सोलापुरात असताना आधी “रजनीगंधा ” आणि नंतर ” छोटी सी बात ” पाहिला. मध्यम वर्गीय प्रमुख पात्रे – विद्या आणि अमोल ! बसने प्रवास वगैरे करणारे, कपडेलत्तेही आपल्यासारखे . धर्मेंद्र आणि हेमाच्या सिनेमाला (आपल्यासारख्या आवडीने) जाणारे आणि त्यांच्या जागी स्वतःला कल्पणारे.
नुक्तीच दयानंद कॉलेजच्या दहलजीवर पाय ठेवलेले आम्ही. तारुण्याचा असा वावर आवडून गेला- नकळत आजूबाजूला बघण्यास प्रवृत्त करून गेला.
चक्क आपल्यासारख्यांवर इतके ताजे, सोपे, रोजच्या रुटीनमधील सिनेमे निघू शकतात? हे सगळं इतकं जवळून पाहिलं असेल या माणसाने? आपले जीवन उत्सवाच्या आसपास जाण्याच्या लायकीचे असते?
बासू चॅटर्जी तेव्हापासून आवडायला लागले. त्यांचा प्रत्येक चित्रपट न चुकता पाहिला. थबकलो मात्र ” एक रुका हुआ फ़ैसला ” पाशी. माध्यमाची आणि दिग्दर्शकाची ताकद जाणवली. या व्यक्तीला इतक्या लाइटली घ्यायला नको हे जाणवलं. मराठीतल्या ” शांतता कोर्ट —- ” च्या आसपास जाणारा ! विवेकबुद्धी (लॉजिक ) चा अत्यंत सुंदर वापर करणारा.
त्यांच्या आणि त्यांच्या सारख्यांच्या काळाला ओलांडून आपण बरेच पुढे आलो. कदाचित आता तसे चित्रपट बनणार नाहीत. नेटफ्लिक्स आणि तत्सम प्रसारणांना ते पचणार नाही. छोट्या छोट्या गोष्टींमधून खरं आयुष्य भिडविण्याचं सामर्थ्य आता कालबाह्य झालंय. सरकारी अथवा बँकांमधील कारकून कधी प्रेमात पडतात का? हृषीकेश मुखर्जी याच पठडीतले. जगणं इतकं अवघड नसतं हे गालातल्या गालात हसत सांगून पटवून देणारे !
अशांना आता अलविदा केलेलंच बरं ! सध्या हिंस्त्र, अंगावर येणारे, न बघवणारे चित्रपट असतात. तेच बघावेत.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply