“शहिदांचे गाव” म्हणून प्रसिद्ध असलेला कुडाळ तालुक्यातील सरंबळ हे माझं गाव. १९१४ साली झालेल्या युद्धामध्ये गावातील ५२ सैनिकांपैकी सात सैनिक शहीद झाले. “लढवय्यांचे गाव” म्हणूनही या गावाची ओळख आहे. त्यांच्या स्मरणार्थ या गावामध्ये रणस्तंभ उभारण्यात आला आहे.
बारामुल्ला येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झालेले “लेफ्टनंट कर्नल मनीष कदम” सुद्धा याच सरंबळ गावचे सुपुत्र …!”आॅपरेशन रक्षक” तो दिवस होता २००८ सालाचा १६ मार्च…!! लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या तीघांना कंठस्नान घालत त्यांनी आॅपरेशन रशक ही मोहिम यशस्वी केला. लष्कर-ए-तोयबा या दहशवादी संघटनेचा हार्डकोअर चीफ प्लॅनिंग कमांडर हफीज़ हमजा जो अनेक वर्षे सैन्याला हवा होता, त्यालाही लेफ्टनंट कर्नल मनिष कदम यांनी यमसदनी धाडत स्वतः देशासाठी शहिद झाले म्हणूनच त्यांना ” किर्तीचक्र ” प्रदान करण्यात आले.लेफ्ट. कर्नल मनीष कदम हे शहीद झाल्यानंतर त्यांच्यावर सरंबळ गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद मनीष कदम यांचे वडील शशिकांत कदम यांनी एका फाउंडेशनची निर्मिती केली आहे. याद्वारे ते सैनिकी दलामध्ये जाण्यास इच्छुक असणा-या तरुणांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतात.
सरबंळ गावातील ग्रामपंचायतीची स्थापना १८ जानेवारी १९४१ साली झाली. गावामध्ये सरंबळ, नाईकवाडी, तळेगाव ही तीन महसुली गाव आहेत. हे भारतीय सैनिकांसाठी गाव प्रसिद्ध आहे. गावातील प्रत्येक घरातील एक तरी व्यक्ती भारतासाठी सीमेवर लढलेली आहे. या गावामध्ये सैन्यात भरती होणारे अनेक जण पाहावयास मिळतात. देशासाठी लढणा-या या गावाला बारमाही शेती आणि निसर्गरम्य परिसर लाभलेला असून सरंबळ गाव वाळूसाठीसुद्धा प्रसिद्ध आहे. तसेच शेतीप्रधान म्हणूनही प्रसिद्ध असणा-या या गावाने “जय जवान.., जय किसान..” हा नारा अबाधित ठेवला आहे.गावातून वाहणा-या कर्ली नदीच्या पात्रातील काही ठिकाणी वाळू उत्खनन केले जाते. त्यामुळे येथील ग्रामस्थांना रोजगार मिळतो. नदी किनारी असलेल्या भाटीवाडीतील किनारे ढासळत असल्यामुळे त्या ठिकाणी धूपप्रतिबंधक बंधारे उभारण्यात आले आहेत. या गावामध्ये असलेले गावतळेसुद्धा प्रसिद्ध आहे.
या गावतळय़ामध्ये वर्षातून एकदा संपूर्ण गाव हर हर महादेव म्हणत तळय़ातील मासेमारी करतो. हा मासेमारी करण्याचा प्रकार पाहण्यासाठी दूरवरून लोकं येतात. गावतळेच्या आधारावर आणि नदीच्या पाण्यावर या ठिकाणी बारमाही शेती केली जाते. हे गाव शेतीप्रधान म्हणूनसुद्धा प्रसिद्ध आहे. या गावाने जय किसान, जय जवान हा नारा अबाधित ठेवला आहे. गावात कधीही पाणीटंचाई भासू नये यासाठी गावात १७ सार्वजनिक तर ८५ खासगी विहिरी आहेत. एक बोअरवेलचा व दोन नळपाणी योजनांचा समावेश आहे. तसेच गावात शैक्षणिक प्रगतीसुद्धा मोठय़ा प्रमाणात झाली आहे. गावात चार प्राथमिक शाळा आहेत. तर एक माध्यमिक शाळा आहे. उच्च शिक्षणासाठी येथील विद्यार्थ्यांना कुडाळ येथे यावे लागते.
सरंबळमध्ये असलेले तलाठी कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, रास्त धान्य दुकान, पशु वैद्यकीय दवाखाना, पोस्ट ऑफिस ही कार्यालये एकाच ठिकाणी पाहावयास मिळतात. येथे एक ग्रंथालय, एक समाज मंदिरसुद्धा आहे. शेतक-यांसाठी विविध कार्यकारी सोसायटय़ा या गावामध्ये कार्यरत आहेत, तर विलास सरंबळ व बबन राणे यांच्या रूपाने दशावतार कलाकार आहेत. गावात विविध सरकारी योजना ग्रामपंचायतीमार्फत राबवल्या जातात. यामध्ये इंदिरा आवास घरकुल योजनेतून ३६ घरे तर रमाई योजनेतून तीन घरे मंजूर झालेली आहेत. तसेच गावात ७४ बायोगॅस उभारण्यात आले आहेत. सरंबळ गाव पर्यावरणपूरक बनवण्याचा ग्रामस्थांचा प्रयत्न आहे. गावाने आतापर्यंत पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम पुरस्कार, महात्मा गांधी तंटामुक्ती पुरस्कार, ग्रामस्वच्छता अभियान प्रथम क्रमांक, ग्रामस्वच्छता अभियान तृतीय क्रमांक, जिल्हा सारक्षता अभियान १०० टक्के साक्षरता असे पुरस्कार मिळवले आहेत.
जय जवान…जय हिंद…..!!
© गणेश उर्फ अभिजित कदम,
सरंबळ कुडाळ सिंधूदुर्ग
Leave a Reply