‘आजच्या युगात खरे विद्यापीठ पुस्तकांचा संग्रह करणे होय” हे टामस कार्लाइन यांचे विधान मोठे उद्बोधक आहे. प्रत्येकच कालखंडातील ग्रंथसंपत्ती पुढल्या पिढीसाठी नेहमीच उपकारक ठरली आहे. समाज जीवनात कितीही बदल झाले तरी ग्रंथालयाचे कार्य मात्र अनन्यसाधारणच राहणार आहे. ग्रंथ हेच माणसांचे गुरू, मित्र व पथदर्शक आहेत. अगदी अनादिकाळापासून ग्रंथांचे महत्व सर्वश्रुत आहे. प्राचीन काळात वेद, पुराण, रामायण, महाभारत यासारख्या ग्रंथांनी नैतिक शिकवण देऊन समाजाला सन्मार्ग दाखवला. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, नामदेव, रामदास यासारख्या संतांनी आपल्या असामान्य त्यागातून व ग्रंथसिध्दीतून समाज बांधणीची महत्तम कामगिरी बजावली. स्वातंत्र्यवीर सावकरांसारख्या लोकनेत्यांनी स्वातंत्र्याची स्फुल्लिंगे आपल्या कर्तृत्वातून व काव्यातून कायम प्रज्वलित ठेवली. महात्मा ज्योतीबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षि शाहू महाराज यांनी या देशात अभूतपूर्व वैचारिक क्रांती घडवून आणली व आपल्या मौलिक ग्रंथातून परिवर्तनाच्या दिशा निश्चित केल्या. त्यांची ग्रंथ संपदा अनंतकाळ प्रकाश देणारी दीपस्तंभ ठरली यात कुणाचेही दुमत नाही. प्राचीन काळापासून आजतागायत संत, विचारवंत, कलावंत व संशोधक यांनी निर्माण केलेली ग्रंथ संपदा भारतीय संस्कृतीच्या कक्षा रूंदावण्यास साह्यभूत ठरली आहे हे अभिमानाने सांगावेसे वाटते.
ज्ञान साधना व सामाजिक कल्याण यांचे नेहमीच अतूट ‘नाते राहिले आहे. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर कालखंडातील ज्ञानसाधनेचा उपयोग समाज कल्याणासाठी झाला, त्यामुळे सर्वच क्षेत्रात आपण वैशिष्ट्यपूर्ण उंची गाठली आहे. पुरोगामी महाराष्ट्राच्या जडणघडणीत विविध परिवर्तनवादी चळवळीचा जेवढा सहभाग आहे तेवढाच सर्वसामान्य जनतेचे, वाचकांचे व अभ्यासकांचे प्रबोधन करण्यात ग्रंथालय चळवळीचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मोलाचा सहभाग आहे.
महाराष्ट्रात १९६७ ला ग्रंथालय कायदा मंजूर झाला व ग्रंथालय चळवळीच्या कार्यास गती आली. एका वैशिष्ट्यपूर्ण शिस्तीत तत्कालीन, वैचारिक, सामाजिक व सांस्कृतिक संचिताला लोकाश्रय देण्याचे कार्य ग्रंथालय चळवळीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या निष्ठेने केले हे अभिमानाने नमूद करावेसे वाटते.
साठोत्तरी कालखंडात तर अगदी ग्रामीण भागापासून ते शहराच्या ठिकाणी असणाऱ्या विद्यापीठ, महाविद्यालयीन व सार्वजनिक ग्रंथालये, विचारवंत, लेखक, कलावंत, रसिक अभ्यासकांची कायम भेटीगाठीची ठिकाणे बनली. ही ग्रंथालये मूल्य जपणाऱ्या विचारवंत, अभ्यासक व प्रतिभावंत लेखक, कलावंतांची “रियाज सेंटर ” होती असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. परंतू आज परिस्थिती एकदम पालटली आहे. एका बाजूला जगभर माहितीचा स्फोट झाला असून ग्रंथालये मात्र ओस पडत चालली आहेत. वाचन संस्कृतीचे अधःपतन होत आहे हे चित्र दुर्दैवी असले तरी त्यातील वास्तवता नाकारता येत नाही.
