नवीन लेखन...

संयत वेदनेचा मारवा

“तुटते चिंधी जखमेवरची, आणिक उरते संथ चिघळणे “. ही ओळ जेंव्हा आरतीप्रभूंनी लिहिली तेंव्हा त्यांनी  मारवा ऐकला होता की नाही, याची कल्पना नाही. परंतु मारवा रागाचा “स्वभाव” मात्र या ओळीतून चपखलपणे दिसून येतो, हे नक्की. या रागात सुखाची सावली नाही किंवा बरेचवेळा असेच वाटते, काही आशा ठेवायला तरी जागा आहे का? महाभारतातील अश्वत्थाम्याची कपाळावरील चिरंतन जखम जशी सतत वाहती असते त्याप्रमाणे या रागात सतत वेदनेचा सूर कायम स्त्रवत असतो.
वास्तविक भारतीय संगीतात “षडज” स्वराचे महत्व अपरिमित आहे, किंबहुना बहुतेक सगळे राग याच स्वराने सुरु होतात किंवा या स्वराचा आधार घेतात. असे फार थोडे राग आहेत, ज्यात या स्वराला तितके महत्व नाही आणि त्या रागांच्या नामावळीत, मारवा राग अग्रभागी आहे. या रागात “सा” लागतो पण, त्याचे अस्पष्ट असणे, इतपतच त्याची खूण. (कोमल) रिषभ आणि धैवत हेच सूर, या रागाची ओळख आहे. खरतर, “ध नि (को) रे नि ध” हा स्वरसमूह आणि यातच या रागाचे “चलन” आहे. षडज जवळपास नसल्यातच जमा आणि पंचम स्वराला स्थान नाही!! गंधार स्वर आहे पण तरीही कोमल रिषभ आणि धैवत, यांच्यासमोर “स्वत्व” हरवलेला!!
या मुळेच हा राग गायला किंवा वाजवायला घेणे, ही कलाकाराची परीक्षाच असते. अत्यंत मर्यादित स्वर हाताशी आहेत पण, जे स्वर आहेत. त्याच स्वरांतून वेदनेचा संपूर्ण अवकाश उभा करायचा, हे तर शिवधनुष्य हाताळण्यासारखे आहे. याचे वादी-संवादी स्वर बघितले तरी आपल्याला समजून घेता येईल. (को) रिषभ आणि (शुद्ध) धैवत, या दोन स्वरांच्या संगतीने, राग मांडावा लागतो. संध्याकाळ संपत असताना परंतु रात्रीचा प्रभाव पडण्याआधीचा जो समय आहे, ती वेळ शास्त्रकारांनी या रागासाठी योजलेला आहे.
प्रत्येक कलाकाराचा स्वत:चा असा खास आवडीचा राग असतो आणि तो सादर करताना, त्याची तन्मयता अनुभवण्यासारखी असते. उस्ताद अमीर खानसाहेबांचा मारवा ऐकताना, अशी आपली एकतानता होते.
रागाच्या पहिल्या सुरापासून “पिया मोरे आनत देस” ही चीज अत्यंत ठाय लयीत चाललेली आहे आणि प्रत्येक सूर कसा स्वच्छ, सुरेल लागलेला आहे. कुठेही तानांचे आडंबर नाही, उगीच कुठे मूर्च्छना नाही. प्रत्येक सुराचा “मझा” घेता येतो आणि त्यायोगे लयीची मोहकता!! माझे तर नेहमीच म्हणणे असते, रागदारी संगीताची खरी मजा आणि ओळख ही नेहमीच ठाय लयीत घेता येते. तिथे प्रत्येक स्वर अवलोकता येतो, “ऐकून” कानात साठवता येतो. या सादरीकरणात, नेमका हाच आनंद घेता येतो. साथीला तबला आहे पण, तो देखील अगदी खालच्या सुरात लावलेला आहे आणि त्यामुळे गायनाला एक वेगळेच परिमाण मिळते. चिरदाह वेदनेचा असामान्य अनुभव या गाण्यातून आपल्याला मिळतो. रागदारी संगीतात कायमचे स्थान मिळवणारी रचना आणि मानदंड म्हणून प्रस्थापित झाली.
“सांज भाई घर आजा रे पिया,
दिन तो डूबा डूब ना जाये
आज का सुरज आजा रे”.
के. महावीर या संगीतकाराची चाल आहे या कवितेला. संगीताच्या क्षेत्रातील हे एक अगम्य कोडे आहे. अंगात प्रतिभा आहे, नवनवीन चाली निर्माण करण्याची क्षमता आहे, प्रयोगक्षम बहुश्रुतता आहे पण तरीही म्हणावी तशी लोकमान्यता नाही, कौतुकाचा वर्षाव नाही. अर्थात, ज्यांना संगीताची जाण आहे, त्या लोकांच्यात मात्र, मान्यता आहे. “सांज भयी, घर आजा रे पिया”. “सांज: शब्द बघा उच्चारला आहे, किंचित स्वरांत थरथर निर्माण करून, गाण्याची सुरवात केली आहे आणि ओळ संपवताना, “पिया” शब्दातून जी व्याकुळता निर्माण झाली आहे, ती तर केवळ लाजवाब!! गाण्यात पुढे, “सांज” याच शब्दावर आणखी वेगवेगळ्या हरकती घेऊन, त्याच शब्दाचे सौदर्य वाढवले आहे.
गाण्याच्या सुरवातीच्या वाद्यमेळातून आपल्याला “मारवा” रागाचे सूचन मिळते आणि तोच स्वर त्या रचनेवर पसरलेला आहे. गझल सदृश रचना जरी वाटत असली तरी तसे प्रत्यक्षात नाही. मध्य लयीत गाणे फिरत असते परंतु लयीची गती किंचित जलद वाटते. गाण्यात पूर्णपणे व्याकुळता पसरली आहे आणि तोच भाव, ही रचना कविता म्हणून वाचायला घेतली तरी जाणवते.
मराठीत जर का अजरामर गाणी शोधायची झाल्यास, एकूणच तसे अवघड जाईल पण, तरीही काही गाणी घ्यावीच लागतील. अशा काही गाण्यांपैकी. “मावळत्या दिनकरा” हे गाणे आहे. कवी भा.रा. तांब्यांची कविता वाचणे, हा नेहमीच राजस अनुभव असतो. इंदूरच्या त्यावेळच्या सरंजामशाहीचा परिणाम त्यांच्या कवितेवर ठळकपणे दिसून येतो तसेच संस्कृत साहित्याचा. असे असून देखील, त्यांच्या कवितेतील लय, ही नेहमीच “गीतधर्मी” असते. सहज चाली लावण्यास, योग्य अशा त्यांच्या कविता आहेत आणि मराठी संगीतकारांनी या वैशिष्ठ्याचा पुरेपूर उपयोग करून घेतला.
“मावळत्या दिनकरा
अर्घ्य तुज जोडोनी दोन्ही करा”
 हृदयनाथ मंगेशकर, चाल बांधताना, त्यातील “काव्य” नेहमीच सकस, दर्जेदार असावे, म्हणून आग्रही असतात आणि अशा वेळेस, त्यांना तांब्यांची कविता मोहवून गेली, यात नवल ते काय!!
सतारीच्या पहिल्याच सुरांतून, मारवा रागाची ओळख निर्माण करून, चालीचे वळण, कसे असेल, याचे निर्देशन होते. कवितेचा आशय बघितला तर आपल्याला सहज समजून घेता येईल, सूर्यास्ताचे अप्रतिम वर्णन आणि  सतार व बासरीच्या सुरांची अप्रतिम जोड आहे. तसे बघितले तर हे गाणे संपूर्णरीत्या मारवा रागावर आधारित असे नाही, म्हणजे “दोन्ही करा” यातील “रा” अक्षरावर किंचित “पंचम” स्वराची छटा आहे आणि मी वर म्हटल्याप्रमाणे, या रागात “पंचम” स्वराला  नाही. परंतु इतपत स्वातंत्र्य सुगम संगीतात सगळेच संगीतकार घेत असतात आणि याचे कारण, सुगम संगीतात गीतातील शब्दांचा आशय, सुरांच्या सहाय्याने वृद्धिंगत करणे आणि तसे करताना प्रसंगी रागाच्या नियमांची मोडतोड केली तरी चालण्यासारखे असते.
मी मघाशी, तांब्यांच्या कवितेत संस्कृत साहित्याच्या प्रभावाविषयी लिहिले आहे, त्याचे सुंदर उदाहरण म्हणजे, “अर्घ्य तुज जोडोनी दोन्ही करा” ही ओळ. सूर्याला अर्घ्यदान ही आपल्या संस्कृतीमधील असामान्य कल्पना आहे, ज्यात समर्पणाची कल्पना सामावलेली आहे आणि तोच संदर्भ या कवितेत नेमकेपणी  वाचायला मिळतो. कविता आणि चाल, याचा अप्रतिम संगम या गाण्यात झालेला दिसून येतो.
हा राग सादर करायला अतिशय अवघड आहे, बहुदा असे असेल म्हणून या रागावर आधारित तशी फारशी गाणी बांधायचे धाडस फारसे कुणी करीत नाही. रागाचे चलन(च) तसे सहज गुणगुणावे इतके सरळ, सोपे नाही आणि याचे कारण असे आहे, मारवा सादर करताना, जरा सूर इकडे, तिकडे हलला तर त्याच सावलीत, “श्री”,”सोहनी” किंवा “पुरिया” रागात शिरण्याचा धोका असतो.
हिंदी चित्रपट “सांज और सवेरा” मध्ये “पायलीया बावरे बाजे” हे गाणे मारवा रागाची ओळख करून देणारे आहे. नौशाद यांनी या  बांधली आहे आणि अर्थात लताबाईंनी गायले आहे. वास्तविक, प्रस्तुत गाणे हे एक नृत्यगीत आहे पण तरीही गाण्यातील काव्याला मारवा रागाचे सूर चपखल बसतात.
थोडे बारकाईने ऐकले तर आपल्याला गाण्याच्या सुरवातीला “सोहनी” रागाची आठवण येते परंतु गाण्याला सुरवात  झाली म्हणजे मग मनावर मारवा रागाचे सूर रंग पसरतात. अर्थात नृत्यागीत असल्याने गाणे जलद लायीत आहे आणि या रागाची प्रकृती बघता, द्रुत लयीतील चित्रपट गाणे हा एक सुंदर आणि गोड “अपघात” ठरतो आणि ही किमया अर्थातच संगीतकार नौशाद यांची.
असेच आणखी एक मराठी गाणे आठवले. शंकर वैद्यांची “स्वरगंगेच्या काठावरती”ही कविता  अरुण दात्यांनी अजरामर केलेली आहे. यागाण्याला चाल, हृदयनाथ मंगेशकरांनी लावली आहे आणि संगीतकाराच्या नेहमीच्या शैलीनुसार चाळीत असंख्य “वक्र” वळणे आहेत पण हा या संगीतकाराचा पिंड आहे.
“स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला
गतजन्मीची खूण सापडे, ओळखले का मला”.
वास्तविक, शंकर वैद्य, हे कुणी भावगीते वगैरे लिहिणारे कवी नव्हेत परंतु एखाद्या कवितेत, गाणे होण्याची असोशी असते आणि ती नेमकेपणी संगीतकाराला ओळखता येणे महत्वाचे. गाण्याच्या सुरवातीला स्वरमंडळ आणि त्याच्या जोडीने सतारीचे सूर आपल्याला या रागाच्या सावलीत घेऊन जातात. हे सूर इतके जीवघेणे आहेत की पुढे रचना किती अप्रतिम होणार आहे, याची हे सूर साक्ष देतात. अर्थात, पुढील अंतरे मात्र वेगळ्या वळणाने जातात आणि कवितेचा आशय बघितला तर चाल वेगळ्या वळणाने जाणे, अपरिहार्य आहे. संगीतकाराला काव्याचा अभ्यास किती आवश्यक असतो, यासाठी हे गाणे एक उत्तम उदाहरण आहे.
अशीच एक अप्रतिम रचना आपल्याला कै. वसंतराव देशपांड्यांनी गायलेला अप्रतिम मारवा. वास्तविक, वसंतराव हे आपल्या जोमदार गाण्यासाठी प्रसिद्ध, पण तरीही इथे त्या ज्या ताकदीने “कोमल” रिषभ” आणि “तीव्र मध्यम” लावलेला आहे, तो ऐकताना आपल्या मनातून “वाहवा”कधी निघून जाते, तेच आपल्याला कळत नाही. “ये मदमाती चली चमकत” ही चीज त्यांनी आलापीतून अतिशय बहारीने रंगवली आहे. गायकाची स्वरांवर स्वार होऊन आपल्या ताब्यात ठेवण्याची शैली इथे अजिबात आढळत नाही. ऐकायला मिळतो तो मारवा रागाचा दुखरा तरीही हुरहूर लावणारा स्वर.
आपल्या आयुष्यात तसे बघितले तर दु:खाचा अंश बराच असतो आणि त्याला टाळून तर पुढे जाणे, सर्वथैव अशक्य.  तुकारामांनी एके ठिकाणी म्हटले आहे  त्याप्रमाणे,”सुख जवाएवढे, दु:ख पर्वताएवढे” त्याप्रमाणे आपले आयुष्य असते. याच दु:खाचा अंश या रागात आपल्यासाठी गोठवून ठेवला आहे!!
— अनिल गोविलकर

Avatar
About अनिल गोविलकर 92 Articles
मी अनिल गोविलकर. उभरता लेखक असे म्हणता येईल. माझा ब्लॉग आहे – www.govilkaranil.blogspot.com ही वेबसाईट आहे. या वर्षी, माझ्या ब्लॉगला ABP माझा स्पर्धेत २रे पारितोषिक मिळाले आहे. तसेच "रागरंग" नावाचे पुस्तक – रागदारी संगीतावरील ललित आणि तांत्रिक, लेखांवर आधारित- प्रसिद्ध झाले आहे. मी १९९४ ते २०११, दक्षिण आफ्रिकेत नोकरीनिमित्ताने वास्तव्याला होतो. त्याचा परिणाम म्हणून त्या देशावरील ललित लेख – जवळपास ३५ ते ४० लेख लिहिले आहेत तसेच संगीतावर आधारित ( जागतिक स्तरावरील संगीत) १०० पेक्षा जास्त लेख लिहून झाले आहेत. काही आवडलेल्या पुस्तकांची परीक्षणे लिहिली आहेत .

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..