MENU
नवीन लेखन...

साठा उत्तराची कहाणी

घरोघर दारिद्र्य किंवा पोटापुरता पसा ज्या प्रत्येक घरात आहे, अशा गावातलं माझं एक घर, अगदी तसंच. सोयी-सुविधा नव्हत्या असं म्हणायचंही काही कारण नाही, कारण त्याची फारशी आवश्यकताच कोणाला वाटत नव्हती. उदा. पोस्टमन, शाळा, दवाखाना, एस.टी. वगैरे वगैरे. गावात देवळं होती, मशिदी होत्या. पडीक गावठाण होतं, गायरान होतं. भीमा आणि सरस्वती या दोन नद्या वाहत होत्या. नद्यांचं पाणी नारळाच्या पाण्यासारखं गोड होतं. स्वच्छ होतं. पाण्यात नाणं पडलं तरी दिसायचं. परंपरेने आलेल्या सगळ्या गोष्टी चालत होत्या. नदीतल्या वाळूला कोणी हात लावत नव्हतं. उलट त्या वाळूत उन्हाळ्यात टरबूज, खरबूज, साखरकाकड्या फुलत होत्या. माणसांबरोबरच प्राण्यांनाही तृप्त करत होत्या. कोणाला फार अपेक्षा नव्हत्या, फार श्रीमंत व्हायचं नव्हतं. शिकलो तर शाळा मास्तर, तलाठी किंवा पाटकरी, पोलीस असं काहीतरी व्हावं असं वाटायचं. सगळं कसं आटोपशीर. माणसं, जनावरं आणि निसर्ग याशिवाय चौथी गोष्ट आढळत नव्हती.

आता ह्या गोष्टी श्रेयस होत्या आणि प्रेयसही. आजकाल लोक विचारतात, लहानपणी तुम्ही काय वाचलं? काय सांगणार? अशा गावात काय वाचायला मिळणार? मी फक्त शाळेतले धडे वाचले, पण ऐकलं फार. आता हे पाहा ना, नद्यांच्या पाण्याचे आवाज, वारा, पिकं, झाडं, बैलाच्या गळ्यातल्या घंटा, बैलगाडीच्या चाकाचे आवाज आणि असे कितीतरी आवाज – माणसांचे, पक्ष्यांचे, प्राण्यांचे, नुसते आवाजच नाही तर वाससुद्धा. ते वास नाकात, मनात साठवले आहेत. ह्यातलं कोणीही बोलणारं नाही, पण हे सगळं काही सतत रम्य असतं असं नाही. कधी कधी त्याचं ‘भयानक-भीतीदायक’ रूपही दिसलं. पण हे सगळं मूक. हा मौनाचा आवाज म्हणजे महाकाव्यच आहे, ते मी अनुभवले. रानावनात फिरलो, भटकलो, मुक्काम केले. ह्या सगळ्या अवस्थेत ते शरीरात, मनात इतके झिरपले आहेत, तेच आतून मला काही सांगतात, शिकवतात. लिहिताना मदतही करतात.

हायस्कूलसाठी थोड्याशा मोठ्या गावात आलो अन् जरा बाहेरचं जग दिसू लागले. बोर्डिंगमध्ये राहिलो. त्या दिवसांवर एखादं पुस्तक होईल.
माझे महाविद्यालयीन शिक्षण अहमदनगर येथे झाले. मोठ्या अपेक्षेने मी सायन्सला गेलो होतो पण मला अपेक्षित यश मिळाले नाही.

एफ.वाय.बी.एस्सी. नंतर मला नैराश्य आले आणि महाविद्यालयीन शिक्षणाला रामराम करून मी गावी कायम वास्तव्यासाठी परतलो. नैराश्य आणि आईची सारखी नगरला जा म्हणून असणारी कटकट टाळण्यासाठी मी जास्तीत जास्त वेळ शेतातच घालवू लागलो.

वर्षभरानंतर मित्राच्या आठाहास्तव मी कॉलेजला परत आलो, पण हे वर्ष मला आता वाया गेले होते, असे म्हणता येणार नाही. मी रानावनाचा, निसर्गाचा, कृषिसंस्कृतीचा एक भाग बनून गेलो होतो. या काळाने मला खूप शिकवले. मी बी.एस्सी. झालो अन् परीक्षा संपल्याबरोबर मला कायनेटिक इंजिनिअरिंग लि.मध्ये नोकरी लागली.

महाविद्यालयीन जीवनातली सगळी फरफट, त्या काळात केलेले वाचन, गाईडस् लेखनावर मिळवलेले थोडेफार पैसे, मित्र आणि प्राध्यापकांचे सहकार्य हा सगळा दीर्घ लेखाचा विषय आहे.

कायनेटिक मधील नोकरीमुळे मात्र माझे जीवन बदलले. महाविद्यालयीन जीवनात गेलेला आत्मविश्वास परत आला. खरं तर ही नोकरी मी थोड्या दिवसांसाठी करणार होतो, पण माझ्या विभागप्रमुखाने माझी कामातील गती पाहून सल्ला दिला की, जाखडे तुम्ही शिक्षक, प्राध्यापक किंवा बँकेत वगैरे नोकरी करण्यापेक्षा इंडस्ट्रीमध्येच करिअर करा. तीच गोष्ट मी कायनेटिक सोडून ड्रिल्को मेटल कार्बाईडस् मध्ये आल्यावर तिथल्या वर्क्स मॅनेजरनी सांगितली. एवढेच नाही तर मेटलर्जीच्या काही परीक्षा असतात, त्या नोकरी करता करता कशा व कोठे द्यायच्या याची माहितीही दिली. त्या परीक्षा नगरमधून देणे अवघड वाटले, आपण पुण्याला जावे, तिथं आणखी मार्गदर्शन मिळेल, अधिक संधी मिळेल म्हणून मी पुण्यात बजाज टेंपोतली नोकरी स्वीकारली. पुण्यात आलो ती तारीख होती 6 मे 1982.

पिंपरी-चिंचवड-भोसरीला कामगार चाळी होत्या अन् पुण्यात गेल्यावर सुरुवातीला मी भोसरीतील एका चाळीतच राहत होतो. ह्या चाळीतील कामगारांना बरोबर घेऊन सांस्कृतिक उपक्रम करावे, असे वाटू लागले. असे करताना ग्रुप जमत गेला, मोठ्या कंपन्यांचे स्वत:चे ‘हाउस जर्नल’ असायचे, पण सर्वसाधारण कंपन्यांत तसे नसायचे. साहित्यप्रेमी कामगार/औद्योगिक कर्मचाऱ्यांना आपले साहित्य प्रकाशित करता यावे म्हणून एखादे त्रैमासिक काढावे असे वाटू लागले. त्यातून ‘पद्मगंधा’ची कल्पना उदयाला आली. 1988 मध्ये ‘पद्मगंधा’चा पहिला दिवाळी अंक मी प्रकाशित केला. तो केवळ एक सांस्कृतिक चळवळीचा भाग म्हणून.

हा प्रवास इतका सोपा नव्हता. अंक प्रकाशित करणे म्हणजे काय? त्याचे संपादन, त्याची मांडणी, चित्रकारांचा सहभाग, मुद्रणतंत्र, कागद यांविषयी काही माहिती नव्हती, पण औद्योगिक नोकरीचा येथे फायदा झाला. मशिनशी खेळण्याची सवय होतीच. औद्योगिक नोकरीत अचूकतेची आवड निर्माण होत असते. मी कंपनी सुटल्यावर घरी जाण्याऐवजी ओळख झालेल्या मुद्रणालयात जाऊन तीन-तीन तास बसत असे. त्यांच्या चर्चा, त्यांचे वादविवाद ऐकण्यातून मला हवे ते ज्ञान मिळू लागले. तेथील कामगारांशी मैत्री झाली. त्यांच्याकडून पुष्कळ शिकलो.

त्याचकाळात औद्योगिक जगतातली शांतता संपत चालली होती. संप, मोर्चे, लाल बावटा, सिटू व इतर कामगार संघटना आक्रमक झाल्या होत्या. समाज बदलायला निघालेले हिस्रक होऊ लागले. कामगार आणि ऑफीसर यांच्यातले अंतर वाढत चालले. प्रत्येक जण दुसऱ्याकडे संशयाने पाहू लागला. या पार्श्वभूमीवर मी पद्मगंधाला या जोखडातून मुक्त करून स्वतंत्र व व्यावसायिक रूप देण्याचे ठरविले.

