पुढे काय होईल? ह्याचा अंदाज बांधणे कठीण असते पण अशी अटकळ मनात ठेवूनच विविध क्षेत्रातील मंडळींना पुढे जावे लागते. आपला शेजारी चीन हा कपटाने वागू शकतो हे आपल्याला युद्धामुळे समजले. त्यांनतर हे गृहीत धरून न चाललो तर काय नुकसान होऊ शकते? हे आपण पाहिले आहे.
आंतरराष्ट्रीय असो देशांतर्गत असो तुम्हाला अटकळ अंदाज निर्णय घेण्यापूर्वी बांधावेच लागतात .अर्थात ह्यासाठी सल्लागारांचे ताफे मदतीला असतात. पण एखाद्याचा अभ्यास व्यवस्थित नसेल तर अंदाज चुकू शकतात व ते उलटूही शकतात. युद्धावेळी तर रशियेला युक्रेन अशी कडवी झुंज देईल असे वाटले नव्हते. ह्याचाच अर्थ इथे अंदाज पार चुकला होता. असो .
हल्लीच नेपाळच्या न्यायालयाने कुख्यात आंतर राष्ट्रीय गुन्हेगार चार्ल्स शोभराज ह्याला वयामुळे (७८) मुक्त करावे असा आदेश दिला आहे. ह्या चार्ल्सचा व गोव्याचा फार जुना सम्बन्ध आहे . त्याला इन्स्पेकटर झेंडेनी पर्वरी गोवा येथे १९८६ साली पकडले होते. त्यामुळे गोव्याचे नाव सगळीकडे झाले. ह्या चार्ल्सने तिहार तुरुंगातून सुरक्षा रक्षकांना गुंगीचे औषध देऊन पोबारा केला होता. ह्या कुख्यात गुन्हेगाराने ज्यांचे वडील भारतीय व आई व्हिएतनाम होती त्याला ओळख लपविण्यात आणि वेष बदलविण्यात पारंगत होता . त्याच्यावर हत्येचे २० पेक्षा जास्त आरोप होते . तो तुरुंगातून वारंवार पलायन करायचा त्याला १९७६ मध्ये भारतात पकडले होते.
गोव्यातल्या ओ कोकेरो हॉटेल मध्ये पकडण्यात झेंडे साहेबाना यश का मिळाले असेल? एक म्हणजे त्यांचा अंदाज व दुसरे म्हणजे बातमीची गुप्तता. त्याला पकडून म्हापसा येथे आणि पर्यंत कुणाला त्याचा सुगावा लागला नव्हता. हॉटेल मालकांनी चाल्र्स चा पुतळा आपल्या हॉटेल मध्ये उभारला होता तो केवळ गिर्हाईके वाढावी म्हणून. असो त्यावर त्यावेळी टीकाही झाली होती. झेंडे साहेबानी अंदाज का बांधला होता? कारण त्या हॉटेलमध्ये अद्यावत दूरध्वनी यंत्रणा होती ज्यामुळे परदेशात सम्पर्क साधने सोपे जात होते. तेव्हा चार्ल्स इथे येणार ह्याची अटकळ झेंडे साहेबानी बांधलेली होती आणि त्यांचा अंदाज बरोबर ठरला.
वर सांगितल्याप्रमाणे आपला अंदाज अचूक असला तर मिळणारे यश देदिप्यमान असते. खेळामध्ये तर विरोधी खेळाडूंकडून कोणता डाव येऊ शकतो ह्याचा निष्ण्यात खेळाडू अंदाज बांधतात त्यात अनेकदा खेळाडू सापडतो व हरतो देखील. अशी व्यूहरचना केल्याशिवाय यश मिल्ने कठीण असते.
करियर उत्सुकांना सुद्धा असे अंदाज करण्यासाठी विशेष अभ्यास करावा लागतो. पुढच्या दहा एक वर्षात काय होऊ शकते? ह्याचा जर अंदाज बांधला तर आपले करियर कुठले असावे? ह्याची कल्पना येऊ शकते. काही वर्षांपूर्वी आय टी क्षेत्राची मागणी वाढलेली होती ती लाट ओसरणार ह्याचा अंदाज घेऊन तुम्ही अन्य क्षेत्राकडे लक्ष दिले असते तर ! अर्थात काहींनी तसे पाऊल उचलले.
