तीन वर्षे झाली आहेत मी मुलीकडे गेले होते. तीन चार महिने मुक्काम होता. तेंव्हा आषाढी एकादशीच्या दिवशी शाळेतील लहान मुले. मुली आणि पालखी सोहळा केला गेला होता. दरवर्षीच करते ती. छोटेसेच विठ्ठल रखुमाई. आणि वारकरी होते. त्यांनी वारकऱ्यांचा पोषाख केला होता. मुलींनी डोक्यावर तुळशीचे वृंदावन आणि मुलांनी हातात पताके व गळ्यात टाळ घालून ठेक्यात वाजवत नाचत अगदी तल्लीन होऊन परिसरात मोकळे पणाने जात होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला माणसं उभी होती. लहान पालखीला व वारकऱ्यांच्या पाया पडत होते. त्यांना पाहून मला वाटले होते की या छोट्यांना ना प्रपंचाची चिंता ना देवाजवळ काही मागणे. खरी तर हीच वारी व हीच खरी भावभक्ती. मी माझ्या कडून छोट्यांना केळी दिली. त्यांच्या सोबत पायी जाण्याची पुण्याई नव्हती. पण मुलींने व्हिलचेअर वर बसवून मला दिंडीत सहभागी करून घेतले होते….
वास्तविक तो ग्रामीण भाग आहे. तरीही पालकांचे सहकार्य मिळते. गावातील बाजार भरतो त्या मोठ्या व मोकळ्या मैदानात मुलीनी फुगड्या झिम्मा सादर केला होता. आणि मुलांनी टाळ वाजवून एका ठराविक लयीत भजनाला साथ दिली होती. या साठी खास भजनी मंडळ आले होते. मग अतिशय महत्त्वाचा भाग असतो तो रिंगणाचा तो देखिल करण्यात आला होता. हे सगळे पाहून मी तर थक्कच झाले होते. मी असे या पूर्वी कधीच पाहिले नव्हते. पेपरमध्ये वाचले व पाहिले होते. आणि त्या वेळी मीपण इतकी रमून गेले होते की विसरूनही गेले होते हे सगळे लहान वारकरी व वातावरण निर्मिती आहे म्हणून. आज मला सकाळीच सगळे काही आठवले. आता शाळा नाही पण त्या ज्ञान आणि संस्कार मंदिरातील तोप्रसंग आठवला व मनातूनच त्या छोट्याश्या वारकऱ्यांना नमस्कार केला आहे.
धन्यवाद.
— सौ. कुमुद ढवळेकर.
Leave a Reply