माझ्यासाठी साहित्य-व्यवहार, साहित्यिक यातली कोणतीच गोष्ट परिचयाची नव्हती. पण पद्मगंधा दिवाळी अंकामुळे काही साहित्यिकांचा परिचय झाला होता. अंकातील काही कंपोझ फिरवून एखादे पुस्तक प्रकाशित करू लागलो. हा हौसे-मौजेचा भाग होता. प्रकाशन व्यवसाय म्हणून करावा असे 1995 नंतर वाटू लागले. आणि डॉ. रा. चिं. ढेरे यांची तीन संशोधनात्मक पुस्तके प्रकाशित करून ‘पद्मगंधा’ प्रकाशन व्यवसायात कार्यरत झाली. पुढे 2000 साली मी पूर्णवेळ प्रकाशक होण्याचा निर्णय घेतला आणि नोकरी सोडली.

हे सगळे काही सहज घडले असे नव्हते, त्यासाठी आत्मचरित्राची पाच-पन्नास पानं जातील, पण पुण्यात आलो कशासाठी आणि आयुष्य ग्रंथव्यवहाराकडे वळले कसे, हेही थोडक्यात सांगायला हवे होते.

हा सगळा खेळ माझ्या मनाचा, माझ्या आवडीचा आणि पुस्तकप्रेमाचा आहे.

ग्रामजीवनातला जगण्याचा अनुभव, लोकजीवन, लोकसंस्कृती, सामूहिक जगण्याचे आविष्कार, औद्योगिक जीवन, महाविद्यालयीन जीवनात आणि नंतर वेळेनुरूप केलेले वाचन, ह्या सगळ्या गोष्टींचे प्रतिबिंब माझ्या लेखनात, प्रकाशनसंस्थेच्या स्वरूपात दिसून येईल. लोकसाहित्य, देवताविज्ञान, मिथके, रूढी-परंपरा जाणून घेण्याची आवड व माहितीचा संस्कार माझ्या गावानेच दिला.

प्रकाशन संस्था उभी करताना पुस्तक म्हणजे काय, यापासून अनेक गोष्टींचा अभ्यास सुरू केला. त्याविषयीची पुस्तके जमा केली. बायंडिंगसारख्या दुलर्क्षित विषयावर चार हजार रुपयाचे एक विलक्षण पुस्तक मला दिल्लीत मिळाले. कोणत्याही कामात बौद्धिक अधिष्ठान असावे, असे मला वाटत आले. ते गंभीर असले तरी महत्त्वाचे असले पाहिजे. या ध्यासातून पुस्तके निवडत गेलो. तांत्रिक ज्ञानाबरोबर प्रकाशकाला आवश्यक असते ते म्हणजे लेखकातील माणूस, त्याच्या लेखनातील प्रामाणिकपणा, प्रतिभा ओळखण्याची शक्ती. पायाळू माणसाप्रमाणे लेखकाच्या सर्जनशक्तीचा अंदाज घेता आला पाहिजे. हे माझे मीच शिकत गेलो, यासाठी कोणाचे मार्गदर्शन नव्हते. परदेशी संस्थांकडे यासाठी स्वतंत्र विभाग व स्टाफ असतो. प्रादेशिक ग्रंथव्यवहारात – त्यातही नवीन संस्था चालू करताना ही भूमिका प्रकाशकालाच स्वीकारावी लागते. मी सायन्स आणि पुढे तंत्रशिक्षणाचा विद्यार्थी होतो. साहित्याचा नव्हतो, त्याचाही न्यूनगंड सुरुवातीला होता. त्यामुळे मात्र मी सावध झालो. फाजील आत्मविश्वास न ठेवता साहित्याचा अभ्यास करू लागलो, तो संपत नसतोच, तो आजही चालूच आहे. व्यंकटेश माडगूळकर एकदा म्हणाले, ”तू ललित लेखक आहेस, ललित साहित्याची तुला आवड आहे, पण प्रकाशन करताना प्रत्येक पुस्तकाचे वाङ्मयीन मूल्य तुला समजले पाहिजे.” यामुळे मी समीक्षेत इतका रमलो, की संशोधन, समीक्षा, लोकसंस्कृती याविषयांची पुस्तके काढणारी संस्था हीच माझ्या संस्थेची ओळख झाली.

प्रारंभापासूनच विशिष्ट प्रकल्प घेऊन काम करणे ही माझी भूमिका होती. प्रकल्पांमुळे तीन-चीर वर्षे एका कामात आपण रमतो व अशा प्रकल्पांत प्रकाशकाचा सहभाग अधिक महत्त्वपूर्ण असतो. डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या संशोधनाचे पुनर्व्यवस्थापन करून व नवीन संशोधन-ग्रंथांचा दीर्घकालीन प्रकल्प केला. याप्रमाणेच लावणी वाङ्मय, श्री. व्यं. केतकर, र. धों. कर्वे, अगाथा ख्रिस्ती, भाषा प्रकल्प असे काही ठळक प्रकल्प सांगता येतील. आताही अल्बेर काम्यूच्या साहित्यावर प्रकल्प चालू आहे. या प्रकल्पांच्या विषयांच्या अनुषंगाने इतर पुस्तकांचे प्रकाशन चालूच असते. केवळ पुस्तके प्रकाशित करण्याऐवजी ग्रंथ प्रकाशित करण्याचे धोरण प्रारंभापासूनच ठरविले. ग्रंथ प्रकाशक होण्यासाठी आवश्यक असणारी शिस्त जाणून टीपा, तळटीपा, संदर्भसूची, ग्रंथसूची, नामसूची अशा गोष्टींशिवाय ठांथ परिपूर्ण होत नाही. वैचारीक व संशोधनात्मक ठांथ प्रकाशित करताना त्याची सौंदर्यपूर्ण मांडणी करण्याचा प्रयत्न करत आलो. त्यामुळे त्याचे शुष्क स्वरूप कमी होते. आपण ग्रंथ प्रकाशक आहोत, याचा मला अभिमान आहे.

आज ज्या थोर आणि श्रेष्ठ लेखकांची पुस्तके मी प्रकाशित केली, त्यांच्याबरोबरचा सहवास, चर्चा यातून केवळ माझी संस्थाच नाही तर मीही घडत गेलो. मला सतत वाटत आले की, आपल्या कामात व्यवहाराइतकेच आपल्या आत्मविकासाचे सूत्र सापडले पाहिजे. माझे घडणे मला अधिक महत्त्वाचे वाटले. मला अनेक विद्वान व अभ्यासू लेखकांची पुस्तके काढण्याचे भाग्य मिळाले. यातील कोणाचा प्रांत संशोधनाचा, तर कोणाचा साहित्यशास्त्राचा. कोण माक्र्सवादी समीक्षा करणारे, तर कोणी समन्वयवादी आणि सामाजिक अंतरंग असणारे, कोणी पाश्चिमात्य आणि भारतीय साहित्य-समीक्षेचे अभ्यासक पण त्याबरोबरच समाज आणि भाषा याविषयी उत्कटतेने मार्गदर्शन करणारे, कोणी ललित लेखन करणारे. माझे प्रत्येक लेखक काहीतरी देत राहिले आणि मी घेत राहिलो. माझ्यासाठी ते माझे गुरुकुल आहेत. ही पंचवीस वर्षे या दृष्टीने बौद्धिक आनंदात गेली.

ह्या सगळ्या प्रवासात वाईट अनुभव आलेच नाहीत, असे नाही, पण ते मला महत्त्वाचे वाटत नाहीत. आपल्या जवळ काहीच नव्हते. आपण शून्य
भांडवलावर संस्था सुरू केली, पुस्तकप्रेम एवढेच भांडवल. महान माणसांप्रमाणे मनोविकार असणारी लहान माणसं भेटली. स्वत:वर जरुरीपेक्षा जास्त प्रेम करणारी आत्मकेंद्रित माणसं भेटली. गॉसिपिंग करणारी भेटली. अशी माणसं त्रासदायक असतात. त्यांचा इगो सांभाळताना मनस्ताप होतो.

अनेक टप्प्यांवर असे वाटत आले की, आर्थिक कसरत करताना फार दमछाक होत आहे, तेव्हा प्रकाशन संस्था बंद करावी. निदान पद्मगंधा दिवाळी अंक बंद करावा, असे वाटायचे. त्याचा प्रकाशन संस्थेवर येणारा आर्थिक ताण कमी होईल, शिवाय ते दोन महिने प्रकाशनसंस्थेचे फारसे काम होत नाही, तो वेळ वाचेल. सातत्य ठेवण्याशिवाय यश मिळणार नाही, याचीही खात्री होती. धडपड, प्रयत्न चालूच ठेवले. 2007 पर्यंत कर्जाचा मोठा ताण आला. ह्यावेळी अगाथा ख्रिस्तीच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्याचा निर्णय खूप योग्य ठरला. अगाथा ख्रिस्ती प्रकल्पामुळे विक्रेते त्या संचाबरोबरच इतरही पुस्तके मागवू लागले. हा प्रकल्प खूप वेगाने केला आणि संस्थेला टेकू मिळाला. काही संशोधनात्मक पुस्तकांनाही प्रतिसाद मिळाला. अशा अनेक नाउमेद करणाऱ्या घटनांतून मार्ग निघत गेला कारण माझ्यासाठी ठांथ प्रकाशन हे पॅशन आणि मिशन होते.

लहानपणापासून आजपर्यंत आलेल्या अडचणी, अपमान, संघर्ष सांगून फार सहानुभूती मिळवावी असे वाटत नाही. माझी आर्थिक शक्ती, बौद्धिक मर्यादा, साधनांचा अभाव यामुळे आणखी काही करायला पाहिजे, तेवढे घडले नाही. प्रकाशन व्यवसायात रिस्क घ्यावी लागते. पुस्तके चकवा देतात. अंदाज चुकतो. मी अनेक अभिजात आणि आदरणीय पुस्तके काढली, पण आदरणीय पुस्तके विक्रेय असतातच असे नाही.

ह्या धावपळीत जमेल तसे प्रसंगानुरूप किंवा कारणपरत्वे मी लेखनही केले. ‘पाचरूट’ (कादंबरी), ‘एक एक काडी गवताची’ (कथासंग्रह), इर्जिक (ललित लेखसंग्रह), गावमोहर (कुमार कादंबरी) या पुस्तकांना विविध पुरस्कार मिळाले. बालवाङ्मय, विज्ञान, इतिहास या विषयांवर माझी पुस्तके प्रकाशित आहेत. ‘म.रा.शासना’चे तीनवेळा तर महाराष्ट्र फाऊंडेशन (अमेरिका) आणि विविध साहित्य संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत. विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातही त्याची नोंद घेतली गेली. वृत्तपत्रात कॉलम्स लिहिले. डॉ. देवींबरोबर ‘भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण’ प्रकल्पात महाराष्ट्राच्या खंडाचे संपादन केले. विविध वृत्तपत्रे, दिवाळी अंक, नियतकालिके ह्यांतून भरपूर लेखन केले आहे. माझ्या लेखनाबद्दल मात्र मी समाधानी नाही, आणखी लिहायला हवे होते; पण त्यालाही लागणारे स्वास्थ्य मला मिळाले नाही. बुद्धिवादाचं मला आकर्षण आहे, पण त्याचं ओझं चोवीस तास घेऊन फिरणं आवडत नाही. यासाठी मी गावाकडचं घर, थोडीफार असणारी शेती सांभाळली आहे. माझं गाव आणि शेत हीच माझ्या लेखनाची प्रयोगशाळा आहे.
आयुष्यात प्रत्येकजण काहीतरी करत असतो, पण आपल्याला आवडते ते करायला मिळणे, आपल्या आवडीचे, छंदाचे रुपांतर व्यवसायात होणे ही गोष्ट फार अभावाने मिळते. मला ती मिळाली. थोडाफार मान, सन्मान, प्रसिद्धी, कीर्ती मिळाली. चेहरा नसलेल्या कुटुंबातून मी आलो, त्या कुटुंबाला चेहरा, ओळख देता आली, यापेक्षा अधिक श्रेयस काय असू शकते.

एखाद्या मनस्वी आणि अव्यवहारी माणसाला सांभाळत संसार करणे ही अवघड गोष्ट माझ्या पत्नीने केली आहे. माझे आई-वडील, भाऊ, दोन्ही मुलं, रानावनात भेटलेली अशिक्षित माणसं या सगळ्यांचा आपल्या घडण्याला हातभार असतो, याची मला जाणीव आहे.

शेवटी साठा उत्तराची कहाणी सफल संपूर्ण झाली, एवढेच म्हणतो.

— अरुण जाखडे
36/11, धन्वंतरी सह. गृह. संस्था, पांडुरंग कॉलनी,
एरंडवन, पुणे – 411038
भ्रमणध्वनी : 9850086423
फोन : (020) 25442455
arunjakhade@gmail.com
p.padmagandha@gmail.com

अरुण जाखडे
About अरुण जाखडे 1 Article
श्री अरुण जाखडे हे पुणे येथील सुप्रसिद्ध “पद्मगंधा प्रकाशन” चे प्रमुख आहेत. ते मराठी प्रकाशक परिषदेचे अध्यक्ष आहेत. बालवाङ्मय, विज्ञान, इतिहास या विषयांवर त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांना विविध साहित्य संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..