नवीन लेखन...

संतांचे सामाजिक कार्य आणि तुकाराम

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये मिलींद सुधाकर जोशी यांनी लिहिलेला हा लेख


सामाजिक दृष्टीने संतकार्याचे परीक्षण करण्याचे अनेक प्रयत्न आजवर अनेक विचारवंतांनी केलेले आहेत. महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक न. र. फाटक, वि. का. राजवाडे, गं. बा. सरदार, रा. चिं. ढेरे, वि. भि. कोलते, प्रा. सदानंद मोरे यांच्यासारख्या अनेक व्यासंगी विद्वानांनी या बाबत आपली अभ्यासपूर्ण मते मांडली आहेत.

यातील काही विचारवंतांनी, संतांचे कार्य हे मुलभूत, पायाभूत आणि राजकीय चळवळीला प्रेरणा, प्रोत्साहन देणारे आहे असे मांडले. किंबहुना संतविचारांमुळेच समाजाचे वैचारिक उद्बोधन झाले. देव, देश, धर्म याबद्दल आस्था, आदर, प्रेम निर्माण झाले आणि त्यामळेच सामान्य माणूस सुद्धा बलिदान करायला तयार झाला. त्याच्या या वृत्तीतूनच पुढची चळवळ उभी राहिली असा निष्कर्ष काढला.

याच्या अगदी उलट काही विचारवंतांना संतांचा मार्ग हा निष्क्रियतेचा, नेभळटपणाचा वाटला. संत भौतिक, सामाजिक, राजकीय प्रगतीविषयी उदासीन होते, त्यांचे संपूर्ण लक्ष हे आध्यात्मिक, पारलौकिक प्रगतीकडे होते. त्यांनी समाजाला दुबळे बनवले, निवृत्तीपर बनवले. समाज प्रतिकारशक्ती हरवून बसला, पारतंत्र्याचेही त्याला काही वाटेनासे झाले अशी मते मांडली गेली. याच्याही पुढे जावून असेही सांगितले गेले की विषमता मूलक, वर्णवर्चस्ववादी धर्म समाजाच्या माथी मारण्याच्या डावपेचांचा एक भाग म्हणून धुर्ततेने व लबाडीने काही संतांनी आपल्या वाङ्मयीन रचना समाजाच्या गळी उतरवल्या.

ही इतकी परस्परविरोधी मते वाचल्यावर सामान्यजनांचा गोंधळ उडणे स्वाभाविक आहे. विचारी साधकाच्या वा सामान्य माणसाच्या मनातील हा गोंधळ दूर होऊन त्याला योग्य निष्कर्ष काढण्यास मदत व्हावी या हेतूने हा लेख लिहीला आहे. संत चळवळीचा कळस असलेल्या तुकाराम महाराजांच्या साहित्याच्या अनुषंगाने केलेला विचार म्हणून गाथेतील अभंगांचे दाखले देऊन मत मांडणी केली आहे. खरं तर सर्व संतांचे विचार सारखेच आहेत. फक्त सांगण्याची पद्धत व तीव्रता आणि व्याप्ती वेगवेगळी आहे.

या सर्व विचारांचा अभ्यास करत असताना काही मुलभूत प्रश्न मनात उभे राहिले. जर संत सामाजिक, राजकीय बाबीत इतके उदासीन असते तर मग ‘बुडते हे जन देखवेना डोळा । म्हणुनी कळवळा संतांचा जगती ।’ हे कसे? हे बुडते जन म्हणजे काय? लोक भक्ती विसरले होते, या अशा बुडत्यांना समजावून सांगून परत भक्तीकडे, अध्यात्मिकतेकडे वळवणे इतकेच संतांना हवे होते काय? सर्व लोकांनी भौतिक विचार सोडून देऊन, ऐहिक कर्मे, कर्तव्ये यांचा त्याग करून देव देव करत जगावे अशी संतांची अपेक्षा होती काय? अशा विचारांनी बहुजन समाज संसार सोडून संन्यासमार्गी व्हावा असे त्यांना हवे होते काय? बहुतांशी संसारात रमणारा सामान्य माणूस सर्व आशा, अपेक्षा सोडून, भौतिक, राजकीय आकांक्षांचा त्याग करून वनमार्गी व्हावा असे करण्यातच त्याची प्रगती आहे असा त्याचा आग्रह होता काय? बहुसंख्येने सामान्य माणूस असा निवृत्तीपर होऊ शकतो अशी संतांची धारण होती काय? सर्वसामान्य माणूस इतका निवृत्तीपर होऊच शकत नाही हे त्यांना समजत नव्हते काय? सामान्य माणसाच्या समाज, देश या बद्दलच्या कर्तव्यांना संतांच्या लेखी काहीच किंमत नव्हती काय? कोणाचे का राज्य असेना मग स्वकीयांचे असो की परधर्मियांचे असो आपण आपली भक्ती करावी त्याकडे लक्ष देऊ नये असे संतांचे वागणे, सांगणे होते का? आक्रमकतेने व बळजबरीने लोकांवर आपला धर्म लादणाऱ्या परधर्मियांशी संतांना काही देणे घेणे नव्हते काय? या घातक परधर्मीय विचारसरणीमुळे होणारे दुष्परिणाम संतांना समजत नव्हते आणि त्याचे दूरगामी होणारे विपरीत परिणाम त्यांना दिसत नव्हते काय? आणि जर संतांचे विचार हे इतके निवृत्तीपर आणि व्यक्तीकेंद्रित, समाजहिताच्या विरोधी होते तर मग या संतविचारांचं गारुड इतकी शतके समाजमनावर अधिराज्य कसं गाजवू शकतं? असे अनेक प्रश्न उभे राहतात.

