नवीन लेखन...

सर्वाधिक उंचीवर ‘तुंगनाथ’

गुप्तकाशीहून एक रस्ता कुंड मार्गे उखीमठला जातो. उखीमठ हे एक पवित्र स्थळ आहे. बाणासुराची कन्या, ‘उषा’ हिने या जागी तपश्चर्या केली होती. या स्थानाचे मूळ नाव ‘उषामठ.’

पुराण काळात या परिसरात बाणासूर नावाचा असुर राज्य करीत होता. ‘शोणितपूर^ गाव त्याच्या राज्याची राजधानी होती. बाणासूर मोठा शिवभक्त होता. बाणासूराच्या मुलीचे नाव ‘उषा’.

एके दिवशी उषा वनात फिरत असताना तिला शिव-पार्वतीचे दर्शन झाले.;पार्वतीमातेने उषेला तुला अनुरूप वर मिळेल, असे वरदान दिले आणि एके दिवशी उषेच्या स्वप्नात एक तेजस्वी, सुंदर राजपुत्र आला. उषा त्याच्या प्रेमात पडली पण हा तरूण कोण, कुठला याची तिला काहीच कल्पना नव्हती. उषा प्रेमविरहाने झुरू लागली. उषेची एक सखी होती. तिचे नाव ‘चित्रलेखा’. तिने उषेची ही स्थिती जाणली. उषेने पण आपले मन तिच्यापाशी मोकळे केले. चित्रलेखेला अनेक सिद्धी प्राप्त होत्या. तिने आपल्या सिद्धीच्याद्वारे उषेला निरनिराळ्या राजकुमारांची चित्रे काढून दाखवली पण उषेच्या स्वप्नातील राजकुमार वेगळाच होता आणि एके दिवशी चित्रलेखेने काढलेले एका राजकुमाराचे चित्र पाहून उषा लाजली. मोहरली. चित्रलेखेला सर्व काही समजले. अरे, हा तर भगवान श्रीकृष्णाचा नातू ‘अनिरुद्ध’. अखेरी एके रात्री चित्रलेखा आपल्या सिद्धी सामर्थ्याने द्वारकेहून अनिरूद्धला घेऊन उषेच्या महालात आली. उषेचे सौंदर्य पाहून अनिरूद्ध पण तिच्या प्रेमात पडला. आता कोणाला नकळत अनिरूद्ध उषेच्या महालात राहत होता. अगदी बाणासूरालासुद्धा याची कल्पना नव्हती.

इकडे द्वारकेत गडबड माजली. अनिरूद्धचा शोध सुरू झाला पण काहीच पत्ता लागत नव्हता. सर्वजण हवालदिल झाले. एके दिवशी नारदमुनींचे द्वारकेत हिमशिखरांच्या आगमन झाले. सर्व द्वारकानिवासी काळजीत असलेले पाहून नारदमुनींनी चौकशी केली. त्यांना सर्व काही कळले. तेव्हा त्यांनी बाणासूराची कन्या उषा हिने अनिरूद्धचे अपहरण केल्याचे सांगून अनिरूद्ध शोणितपूरला असल्याचे सांगितले. हे ऐकताच श्रीकृष्ण व बलराम क्रुद्ध झाले व त्यांनी शोणितपूरवर आक्रमण केले. बाणासूर शूर होता. त्याने आपल्या मदतीसाठी शंकरानी यावे अशी प्रार्थना केली. श्रीशंकर धावून आले व भगवान श्रीकृष्ण आणि शंभुमहादेव यांच्यात घनघोर युद्ध सुरू झाले. पण शेवटी होणारा विनाश पाहून दोघांनी युद्ध आवरते घेतले. श्रीशंकरानी बाणासूराची समजूत काढली व अखेरीस अनिरूद्ध व उषा यांचा मंगलविवाह थाटामाटात पार पडला.

