मी शक्यतो राजकारण किंवा राजकारणी व्यक्तीसंदर्भात लिहीत नाही. कोणी मला पाठविले/ टॅग केले तर प्रतिसादही देत नाही. माझी (बरीवाईट) मते माझ्यापाशी. जसे आपण निवडणुकीत ज्याला द्यायचे त्यालाच मत देतो, पण दारी आलेल्या प्रत्येक पक्षाचे/उमेदवाराचे मान डोलावून स्वागत करतो, तसे माझे हे वागणे ! पण गेले काही महीने देश/राज्य पातळीवर जे काही चाललं आहे/ दिसतं आहे, वाचनात येत आहे, ऐकू येत आहे ते अस्वस्थ करणारं आहे.
आणीबाणीच्या काळात मी सोलापूरला होतो, महाविद्यालयात असल्याने किंचित कळत्या वयात. पण माझा धाकटा भाऊ तेवढी पोच नसल्याने एकदा अतिशय उत्स्फूर्तपणे इंदिरा गांधींबद्दल काहीतरी घरात बोलून गेला आणि भयभीत झालेल्या (सरकारी नोकर असलेल्या) माझ्या वडिलांनी त्याला खूप झापलं होतं. सध्याच्या परिस्थितीत हा प्रसंग राहून-राहून आठवतोय. सोलापूरच्या “आशा ” टॉकीज मध्ये “आँधी ” बघतानाचे भीतीदायक वातावरण अजूनही विसरता येत नाहीए. केव्हा एकदा चित्रपट संपतोय असे झाले होते, आणि राहून राहून चित्रपटगृहाच्या दरवाजांकडे लक्ष जात होते- पोलीस आत येऊन काहीतरी कारवाई तर करणार नाहीत ना? आयुष्यात अजिबात एन्जॉय न करता आलेला पण नंतर खूप आवडून गेलेला हा “पहिला ” चित्रपट ! ( दुसरा “सरफरोश” जो ठाण्याच्या वंदना टॉकीज मधील असह्य उकाड्याने आणि पब्लिकमुळे आधी आवडला नव्हता.)
” सिंहासन “हा राजकारणाची पिसं काढणारा, डोळ्यांत अंजन घालणारा प्रादेशिक चित्रपट ! पण खऱ्या अर्थाने वैश्विक रंग असलेला. महाराष्ट्रातील सगळ्या प्रांतातील, सगळ्या राजकारण्यांची चेहरेपट्टी रेखाटणारा ( कां खरवडणारा ?) – त्यांत आमचे (आपले) आवडते- निळू फुले ! “दिगू “या सर्वसामान्य पत्रकाराचे प्रतिनिधी. असं म्हणतात – बेरकी, श्रुड आणि अस्सल राजकारणी रंगविता रंगविता निळू भाऊ स्वतःचा खरा रंग विसरून गेले होते आणि मराठीतल्या या खऱ्याखुऱ्या पहिल्या मल्टी स्टारर मांदियाळीत राजकारण्याची भूमिका त्यांना अपेक्षित होती. पण पटेलांनी त्यांचा मेकओव्हर केला आणि चष्मा/शबनम वाला त्याकाळातील बुद्धिजीवी, परखड, सगळ्यांशीच चांगले संबंध ठेवणारा पण अंतर्यामी अतिशय संवेदनशील पत्रकार त्यांच्या वाट्याला आला. निळूभाऊंनी त्या भूमिकेचे सोने केले. राजकारणाचे आणि राजकारण्यांचे बदलते रंग पाहून तो “दिगू ” शेवटी वेडा होतो. प्रश्न एवढाच – अरुण साधू आणि जब्बारला १९७९ सालीच हे २०२१चं भाकीत कसं अचूक वर्तविता आलं होतं की आपला “दिगू ” होत चाललाय ?
आणि भविष्यवेत्त्या भटांनाही नेमकं का लिहावेसे वाटलं – ” उषःकाल होता होता, काळरात्र झाली ! “
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply