संतकवि कृष्णदयार्णव हा संतकवि सातारा जिल्ह्यांतील कर्हाहड जवळील कोपरडें येथील रहाणारा. माध्यंदिनशाखी देशस्थ ब्राह्मण होय. याचें खरें नांव नरहरि असून बापाचें नांव नारायण व आईचें बहिणा होते.
याचा जन्म सन १६७४ च्या अक्षय्य तृतीयेस झाला. याचें लग्न लवकर झालें होतें. या वेळीं महाराष्ट्रांत औरंगझेबाच्या स्वारीमुळें सर्वत्र धुमाकूळ माजला होता. त्यामुळें नरहरीला गांव सोडावा लागला. तो जोगाईच्या आंब्यास राहिला असतां तेथें आनंदसंप्रदायीं गोविंदाने त्याला शके १६१८ गोकुळ अष्टमीस उपदेश दिला. मधुकरी मागत असतां “कृष्णदयार्णव” असें नरहरि सतत म्हणे. त्यावरून तेंच त्यांचें टोपण नांव रूढ झालें.
तीर्थयात्रा करून आल्यावर व प्रथम कुटुंब वारल्यावर अग्निहोत्र घेतल्यामुळें यांनीं द्वितीय संबंध केला. परंतु तितक्यांत त्यांना महारोग झाला. त्यावर उपाय म्हणून भागवताच्या दशमस्कंधावर त्यांनीं प्राकृत टीका लिहिली. यावेळीं यांचें वय ५४ होतें. या ग्रंथास आधार श्रीधरी टीकेचा आहे. पूर्वार्धाचे ४९ अध्याय संपले व रोग नाहींसा झाला. उत्तरार्धाचे ३७ अध्याय संपविले व ३८ व्या अध्यायाचे २३ श्लोक झाले आणि स्वामी पैठण येथें समाधिस्त झाले (शके १६६२ मार्गशीर्ष). पुढील साडेतीन अध्याय यांचा शिष्य उत्तमश्लोक यानें लिहिले आहेत. एकंदर ग्रंथास १६ वर्षे लागलीं. हा ग्रंथ चांगला आहे. ओवी एकनाथाप्रमाणें आहे. ज्ञानेश्वरीचीहि छाया ग्रंथावर पडलेली आहे. विद्वान लोक या “हरिवरदा” ग्रंथास फार मान देतात. यावरून कर्त्याची विद्वत्ता व बहुश्रुतपणा दिसून येतो. काव्याच्या दृष्टीनेंहि ग्रंथ चांगला वठला आहे. विस्ताराच्या मानानें हा ग्रंथ प्रचंड आहे. याची एकंदर ओवीसंख्या ४२ हजार आहे.
स्वामींचा “तन्मयानंद” नांवाचा आणखी एक ग्रंथ व बरेचसे अभंग आणि पदें इतकी कृति सध्यां उपलब्ध आहे.
संतकवि कृष्णदयार्णव यांचे १३ नोव्हेंबर १७४० रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply