आजपर्यंत जेवढ्या जहाजांवर काम केले त्या त्या सगळ्या जहाजांवर कमीत कमी एक तरी दाढी आणि पगडी असलेले सरदार हे अधिकारी किंवा खलाशी असायचे. इलेक्ट्रिक ऑफिसर म्हणजेच बत्ती साब किंवा डेक आणि इंजिनियर ऑफिसर अशा वेगवेगळ्या रँक मध्ये कोणी ना कोणी असायचाच. मुंबई समुद्राच्या बेटांवर वसलेली असून आणि महाराष्ट्राला साडे सातशे किलोमीटर सागर किनारा लाभून देखील जहाजावर मराठी माणूस क्वचितच भेटतो. याउलट पंजाब आणि समुद्राचा संबंध नसूनही जहाजांवर सरदार मात्र कायम हजर.
भारतीय सैन्यदल आणि नौदलात सरदार लोकं भरपूर असल्याने मर्चंट नेव्ही मध्ये सुद्धा त्यांची संख्या भरपूर झाली. नौदलातून रिटायर्ड झाल्यानंतर बहुतेकांना मर्चंट नेव्हीत डायरेक्ट एन्ट्री मिळायची.
माझ्या प्री सी ट्रेनिंग कोर्सच्या बॅच मध्ये पगडी वाले दोन आणि बिना पगडी वाले चार सरदार होते. दोघा पगडी वाल्यांपैकी एकाचे नाव रवींदर सिंग तर दुसऱ्याचे जसप्रीत सिंग होते. जसप्रीत जरा सनकी आणि गंभीर टाईपचा होता, त्याला मजाक मस्करी समाजत नसे कधी कधी एकदमच भडकायचा. याउलट रवींदर होता एकदम जॉली त्याला सगळे गोल्डी बोलायचे, तो फक्त दिसायला साळसुद होता पण तसं पाहिलं तर एकदम अवली. त्याची आणि माझी एकाच कंपनीत निवड झाली होती.
माझ्या पहिल्या जहाजावर पहिला पगडी वाला सरदार भेटला तो बत्ती साब होता, इंडियन नेव्हीतून रिटायर्ड होऊन त्याने मर्चन्ट नेव्ही जॉईन केली होती. मी जुनियर इंजिनियर म्हणून जॉईन झालो होतो, पहिल्यांदा एवढं मोठं जहाज बघून सुरवातीला थोडा नर्वस आणि होमसिक असायचो. उंच आणि धिप्पाड बत्ती साब मी सिरीयस दिसलो की बोलायचा पांच साब डरो नही, सब सिख जाओगे धीरे धीरे, हमे देखो ट्यूब और बल्ब चेंज करते हैं और हजारो डॉलर्स कमाते हैं.
खरं म्हणजे बत्ती साब ट्यूब और बल्ब चेंज करते हैं बोलायचा पण जहाजावर सगळ्यात कठीण काम त्याचेच असते. इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक फॉल्ट शोधणे त्याच्याशिवाय कोणालाच जमत नाही. फॉल्ट मिळाल्यावर रिपेअर करणे एकदमच सोपे असतं पण मेकॅनिकल फॉल्ट डोळ्याने बघता येतो आणि ओळखता येतो पण इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक फॉल्ट शोधायला खूप पेशंन्स आणि वेळ लागतो.
त्या पहिल्याच जहाजावर एक महिन्यात नवीन सेकंड इंजिनियर आला जो सरदार होता . पहिल्या सेकंड इंजिनियरने मला चांगली वागणूक दिली नव्हती, जहाजाची, इंजिन आणि इतर सर्व मशिनरीची माहिती कशी करून घ्यायची त्या ऑपरेट कशा करायच्या याची प्राथमिक माहिती सुद्धा त्याने दिली नाही. पण जतींदर सिंग अझरोट नावाच्या सेकंड इंजिनियरने आल्यावर माझ्याबद्दल गोल्डीने त्याला सांगितलं आहे असं सांगितले. मी गोल्डीचा मामू आहे, तू बिनधास्त रहा, कोणी काही त्रास दिला किंवा काही अडलं तर लगेच येऊन सांग. गोल्डीचा सरदार मामू आल्यावर मला नुसतं इंजिनियर म्हणून कामाचे धडे न मिळता क्रू हॅन्डलिंग आणि मॅनेजमेंट चे धडे पण मिळायला लागले. कामाच्या आणि शिस्तीच्या बाबतीत तो खूपच कडक होता, जहाजावर सगळे त्याला घाबरायचे. मला पण भाच्याचा मित्र म्हणून त्याने ढील न देता व्यवस्थित सगळं शिकायला लावलं.
दुसऱ्या जहाजावर मी फोर्थ इंजिनियर म्हणून जॉईन झालो तिथे सेकंड इंजिनियर म्हणून इंदरपाल सिंग नावाचा बिना पगडी वाला सरदार आणि दविंदरपाल सिंग नावाचा पगडी वाला सरदार भेटला. दविंदरपाल हा जुनियर इंजिनियर होता आणि गोल्डीचा सख्खा भाऊ होता. दविंदरपालचे टोपण नाव सॅन्टी होते. कंपनीत जहाजांवर झिरो अल्कोहोल पॉलिसी आली नसल्याने सेकंड इंदरपाल सिंग सतत नशेत असायचा, ड्युटी संपली की बियर पिऊन टल्ली झालेला असायचा. त्याला राग पण खूप यायचा, राग आल्यावर त्याच अंग आणि डोळे लाल व्हायचे. पण माझ्यावर रागवायची त्याला कधीच वेळ आली नाही, कुठलंही काम असलं की मला घेऊन तो जायचा, मला बोलायचा तू असलास की काम लवकर तर होतातच पण यशस्वी सुद्धा होतात, इथं जहाजावर कॉमन सेन्स जास्त वापरावा लागतो जो सगळ्यात अनकॉमन असतो. असं बोलायचा आणि खांद्यावर हात ठेवून हसायचा. सॅन्टी तर गोल्डी पेक्षा जॉली होता, मी काही काम सांगितलं आणि तो विसरला तर बोलायचा म्हात्रे भैया जाने दो ना कोई अपने छोटे भाई पे थोडी ना छोटी सी बात के लिये नराज होता हैं. जहाजावर पार्टी असली की सॅन्टी रात्रभर टल्ली होऊन नाचायचा. सेकंड इंजिनियर आणि सॅन्टी एकत्रच घरी गेले पण ते गेल्यावर एक महिन्यांनी नवीन चीफ इंजिनियर आला जो सरदार होता त्याचे नाव तिरलोचन सिंग होते, स्वभावाला एकदम शांत पण मला दिवाळी नंतर आठ दिवसानी घरी गेल्यावर कळलं की चीफ इंजिनियरने मला दिवाळीच्या अगोदर शक्य असूनही कार्गो डिस्चार्ज झाल्याशिवाय रिलीव्ह करु नका असा मेसेज पाठवला होता त्यामुळे कंपनी रिलिव्हर पाठवत असूनसुद्धा मला अडकवून ठेवले.
मी थर्ड इंजिनियर म्हणून रोटरडॅम पोर्ट मध्ये जॉईन झालो तिथं गोल्डी प्री सी ट्रेनिंग कोर्स झाल्यावर पाहिल्यान्दाच पाच वर्षांनी भेटला. मी त्याला रिलीव्ह करायला गेलो होतो, मी सकाळी जॉईन झालो आणि दुसऱ्या दिवशी पहाटे तो घरी गेला. तिथं फोर्थ इंजिनियर पगडी वाला सरदार होता तर चीफ इंजिनियर आणि कॅप्टन बिना पगडी वाले सरदार. कंपनीत झिरो अल्कोहोल पॉलिसी येऊन दोन वर्ष झाली होती. दहा दिवसानी राजिंदर सिंग नावाच्या फोर्थ इंजिनियरने एकटा असताना हळूच विचारले तीन साब आप ड्रिंक्स करते हो क्या? त्याला म्हटलं नाही करत, तो म्हणाला मै करेगा तो किसीसे बोलेंगे तो नही. मी म्हटलं मला न सांगताच प्यायची होतीस ना, मी पीत नाही सांगितल्यावर. तो म्हणाला वो बात नही, मै अकेले पियेगा और टल्ली हो गया तो आप संभाल लेंगे ना, बाकी कोई भरवसा करने लायक नही हैं. मेन बात तो ये हैं दारू की दो बोतले हैं, किसीको पूछेगा तो साली उसकी ही ना निकल जाये. त्याच असं झाले होते जहाजावर दारू प्यायला मनाई असल्याने जो कोणी बाहेरून लपून किंवा चोरून कोणत्याही मार्गाने आणायचा तो केबिन मध्ये किंवा सहज कोणाला सापडेल अशा ठिकाणी ठेवत नसे. फोर्थ इंजिनियरला एअर कंडिशन सिस्टिम मध्ये एका मोठ्या मोटरच्या खाली दोन खंबे अचानक सापडले होते, त्याला ते मिळाले नसते पण तिथं मोटर च्या वर काम करत असताना एक नट खाली पडला आणि घरंगळत मोटर खाली घुसला मग काय त्याला लॉटरीच लागली दोन खंब्यांची. चार दिवस झाल्यावर बिना पगडीच्या सरदार चीफ इंजिनियरने मला हळूच विचारले तीन साब आप ड्रिंक्स करते हो क्या? त्याला म्हटलं नही बडा साब, और करता तो भी पिलायेगा कौन? जेव्हा फोर्थ इंजिनियरला चीफ इंजिनियरने केलेल्या चौकशी बद्दल सांगितलं तेव्हा तो डोळ्यात पाणी येईपर्यंत पोट धरून हसत होता. मला म्हणाला बडा साब का मूह उतरा होगा ना आप पिते नही सुनने के बाद, वो बोतले शायद कॅप्टन ने मंगवाई थी और अपना बडा साब बोला होगा मै अच्छी तरह से छुपा के रखता हैं. आज सुबह से कॅप्टन का और उसका मुह उतरा हुआ है, चीफ इंजिनियर सुमडी मे जहाज का एक एक चप्पा ढुंढ रहा है. फोर्थ ला म्हटलं तू नीट ठेवल्यास ना, त्यावर तो मिशाना पिळ भरत म्हणाला दारू खतम, और खाली बोतल रात मे समुंदर के अंदर. चार दिवसात एकट्याने दोन खंबे रिचवले म्हणून मला डोक्याला हात लावायची वेळ आली.
पुढल्या जहाजावर सुखबिंदरपाल सिंग अझरोट नावाचा चीफ इंजिनियर भेटला, सेकंड इंजिनियर जतींदरपाल सिंग चा मोठा भाऊ आणि गोल्डी व सॅन्टीचा मोठा मामा. आमच्या कंपनीत यानेच सगळ्यांना त्याच्या मागे एक एक करून भरती करून घेतले होते. त्याने मला तो जॉईन झाल्यावर आठ दिवसातच थर्ड इंजिनियरचे ऑनबोर्ड प्रमोशन दिले. पुढील दोन आठवड्यात माझा कॉन्ट्रॅक्ट पूर्ण होऊन घरी जाताना निरोप द्यायला डेक वर येऊन त्याने पाठ थोपटून सांगितलं, तुझे प्रमोशन तू माझ्या भाच्याचा मित्र आहेस असं नको समजू, मी तुझ्या कामावर खरोखरच खुश आहे, सुखी रहा.
कॅप्टन, चीफ ऑफिसर अशा वेगवेगळ्या रँक मध्ये कोणी ना कोणी सरदार नेहमीच भेटत होते. एका जहाजावर भेटलेला सरदार चीफ इंजिनियर सांगत होता की कंपनीतल्या ज्या जहाजावर एका थर्ड इंजिनियरने सुसाईड केले होते, त्या जहाजावर तो सेकंड इंजिनियर होता. थर्ड इंजिनियर त्याला पहाटे चार वाजता वॉच हॅन्डओव्हर करून गेला. जेव्हा सकाळी साडे चार वाजता तो चहा पिऊन इंजिन रूम मध्ये राउंड मारायला गेला तर एका मजल्यावर अर्ध्या तासापूर्वी गेलेला थर्ड इंजिनियर दोराने फास घेऊन लटकताना दिसला.
जहाज जसं हलत होत तस घड्याळाच्या लंबका प्रमाणे त्याचे लटकलेले प्रेत हलत होते. माहिती मिळताच सगळे जण तिथं जमा झाले पण प्रेताला हात लावायची कोणी हिम्मत केली नाही. तेव्हा मीच त्याची दोरी सोडली आणि त्याचे प्रेत खाली उतरवले असं सांगताना त्या सरदार चीफ इंजिनियरचे डोळे पाणावले होते. गर्लफ्रेंड सोबत भांडण झाल्याने त्याने टोकाचं पाऊल उचललं होते अशी माहिती समोर आली होती. तोच चीफ इंजिनियर नेहमी बोलायचा तुमचे घरचे काही प्रॉब्लेम असतील तर सांगत जा, व्यक्त होत जा, मी घरी पाठवायची व्यवस्था करेन. कंपनीशी भांडून किंवा जी काही उत्तरे द्यायची ती देऊन का होईना पण कोणाला सही सलामत घरी पाठवणे हे त्याचे प्रेत पाठवण्यापेक्षा कधीही चांगल राहील.
काही कडक आणि रागीट, काही प्रेमळ आणि मिस्कील पण जहाजावर जेवढे सरदार भेटले ते सर्वच्या सर्व बिनधास्त, जॉली आणि हरफनमौला.
© प्रथम रामदास म्हात्रे.
मरीन इंजिनियर,
B.E.(mech), DIM.
कोन,भिवंडी, ठाणे.
Leave a Reply