हिवाळ्यात बर्फवृष्टीमुळे केदारनाथचे मंदिर बंद असते. त्या काळात केदारनाथची पूजा उखीमठला होते. उखीमठला उषेचे मंदिर तर आहेच पण शिव-पार्वती, अनिरूद्ध (भगवान श्रीकृष्णाचा नातू) व मांधाता यांची पण मंदिरे आहेत. उखीमठपासून एक रस्ता दोगल-भीठा, चोपता, मंडल, गोपेश्वर मार्गे चमोलीला जातो व रूद्रप्रयाग-बद्रिनाथ रस्त्याला मिळतो. पूर्वी जेव्हा वाहतुकीची साधने, रस्ते नव्हते तेव्हा हा मार्ग बद्रिनाथहून केदारनाथला जाणारा पायी मार्ग म्हणून प्रचलित होता. हा मार्ग अतिशय रमणीय आहे. घनदाट वनश्री, चीड-पाईनचे वृक्ष, वृक्षांच्या दाटीतून डोकावणारे एखादे हिमाच्छादित पर्वतशिखर, आसमंतात पसरलेली हिरवळ व त्यावर डोलणारी फुले, तर फुलांचा परिमळ सोबत घेऊन नाचणारी वाऱ्याची झुळूक! मध्येच एखादा झरा पायापायात येतो व स्वत:कडे आपले लक्ष वेधून घेतो. या मार्गावर केलेला प्रवास म्हणजे एक सुखद अनुभव आहे.

उखीमठापासून ३० कि.मी. अंतरावर ‘चोपता’ ही नितांतसुंदर वस्ती आहे. गढवाल हिमालयातील हे सर्वात सुंदर स्थळ म्हणून ओळखले जाते. काहीजण तर याची तुलना स्वित्झर्लंडशी करतात. चोपत्याची उंची आहे समुद्रसपाटीपासून २९०० मीटर्स! या ठिकाणी निवासाची, खाण्याची सोय उपलब्ध होते.

चोपत्यापासून ६ कि.मी. अंतरावर एका पर्वतशिखरावर तुंगनाथचे पुरातन मंदिर आहे. तुंगनाथ म्हणजे पर्वतशिखरांचा नाथ किंवा राजा! हे शिव मंदिर आहे. या पवित्र स्थानाचे उल्लेख स्कंदपुराणाच्या केदारखंडातसुद्धा अनेकदा आले आहेत. रचनाकार म्हणतात, ‘हे स्थान म्हणजे हरी आणि हर यांचे स्थान आहे. या स्थानाचे दर्शन म्हणजे भगवान विष्णू व श्रीशंकराचे दर्शन आहे. नंदीचे या स्थळी कायम वास्तव्य आहे.’ तुंगनाथची उंची आहे समुद्रसपाटीपासून ३६८० मीटर्स! भारतातील हे सर्वात उंचीवरचे पुरातन मंदिर असावे. तुंगनाथ हे पंचकेदारातील तिसरे शिवस्थान.

चोपता ते तुंगनाथ ही सर्व वाट दगडी बांधणीची असून पूर्ण चढावाची आहे. साधारण ३ तासात हे अंतर पार करता येते. तुंगनाथला जाण्यासाठी चोपत्याला घोडे पण उपलब्ध होतात.

चोपत्याचा सर्व परिसर चीड, पाईन, होडोडेड्रॉन इ. वृक्षात, पर्वत रांगांत हरवून बसला आहे. एप्रिल-मे महिन्यात होडोडेंड्रॉनची झाडं लाल फुलांनी बहरून जातात पण या परिसराचे खरे सौंदर्य खुलते ते ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात! यावेळी ब्रह्मकमळे, हिमकमळे व इतर अनेक सुंदर फुलांची उधळण होते. सर्व परिसर सुरंगी, सुदर्शन फुलांनी बहरून जातो.

पहाटेची वेळ! वातावरणात पसरलेली शांतता. जंगली फुलांचा परिमळ घेऊन धावणारी एखादी वाऱ्याची झुळूक! पक्षी स्वानंद स्वर आळवत असतात. पूर्वेला रक्तिमा पसरत असतो. सृष्टी हळूवार जागी होत असते. कांचुरा, पांगारा, बुरांश इ. परिचित-अपरिचित झाडे शुर्चिभूत दिसत असतात. दूरवर दरीत रात्रीच्या अंधारात वाट चुकलेले काही ढग झाडावर विश्रांती घेत पडलेले असतात. सृष्टीचे सुंदर, पवित्र प्रसन्न रूप आपल्यासमोर उभे असते. पहाटवारा सृष्टीच्या रोमारोमात चैतन्य आणत असतो.

पावले तुंगनाथची वाट चालू लागतात. साधारण १ कि.मी. अंतर चालल्यावर वृक्षवल्ली आपल्याला एका सुरेख हिरव्या कुरणावर आणून सोडतात व आपला निरोप घेतात. अशा कुरणाला ‘बुग्याल’ असे म्हणतात. या पुढच्या प्रवासात मात्र कुठेही झाडे दिसत नाहीत. वातावरणात होणारा सुखद बदल स्पष्ट जाणवत असतो. समोर सोनेरी तेजाने झळकणारी पर्वतशिखरे उभी असतात. हा सर्व रस्ता पूर्ण चढणाचा आहे. पण प्रशस्त असून बांधलेला आहे. त्यामुळे अवघडपणा असा नाही. हा रस्ता आपल्याला थेट मंदिरापाशी घेऊन जातो. एका प्रवेशद्वारातून आपण मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करतो.