सामान्य माणसे असा कधी विचार करतातच असे नाही त्यामुळे अनेकदा ते व्यवहारात फसतात. जे काही अभ्यास करतात ते ह्या चक्रव्युव्हात अडकत नाहीत. मोबाईलवर आलेला संदेश बघा ना ! तुम्हाला लाखांचे बक्षीस लागल्याचा संदेश येतो आणि आपण हुरळून जातो. ह्या पत्थ्याला माझा नम्बर कोणी दिला असावा? असा प्रश्न देखील मनात येत नाही मग पुढची चौकशी सोडाच. त्यांनतर तुम्हाला अमुक पैसे भरावे लागतील असा संदेश किंवा निरोप येतो खरेतर तेव्हा तरी तुम्ही सतर्क राहायला हवे होते, शेवटी आपण त्या जाळ्यात सापडतो आणि हातची रक्कम देखील घालवून बसतो.
हीच गत पत्ता विचारण्याची असते. एखादा अपरिचिट गृहस्थ अमुक माणसाचे घर वा पत्ता विचारतो तेव्हा त्याच्याकडे मोबाईल असायला हवा व गुगल सेवेमुळे पत्ताही शोधता येतो मग अशा परिस्थितीत कोणी अनोळखी पत्ता विचारतो तेव्हा संशय यायला पाहिजे व आपण सतर्क राहिले पाहिजे. परोपकार ह्या गोष्टी अशा गैर गोष्टींना लावू नये.
आपण अफवेवर विश्वास ठेवतो. तुम्हाला साधा प्रयोग माहिती असेलच. एकाच्या कानात पुटपुटलेली बातमी शेवटी काय रूप धारण करते? राईचा पर्वत होतो तो असा. आपण खात्री करत नाही त्यातून घोटाळा निर्माण होतो, ह्याच मानसिकतेचा गुन्हेगार फायदा उठवतो व आपले ध्येय पुरे करतो. सोन्याचे अस्सल मंगळसूत्र घालून फिरणे धोक्याचे असते पण आपण अतिआत्मविश्वासाने ते घालून ऐटीत जातो व गमावून बसतो. त्यापेक्षा बाहेर जातेवेळी नकली मंगळसूत्र घातले तर .. ! गळ्यातून हिसकावून घेणाऱ्या चोरांना पश्चाताप होऊ शकतो. मिरविण्याची हौस आपल्याला महाग पडू शकते.
तेव्हा मिळविण्याची मानसिकता बदलायची गरज आहे असे नाही का वाटत? करियर क्षेत्रात देखील अशा गैर मानसिकतेचे आपण बळी पडतो ह्याचे एक कारण म्हणजे आपण अद्यावत नसतो. एक करतो म्हणून दुसरा अशी साखळी त्यातून निर्माण होते व आपल्या हाती पश्चातापाशिवाय काहीही लागत नाही. कोणीतरी पैसे देऊन नोकरी मिळविले असे आपल्या कानावर येते आणि आपणही तसे करायचा प्रयत्न करतो ह्यातून वय उलटते शिवाय पैसेही दिल्यास वाया जाऊ शकतात. कुठलाच काम करणारा माणूस पैसे घेण्याच्या फ़ंदात पडत नसतो जर कोणी मागू लागला तर सतर्क व्हावे. अर्थात ह्याला अपवादही असतात पण धोकाही असतो. सतर्कता आपल्याला मदत करते सावध करते हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.. शहरात आपल्या दाराला पाहण्याचे छिद्र असते त्याचा हेतू सतर्कतेला मदत करणे हाच असतो. अलीकडे सीसी टीव्ही आले आहेत पण एक तर ते बंद असतात किंवा लावले जात नाहीत . कारण काय तर खर्च. पण चोरीमुळे तुम्हाला जे नुकसान होत असते ते कित्येक पट जास्त असू शकते. कोणाचा जीव जातो कोणाचे दागिने लंपास होतात काय आणि काय .. अशा सतर्कतेमुळे तुम्हाला होणारे नुकसान कमी तर तुम्ही करतातच शिवाय पोलिसांना सुगावा लागण्यासाठी त्याची मदत होते ती वेगळीच. वाहतूक करतेवेळी तर आता सतर्क असायलाच हवे. आपण गाडी बंद करतो व बाहेर पडण्यासाठी दरवाजा उघडतो त्यावेळी काळजी पूर्वक उघडल्यास दुसऱ्याला त्रास होणार नसतो. पण आपण आपल्याच नादात तो उघडतो त्याचे परिणाम वाईट होऊ शकतात. म्हणून तर उमेदवार घेताना तरुणांना जास्त पसंती दिली जाते. वयाने मोठा असलेल्या कडून चपळाईने हालचाल होईल ह्याची खात्री नसते. प्रशिक्षण असो वा अनुभव तुम्ही अभ्यास करून सतर्क कसे राहता येईल? ह्याची जबाबदारी आपली असते.
— रामदास केळकर
Leave a Reply