या प्रश्नाला उत्तर मिळणार कुठे? तर संतसाहित्य आणि इतिहास यांच्यात. म्हणून या दोघांच्या सहाय्याने उत्तरे मांडण्याचा प्रयत्न इथे केला आहे. गाथेच्या आधारे संतांची भूमिका समजते आणि इतिहास अभ्यासला की तिला पुष्टी मिळते. तुकाराम महाराजांच्या गाथेतील अभंगात संत विचारांचे विविध पैलू नजरेस येतात त्या मुळे संतांबद्दलच्या विविध दृष्टीकमोनांच्या मांडणीत हेच अभंग संदर्भ म्हणून, दाखला म्हणून वापरले जातात आणि पुनरुक्तीचा दोष स्वीकारूनही अनेक लेखांमधून समाविष्ट केलेले दिसतात. खरंतर हा प्रत्येक अभंग हा स्वतंत्र लेखाचा, पुस्तकाचा विषय आहे, मात्र या लेखाची मर्यादा लक्षात घेऊन अभंगांचा सारांश अत्यंत संक्षिप्त स्वरूपात मांडला आहे.

१) संतांचा जगती येण्याचा उद्देश काय होता?
आम्ही वैकुंठवासी । आलो याची कारणासी ।।
बोलिले जे ऋषी । साच भावे वर्ताया ।।
झाडू संतांचे मार्ग। आडराने भरीले जग ।।
उच्छीष्टाचा भाग । शेष उरला तो सेवू ।।
अर्थ लोपली पुराणें । नाश केला शब्दज्ञाने ।।
विषयलोभी मन । साधन ते बुडविले ।।
पिटू भक्तीचा डांगोरा । कळीकाळासी दरारा ।।
तुका म्हणे करा । जयजयकार आनंदे ||(२३६)

जनसामान्यांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी संत वैकुंठातली त्यांची सर्वात आवडती गोष्ट म्हणजे ईश्वरसमीपता सोडून आले. खालावलेल्या सामाजिक स्थितीचं भान या अभंगातही दिसतं आणि हे चित्र बदलवण्यासाठी ऋषींचे विचार परत रुजवण्याची गरज आहे हे कळतं. या अभंगातील “आली” आणि “साचभावे” हे शब्द अभ्यासले तर संतांचा कळवळा आणि त्यांची भूमिका स्पष्टपणे समजते.

२) संतांना मुख्यतः काय करायचे होते?
धर्माचे पाळण । करणे पाखांड खंडण ।।
हेचि आम्हा करणे काम । बीज वाढवावे नाम ।।
तीक्ष्ण उत्तरे । हाती घेऊनी बाण फिरे ।।
नाही भीडभार । तुका म्हणे साना थोर ।।(२०७६)

संतांनी मुख्य काम धर्मपालन सांगितले, परंतु हे लक्षात घेतले पाहिजे की पाखांडखंडण हेही त्यांनी आवश्यक आणि महत्त्वाचे मानले होते. चांगले समोर आणायचे असेल तर वाईट दूर करायलाच लागतं. धर्मपालन म्हणजे काय हे तर समजावलेच पण पाखंडी आणि भोंदू परमपुज्यांकडून सामान्य जनांची केली जाणारी दिशाभूल, शोषण, पिळवणूक तसेच समाजात प्रचलित असलेल्या अनिष्ट रूढी, परंपरा, दंभ यावर अत्यंत आक्रमक प्रहार करून जागृती निर्माण केली.

३) संतांना निवृत्तीपर, कर्मत्यागप्रधान धर्म हवा होता काय?
धर्म रक्षावयासाठी । करणे आटी आम्हासि ।।
वाचा बोलो वेदनीती । करू सती केले ते ।।
न बाणता स्थिति अंगी । कर्म त्यागी लड तो।।
तुका म्हणे अधम त्यासी । भक्ती दुषी हरीची।।(१३७)

धर्मरक्षणासाठी सर्वस्व वेचण्यास तयार असलेले संत कर्मत्यागावर कठोरतेने प्रहार करतात, अशी स्थिती न बाणता कर्मत्याग करणाऱ्याला लंड, अधम असे संबोधून त्याची कडक निर्भत्सना करताना दिसतात. संतांना प्रपंचाच वावडे नव्हते, तर अतिरेकी प्रपंचासक्तीला विरोध होता. “जोडोनिया धन उत्तम व्यवहारे । उदास विचारे वेच करी ।।” असा सल्ला ते देतात. पाइकीच्या अभंगातून आणि इतरही अनेक अभंगांतून लढण्याचा संदेश ते देतात, मग हे विचार निवृत्तीपर कसे?

४) स्वराज्यपूर्व काळातील परिस्थिती कशी होती आणि संतांना तिचे भान होते का?
हाती होन दाविती बेणा । करिती लेकीची धारणा।।
ऐसे धर्म झाले कली । पुण्य रंक पाप बळी ।।
सांडीले आचार । द्विज चाहाड झाले चोर ।।
टिळे लपविती पातडी । लेती विजार कातडी ।।
बैसोनिया तक्ता । अन्योविण पिडिती लोका ।।
मुदबख लिहिणे । तेल तूप साबण केणे ।।
नीचाचे चाकर । चुकलिया खाती मार ।।
राजा प्रजा पीडी । क्षेत्री दुश्चितासी तोडी ।।
वैश्शूद्रादिक । हे तो सहज नीच लोक ।।
अवघे बाह्य रंग । आत हिरवे तरी सोंग ।।
तुका म्हणे देवा । काय निद्रा केली धावा ।।(१४४)
या अभंगातून ह स्पष्ट होते की सामाजिक
परिस्थितीचं भान संतांना होते. अभंगात वर्णन केल्याप्रमाणे चारही वर्णाच्या लोकांच्या त्या काळी झालेल्या नैतिक अवमूल्यनावर ते लक्ष ठेऊन होते. या घसरलेल्या स्थितीमुळे व्यथित होऊन, देवा काय झोपला आहेस का? असा परखड सवाल करण्यासही ते मागेपुढे पहात नाहीत.

५) परधर्माच्या आक्रमणाचे, त्यामुळे निर्माण झालेल्या धोक्याचे भान होते का?
संता नाही मान । देव मानी मुसलमान ।।
ऐसे पोटाचे मारिले । देवा अशा विटबीले ।।
घाली लोटांगण । वंदी नीचाचे चरण ।।
तुका म्हणे धर्म । न कळे माजल्याचा भ्रम।।(१६१३)
कोणता धर्म मानावा, कोणास मान द्यावा, कोणास देऊ नये हे अगदी स्पष्टपणे सांगितले आहे. तसेच मुसलमान देव मानल्यास विटंबना पदरी पडेल हा धोकाही दाखवला आहे. या अभंगांवर तुकोबा कीर्तन करीत असत. म्हणजे जनसामान्यांना त्यातून ते आणखी सविस्तरपणे याबाबत सांगत असले पाहिजे. धर्मपालन म्हणजे कोणता धर्म आणि काय करणे अपेक्षित आहे ते या अभंगातून सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट होते. सामान्यांचा वैचारिक गोंधळ दूर करून धर्मसंस्थापना करण्याचे हे काम संतांनी केले.

६) संताविचारांमुळे समाज पराक्रमशून्य, पौरुषहीन, नेभळट बनला का?
मऊ मेणाहुन आम्ही विष्णुदास ।
कठीण वज्रास भेदू ऐसे ।।
मेले जीत असो निजोनिया जागे ।
जो जो जे जे मागे ते ते देऊ ।।
भले तरि देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे काठी देऊ माथा ।।
मायाबापाहुनी बजु मायावंत ।
करू घातपात शत्रूहुनी ।।
अमृत ते काय गोड आम्हापुढे ।
विष ते बापुडे कडू किती ।।
तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी ।
देवासही आटी जन्म घेणे ।। (१४१)
या अभंगांमधून संतांची जशास तसे ही वृत्ती स्पष्ट होते. वेळ पडल्यास वार करून किंवा घातपात सुद्धा करून आम्ही आमचे रक्षण करू आणि शत्रूचे निर्दालन करू हे ही स्पष्ट आहे. सर्व शक्तीनिशी रक्षण करावे हे तर सांगितलेच पण यासाठी वेळप्रसंगी देवालाही जन्म घेऊन खटाटोप करावाच लागतो आणि तो त्याने यापूर्वीही केला आहे आणि आताही करेल तसेच अशा खटाटोप करणाऱ्यांनाही देव सहाय्यच करेल असे प्रोत्साहित करणारे आश्वासन देऊन संतांनी जनसामान्यांना लढण्यास प्रवृत्त केले. भ्रामक अहिंसेच्या कल्पनेतून बाहेर काढले.