एकेकाळी मोठ्या निष्ठेने व आत्मीयतेने उभारलेल्या परिवर्तनाच्या चळवळीचे आज एकदम रूप बदलले आहे. रचनेच्या स्वप्नपूर्तीपेक्षा जागोजागी अपेक्षाभंगच वाट्याला येत आहे. ह्या उदास मानसिक अवस्थेमध्ये मात्र दुसऱ्या बाजूला तंत्रज्ञान व भौतिक क्षेत्रात प्रचंड विकास झालेला आहे. इलेक्ट्रॉनिक्स, दूरसंचार आणि संगणक क्षेत्रात आपण मोठी झेप घेतली आहे. महानगरापासून खेड्या-पाड्यापर्यंतची माणसे भौतिक, यांत्रिक व आर्थिक क्रिया-प्रतिक्रियेशी बांधली गेली आहेत. आंघोळीला गिझर, स्वयंपाकघरात कुकर, रेफ्रिजरेटर, कुलर, संपर्कासाठी मोबाईल, जिने चढायला लिफ्ट व माहिती तंत्रज्ञानासाठी घराघरात संगणक ह्या व अशा अनंत भौतिक सुविधांच्या अवडंबरात माणसांच्या मनाला चिरशांती देणारे, जीवन जगण्याला हृदयापासून मदत करणारे ग्रंथ मात्र धूळ खात पडले आहेत. देशप्रेम, राष्ट्रीयत्व, न्याय बंधुत्व या मूल्यांशी जणू आधुनिक माणसाचा संबंध उरला नाही. त्यात पुन्हा इलेक्ट्रॉनिक मिडियाने तर आणखीच भयावह परिस्थिती निर्माण केली आहे. स्वतंत्र बुध्दी, मन व भावना असणाऱ्या माणसांची अभिव्यक्ती व सृजनशीलतेचे सारे मार्ग बंद झाले आहेत. मिडिया जसे सांगेल तशी माणसे बोलू लागली आहेत, राहू लागली आहेत. आपल्या स्थायी भावापासून तुटला गेलेला माणूस एका विचित्र संभ्रमावस्थेत अडकला आहे. एकेकाळी शिक्षण, वैचारिक, साहित्य व संगीताच्या क्षेत्रात विलक्षण स्थैर्याचे वातावरण निर्माण झाले होते. ग्रंथरूपी घनगर्द सावलीत माणूस आनंदात जीवन जगत होता. हे वातावरण आता दुर्मीळ झाले आहे. येणाऱ्या संकटाला व सुख – दुःखाला सामोरे जाण्याचे आत्मबल ग्रंथानेच माणसाला दिले परंतु आज ग्रंथाने निर्माण केलेल्या विचारांच्या व आचारांच्या वाटा दुभंगल्या जात आहेत.
गेल्या काही वर्षात विचारा – आचारांच्या प्रभावित झालेल्या शिक्षण, समाज प्रबोधन व ग्रंथालयासारख्या क्षेत्रात अनंत प्रदुषणे निर्माण झाली आहेत. ह्या सर्व क्षेत्रात रचनात्मकतेचा मूळ उद्देश बाजूला सारला गेला आहे व त्यांना एकप्रकारचे बाजारू रूप प्राप्त झाले आहे. नेतृत्त्व करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस आपल्याकडे एकतरी सार्वजनिक संस्था असावी असे वाटत आहे. शिक्षण संस्था, सेवाभावी संस्था, आश्रमशाळा यासारख्या सार्वजनिक संस्था स्थापन करून झटपट श्रीमंत होण्याची एकच स्पर्धा सुरू झाली आहे. याचसोबत गावोगावी खेडोपाडी ग्रंथालय स्थापनेचे पेव फुटले आहे. अनंत काळ प्रकाशाचे मार्ग दाखवणारे ग्रंथालय व्यक्तिगत मिळकतीचे साधन बनत चालले आहे.
