गुन्हेगाराकडून सत्य वदवण्यासाठी विविध पद्धतींचा वापर केला जातो. या पद्धती वेगवेगळ्या तत्त्वांवर आधारलेल्या आहेत. काही पद्धती रसायनांचा वापर करतात, तर काही पद्धती इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात. प्रत्येक पद्धतीचे फायदे-तोटे आहेत, तसेच प्रत्येक पद्धतीला स्वतःच्या मर्यादा आहेत. सत्याचा शोध घेऊ पाहणाऱ्या या विविध प्रचलित पद्धतींची थोडक्यात ओळख करून देणारा हा लेख…
मराठी विज्ञान परिषदेच्या ‘पत्रिका’ या मासिकातील शीतल चिपळोणकर यांचा हा पूर्वप्रकाशित लेख
काही दिवसांपूर्वी एका राजकारणी व्यक्तीच्या नार्को चाचणीची एक चित्रफीत दूरचित्रवाणीवरील बातम्यांमध्ये अनेक वेळा दाखवली जात होती. पांढऱ्या कोटातील डॉक्टर, चिकित्सक आणि इतर अधिकारी बराच वेळ त्या अर्धवट शुद्धीतील व्यक्तीकडून ‘सत्य’ वदवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होते. ती चित्रफीत पाहून मनात विचार आला, की एक सनसनाटी खबर देण्याव्यतिरिक्त या नाक चाचण्या किंवा अशाच प्रकारच्या इतर चाचण्यांचा खरेच किती उपयोग होत असावा? सत्याच्या शोधात केल्या गेलेल्या या चाचण्यांमागील सत्य किती लोकांना ठाऊक आहे?
‘नार्को (गुंगी येणे) या ग्रीक भाषेतील शब्दापासून ‘नार्को चाचणी’ हे शब्द तयार झाले. १९२० सालाच्या सुमारास रॉबर्ट हाउस हे अमेरिकन स्त्री-रोगतज्ज्ञ गर्भवती स्त्रियांना प्रसूतीच्या वेळी वेदना कमी करण्यासाठी ‘मॉर्फिन’, ‘स्कोपोलामिन’ अशी औषधे देऊन निद्रावस्था देत असत. मॉर्फिनमुळे जे मळमळणे, उलटी होणे इत्यादी दुष्परिणाम होतात, ते स्कोपोलामिनमुळे कमी होत असत. परंतु, यामुळे निद्रेचे प्रमाण वाढत असे. रॉबर्ट हाउसच्या असे लक्षात आले, की स्कोपोलामिन दिल्यामुळे, निद्रावस्थेतही स्त्रिया विचारलेल्या प्रश्नांची बरोबर उत्तरे देत; एवढेच काय, पण आपली प्रांजळ मतेही त्या रॉबर्ट हाउस यांच्याकडे उघडपणे व्यक्त करीत. पुढे रॉबर्ट हाउस यांनी दोन कैद्यांवर या औषधांच्या इंजेक्शनचा वापर केला. या औषधांच्या प्रभावाखालील त्या दोन कैद्यांनी आपण निर्दोष असल्याचे सांगितले. पुढे न्यायालयामध्ये त्यांच्या निर्दोषपणाचे पुरावे मिळून त्यांची सुटकाही झाली.
इ.स. १९३०मध्ये विल्यम ब्लेकवेन या मानसशास्त्रज्ञांनी ‘कॅटाटोनिक स्क्रिझोफेनिआ’ हा विकार जडलेल्या रुग्णांमध्ये या चाचणीचा वापर केला. नसेमधून ‘सोडियम एमिटल’ नावाच्या औषधाचे इंजेक्शन दिले असता, मूग गिळून बसलेला रुग्ण घडाघडा बोलू लागतो, हे विल्यम ब्लेकवेन यांनी दाखवून दिले. हा परिणाम तात्पुरता असला, तरी या औषधामुळे निर्माण होणाऱ्या संमोहन-स्थितीद्वारे रुग्णाच्या कल्पनाविश्वात जाऊन त्याच्याशी बातचीत करणे शक्य होऊ लागले. त्यानंतर रुग्णाला बोलते करण्यासाठी सोडियम एमिटल किंवा सोडियम पेंटोथाल या औषधांचा वापर सुरू झाला. ही औषधे सामान्य लोकांमध्ये ‘टूथ सिरम’ या नावाने प्रसिद्ध झाली. बरेच मानसोपचारतज्ज्ञ मानसोपचाराखाली असणाऱ्या रुग्णाशी संवाद साधण्यासाठी या औषधांचा सर्रास वापर करू लागले.
दुसऱ्या महायुद्धानंतर, मानसिक संतुलन गमावलेल्या अनेक सैनिकांवर उपचारार्थ या टूथ सिरम औषधांचा वापर होऊ लागला. या औषधांच्या प्रभावाखाली सैनिकांना बोलते केले जाई. त्यामुळे त्यांचे मन हलके होण्यास मदत होत असे. त्याच वेळी त्यांच्या मनांवर सकारात्मक विचार बिंबवले जात. काही रुग्णांना त्याचा फायदा होई. मात्र, प्रमाणाबाहेर वापर केला असल्यास, या औषधांमुळे रक्तदाब कमी होणे, प्रसंगी कोमा आणि मृत्यूचा संभवही असतो. म्हणून ब्लेकवेनने आपल्या पुढील संशोधनानुसार, ‘पिक्रोटॉक्सिन’ नावाचे औषध त्यावर उतारा म्हणून सुचवले. परंतु पिक्रोटॉक्सिनमुळे आकडी येत असल्याचे आढळल्यावर त्याचा वापर पुढे बंद झाला. मात्र, या सर्व संशोधनाचा परिणाम एक झाला. रुग्णांचे वा मानसिक संतुलन गमावलेल्यांचे मन मोकळे करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या औषधांचा कालांतराने न्यायवैद्यक शास्त्रात वापर सुरू झाला. संशयित गुन्हेगारांकडून सत्य वदवून घेण्यासाठी या औषधांचा वापर केला जाऊ लागला. त्यातूनच नार्को चाचणी अस्तित्वात आली.
उलटतपासणीमध्ये गुन्हेगार पकडले जाऊ या भीतीने गुन्ह्याचा तपशील अथवा घटनाक्रम लपवतात, अथवा कल्पनाशक्तीच्या आधारे उलटसुलट माहिती पोलिसांना देतात. कधीकधी पूर्णपणे मौन धरतात. अशा वेळेस नार्को चाचणी करून त्या व्यक्तीला संमोहनाच्या वेगवेगळ्या पातळ्यांवर नेले जाते. व्यक्तीचे वय, लिंग, वजन, त्या व्यक्तीला असलेले आजार इत्यादींचा विचार करून नार्को चाचणीचा डोस ठरवला जातो. या नार्को चाचणीकरिता शरीरात नसेमधून सोडियम पेंटोथाल हे रसायन सोडले जाते. ही चाचणी करताना, मानसोपचारतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, फिजिशिअन हजर असतात. शरीरात सोडलेल्या सोडियम पेंटोथालमुळे मेंदूची विचारशक्ती कमी होते. त्यामुळे सदर व्यक्ती लपवाछपवी न करता सत्य उघड करेल अशी अपेक्षा असते.
बऱ्याच वेळा कमजोर मनाच्या व्यक्ती या सूचनांना अधिकाधिक प्रतिसाद देऊ लागतात अथवा भावुक होऊ शकतात. अशा व्यक्तींच्या बाबतीत, तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी विशिष्ट पद्धतीने प्रश्न विचारल्यास त्या व्यक्तीकडून योग्य उत्तरे मिळू शकतात. परंतु, अनेक वेळा या संभाषणात व्यक्तिगत इच्छा, भास, संघर्ष, भ्रम, गैरसमज, स्वप्ने यांचा प्रभाव दिसतो. काही सराईत गुन्हेगार अथवा प्रशिक्षित कमांडो तर अशा नार्को चाचण्यांना संमोहित अवस्थेतही दाद देत नाहीत आणि खरी माहिती गुप्तच राहते. या चाचणीकरिता वापरल्या जाणाऱ्या औषधाच्या कंपनीने कधीही असा दावा केलेला नाही, की ते इंजेक्शन दिल्यावर एखादी व्यक्ती रसायनांच्या साहाय्याने संमोहित करून सत्य वदवून घेण्याबरोबरच, विज्ञान आणि तंत्रज्ञानातील इतर पद्धतींचाही वापर करण्याचे प्रयत्न याचबरोबर सुरू झाले. विज्ञानातील प्रगतीमुळे मानवी शरीराचा आणि मानवी मनाचा अधिकाधिक अभ्यास होत गेला. मेंदूचे विविध कप्पे आणि त्यांतून उत्पन्न होणाऱ्या विद्युत्लहरी यांची माहिती मिळत गेली. गुन्ह्याचा तपास करताना, न्यायवैद्यकशास्त्र याच माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करते. एखाद्या गुन्ह्यासंबंधी चौकशी करताना संशयित व्यक्तीचा खरेखोटेपणा पडताळून पाहण्यासाठी अथवा घटनेबद्दल अधिक माहिती, धागेदोरे मिळवण्यासाठी आजकाल नार्को चाचणीव्यतिरिक्त या माहिती तंत्रज्ञानावर आधारलेल्या इतर चाचण्याही वापरल्या जातात. ‘पॉलिग्राफ’ आणि ‘ब्रेन फिंगरप्रिन्टिंग’ (ब्रेन वेव्ह मॅपिंग) या चाचण्यांचा यात समावेश होतो. मात्र, या चाचण्यांना शास्त्रीय आणि तांत्रिक आधार असूनही त्यात अनेक त्रुटी आढळतात. या चाचण्या करण्याबद्दल मानवी हक्कासंबंधीचे आणि नैतिकतेच पुष्कळ वाद निर्माण झाले आहेत.
