एका मैदानात तिरंदाजीचा खेळ चालू असतो. एका विशिष्ठ तिरंदाजाचे कौशल्य सराहनीय असते. सगळे लोक त्याची वाहवा करत असतात. त्या घोळक्यातला एकच माणूस प्रत्येकवेळी म्हणत रहातो “हा तर सरावाचा भाग आहे. ‘ ”
अनेकवेळा असे झाल्यावर सगळे लोक त्याच्याकडे बघायला लागतात. शेवटी आपला खेळ संपवून तो तिरंदाज धीमी पावले टाकत त्या माणसापर्यंत येतो व त्याला म्हणतो “तू म्हणतोस हा सराव आहे तर तू मारुन दाखव एक तरी निशाणा.”
तो माणूस म्हणतो “मला त्याचा सराव नाही. पण आता मी जे दाखवतो आहे ते तू बघ. तुला तसे करता येईल का मला सांग.” तो माणूस एक मोठ्या तोंडाची बाटली घेतो. त्यातून एका बारीक नळीत तो एक द्रव्य ओततो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या नळीतून, ती आरपार असूनही द्रव्याचा एक थेंबही खाली पडत नाही.
बघणारे सगळे चकीत होतात. तो माणूस तिरंदाजाला म्हणतो “तुझी तिरंदाजी सरावाने मी करु शकतो. तू ही सरावाने माझ्यासारखे करु शकशील. तरीही मला शंका आहेच की तू हे करु शकशील अथवा नाही. ”
अनेकदा आपण काही चमत्कृतीजन्य गोष्टी सरावाने करुन दाखवतो. इतरांना त्याचा अचंबा वाटतो. कित्येक लहान मुले मोठ्या माणसांच्यापेक्षा अधिक चांगले गाऊन दाखवतात, नाचून दाखवतात, बोलून दाखवतात. डोंबाऱ्याचा खेळ असो अथवा बुध्दिबळाचा डाव असो, काही लोकांना त्यात सहज प्रभुत्व मिळते.
हे सगळे जर सरावाने साध्य होणार असेल तर आपणही रोज आनंदी रहाण्याचा, शांतीपूर्वक जगण्याचा, दुसऱ्याला आनंद देण्याचा सराव का बरे करु शकणार नाही? आपल्या विचारात आणि आचारात जर हाच ध्यास असेल की आपण आनंदाचा, शांतीचा विचार करत राहिलो पाहिजे तर आपल्या आचारात त्याचे प्रतिबिंब आपोआपच पडेल.
याउलट आपण प्रतिशोध घ्यायचा, दुसऱ्याला दुखवायचा, कमी लेखायचा ध्यास घेतला तर आपण त्यातच सराईत होऊ. आज सगळे जग एका अस्वस्थतेच्या टोकावर उभे आहे. पैसा अडका तर खूप जण मिळवतात. परंतु प्रत्येकाला शेवटी सुखी व्हायचे आहे. आनंदी व्हायचे आहे. मनाची शांती मिळवायची आहे. हे सुख, ही शांती पैश्याने मिळत नाही. ती आपल्यातच असते. ती आपल्याला शोधायची असते आणि आपला आनंद आपणच निर्माण करायचा असतो.
आता आपल्याला ठरवायचे आहे की आपण कशाचा ध्यास घ्यायचा. कशाचा सरावा करायचा. जसा आपला अभ्यास असेल तसे आपले नैपुण्य ठरेल. चला तर मग, आपण आनंदाचा, शांतीचा सराव करायला लागू या.
— नीला सत्यनारायण
अनघा प्रकाशनच्या मैत्र या लेखसंग्रहातील हा लेख. हे पुस्तक मार्च २०१७ मध्ये प्रकाशित झाले.
Leave a Reply