मागणी तसा पुरवठा हे तत्व ग्रंथ व्यवहारात रूढ झाल्यामुळे स्वप्नरंजन करणे, इच्छापूर्ती करणे अशा उथळ वाङ्मयाची ग्रंथालयात हौशीने मांडणी होत आहे. काही वर्षांपूर्वी प्रकाशन व्यवसायात असणारी ध्येयनिष्ठता आज पाहावयास मिळत नाही. एकेकाळी विविध क्षेत्रातील प्रतिभावंत शोधून त्यांचे साहित्य ग्रंथरूपाने प्रकाशित करण्याचे काम प्रकाशक करत असत. प्रतिभावंत लेखक व कवींना प्रकाशमान करण्यासोबत उत्तम व अव्वल दर्जाचे साहित्य वाचकांपर्यंत पोहचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य प्रकाशन संस्था करीत असत. आज प्रकाशन व्यवसायातला दर्जा ढासळला आहे. पुस्तकांच्या किंमती भरमसाठ वाढवून मोठ्या प्रमाणात सूट देण्याची वेगळीच प्रथा सुरू झाली आहे. विसंगती निर्माण करण्यात प्रामुख्याने ग्रंथालय कार्यकर्ते, दुय्यम दर्जाचे लेखक मोठ्या हौसेने सहकार्य करीत आहेत. ग्रंथ व्यवहारात चालणाऱ्या अशा घडामोडीकडे अजून कुणीही गांभीर्याने बघत नाही ही मोठी शोकांतिका आहे.
,आपणास समृध्द अशी वाड्:मयीन परंपरा लाभली आहे. आज घडीलाही मराठी वाङ्मयात मौलिक लेखन होत आहे. वैचारिक साहित्य, समीक्षा, दलित साहित्य, स्त्रीवादी साहित्य, आदिवासी साहित्य, आत्मचरित्र, आत्मकथन या वाड्:मय प्रकारात अव्वल दर्जाचे लेखन होत आहे. महाविद्यालय व विद्यापीठ पातळीवर विविध साहित्य कृतीवर अभ्यासपूर्ण चर्चा घडत आहे. लेखक, कलावंतांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. ग्रंथालय क्षेत्रात प्रतिष्ठेने वावरणाऱ्या कार्यकर्त्यांने आपली वाङ्मयीन व वैचारिक दृष्टी प्रगल्भ केल्यास उत्कृष्ट ग्रंथ ग्रंथालयात दाखल होतील व ग्रंथ व्यवहारातील बरेच प्रश्न मिटतील.
ग्रंथालय कार्यकर्त्यांनी आपली चळवळ सीमित न ठेवता विविध क्षेत्रातील अभ्यासक व कलावंतांना आपल्या या रचनात्मक चळवळीत सहभागी करून घेतल्यास ग्रंथालयाचा दर्जा उंचावण्यास निश्चित साहाय्य होऊ शकेल. परंतु असे प्रयत्न दुरान्वयानेही होत नाहीत ही खेदाची बाब आहे. शासनाने याकडे गांभीर्याने बघितल्यास, परिस्थिती बदलण्यास काही प्रमाणात मदत होऊ शकते.
संत ज्ञानेश्वरांनी आपल्या पसायदानात म्हटले आहे की, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रति वाढो. माणसांमधील खलनायकत्व संपवण्याचे खरे कार्य ग्रंथच करत असतात. कुठल्याही देशातील साहित्यिक, विचारवंत विसंगती मांडून सुसंगत समाजरचनेचे स्वप्न पाहत असतात. परंपरेतला व जगण्यातला गढूळपणा नष्ट करून क्रांतीचे बीजे साहित्यातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष- पेटवण्याचा प्रयत्न करतात. ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. रंगनाथन म्हणतात ‘ग्रंथालय ही शिक्षण व संस्कृतीच्या क्षेत्रात ज्ञानाचे झरे आहेत’, ती केवळ संग्रहालये नव्हेत. प्रत्येक पिढीला जीवन विषयक आत्मबदल देणारे ग्रंथ हेच माणसांचे खरे गुरू आहेत. आजच्या काळातील देवालय व संस्कार केंद्र आहेत.
वर्षापासून माणसां- माणसांची मने जोडण्याचे कार्य ग्रंथ करीत आहेत. संस्कृतीच्या संवधर्नात व उत्तम समाज बांधणीत ग्रंथप्रचाराचा व प्रसाराचा सिंहाचा वाटा आहे. आजच्या यंत्रयुगात निर्माण झालेल्या चंगळवादाने माणसांचा पूर्वीपेक्षाही अधिक गतीने व निष्ठेने वाचन संस्कृतीचा विकास करणे काळाची गरज आहे. म्हणून पुन्हा एकदा वाचन संस्कृतीच्या पुनर्बांधणीसाठी ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्त्यांनी वाचक, अभ्यासकांनी आत्मपरिक्षण करून कामाला लागणे आवश्यक आहे.
संकलन : विनोद सुर्वे
Leave a Reply