ह्ये काय नाव हाय व्हय, असा इचार तुमच्या मणात आला आसल तर पार इस्कटून इस्कटून सांगा आसं बी म्हनल कुनी. तर त्ये खरंय बगा .
सतरंजी म्हंजे बसायचं काय तरी असनार.
सतरंगी म्हंजे अशीच आपली बारा गावची , सतरा डोसक्याची , कोन नाय कोनचं नि डाल भात लोनचं वाली .
अतरंगी म्हंजे तोंडावर गोगल , तोंडात मावा आणि आख्या माणव देहाची वळख करून देनारी शिवराळ भाषा .
आता चपटी म्हंजे ? ह्ये असं कायतरी असनार असं वाटनार तुमास्नी .
पण…
पण ह्यातलं काहीही नाही . मग ह्या पोस्टला असं शीर्षक का दिलं ?
तर दोन कारणांनी …
एक म्हणजे अनेक जण आल्याआल्या पुढं ढकलतात . दुसरं म्हणजे काही जण बारकाईनं वाचतात . आता असं एखादं शीर्षक दिलं की सगळेच वाचतात .म्हणून हा खटाटोप .
तर चला पुढं जाऊया …
आता आपल्याला दोन प्रकारचे गट वाचायला मिळतील . निष्ठावान समर्थक आणि दुहेरी , तिहेरी वा जास्त पक्षांतरे करणारे त्यागी निष्ठावान समर्थक (त्यागी म्हणजे पूर्वीच्या पक्षावरची निष्ठा त्यागणारे ).
१ निस
२ त्यानिस
स्थळ : मतं मागण्यासाठी (अर्थात लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी हे त्यात अध्याहृत .) मतदाराच्या घरी .
निस : नम्र भाव , हाती पक्षाने दिलेलं प्रचार साहित्य . घरातल्या सर्वांची आपुलकीने चौकशी . समस्या नोंदवून घेण्याची लगबग . उमेदवार आला नाही तरी आम्ही आहोत , मत नाही दिलं तरीही आम्ही तुमच्या सोबत आहोत , ही मनापासूनची ग्वाही .
काळ बदलला आहे.
त्यानिस : मग्रुरी , हातातली स्लिप अंगावर फेकून मत देण्याची धमकी , नाही दिल मत तर बघून घेऊ ,ची फोडणी , घरातल्या कर्त्या माणसाला पाचशे ची नोट देऊन दोन हजार दिल्याची नोंद आणि उमेदवार निवडून आले नाहीतर हे पैसे व्याजासह वसुल करण्याची, रिव्हॉल्व्हर कुरवाळत दिलेली धमकी .
स्थळ : उमेदवाराचे
निस : नम्रपणानं दिवसभराचा वृत्तांतकथन, उद्याच्या नियोजनाची तयारी , रात्री खूप उशिरा घरी जेवायला जाण्याची मानसिकता .
त्यानिस : वाटपात पैसे कमी पडल्याची तक्रार, जेवणावळी घालायला हव्यात त्याशिवाय मतदार तयार नाहीत हा आग्रह , मटण , दारू आणि न वाटलेल्या रकमेचे नेत्याच्या नकळत समान वाटप .
स्थळ : निवडणुकीनंतर श्रमपरिहार
निस : घरून आणलेल्या पुऱ्या वा पोळ्या , बटाट्याची भाजी , प्रचार काळातील अनुभव कथन , समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची आग्रही मागणी , आत्यंतिक मानसिक समाधान .
त्यानिस : बरेचसे दारूत आकंठ बुडालेले , मटण खातोय की हाडं चघळतोय की दगड चावतोय याची शुद्ध नाही . काही लोळतायत , समोर आयटम नाचत्येय . आता आपला नेता पक्षाला गुंडाळून कसा ठेवील , यावर बेटिंग . हजारो रुपयांच्या थैल्या केव्हा मिळतात याची वाट बघण्यात वेळ जातोय . आपला नेता आता कोणती नवी गाडी घेणार , कुणाला अडवणार , कुणाची जिरवणार , कुणाला खुन्नस देणार याची खमंग चर्चा लडबडत्या स्वरात आणि हलत्या डुलत्या अनुयायात सुरू .
निवडून आलेला नेता एव्हाना मंत्रिपदाच्या शर्यतीत राजधानीकडे सुसाट निघालेला . अर्थात त्याला खिशात असलेल्या चपटी ची सखोल जाणीव आहेच .
हुश्य ! तूर्तास इतकंच .
आता तुम्हालाही अनुभव असेलच म्हणा. अहो मग लिहा ना, आम्हालाही वाचायला आवडेल की …
— डॉ. श्रीकृष्ण जोशी
रत्नागिरी
रत्नागिरी
Leave a Reply