तुंगनाथचे मंदिर पांडवांनी बांधले व त्याचा जीर्णोद्धार शंकराचार्यांनी केला असे सांगितले जाते. मुख्य मंदिराच्या बाहेर नंदी विराजमान आहे तर प्रवेशद्वारापाशी विघ्नहर्त्या श्रीगणेशाची सुरेख मूर्ती आहे. कत्युरी शैलीतील या मंदिराचे गर्भगृह व सभागृह असे दोन भाग आहेत. गर्भगृहात शिवलिंग, शंकराचार्य व पंचकेदारांच्या प्रतिमेचे पूजन होते. सभागृहातही काही देव-देवतांच्या मूर्ती आहेत. मंदिराशेजारी पार्वती मातेचे व पंचकेदाराची छोटी मंदिरे आहेत. तर प्रांगणात भूतनाथ, कुबेर इ. छोटी मंदिरे आहेत. ताशीव दगडात बांधलेल्या तुंगनाथाच्या मंदिराच्या शिखरावर हिमवृष्टीपासून संरक्षण होण्यासाठी लाकडी छत आहे.

कत्युरी साम्राज्याच्या काळात हे एक वैभवशाली मंदिर होते. परिसरातील ९ गावांचे उत्पन्न या मंदिरासाठी मोईन केले होते. देवाच्या सेवेसाठी नोकरचाकर, गायक, नृत्यांगनांची नेमणूक केली होती. सण, उत्सव साजरे केले जात होते. आज मात्र हे वैभव कुठेच दिसत नाही.

तुंगनाथहून अष्टदिशांना नजर टाकली असता नंदादेवी, त्रिशूल, चौखंबा इ. नामांकित हिमशिखरांचे, खोल दऱ्या, जंगले, गवताळ कुरणे, रुपेरी प्रवाहांचे फार सुंदर दर्शन होते.

तुंगनाथ शिखरापासून तीन जलप्रवाह निघतात व ते पुढे एकत्र येऊन एक धारा तयार होते. तिला ‘पापनाशनी आकाशगंगा’ असे म्हणतात. ही धारा अतिशय पवित्र मानली जाते. जवळच रावणशिला आहे. या ठिकाणी रावणाने भगवान शंकराची आराधना केली होती, अशी आख्यायिका आहे.

तुंगनाथचे महत्त्वाचे आकर्षण म्हणजे तुंगनाथपासून २ कि.मी. अंतरावर असलेले चंद्रशिला शिखर! चंद्रशिला शिखराची उंची आहे ४१३० मीटर्स! या परिसरातील सहज जाता येईल असे हे सर्वात उंच शिखर आहे. या ठिकाणी प्रभू रामचंद्राने श्रीशंकराची आराधना केली होती, असे सांगतात. चंद्राशिलाहून हिमालयाच्या गढवाल/ कुमाऊँमधील पर्वतराजीचे होणारे अफाट दर्शन भान हरपून टाकणारे आहे. शब्दात हे वर्णन करणे अशक्य आहे. तेथे कालिदासाची प्रतिभाच हवी. नजर खिळवून टाकणारे हे निसर्गाचे भव्य रूप डोळ्याचे पारणे फेडते. दिवसाच्या प्रत्येक क्षणी हिमालयातल्या सृष्टीचे अपरंपार सौंदर्य व विविध हिमशिखराच्या अपूर्व रंगशोभा मन थक्क करून टाकतात. या शिखराच्या परिसरात पसरलेली अफाट दरीखोरी, गवताळ मैदाने, जंगले, स्फटिकजलाच्या रेषा, भाबर-तराई भागातील मैदानी प्रदेश पाहताना या धरतीवर परमेश्वराने केवढे भव्य व दिव्य सौंदर्य ओतले आहे याचा साक्षात्कार होतो. या ठिकाणाहून दिसणारा सूर्योदय व त्याबरोबर क्षणाक्षणाला बदलणारे हिमशिखरांचे रंग व रूप थक्क करून टाकते. चांदण्या रात्री तर हे सौंदर्य काही वेगळंच असतं.

चंद्रशीलावर रामरायाचे एक छोटेसे मंदिर आहे. या भागात कोणत्याही उंच शिखरावर दगडांची एकमेकावर मांडणी केलेली दिसते. आपल्या पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा हा एक रिवाज आहे. चंद्रशिला शिखरावर अशा मांडण्या दिसतात.

हिवाळ्यात या परिसरात प्रचंड बर्फवृष्टी होते. सर्व परिसर बर्फात हरवून जातो. रस्ते बंद होतात. कार्तिक पौर्णिमेच्या दरम्यान तुंगनाथचे मंदिर बंद होते. आता तुंगनाथची पूजा १५-१६ कि.मी. अंतरावरील मकुमठ या ठिकाणी होते. मकुमठचे मैठाणी ब्राह्मण तुंगनाथचे मुख्य पुजारी आहेत. साधारण एप्रिल-मेमध्ये हे मंदिर परत उघडले जाते. हिमालयातील अती उंचीवरील सर्वच मंदिरे हिवाळ्यात बर्फवृष्टीमुळे बंद असतात.

या परिसरात कस्तुरी मृगांचा संचार आहे. मोनाल, अल्पाइन चप, बुलबुल इ. पक्षी नजरेस पडतात. मध्येच कस्तुर पक्षांचे (लाफिंग थ्रश) हसणे ऐकू येते. तर तपकिरी रंगावर पांढऱ्या रेषा असलेला लांब चोचीचा हुप्पी हुदहुद पक्षी लक्ष वेधून घेतो. हिंस्र श्वापदांचा वावर नसल्यामुळे हा परिसर तसा सुरक्षित आहे. हा सर्व परिसर वनौषधींनी अतिशय समृद्ध आहे. तुंगनाथला अशा वनौषधींवर संशोधन करण्यासाठी एक प्रयोगशाळा स्थापली आहे. त्या ठिकाणी वनौषधींवर संशोधन केले जाते.

दुर्मिळ होत असलेला कस्तुरीमृग भारतात गढवाल व काश्मीरमध्ये अधिक उंचीवर असलेला हिमालयाच्या पर्वतराजी परिसरात आढळतो. कस्तुरी मृगाच्या संरक्षणासाठी व संवर्धनासाठी शासनाने अनेक योजना आखल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून चोपत्यापासून ५-६ कि.मी. अंतरावरील ‘काचुला खरक’ या ठिकाणी कस्तुरी मृगाचे प्रजनन केंद्र स्थापले आहे. भारतातील अशा प्रकारचे हे एकमेव केंद्र आहे.

चोपत्यापासून ५-६ कि.मी. अंतरावर सारी नावाची वस्ती आहे. सारीपासून तीन कि.मी. अंतरावर देवरियाताल नावाचे एक छोटेसे पण अतिशय सुंदर सरोवर आहे. गढवाल हिमालयातील हे सर्वात सुंदर सरोवर म्हणून ओळखले जाते. स्फटिकजलाने बहरलेल्या या सरोवराच्या निळ्याभोर पाण्यात बर्फाच्छादित हिमशिखरांचे प्रतिबिंब पाहताना तर स्वर्गीय आनंद मिळतो. या परिसरात मोनाल पक्ष्याचे पण दर्शन होते.

महाभारताच्या वनपर्वात सांगितलेली एक घटना म्हणजे यक्ष व युधिष्ठिर यांच्यात एका सरोवराकाठी झालेला संवाद! यक्षाने विचारलेल्या प्रश्नांची युधिष्ठिर राजाने समाधानकारक उत्तरे देऊन यक्षाला प्रसन्न करून घेतले. ही घटना देवरियाताल या ठिकाणी घडली असे सांगितले जाते. महाभारतकालात हा परिसर द्वैतवन म्हणून ओळखला जात होता.

ब्रिटिश काळात अनेक निसर्गवेड्या अधिकाऱ्यांनी तुंगनाथला भेट दिली. बॅटन नावाचा इंग्रज अधिकारी तर म्हणतो, ‘तुंगनाथ ते देवरिया सरोवरापर्यंतचा सारा प्रदेश हा धरतीवरील सर्वांत सुंदर प्रदेश आहे.’ धार्मिक यात्रेकरू तुंगनाथला फार कमी येतात. पण निसर्गावर प्रेम करणारे, निसर्गातच परमेश्वराचे रूप पाहणारे निसर्गप्रमी मात्र तुंगनाथला आवर्जून येतात व या निसर्गात स्वत:ला हरवून बसतात.

– प्रकाश लेले

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..