७) पाखांड खंडण करून समाजात योग्यअयोग्यतेची समज कशी निर्माण केली?
मुखे बोले ब्रह्मज्ञान । मनी धन आणि मान ।।
एशियाची करीता सेवा । काय सुख होय जीवा।।
पोटासाठी संत । झाले कलीत बहुत ।।
विरळा ऐसा कोणी । तुका त्यासि लोटांगणी।।(३०९)
आमची गोसावी अयाचित वृत्ती ।
करवी शिष्या हाती उपदेश ।।
दगडाची नाव आधीच ते जड ।
ते काय दगड तारू जाणे ।।
तुका म्हणे वेष विटबिला त्यांनी ।
सोंग संपादणी करिती परी ।।(३३३७)

जगी कीर्ती व्हावी । म्हणोनि आलासी गोसावी।।
बहुत केले पाठांतर । वर्म ते राहिलजे दूर ।।
चित्ती नाही अनुताप । लटिके भगवे स्वरुप ।।
तुका म्हणे सिंदळीच्या । व्यर्थ श्रमविली वाचा।। (३१८२)

वरील सर्व अभंगांतून दंभ, पाखंड, विषमता यावर प्रहार केले. तथाकथित साधू, मठाधिपती, गोसावी, परमपूज्य यांची ढोंगी कार्यपद्धती समाजाला सांगून सावध केले. यांच्या नादी लागला तर खऱ्या विशुद्ध धर्मापासून समाज दूर जातो आणि भ्रष्ट आचार विचार स्वीकारतो, ज्याचे दूरगामी घातक परिणाम होतात. पिढ्यानपिढ्या भोगायला लागतात. हा धोका ओळखूनच संतांनी पाखंडखंडणाला विशेष महत्त्व दिले.

नुसत पाखांडखंडण करून न थांबता
जे का रंजले गांजले । त्यांसि म्हणे जो आपुले।।
तोचि साधू ओळखावा । देव तेथेची जाणावा।।
मृदू सबाह्य नवनीत । तैसे सज्जनांचे चित्त ।।
ज्यासि अपंगिता नाही । त्यासि धरी जो हृदयी।।
दया करणे जे पुत्रासी । तेचि दासा आणि दासी।।
तुका म्हणे सांगू किती । त्याचि भगवंताच्या मूती।। (२०४)

अशा अभंगांतून योग्य काय, खरा कोण ते लोकांना समजावले व नीर क्षीर विवेक उभा केला. (अभंगाच्या शेवटी दिलेला क्रमांक हा श्री देवडीकरकृत श्रीतुकाराममहाराजांची गाथा आवृत्ती सन २००० प्रमाणे घेतलेला आहे.)

संतविचारांची वैचारिक पार्श्वभूमी बघितली. आता त्यांच्या कार्याचे सामाजिक परिणाम स्पष्टपणे दाखवणाऱ्या दोन ऐतिहासिक दाखल्यांचा विचार करू म्हणजे संतांचे कार्य सप्रमाण सिद्ध होईल.

सन १२९२ मध्ये देवगिरीवर राजा रामदेवरायाचे राज्य होते. याच्या साधारण १०० वर्षे आधी म्हणजे सन ११९६ च्या सुमारास दिल्लीत सुलतानाची सत्ता प्रस्थापित झाली होती. अफगाणिस्तान मधून धनलालसा, धर्मविस्तार आणि राज्यविस्तार या हेतूने आलेल्या या महत्त्वाकांक्षी सुलतानांनी हा हा म्हणता संपूर्ण उत्तर भारत आपल्या ताब्यात घेतला होता आणि क्रूर व नृशंस अत्याचारांनी संपूर्ण जनजीवन उद्ध्वस्त करून टाकले होते. उत्तरेतली ही स्थिती ज्ञानदेवांनी आणि नामदेवांनी त्यांच्या यात्रेदरम्यान प्रत्यक्ष पाहिली होती, पण त्यांच्या सांगण्याची दखलही घेतली गेली नाही.

उत्तरेतील सुलतानांच्या अधाशी नजरा देवगिरीच्या अफाट संपत्तीवर खिळल्या होत्या. देवगिरीच्या या बलाढ्य आणि वैभवसंपन्न साम्राज्याचा सम्राट राजा रामदेवराय हा अत्यंत बेजबाबदार, बेसावध आणि विवेकशून्य होता. सुखोपभोगी, संथ, मृदू होता, लढवय्या नव्हता.