सत्य वदवून घेण्यासाठी, तंत्रज्ञानावर आधारलेली एक पद्धत म्हणजे पॉलिग्राफ. पूर्वी ‘लाय डिटेक्टर’ म्हणून ओळखले जायचे तेच हे यंत्र! पॉलिग्राफ या शब्दाचा अर्थ ‘अनेक नोंदी’. हे यंत्र, खोटे बोलताना शरीरात होणाऱ्या विविध बदलांची नोंद घेते. या पद्धतीचा वापर एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस, प्रथम झाला. वैद्यकतज्ज्ञ आणि गुन्हेविश्लेषक असणाऱ्या, इटलीच्या सिझारे लॉम्ब्रोसो यांनी खोटे बोलणाऱ्या व्यक्तीच्या रक्तदाबात आणि हृदयाच्या ठोक्यांत पडणारा फरक टिपणारे यंत्र तयार केले होते. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर, अमेरिकेतील हार्वर्ड येथील मानसशास्त्रज्ञ विल्यम मार्सटन यांनी हेरगिरीच्या संदर्भातील माहितीतील तथ्य ओळखण्यासाठी अशाच प्रकारचे एक यंत्र तयार केले. विल्यम मार्सटन यांनी तयार केलेल्या या यंत्रात अमेरिकेतील पोलिस अधिकारी जॉन लार्सन, लिओनार्ड कीलर यांनी, मापन करता येणाऱ्या इतर विविध शारीरिक बदलांची भर घालून, गुन्हे अन्वेषणाच्या दृष्टीने या यंत्राला स्वीकारार्ह स्वरूप दिले.
एखादी अपराधी व्यक्ती खोटे बोलत असेल वा त्या अपराधी व्यक्तीने गुन्ह्याबद्दलचा तपशील लपवला असेल, तर ती व्यक्ती मानसिकदृष्ट्या एका उच्च स्थितीत (हायपर अराउजल) असल्याचे गृहीत धरले जाते. अशा वेळी त्या व्यक्तीच्या शरीरातील अॅड्रेनल ग्रंथींद्वारे ‘ॲड्रेनॅलिन’ या रसायनाची निर्मिती होते. हे रसायन त्या व्यक्तीच्या शारीरिक स्थितीत अनेक बदल घडवून आणते. आपल्या शरीरातील एक प्रकारची चेतासंस्था त्यास जबाबदार असते. पॉलिग्राफ यंत्राद्वारे या शारीरिक बदलांची नोंद केली जाते. त्यानुसार, एखाद्या व्यक्तीची चौकशी करताना, त्याच्या शरीराला अनेक संवेदक जोडून, त्या व्यक्तीचा रक्तदाब, त्याच्या हृदयाची गती, श्वासोच्छ्वास, त्वचेची विद्युत्वाहकता, स्नायूंचा विद्युत् आलेख, इत्यादींचे मापन करून हे यंत्र त्या व्यक्तीच्या मानसिक चढउतारांचा आलेख बनवते. तज्ज्ञ हा आलेख पाहून त्या व्यक्तीच्या बोलण्यातील खरे-खोटेपणाचा अंदाज बांधू शकतात. परंतु, मानसिक तणाव, चिंता, भीती, मानसिक गोंधळ, नैराश्य, रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होणे, अथवा उत्तेजक पदार्थांचे सेवन, या आणि अशा विविध कारणांमुळे पॉलिग्राफद्वारे चुकीचे आलेख मिळण्याची शक्यता असते. यामुळे तज्ज्ञांचे अंदाज चुकूही शकतात.
सत्य शोधून काढण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारी आणखी एक पद्धत म्हणजे ‘ब्रेन फिंगरप्रिन्टिंग’ किंवा ‘ब्रेन वेव्ह मॅपिंग’ मेंदूमध्ये साठवलेल्या माहितीचा थेट शोध घेणारी ही चाचणी आहे. जैविक मानसशास्त्राच्या क्षेत्रात तज्ज्ञ असणाऱ्या अमेरिकन शास्त्रज्ञ लॅरी फेअरवेल यांनी ही पद्धत गेल्या शतकाच्या अखेरीस विकसित केली असून त्याचे एकस्वही त्यांना मिळाले आहे. ही चाचणी करण्यासाठी, संशयित व्यक्तीच्या डोक्यावर अनेक ठिकाणी इलेक्ट्रोडच्या स्वरूपातील संवेदक बसवले जातात. मेंदूतील विविध भागांतून येणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या विद्युत्लहरी आलेखाच्या स्वरूपात या संवेदकांद्वारे नोंदवल्या जातात.
या चाचणीत संशयिताला गुन्ह्याशी संबंधित छायाचित्रे, आवाज आणि वस्तू दाखवल्या जातात. त्याचबरोबर त्या व्यक्तीला गुन्ह्याशी संबंधित नसलेल्या वस्तूही दाखवल्या जातात. गुन्ह्याशी निगडित वस्तू पाहून संशयित व्यक्तीच्या मेंदूतून ‘पी३००’ या नावे ओळखल्या जाणाऱ्या विद्युत्लहरी निर्माण होतात. एखाद्या विशिष्ट घटनेचा तपशील हा मेंदूतील ‘हिप्पोकॅम्पस’ या भागात साठवला जात असतो. त्यामुळे, गुन्ह्याशी संबंधित वस्त दाखवल्यावर, हिप्पोकॅम्पसमधून पी३०० या विद्युत्लहरी सर्वाधिक प्रमाणात निर्माण होतात. ज्या वस्तूंचा गुन्ह्याशी संबंध नाही, अशा वस्तू दाखवल्यानंतर मात्र अशा लहरी निर्माण होताना दिसत नाहीत. या चाचणीमध्ये मेंदूवर होणाऱ्या संबंधित परिणामाची विश्वासार्हताही दाखवली जाते. ती जेव्हा ९९ टक्के इतकी असेल, तेव्हा ती व्यक्ती गुन्ह्याबद्दल अधिक तपशील देऊ शकेल, असे खात्रीलायकरीत्या सांगता येते. या चाचणीतून त्या व्यक्तीने गुन्हा केला आहे की नाही, हे मात्र सिद्ध होऊ शकत नाही. ती व्यक्ती, गुन्ह्याशी फक्त संबंधित आहे आणि ती गुन्ह्याशी संबंधित काही गोष्टींबद्दल अधिक माहिती देऊ शकेल, ही गोष्ट मात्र समजते.
या व अशा विविध चाचण्यांमुळे पोलिसांना गुन्ह्यासंबंधी धागेदोरे मिळण्याची शक्यता असली, तरी खात्रीलायक पुरावे मात्र अभावानेच मिळतात. संशयित व्यक्ती आणि न्यायालयाच्या परवानगीनंतरच अशा चाचण्या होऊ शकतात. पक्षाघात, मनोरुग्ण, इत्यादींमध्ये पॉलिग्राफ किंवा ब्रेन फिंगरप्रिन्टिंगसारख्या चाचण्यांचे विश्लेषण गुंतागुंतीचे ठरते. तसेच, या चाचण्यांत अनेकदा वेळेचा अपव्ययही होतो. नार्को चाचणीदरम्यान दिलेली उत्तरे अर्धवट शुद्धीत दिली गेलेली असल्यामुळे, ती भारतातच काय, पण जगातील कोणत्याच न्यायालयात पुरावा म्हणून ग्राह्य धरली जात नाहीत.
समाजातील वाढती गुन्हेगारी पाहता, वैज्ञानिकांच्या अथक प्रयत्नांना यश येणे आवश्यक आहे. सध्या अस्तित्वात असणाऱ्या चाचण्या जरी गुन्ह्याचा तपास करण्याच्या दृष्टीने पूरक असल्या, तरी त्यांना मर्यादा आहेत, तसेच त्यांत पळवाटाही आहेत. त्यामुळे शास्त्रज्ञ यापेक्षाही अचूक चाचण्यांच्या शोधात आहेत. अशी गुरुकिल्ली मिळाली, तरच गुन्हेगारांच्या अनाकलनीय मनांची कवाडे उघडू शकतील.
शीतल चिपळोणकर
वैद्यकतज्ज्ञ
drsheetalchiplonkar@gmail.com
मराठी विज्ञान परिषदेच्या ‘पत्रिका’ या मासिकातील हा पूर्वप्रकाशित लेख
Leave a Reply