साठवून ठेवावे पाणी
जोडावे मनुष्यप्राणी
अलगद येती नाणी
आपल्याकडे!!
अर्थ–
जास्त काही सांगायची गरजच नाही कधी कधी त्यापेक्षा विचारपूस जास्त गुणकारी ठरते. पाणी हे जीवनावश्यक, या पृथ्वी वरचे अमृतचं जणू काही, पण आज त्याचा उपयोग आपण करून घेतोय पण त्याची साठवण? 100% होत्ये का? तर अजिबात नाही. निसर्ग आपल्यावर कृपादृष्टी दाखवतो आणि हे अमृत आपल्या पदरात टाकतो पण त्याचे योग्य नियोजन काही हा माणूस करताना दिसत नाही. पावसाचे पाणी अगदी स्वच्छ मग तेच साठवून ठेवले ते? उपाय असंख्य आहेत. पण त्याही पेक्षा जास्त महत्वाचे म्हणजे रोज मिळणारे पाणी आपण किती योग्य रित्या वापरतो ते जास्त महत्वाचे. सकाळी दात स्वच्छ करताना समोरचा नळ बंद करणे हा अगदी छोटा पण महत्वाचा उपाय आहे. म्हणतात ना सुरुवात स्वतः पासून करावी. हे ज्याला कळत नाही त्याला मार्च महिन्यात एखाद्या गडावर पाठवावे म्हणजे पाण्याचे महत्व अगदी बरोब्बर कळेल.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात पाण्याचा योग्य उपयोग नाही झाला तर तो गुन्हा ठरायचा.
त्याच प्रमाणे माणसं जोडणं हाही एक महत्वाचा घटक आहे आयुष्यातला, श्री समर्थ रामदास किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वात पहिले काय केलं तर माणसं जोडली त्यामुळेच हे स्वराज्य उभे राहिले, देशभरात 1200 हुन अधिक मठ स्थापन होऊ शकले. आज आपण व्यवसाय, नोकरी काही करत असू अगदी घरात सुद्धा काम करत असू त्यावेळीही माणसं जोडणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. या सगळ्याने काय होईल? अलगद येती नाणी म्हणजे पैसा का? नाही आजकाल सुख हे केवळ पैशाने उपभोगायची गोष्ट आहे. येथे नाणी म्हणजे सुख, समाधान येईल याचाच अर्थ पाण्याचे नियोजन, माणसं जोडणं याने आपोआप पैसा येईलच पण त्याने मनुष्य समाधानी आणि सुखी होईल.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply