सारे म्हणती माझे माझे
शेवटी होते त्याचेच ओझे
मान्य करण्या जो तो लाजे
उपाय काय ?
सद्गुरू येथे शोधावा
त्यास मनात पुजावा
कान समोर धरावा
मार्ग दिसतो!!
अर्थ–
समोर दिसते ते सारे माझे आहे, माझ्यामुळे आहे, दुसऱ्या कोणाचा यात हातभार नाही की दुसरा कुणी यात साथीदार नाही असे जेव्हा वाटू लागते तेव्हा समजावे गर्वाचा फुगा भरभर फुगत चालला आहे. हे विश्व मी निर्माण केले आहे याचा गवगवा कधी भगवंताने केला नाही. कर्म करून मोकळे झाले की त्याचे पुण्य पदरात पडते, पण त्याच कर्माचे पोस्ट मार्टम झाले की त्याचे पुण्य गायब झाल्या शिवाय राहील काय? माझी कधीच चूक नसते, अथवा आतून माहीत असूनही ती मान्य करण्याची क्षमता आपल्यात नाही हेच कळत नसेल तर तुम्हाला सद्गुरू ही नितांत गरज आहे असे मला वाटते. काय चुकीचे, काय बरोबर हे लक्षात आणून द्यायला कुणीतरी बरोबर असले की बरं पडतं नाहीतर कर्म चांगले असूनही त्याचा फायदा होत नाही किंवा त्याचा गैरफायदा घेतला जातो. माझं माझं करत सगळं घेतलं पण त्याचा उपयोग कसा करायचा, त्याचा विनियोग कसा करायचा हे माहीत नसेल तर त्याचे ओझे वाढत जाते आणि येथे सदगुरू ची गरज पडते.
योग्य मार्ग, योग्य नीती, योग्य कर्म, योग्य परिणाम, योग्य समय याचे गणित आपल्या आयुष्यात अनुभव आणि सद्गुरू सोडवू शकतात. म्हणून थोरल्या लोकांचा अनुभव आपल्या प्रगती साठी कसा मोलाचा ठरेल याचे गणित मांडलेत की यशाच्या मार्गात कितीही अडचणी आल्या तरी पिछेहाट होणार नाही.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply