मागच्या पिढीशिवाय पुढच्या पिढीचा जन्म होत नाही हे विज्ञानीय सत्य आहे. याची चर्चा आपण मागच्या आठवड्यात केली. मागच्या पिढीचा जन्म, मागच्याच्या मागच्या पिढीचा जन्म, मागच्याच्या मागच्याच्या मागच्या पिढीचा जन्म …… ही साखळी अशीच चालू होती म्हणूनच माझा जन्म होअू शकला.
मी आणि माझ्या बायकोनं, आमच्या अपत्यांना जन्म दिला. त्या अनुषंगानं केलेली ही कविता वाचा आणि त्यावर मनन करा.
माझ्या शुक्राणूत होतं
माझ्या आअीबाबांच्या अनेक
पूर्वपिढ्यातून संक्रमित
झालेलं आनुवंशिक तत्व,
माझ्या बायकोच्या
पक्व बीजांडात होतं
तिच्या आअीबाबांच्या अनेक
पूर्वपिढ्यांतून संक्रमित झालेलं आनुवंशिक तत्व.
आमच्या अपत्याचा जन्म
हा आमचा निर्णय होता
या पृथ्वीवर जन्म घेण्याशिवाय
अपत्याला दुसरा पर्यायच नव्हता
माझा शुक्राणू … बायकोचं पक्व बीजांड …
आमच्या अपत्याचा जन्म ….
आमच्यातील आनुवंशिक तत्वाचा
पुनर्जन्म.
सजीवांच्या ….
जनक-जननींच्या
अनेक पूर्वपिढ्यातून
संक्रमित झालेलं
आनुवंशिक तत्वंच
अपत्यरुपानं अनेक
पुनर्जन्म घेत असतं
आनुवंशिक तत्व हाच
सजीवांचा आत्मा आहे.
तोच अपत्यरुपानं पुढच्या पिढीत
जन्म घेत असतो
आनुवंशिक तत्व
दोन जिवंत शरीरातून
तिसर्या जिवंत शरीरात
प्रवेश करतं ….
अेका मेलेल्या शरीरातून
दुसर्या जिवंत शरीरात नाही.
वासांसि जीर्णानि …. ।।गीता :: 2 :: 22।।
हा श्लोक
आत्म्याच्या आनुवंशिक सिध्दाताला
मान्य नाही
सजीव मेला की संपला
त्याचा या पृथ्वीवरील जन्म हा
पहिलाच आणि शेवटचाच असतो.
प्रेताची प्रत्येक पेशी
सडते विघटन पावते आणि
अणूरेणूंच्या स्वरूपात
पर्यावरणात विलीन होते.
जन्ममृत्यूचं हे चक्र नसून
जन्म-पुनर्जन्माची ही साखळी आहे.
हे ध्यानी घे, मनुजा…मानवा…
हे ध्यानी घे.
सजीव, वयात आला … म्हणजे जननक्षम झाला …. म्हणजे तो पुढच्या पिढीला जन्माला घालतो. पुढची पिढी आणखी पुढच्या पिढीला जन्माला घालते, पुढच्याच्या पुढची पिढी, पुढच्याच्या पुढच्याच्या पुढच्याच्या पुढची पिढी ….. ही साखळी, जोपर्यंत या पृथ्वीवर, सजीवांच्या अस्तित्वाला पोषक अशी परिस्थिती आहे तो पर्यंत चालू राहणार आहे आणि तोपर्यंत दोन जिवंत शरीरातून अेक चेतना, तिसर्या जिवंत शरीरात संक्रमित होत राहणार आहे हे ही विज्ञानीय सत्य आहे.
— गजानन वामनाचार्य
शनिवारचा सत्संग – ३
शनिवार १० डिसेंबर २०१६
सजीवांच्या शरीरातील आनुवंशिक तत्व
आत्म्याचा आनुवंशिक तत्व सिध्दांत
Leave a Reply