एक अनोळख्या प्रदेशात भटकता भटकता चार रस्ते समोर येतात. चौकात मध्ये बाण दाखवून कुठला रस्ता कुठे जातो हे दाखवलेले असते. तुम्ही थोडा वेळ थांबता. गावाचे नाव आणि दिशादर्शक बाण याची सांगड घालता आणि मग पुढे मार्गस्थ होता. जर लिहिलेले अनोळखी भाषेत असेल तर कुणाला तरी कुठला रस्ता घ्यायचा ते विचारता. आजकाल गुगल मॅप ची सोय आहे. इंटरनेट सेवा सुरू असेल किंवा सिग्नल मिळत असेल तर गुगल दाखवेल तो रस्ता घेता नाहीतर कुणालातरी विचारण्याचा जुना पर्याय आहेच. कधीतरी गुगल पण तुम्हाला दोन चार पर्याय देऊन कोड्यात टाकते! मग आपण एखादा रस्ता निवडून पुढे जावे तर मध्येच गुगल दुसराच एखादा मार्ग तुमची पाच मिनिटे वाचवू शकेल असे सांगतं आणि तो रस्ता घ्यायचाय का विचारतं. अशावेळी पटकन निर्णय घ्यावा लागतो.
आयुष्याच्या वाटेवरून चालताना पण हे असेच होते नाही का? वेगवेगळ्या टप्प्यांवर आपल्याला वेगवेगळे पर्याय उपलब्ध असतात आणि त्यातला एक आपल्याला निवडायचा असतो. कोणती शाळा, कोणता कोर्स, कोणते करियर, कोणता पार्टनर ? आयुष्य हे असं चालत रहातं.
खरे तर आयुष्याच्या वाटेवरून चालताना हे असे चार रस्ते क्षणोक्षणी एकत्र येतात. छोटे मोठे निर्णय हे सतत घ्यावे लागतात. गुगल मॅप सारखे सतत कुणीतरी सोबत असतेच असं नाही. आणि कुणी असे असलेच सोबत तर कधी कधी त्या सिग्नल नसलेल्या मोबाईल सारखी अवस्था होऊ शकते की! अशावेळी निर्णय हा स्वतःलाच घ्यावा लागतो.
कधी जंगलात रस्ता चुकल्याचा अनुभव घेतलाय? अचानक काहीच कळेनासे होते. आपण तिथल्या तिथेच गोल गोल फिरत बसतो मग आपल्यामोर एक पर्याय उरतो. समोर दिसत असलेल्या टेकडीवर, डोंगरावर सगक्या तेवढ्या वर चढून चारी बाजूला जेवढी दूर जाईल तेवढी दूर नजर फिरवायची आणि काही ओळखीच्या खुणा दिसतात का पहायचे. त्या नाहीच दिसल्या तर दूरवर निदान कुठल्या वस्तीच्या खुणा तरी दिसतात का मागोवा घ्यायचा. आयुष्यात पण वाट चुकल्यासारखे वाटते तेव्हा असेच काहीसे करावे लागते. मनाची एक उंची गाठावी लागते जेथून सारे काही स्पष्ट दिसेल!
लहानपणी माझ्या गावातून दुसऱ्या एका गावी जायला दोन रस्ते होते. दुसरा रस्ता थोडा आडवळणाचा असला तरी खूप निसर्गरम्य, कधी डोंगरांमधून तर कधी नदी किनाऱ्यांवरून जाणारा! पण सारे लोक मात्र तो चौकात बाण दाखवलेला पहिला रस्ताच घ्यायचे. काहींना लवकर पोहचायचे असायचे, काहींना दुसरा रस्ता घ्यायचा म्हणजे उगाचच नसती आफत ओढवून घेऊ असे वाटायचे, काही लोक बाकी सारे जे करतात तेच करायचे म्हणून तो दुसरा रस्ता टाळायचे! मोठे झाल्यावर मला आयुष्य जगताना बहुतांशी लोक हे असेच करताना दिसले. चाकोरीबद्ध आयुष्य जगताना ते संपून गेले आणि खरे जगायचे राहून गेल्याची खंत बाळगणारे, स्पर्धेचा आणि गर्दीचा भाग बनून तथाकथित सुरक्षित आणि आरामदायी आयुष्य जगणारे, आपणच विणलेल्या कोषामध्ये गुरफटलेले.
मित्रांनो, खरे तर दरम्यानच्या कितीतरी मौल्यवान संधी ओसंडून वाहत असतात पण निर्णय घेण्याच्या आणि थोडा धोका पत्करण्याच्या क्षमतेअभावी कितीतरी संधी निसटून जातात.
लहानपणी आकाशात पक्षी उडताना पाहणे आवडायचे ! छान निळ्या आकाशात स्वच्छंदी भरारी घ्यायची, कुठल्याही बंधनांशिवाय मनसोक्त विहरायचे. आपल्याला आयुष्य पण असे जगता आले पाहिजे. आपली वाट पाहत असलेली आणि उत्स्फूर्तपणे आपल्यासाठी उघडत असलेली नवीन क्षितिजे आपण असे विशाल निळ्या आकाशात भरारी घेतल्या शिवाय कधीही पाहू शकणार नाही.
कधी छानसे डिझाईन असलेले कार्पेट खरेदी केलेय? त्याची गुंडाळी पूर्णपणे उलघडली की मगच ते डिझाईन लक्षात येते. तसेच आपले पण आहे. आपल्याला नक्की काय हवंय, आपली बलस्थाने कोणती, आपल्या उणिवा कोणत्या, आपल्यासाठी काय महत्वाचे आहे काय नाही, इतरांचे आपल्या आयुष्यातील स्थान अशा अनेक गोष्टी उलघडल्या की खऱ्या सुखाचा मार्ग गवसतो! सगळ्या किंतु परंतु चा निकाल लागतो.
थोडेसे अंतर्मुख व्हा. स्वतःवर प्रेम करा, नात्यांना महत्व द्या. चांगुलतेवर विश्वास ठेवा. ज्याच्या हाती स्वतःला सोपवू शकाल असे मार्गदर्शक शोधा आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा दुसऱ्यांसाठी तुम्ही स्वतः असा मार्गदर्शक बना. नव्या वाटा चोखाळण्यासाठी स्वतःला सज्ज ठेवा. सर्वोत्तम व्हा, सर्वोत्तम द्या.
— श्रीस्वासम
#CareerSochh
Leave a Reply