डिसेंबर १२९३ मध्ये फक्त ८००० स्वारांनीशी दिल्लीच्या सुलतानाचा सेनापती अल्लाउद्दीन खिलजी देवगिरीवर चालून आला. त्या वेळी किल्ल्यात फक्त ४००० सैनिक होते. बाकीचे युवराज शंकरदेवाबरोबर स्वारीस गेलेले होते. उसने अवसान आणून रामदेवराय अल्ला उद्दीनशी लढायला गेला परंतु चुटकीसरशी पराभूत होऊन किल्ल्याकडे पळत सुटला. संपूर्ण देवगिरी शहर वाऱ्यावर सोडून हा राजा किल्ल्यात निघून गेला. किल्ला अभेद्यच होता, त्याच्याआधारे लढत राहू असा विचार होता. पण कसायाच्या हातात गाय सापडावी तशी देवगिरी खिलजीच्या ताब्यात सापडली. त्याने तेथील संपत्तीची, साधनांची, स्त्रियांची यथेच्छ लूट केली. घाबरट रामदेवराय किल्ल्यातून बाहेर आलाच नाही. शंकरदेव सैन्य घेऊन येईल आणि खिलजीचा पराभव करेल अशी त्याला आशा होती. खिलजीने हुशारीने एक अफवा स्वारीच्या आधीच सर्वत्र पसरवली होती की तो जे सैन्य घेऊन आला आहे ही तर एक छोटी तुकडी आहे, अजून प्रचंड मोठी फौज दिल्लीहून निघाली आहे. याचा परिणाम असा झाला की दक्षिणेतील एकही राजा रामदेवरायाच्या मदतीला आला नाही. तसेही या राज्याचे संबंध मित्रत्वाचे नव्हतेच. ते कायम एकमेकांशी भांडत असत.

खिलजीने किल्ल्याला वेढा दिला, इतक्यात रामदेवरायाला कळले की ज्या धान्यसाठ्याच्या आधारे लढण्याचे मनसुबे आखले होते त्या धान्याच्या पोत्यात धान्याच्या जागी प्रत्यक्षात मीठ भरलेले आहे. गडावर फक्त २-३ दिवस पुरेल एवढाच जन्नसाठा आहे. सैन्य नाही. अन्न नाही, आणि शौर्य नाही अशा अवस्थेत रामदेवरायाने खिलजीसमोर शरणागती पत्करली व तहाची बोलणी सुरू केली. अल्लाउद्दीनने अव्वाच्या सव्वा खंडणी मागितली ती त्याने कबूल केली.

दरम्यान शंकरदेव प्रचंड मोठे सैन्य घेऊन खिलजीवर चालू गेला. रामदेवराय किल्ल्यातून बाहेर आलाच नाही. खिलजी मात्र डगमगला नाही, प्राण पणास लावून लढला आणि त्याने शंकर देवाचाही पराभव केला. अशारीतीने फक्त ८००० स्वारांनीशी आलेल्या लिजीने अवघ्या १५ दिवसात बलाढ्य देवगिरीचा संपूर्ण पराभव केला. रामदेवरायाला मांडलिक बनविले. २४००० किलो (६०० मण) सोने, ४०००० किलो (१००० मण) चांदी, २८० किलो मोती, ८० किलो हिरे माणके आणि रेशीम कापडाचे ४००० ठाण, इतकी प्रचंड खंडणी आणि केलेली लूट खिलजीला मिळाली आणि दक्षिणेत सुलतानी आली. हा इतिहास वाचला की सुन्न व्हायला होतं आणि अनेक प्रश्न उभे राहतात. इतकी प्रचंड खंडणी देऊ शकणारं मोठं आणि वैभवसंपन्न साम्राज्य इतक्या सहजपणे आणि तडकाफडकी पराभूत का झालं? उत्तरेतील विस्तारवादी सुलतानी वृत्तीचा आणि आक्रमणाचा धोका कुणाच्याही लक्षात आला नव्हता का?

उत्तरेतील अत्याचाराच्या बातम्या यांच्यापर्यंत पोहोचत नव्हत्या का? हा धोका ओळखून प्रतिकारास व संरक्षणास कायम सिद्ध राहिले पाहिजे, उत्तर सीमेवर कडक बंदोबस्त हवा हे सांगणारा एकही मुत्सद्दी, एकही विचारी ब्राह्मण दरबारात नव्हता का? सेनापती, राजगुरू, हेरखाते काय करत होते? खिलजीला सीमेवरच का रोखला नाही? एवढ्या मोठ्या साम्राज्याचा दरबार इतका बेसावध आणि राजा इतका नेभळट कसा? राजावर काही संस्कार झाले नव्हते का? रयतेला शत्रूच्या तावडीत सोडून हा किल्ल्यात कसा काय लपतो? साम्राज्याच्या सीमा उघड्या आणि राजधानीच्या संरक्षणाला इतकी तुटपुंजी फौज कशी? किल्ल्यात येणारी धान्याची पोती कुणी पुरवली? घेताना कोणी तपासली? त्यात मीठ आहे हे कोणाच्याच लक्षात कसं आलं नाही? की हा व्यापारी आणि अधिकारी यांनी संगनमताने केलेला भ्रष्टाचार होता? पोती उतरवणाऱ्या हमालांच्या तरी लक्षात आलेच असेल ना, मग ते का गप्प बसले? का पैसे देऊन त्यांचीही तोंडे बंद केली गेली?

