नवीन लेखन...

सत्य ठरलेलं स्वप्न -कोकण रेल्वे – भाग दोन

रेल्वेमुळे कमी खर्चात, बऱ्याच मोठ्या प्रमाणात अतिशय जलदपणे मालवाहतूक करता येते. पेट्रोल, डिझेलची बचत होते आणि हवेचं प्रदूषण टाळलं जातं. कोकण रेल्वेची ‘रो रो वाहतूक सर्व्हिस’ हे यामधले पुढचं पाऊल आहे. ही ६० ते ७० डब्यांची मालगाडी आहे. या मालगाडीत मालाने भरलेले ट्रक (ड्रायव्हर आणि क्लिनरसह) चढविले जातात. मुंबईजवळ कोलाड येथे या मालगाडीत ट्रक चढविले जातात व १८ ते २० तासांच्या प्रवासानंतर सुरतकल आणि अंकोला येथे ते उतरतात. पुढे इच्छित स्थळी पोहचतात. नाशवंत माल (फुले, फळे, भाज्या) लवकर आणि कमी पैशांत पोहचविण्याचा हा अभिनव उपक्रम आहे. २००७-२००८ या वर्षामध्ये कोकण रेल्वेच्या माल वाहतुकीतून २६९ कोटी रुपये, तर प्रवासी वाहतुकीतून २३२ कोटी रुपये उत्पन्न जमा झालं. १९९१ सालाच्या अंदाजाप्रमाणे संपूर्ण प्रकल्पाचा खर्च १५ वर्षांतील उत्पन्नातून भरून निघाला आहे. रोज जवळजवळ ५० प्रवासी गाड्या या मार्गावर धावत असतात. एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरलेल्या या कोकण रेल्वेची एकूण कर्मचारी संख्या ४१५१ इतकी कमी असून, १ कि.मी. रेल्वे अंतराला हे प्रमाण ४.६१ इतकं आहे; तर संपूर्ण भारतीय रेल्वेवर हेच प्रमाण १२.८७ इतकं आहे.

कोकण रेल्वेच्या मार्ग बांधणीमुळे दोन शहरांतील अंतर किती कमी झालं आहे याचा तक्ता अभ्यासनीय आहे.

मार्ग पूर्वीचा मार्ग (अंतर)    कोकण रेल्वे (अंतर)        बचत
१. मंगलोर-मुंबई २०४१ कि.मी. ९१४ कि.मी. ११२७ कि.मी.
२. मंगलोर-दिल्ली ३०३० कि.मी.

 

२२४९ कि.मी. ७८१ कि.मी.
३. कोचिन-मुंबई १८४९ कि.मी. १३३६ कि.मी. ५१३ कि.मी.

प्रवासाला लागणारा वेळ (तासांत)

मार्ग     पूर्वीचा मार्ग                  कोकण मार्ग                     बचत (तासांत)

 

१. मुंबई-मंगलोर ४१ तास १५ तास २६ तास

 

२. मुंबई-कोचिन ३६ तास २४ तास १२ तास

 

३. मुंबई-गोवा २० तास १० तास १० तास

महाराष्ट्रातील कोकण रेल्वे मार्गावरील कणकवलीच्या स्टेशनमास्तर म्हणून त्याच गावातील एक महिला श्रीमती माया पाटोळे या काम बघत असत. बारीक-सारीक तक्रारींचं निवारण करणं व बराच वेळ निर्मनुष्य स्टेशनावर देखरेख ठेवण्याचं चोख काम त्या कसोशीने करीत. आपल्या गावाचं रेल्वेमुळे भलं झालं आहे, या भावनेमुळे त्यांना स्टेशन सांभाळण्यात भरपूर आनंद मिळाला आहे.

गोव्यातून कर्नाटकातील उडपी रेल्वेमार्ग सुरू झाला आणि गोव्यातील काणकोण स्टेशनजवळील दारूच्या गुत्त्याचं नशीबही फळफळलं. दुपारी उडपीहून निघणाऱ्या गाडीतून मद्यशौकीन या स्टेशनपर्यंत येत. कारण, कर्नाटकपेक्षा इथे दारू बरीच स्वस्त होती. संध्याकाळी मद्यप्राशन करून रात्रीच्या गाडीने ही मंडळी आपापल्या घरी मुक्कामास परतत.

या मार्गावरील एका खेड्यातील आजीबाईंनी रेल्वे कधीच पाहिली नव्हती. लग्न होऊन दुसऱ्या गावात राहण्यास गेलेल्या आपल्या मुलीच्या घरापर्यंत रुळांवरून धावणारी ही गाडी जाते हे ऐकून त्या अचंबितच झाल्या. एरवी तिच्या गावाला जाण्याचा रस्ता चांगला ४ ते ५ तासांचा होता. खाच-खळग्यांच्या रस्त्यानं सर्व्हिस मोटारने जाणं क्रमप्राप्त असे. पावसाळ्यात तर हाल विचारूच नका. आता मात्र कोकण रेल्वेमुळे मुलगी १ तासाच्या प्रवासाएवढी जवळ असल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसू लागला.

कोकणी माणसांना, कोकणातील प्रदेशांना, अन्य जणांच्या जवळ आणणाऱ्या कोकण रेल्वेनं प्रवास करणं ही एक अक्षरशः वेगळीच अनुभूती असते. त्यातही पावसाळा संपता संपता कोकण रेल्वेचा प्रवास करणं म्हणजे निसर्गाच्या विविध रूपांची नुसती उधळण वेचून घेऊन प्रवास करणं असतं. हिरव्यागार भातशेतीच्या खाचरांमधून साचलेलं मातकट पाणी, भुरभुरत्या पावसात डोक्यावर कांबळ (इरली) घेऊन काम करणारा शेतकरी, दूरवर पसरलेल्या हिरव्यागार डोंगररांगा, हा सर्व आनंद लुटायचा असेल तर डब्याच्या दाराजवळ उभं राहावं, गार वारा पीत हा खेळ पाहावा. या क्षणांची मजा काही और आहे. मुंबईहून रत्नागिरीकडे जाताना चिपळूण सुटलं, की निसर्गाचं रूप एकदम पालटतं. लाल माती व कातळीचे डोंगर थेट रेल्वे लाईनला भिडलेले. खळाळत वाहणारे छोटे-मोठे ओहोळ, दूरवर छोट्या खेड्यांत जाणाऱ्या तांबड्या मातीच्या पाऊलवाटा, अगदी रेल्वेरुळांना चिकटलेली हिरवी रोपटी, हे सर्व कापत अकराळ-विकराळ, तांबूस, पिंगट, काळपट अशा विविध रंगछटांच्या डोंगर-कपारीतून मार्ग काढत गाडी भोकेवाडीच्या बोगद्यात शिरते. काळ्यामिट्ट अंधारात डोंगर-कपारींच्या कडा डब्यावर चाल करून येतात. गाडीचा रुळांवरील घनगर्जनेचा घुमणारा आवाज छातीचे ठोके चुकवितो. मध्येच इंजिनाच्या जोरदार शिटीचा आवाज त्यात मिसळल्यावर आपला प्रवास कुठे चालला आहे हेच क्षणभर कळेनासं होतं. दहा मिनिटं अंधार आपला सोबती असतो, पण तो हवाहवासा वाटतो, आपला प्रवास असाच चालू राहावा असं वाटू लागतं आणि गाडी बघता बघता रत्नागिरी स्टेशनात शिरते. कोकणातील सर्वच स्टेशन चकाचक, स्वच्छ आहेत. तुरळक माणसांच्या स्वस्थ हालचालींची जाग असलेली ही स्टेशनं वातावरणामुळे मनाला समाधान देतात, पुन:पुन्हा येण्यासाठी आमंत्रण देत राहतात.

या कोकण रेल्वेचा प्रवास म्हटलं, की आजही एक आठवण मनात हमखास जागी होते. मुंबईकडे जाणाऱ्या मांडवी एक्सप्रेसच्या प्रतीक्षेत कुडाळ रेल्वे स्टेशनावर आम्ही आठ जण उभे होतो. दिवस पावसाळ्याचे होते, पण आकाश निरभ्र होतं. गाडी सव्वीस डब्यांची असणार होती आणि प्रत्येक क्रमांकाचा डबा कुठच्या जागी येणार याचे इंडिकेटर संपूर्ण प्लॅटफॉर्मवर नीट लावलेले होते. आम्ही वाट बघत होतो. काही मिनिटांतच अनपेक्षितपणे आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली. हा हा म्हणता सरीच्या सरी कोसळू लागल्या आणि आम्ही सर्वजण बॅगांसह नखशिखांत ओलेचिंब झालो. गाडी काही येता येत नव्हती. आम्ही हैराण… आणि एकदाचं इंजिन दिसलं, आम्ही डब्यात शिरलो… जवळजवळ संपूर्ण डबा रिकामा होता. जणू तो आमचाच राखीव डबा होता. ओलेचिंब कपडे वाळविण्यासाठी जागाच जागा होती. भिजलेले असूनही आम्ही सुखावलो. जरा विसवतो, तो खानपानाचा मारा सुरू झाला. मांडवी एक्सप्रेसमध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थांइतके विविध पदार्थ भारतातील कोणत्याच गाडीत बघितले नव्हते. पोहे, भजी, उपम्यापासून मटण, चिकन ते मसाला दूध अशा तब्बल बावन्न पदार्थांनी दहा तासांत हजेरी लावली होती.

स्टेशनवर पावसानं केलेली फजिती अलगद मागे पडली होती आणि सुरू झाला होता जिव्हासुख देणारा आणि नेत्रसुखद कोकण रेल्वेचा प्रवास! कोकण रेल्वेच्या ‘घडण्याचा प्रवास मनात आठवत हा रेल्वेप्रवास करणं हे तर आणखीनच सुखद असतं.

-डॉ. अविनाश वैद्य

Avatar
About डॉ. अविनाश केशव वैद्य 179 Articles
भटकंतीची आवड. त्यावरील अनेक लेख गेली २० वर्षे अनेक मासिकात प्रसिद्ध केले आहेत. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १) मलेरिया - कारणे उपाय मराठी विज्ञान परिषद पारितोषक २) रेल्वेची रंजक सफर - मनोविकास प्रकाशन. मी विविध विषयावर लेख प्रसिद्ध करू इच्छीत आहे. डास. लहानपणच्या आठवणी रेल्वे फोटोग्राफी आवड ज्येष्ठ नागरिक संघ मकरंद सहनिवास गेली १८ वर्षे चालवीत आहे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..