माणूस मुंबईत पाय ठेवतो. तो एकदा या सापळ्यात अडकला की खाऊन-पिऊन इतका गब्बर होतो की, सापळ्यात माणसं अडकतात, उंदीर नाहीत. ते रुळावर बसून गंमत बघतात.
गाडीची वाटत पाहत व्ही.टी. स्टेशनवर उभा होतो. गर्दी नेहमीसारखी तुफान होती. एकही गाडी प्लॅटफॉर्मवर दिसत नव्हती. बहुधा काही तरी गोंधळ असावा. त्यामुळे नेहमीपेक्षा जास्त गर्दी वाटत होती. आता येणारी गाडी रिकामी आली तरी त्याच चढण म्हणजे ‘हरहर महादेव’ अशी घोषणा न करताच चढाई करणं असंच होते. एवढ करुनही बसायला जागा मिळेलच याची शाश्वती नाही.
रिकाम्या रुळांकडे बघत राहिलो. निऑन साईनच्या झगमगटात ते चमकत होते. उघडझाप होणाऱ्या दिव्यांप्रमाणे लकाकत होते. रेल्वेचे रुळ म्हणजे मुंबई शहराच्या रक्तवाहिन्याच. लाखो लोकांना घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर विनासायास पोहाचवणारे रुळ. किती गाडया या रुळांवरुन चालत असतील. या रुळांवरच गाडयांची ये-जा अवलंबून.
तेवढया गर्दीत कुणीतरी प्लॅटफॉर्म झाडत होते. कचरा सगळा त्या रुळांवर पडलेल्या कचऱ्यात काही तरी हलल्यासारखं वाटल. एक पिटुकला उंदीर या रुळावरुन त्या रुळाकडे पळाला आणि बघता बघता गायब झाला. गाडीचा पत्ता नव्हताच. रुळांकडे बघत बसलो. रुळांमध्ये उंदराची मोठी वस्तीच. विश्वास बसणार नाही इतके उंदीर सळासळा इकडून तिकडे पळत होते. मधेच थंबून वर बघत होते. बहुतेक लोकलची वाट पाहणाऱ्या माणसांची त्यांना कीव येत असावी. रुबाबत बसून समोरच्या दोन पायात फेकलेल्या कचऱ्यातील किडुकमिडूक पकडून खाणाऱ्या उंदरांचे डोळे उजेडात चकमकत होते. आपल्याच नादात इकडून तिकडे फिरणाऱ्या उंदारांकडे बघायला कुणाला वेळ होता. जो तो एक तर इंडिकेटर किंवा मस्जीद बंदरच्या माणसांबरोबर गप्पा मारण्यात नाहीत तर जाहिराती वाचण्यांत मग्न होता. एकमेकांमागे पळणाऱ्या त्या उंदरांचा आवाज ऐकू येण शक्य नव्हतं. धाड धाड करत गाडी आली. एकच झुंबड उडाली. जागा पकडण्यासाठी मी गर्दीपासून मागे उभा राहिलो. जिवाच्या आकांताने गाडी पकडणाऱ्या लोकांचे डोळे रुळावरच्या उंदारांसारखे चमकत होते. गाडी येऊन गेली, पण प्लॅटफॉर्मवरची गर्दी कमी झालेली नव्हती.
निरुपद्रवी वाटणारा उंदीर जर चुकून घरात घुसला तर काय हाकाकार माजतो ते एकदाच अनुभवल आहे. कपडे कागद, वहया, पुस्तकं, गाद्या, धान्य, रबरी चपला यांच्या पार चिंध्या करुन टाकतात. घरात किमान माणसांची वर्दळ असते. त्यामुळे असलाच तरी उंदीर दबून राहतो. पण मोठमोठया गोदामांत त्यांची चंगळच असते. मुंबईत एकेकाळी इतके उंदीर झाले आणि त्यांनी इतका उच्छाद मांडला की त्यावेळच्या गोऱ्या गव्हर्नरने पोलीस कमिशनरला लिहून या उंदाराचे काही तरी करा असा घोषा लावला.
मुंबई बंदरांमुळे धान्यांची प्रचंड गोदामं आहेत. त्यामुळे उंदरांचा सुळसुळाट झाला नाही तरच नवल. इतका सुळसुळाट की शेवटी मुंबई महानगरपालिेकेलाही एक खास योजना हाती घ्यावी लागली. केवळ उंदरांचे पिंजरे आणि उंदरांच्या गोळया पूरवून काही उपयोग नाही. उंदीर पकडण्यासाठी खास माणस नेमावी लागली. पण लोकांचा फारसा सहभाग लाभला नाही म्हणाले या योजनेला. आणि ती कागदावरच राहिली.
डॉ. पी.जी. देवधर जागतिक कीर्तीचे सर्पतज्ञ. मुंबईतही सापाची एकेकाळी कमतरता नव्हती. त्यामुळे उंदराची संख्या आटोक्यात होती. साप कमी झाले. उंदीर वाढले. उंदरांना मारण्याची एक देशव्यापी योजना होती. त्या समितीवर डॉ. देवधर होते. त्यांनी खूप काम केलं. पण मुंबईच्या उंदरांनी काही त्यांना दाद दिली नाही.
उंदरांची शिरगणती करण्यात आली होती असे म्हणतात. म्हणजे शहरात उंदीर किती आहेत? याचा एक अंदाज घेण्याचा प्रयत्न झाला. तो करता करता जेवढा वेळ गेला तेवढया वेळात शहरात जेवढी माणसं राहतात तेवढया संख्येने उंदरांची संख्या वाढली. माणसी सरासरी 100 उंदीर आपल्या नगरात गुण्यागोविंदाने राहतात. ते इतके माजले आहेत की, एकटया-दुकटय जखमी जनावराचाही ते तासात फडशा पाडून टाकतात.
म्हणजे मुंबईतल्या प्रदुषणाचा वगैरे काही त्यांच्यावर परिणाम होतो असे दिसत नाही. पूर्वी उंदरांचे सापळे मिळायचे. त्यात पोळी- खोबरं ठेवल की उंदीर आत जाऊन अडकून पडायचे. पण आता तो आत शिरत नाहीत असा अनुभव आहे. उंदीर शिकले पण माणसं काही शिकली नाहीत.
गावाकडे तब्येतीत राहाणारा माझा मित्र म्हणतो. मुंबई शहर म्हणजे एक मोठा सापळात आहे. चार पैसे कमवून गावाकडे परत जायच म्हणून माणूस मुंबईत पाय ठेवतो. तो एकदा या सापळयात अडकला की खाऊन-पिऊन इतका गब्बर होतो की, सापळयात माणसं अडकतात, उंदीर नाहीत. ते रुळावर बसून गंमत बघतात.
——————————————————————
-प्रकाश बाळ जोशी
आज दिनांक : 3 मार्च 1994
Leave a Reply