असे अनेक प्रश्न उभे राहतात, यांची उत्तरे द्यायची झाली तर तो स्वतंत्र लेखाचा विषय होईल. सारांशरूपाने संक्षिप्त स्वरूपात निष्कर्ष काढला तर संपूर्ण राष्ट्रात म्हणजे रयतेपासून ते राजापर्यंत असलेला देव, देश, धर्म यांच्यावरील निष्ठेचा अभाव, सुखासीन, कामचुकार, भ्रष्ट वृत्ती, व्यक्तिगत स्वार्थ आणि लालसा यांचं प्राबल्य यामुळे लयास गेलेली वीरता, क्षात्रतेज आणि राष्ट्रहीत दक्षतेचा अभाव. यातील सर्वांत महत्त्वाची आणि तितकीच क्लेषदायक बाब ही की देवगिरीची ही स्थिती होती ती अफाट वैभव व सुबत्ता असताना आणि तेही स्वधर्मीयांच्याच राज्यात. आता दुसरा दाखला पाहू या.

सन १६४५ मध्ये शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोविली आणि अविरत प्रयत्न आणि पराक्रमाने स्वराज्य निर्मिले. सन १६७४ मध्ये शेकडो वर्षांनी एक हिंदू छत्रपती झाला. सुलतानांची त्यांच्यानंतर, अंतर्गत व बाह्य शत्रूवर मात करून संभाजीराजे छत्रपती झाले.

संपूर्ण भारत इस्लाममय करण्याच्या ध्येयाने पछाडलेल्या औरंगजेबाच्या डोळ्यात हे हिंदुराष्ट्र काट्यासारखे सलत होते. एका काफीराने स्वराज्य निर्मावे, छत्रपती व्हावे हे त्याला सहन होत नव्हते. औरंगजेबाचं साम्राज्य काबुलपासून मद्रासपर्यंत पसरलेलं होतं तो बादशाह नव्हता तर अतिश्रीमंत, बलाढ्या सत्तेचा शहेनशहा होता. मोगल साम्राज्याच्या तुलनेत स्वराज्याचे क्षेत्र किरकोळ होते. तसेच शस्त्रसामर्थ्य आणि आर्थिकबळ नगण्य होते.

शिवाजी महाराजांचे निधन आणि मराठ्यांचा अंतर्गत कलह, याचा फायदा घेऊन हे काफिरांचे राज्य संपवण्याच्या हेतूने अफाट सैन्य आणि अपार संपत्तीचं पाठबळ घेऊन शहेनशहा दक्षिणेत उतरला. पहिल्या चार वर्षातच त्याने आदिलशाही आणि कुतुबशाही संपविली आणि आपले संपूर्ण लक्ष मराठ्यांवर केंद्रित केले. या विषम लढाईत स्वराज्य चुटकीसरशी पराभूत होईल असेच वाटत होते मात्र झालं याच्या अगदी उलट.

क्रूरकर्मा औरंगजेबाशी लढण्याच्या नुसत्या कल्पनेने एखादा गर्भगळीत झाला असता, पण ‘मोडेन पण वाकणार नाही,’ हे शिवशाहीचं तत्त्व. श्रींच्या इच्छेनुसार छत्रपतींनी निर्मिलेले स्वराज्य औरंगजेबाने गिळंकृत करावं हे छत्रपतींइतकेच तेजस्वी तडफदार असणाऱ्या संभाजीराजांना कसं मान्य होणार? महाराजांवर, स्वराज्यावर, स्वधर्मावर जीवापाड प्रेम करणाऱ्या रयतेला, सरदारांना कसं मान्य होणार? महाराजांवर, स्वराज्यावर, स्वधर्मावर जीवापाड प्रेम करणाऱ्या रयतेला, सरदारांना कसं मान्य होणार? तत्कालीन जगातील सर्वांत मोठ्या साम्राज्याचा सम्राट, शहेनशहाला कडव्या मराठ्यांनी थोडेथोडके नव्हे तर तब्बल २५ वर्षे झुंजवला.

आदिलशाही, कुतुबशाही पत्त्यासारख्या कोसळतात आणि तुलनेने दुबळे मराठे मात्र २५ वर्षे लढतात आणि विजयी होतात हे अद्भुतच होतं. या काळात मराठ्यांना फक्त मुघलांशीच नव्हे तर पोर्तुगीज, इंग्रज, सिद्दी यांच्याशीही लढावे लागले. याच काळात धर्मवीर संभाजींचा धर्मवेड्या औरंगजेबाने हालहाल करून केलेला वध मराठ्यांनी पाहिला. परंतु त्यामुळे खचून न जाता ते अधिक त्वेषाने चवताळून उठले आणि घट्ट पाय रोऊन उभे राहिले, लढले.

