाची व कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत हे लक्षात घेऊनच या संस्थेतील अभ्यासक्रमांची रचना केलेली असते. आजवर लाखो लोकांनी या संस्थेतील योगशिक्षणाचा व योगोपचारांचा लाभ घेतला आहे. आजवर शिक्षण घेतलेल्या अनेक साधकांच्या पाठिंब्याच्या जीवावर शतकपूर्तीकडे दमदार वाटचाल करत आहे.
Leave a Reply