सॅटेलाईट रेडिओ’ ही संकल्पना तुलनेने खूपच अलीकडची आहे. त्याला डिजिटल रेडिओ असेही म्हटले जाते. यात डिजिटल सिग्नल हे उपग्रहामार्फत रिले केले जातात व ते आपल्या विशिष्ट प्रकारच्या रिसिव्हरपर्यंत म्हणजे रेडिओपर्यंत पोहोचतात. याचे वैशिष्ट्य म्हणजे अतिशय मोठ्या भौगोलिक प्रदेशात हे कार्यक्रम अतिशय स्पष्टपणे ऐकता येतात.
एफएम रेडिओचे प्रक्षेपणही चांगले असले तरी ते फार अंतरापर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे जास्तीत जास्त मोठा आवाका व सीडीइतका स्पष्ट आवाज या दोन्ही गोष्टी साध्य करण्यासाठी सॅटलाईट रेडिओ हा उत्तम पर्याय ठरतो. ५ जानेवारी २००१ रोजी टिम मॅकग्रा या कलाकाराने सिरियस या सॅटेलाईट रेडिओवर ‘थिंग्ज चेंज’ हे पहिले गीत सादर केले होते. सिरियस व एक्सएम या दोन कंपन्या अमेरिकेत पहिल्यांदा सॅटेलाईट रेडिओ क्षेत्रात कार्यरत होत्या पण नंतर कालांतराने त्यांचे विलीनीकरण झाले. सध्या वर्ल्डस्पेस या सॅटेलाईट रेडिओचा विशेष बोलबाला या आहे.
रेडिओची कार्यपद्धती ही डिजिटल ऑडिओ ब्रॉडकास्टिंग ही आहे. सॅटेलाईट रेडिओ हा कुठल्याही देशात ऐकता येतो. त्यात फिक्स्ड लोकेशन रिसिव्हर, डिश अँटेना आवश्यक असतो. यात उंच इमारतींमुळे सिग्नलला बाधा येऊ शकते. सिग्नलची क्षमता वाढवण्यासाठी रिपीटर नावाचे साधन वापरले जाते. सॅटेलाईट रेडिओसाठी संबंधित कंपनीकडे शुल्क भरावे लागते त्यानंतर ते तुम्हाला एक आयडी देतात. त्याला इलेक्ट्रॉनिक सीरियल नंबर असे म्हटले जाते. तो डिजिटल स्ट्रीमरकडे पाठवला जातो. सॅटेलाईट रेडिओवर किमान शंभरहून अधिक चॅनेल असतात. सॅटलाईट रेडिओचा विशेष फायदा म्हणजे त्यात कमर्शियल जाहिरातींचा छोटासा ब्रेक नसतो. त्यामुळे रसभंग होण्याची शक्यता नसते.
सॅटेलाईट रेडिओ संगीताचा आस्वाद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर | वापरला जातो. सॅटलाईट रेडिओची सहा महिन्यांची फी ९०० ते १२०० रुपयांपर्यंत असते. साधारण रेडिओच्या तुलनेत अधिक चांगला आवाज व देशविदेशातील संगीताचा परिचयही या माध्यमातून आपल्याला घडतो. मोटारीत बसूनही आपल्याला सॅटेलाईट रेडिओ ऐकता येतो. तूर्त तरी हे साधन आय टी प्रोफेशनल्स, मॉल्स, श्रीमंत लोक यांच्यापुरते मर्यादित आहे. त्यामुळे भारतात तो फारसा लोकप्रिय होऊ शकला नाही. वर्ल्ड स्पेस रेडिओचे काही कटू अनुभवही त्याला कारणीभूत ठरले आहेत.
Leave a Reply