छत्रपती संभाजीच्या नंतर मराठे पराभूत होतील असे वाटले होते पण राजाराममहाराज खंबीरपणे उभे राहिले. दुर्दैवाने रायगडाचा पाडाव झाला, महाराणी येसूबाई आणि छोटा शाहू औरंगजेबाच्या ताब्यात सापडले. कैद झाले. जवळजवळ सर्व स्वराज्याचा भूभाग औरंगजेबाच्या ताब्यात आला होता. छत्रपती राजाराम महाराजांना राजधानी जिंजीला हलवावी लागली. अशाही परिस्थितीत मराठ्यांनी लढा सुरूच ठेवला. संताजी, धनाजींनी जबरदस्त प्रतीआक्रमणे केली.

राजारामाच्या मृत्युनंतर महाराणी ताराबाई, रामचंद्रपंत अमात्य यांनी लढा सुरूच ठेवला. या कडव्या चिवट प्रतिकारामुळे आणि प्रतीआक्रमणामुळे औरंगजेब, त्याचे सैन्य खचले आणि हा शहेनशहा अखेरीस शोकमग्न, निस्तेज, पराभूत अवस्थेत या महाराष्ट्रातच १७०७ साली मरण पावला. त्याच्यासमोर मराठ्यांच्या तीन छत्रपतींचे मृत्यू झाले, स्वराज्याची महाराणी आणि राजपूत्र त्याच्या ताब्यात होते तरीही तो मराठ्यांना हरवू शकला नाही.

या एकापेक्षा एक कठीण प्रसंगात छत्रपतींच्या वारसांनी, सरदारांनी, सामान्य लोकांनी केलेल्या संघर्षाला इतिहासात तोड नाही. दैवाने मराठ्यांची अतिशय कठोर परीक्षा पाहिली, आपल्या निष्ठेच्या बळावर मराठेही त्यात खरे उतरले आणि मग दैवाने प्रसन्न होऊन विजयश्रीची माळ मराठ्यांच्या गळ्यात टाकली.

देवगिरीच्या धक्कादायक पराभवामुळे मराठे खचले आणि त्यांना त्यातून सावरायला साडे तीनशे वर्षे लागली. तसेच औरंगजेबाच्या पराभवामुळे मोगल खचले आणि त्यानंतर दिल्लीच बादशाही कधीच प्रबळ झाली नाही. तिचा झपाट्याने हास होत गेला आणि त्यानंतर हिंदुस्थानच्या राजकारणाची सूत्रे मोगलांकडून मराठ्यांच्या हातात आली. इतकेच नव्हे तर नंतरच्या बादशहांना दिल्लीच्या रक्षणासाठी मराठ्यांकडे याचना करावी लागली.

बलाढ्य देवगिरी १५ दिवसांत खिलजीच्या मोजक्या सैन्याकडून पराभूत होते आणि सर्वशक्तीनिशी दक्षिण दिग्विजयासाठी आलेल्या शहेनशहा औरंगजेबाशी मराठे तुटपुंज्या शक्तीसामर्थ्यानिशी २५ वर्षे संघर्ष करतात आणि शेवटी त्यांचा पराभव करतात. मराठी राज्यकर्ते आणि रयत यांच्यात हा स्तिमित करणारा वैचारिक बदल कशामुळे घडला? एवढे मनोबल, तेज, शौय, हिमत त्यांच्यात कुठून आली? मराठ्यांच्या वृत्तीतला आश्चर्यकारक बदल, स्वराज्यासाठी सर्वस्व त्यागण्याची तयारी याचं एक प्रमुख कारण म्हणजे संतांचे विचार आणि कार्य.

देवगिरी ते स्वराज्य या कालखंडात ज्ञानेश्वरांपासून ते समर्थांपर्यंतच्या संत चळवळीमुळे परचक्र पूर्ण भरात असतानाही धर्म, संस्कृती टिकली. या काळात संतांनी अविरत परिश्रमाने आपल्या भक्तीमार्गाद्वारे चारही वर्ण, चारही आश्रम, आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू व ज्ञाता अशा चारही स्थितीतील भक्त या सर्वांना आवडेल, रुचेल, पचेल अशा पद्धतीने ऋषंचे हे विचार सांगत सांगत लोकविचाराच्या केंद्रस्थानी देव, देश, धर्म यांची पुन्हा स्थापना केली. यांच्याबद्दल प्रेम निर्माण केलं. भौतिक कर्तव्यास तत्पर आणि पारमार्थिक प्रगतीबाबत दक्ष असा माणूस उभा केला. अस्मिता, तेज, पौरुष जागृत केले. या वैचारिक परिवर्तनामुळे शैथिल्य, षंढता पळाली आणि समाज मजबुतीने कुठल्याही आव्हानाला न घाबरता पाय रोवून उभा राहिला. आपले गतवैभव मिळवण्यासाठी सिद्ध झाला.

विजयनगरच्या पराभवानंतर, मुघलशाही विरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्याची सुरुवात संपूर्ण भारतात सर्वात आधी या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजीमहाराजांनी केली आणि ती यशस्वी झाली याचे मुख्य श्रेय महाराजांच्या सर्वसमावेशक अलौकिक नेतृत्वाला, शहाजीराजे आणि जिजाबाईंच्या संस्कारांना, तसेच धर्मवीर संभाजी, राजाराममहाराज, ताराबाई, सर्व मराठे सरदार आणि रयत यांना असलं तरी त्या चळवळीच्या यशस्वितेत संत विचारांचे योगदान पण महत्त्वाचेच आहे. या श्रेयातील उचित वाटा संतांच्या या कार्याला द्यावाच लागेल. संतांनी भलेही हातात शस्त्र धरले नसेल पण देव, देश, धर्मासाठी हातात शस्त्र घेणारे हजारो हात तयार केले हे नाकारणे, हे कृतघ्नतेचे लक्षण आहे.

आजच्या तालिबान, अल कायदा, इसीस द्वारे केली जाणारी कृष्णकृत्ये, अत्याचार, दहशतवादी कारवाया बघितल्यावर तर असे वाटते की जर त्या काळी मराठे धर्मांध औरंगजेबाकडून पराभूत झाले असते आणि संपूर्ण हिंदुस्थानभर त्याची निरंकुश सत्ता प्रस्थापित झाली असती तर काय झाले असते, नुसत्या विचारानेही थरकाप उडतो.

हे या भारतदेशाचे भाग्यच म्हणावे लागेल की, तुकाराममहाराज, शिवाजीमहाराज आणि समर्थ रामदास हे ईश्वरनिष्ठ त्रिकुट एकाच कालखंडात या भूमीवर कार्यरत होते. आज आपण स्वतंत्र आहोत आणि आपला धर्म, देश, देव टिकला तो यांच्यामुळेच. संतांचे हे उपकार विसरून चालणारच नाही. तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात हेच सांगितलंय,
काय सांगो आता संतांचे उपकार ।
मज निरंतर जागविती ।।
काय द्यावे त्यांशी व्हावे उतराई ।
ठेविता हा पायीं जीव थोडा ।।
खिलजी आक्रमणापूर्वीची देवगिरीची, औरंगजेब आक्रमण काळातील आणि आजची आपली सामाजिक मानसिकता याची तुलना केल्यास लक्षात येईल की आजची परिस्थिती ही देवगिरीच्या परिस्थितीच्या जवळ जाणारी आहे. काही बाबतीत तर त्यापेक्षाही वाईट आहे.

१९६२ चे चीन विरुद्धचे युद्ध का झालं? त्यात आपला पराभव का झाला? कारगिलच्या वेळेसही शत्रूच्या हालचालींबद्दल आधी बातम्या मिळालेल्या असतानाही त्वरित कृती का केली गेली नाही? चीन सीमेवरील आजची आपली शस्त्रसज्जता पुरेशी आहे का? चीन आणि पाकिस्तान यांच्याशी एकाच वेळेस युद्ध करायची वेळ येऊ शकते यासाठी आपली काय तयारी आहे? एकंदरीतच आजची आपली शस्त्रसज्जता पुरेशी आणि कालानुरूप आहे का? या प्रश्नांची उत्तरे अस्वस्थता निर्माण करणारी आहेत.

ही स्थिती जर बदलायची असेल, धर्म, संस्कृती यांची होणारी घसरण जर थांबवायची असेल तर संतविचार समाजात प्रकर्षाने रुजविण्याची गरज आहे. एक असा समाज घडवण्याची गरज आहे ज्याच्या डोक्यात विठोबा आणि ओठात तुकोबा असेल आणि ज्याच्या बाहूत शिवबा आणि हृदयात ज्ञानोबा असेल.

आजच्या शास्त्रीय आणि संगणकीय युगात तरुण पिढीला या विचारांकडे आकृष्ट करण्यासाठी संतविचारांची मांडणी तर्कसुसंगत, वास्तववादी आणि वेगळ्या पद्धतीने करण्याची गरज आहे. एखादे प्रमेय जसे सप्रमाण सिद्ध करतो तसे संतविचारांचे महत्त्व आणि उपयोग सप्रमाण सिद्ध करण्याची गरज वाटते. म्हणून हा लेखनप्रपंच. खरं तर मी कोणी ज्ञानी, पंडित, इतिहास संशोधक इ. नाही परंतु एक संस्कृतीप्रेमी म्हणून जे वाचलं, अभ्यासलं ते या लेखाद्वारे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

संतविचार कालबाह्य झालेले नसूनउलट आजच्या युगातील विषमता, जातीयवाद, दहशतवाद, फुटीरतावाद इ. वाद मिटवण्यासाठी त्यांची प्रामुख्याने गरज आहे असे मला वाटते. हा लेख वाचून वाचकांना ते पटले तर ते मी माझे भाग्य समजेन.

— मिलींद सुधाकर जोशी,
पुणे

(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..